होंगे कामयाब होंगे कामयाब,हम होंगे कामयाब एक दिन
हो हो हो मन मे है विश्वास,पुरा है विश्वास
हम होंगे कामयाब एक दिन
सध्या कोरोनानामक महामारीच्या सावटाखाली आपण आहोत. ह्या परिस्थितीतून सुखरूप बाहेर येणार आहोतच. सद्यस्थितीचे वर्णन वाचतांना सुद्धा अंगावर काटा येतो. देशात आज ४४ लाख रुग्णांचा आकडा पार केला असून कोरोना संक्रमणात आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. त्यात गेल्या काही आठवड्यांमध्ये मुंबईबाहेर विशेषतः पुणे, नागपूर येथे संक्रमितांचा आकडा वाढत आहे.
ह्याच धर्तीवर नागपुरात कोरोनासंक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने ने मोठ्या प्रमाणात तपासण्या सुरु केल्या आहेत. संशयितांचे वेळेत झालेले परीक्षण हे प्रसार रोखणे आणि कोरोनाचा मृत्युदर कमी करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न चांगला आहेच. परंतु सध्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारी व्यवस्थाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. म्हणूनच एनएमसीने सामाजिक संघटनांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोक कल्याण समितीने एनएमसीच्या साथीने "मिशन विश्वास" मोहीम हाती घेतली. हे काम मुळात खूप वेगळं आहे. आपत्तीच्या वेळी संघाचे कार्यकर्ते आणि संघटन देशपातळीवर व्यापक योजना आखण्यात आणि त्यावर काम करण्यासाठी सदैव तत्पर असतेच. ह्याचा एक भाग म्हणून रा.स्व.संघ लोककल्याण समितीचे कार्यकर्ते एनएमसीच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत कोरोना रुग्णांची सूची तयार करतात. या नंतर रुग्णांना तातडीने चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. हवी तशी मदतही करण्यासाठी कार्यकर्ते तयार आहेत.
प्रसंगानुरूप रुग्णांच्या कुटुंबियांना दैनंदिन आवश्यक वस्तू, औषधे स्वयंसेवकांकडून पुरवली जातात. त्यांच्याशी फोनवर संवाद साधतांना जी माहिती मिळते ती निःशब्द करणारी आहे. दररोज नवा अनुभव मिळत असतो. ही अनुभवांची शिदोरी ही रोज नवा विचार देत असते. साधारणपणे १ तास जातो हे करायला. रोज ५ हुन अधिक व्यक्तींना फोन करून विचारपूस करण्याचा प्रयत्न असतो. मागील काही दिवसात १५ हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेण्यात स्वयंसेवकांना यश आले आहे. ह्या अनुभवांवर ही स्वतंत्र लेखन होईल इतके अनुभव रोज येत असतात.
मेडिकलच्या टीम बरोबर संघाचे आरोग्य विषयक असलेले सेवांकुर आयाम मधील कार्यकर्ते ही काम करतांना दिसत आहेत. महानगरपालिकेच्या प्रभागात काही जण प्रत्यक्ष जाऊन प्रसंगी आपला जीव धोक्यात घालत मिशन विश्वास मध्ये कार्य करत आहेत. आपले काम करताना कार्यकर्ते शारिरीक अंतर राखत असून फेस मास्क, फेस शिल्ड, हँड सॅनिटायझर आदी सर्व सुरक्षिततेच्या साधनांचा उपयोग करीत आहेत. आपल्या नेमलेल्या कामासह कोरोनापीडित आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनोबल उंचावण्याचे काम करतांना सद्यस्थितीबद्दल ऐकतांना आणि वाचतांना वाईट वाटतं. आपण एवढ्या मोठ्या महामारीसाठी एकत्र येण्याची हीच वेळ आहे. शेवटी एवढंच म्हणावेसे वाटते..
निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूलें !
स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूलें !!
✍️ सर्वेश फडणवीस
#मिशन_विश्वास #RSSorg #NMC
No comments:
Post a Comment