वाढदिवसाच्या दिवशी पुस्तके घेण्याची सवयच लागली आहे. सवयीचा भाग म्हणून ह्यावर्षी साहित्य प्रसार केंद्रात गेल्यावर मारुती चितमपल्ली ह्यांची पुस्तकं आणली. खरंतर कथा,कादंबरी,ललित ह्यानंतर चौथा प्रकार म्हणजे चितमपल्ली सरांची पुस्तकं आहेत. सहज,सोपी भाषा आणि अरण्याचे दर्शन,जंगलाची ओळख हा त्यांच्या लेखनशैलीचा बाज मनाला स्पर्शून जाणारा आहे. विदर्भ आणि इथली वनसंपदा येथील जंगल ह्यामुळे वाचतांना जी सहजता जाणवते ते शब्दांतीत आहे आणि चितमपल्ली ह्यांच्या पुस्तकांतील निसर्ग त्यांच्या लेखणीतून अजून वेगळा आनंद देणारा ठरतो.
नुकतंच "रानवाटा"पुस्तक वाचून संपले. रानवाटेच्या विश्वात दोन दिवस कसे गेले समजले नाहीच. साहित्य प्रसार केंद्र या प्रकाशनाची पुस्तक रुपात भेट होणे हा ही अनुभव छान आहे. अत्यंत सुबक मांडणी, सुटसुटीत छपाई, चांगला कागद आणि तितकंच वेळोवेळी दर्जेदार साहित्य प्रकाशित करणं ही या प्रकाशनाची वैशिष्ट्येच म्हणावी लागतील. १५० पानी पुस्तकांत १५ लेखाचे हे एकप्रकारे संकलनच आहे. विविध वृत्तपत्र, दिवाळी अंकांसाठी लिहिलेले लेखाचं एकत्रित केलेला रानफुलांचा गुच्छ असंच म्हणता येईल असे हे पुस्तक आहे. १९९१ साली महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त असे पुस्तक रानवाटा. अतिशय आटोपशीर प्रस्तावना स्वतः चितमपल्ली ह्यांनी लिहिलेली आहे. निसर्गाच्या भावविश्वाला शब्दांत मांडण्याची किमया ही फार कमी जणांना लाभली आहे त्यात चितमपल्ली अग्रक्रमावर म्हणता येईल इतके सहज लेखन त्यांच्या लेखणीत जाणवते.
रानवाटा पुस्तकांत महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या प्रदेशातील वन्यजीवनाचे बारकावे टिपलेले आहेत. वन विभागात असल्याने चितमपल्ली ह्यांनी जंगल पिंजून काढले आहेत. त्यांच्या आईला रानवाटांची माहेरओढ होती तिचा तो वसा घेऊनच त्यांनी तीन तप रानवाटेने भटकंती केलेली आहे. डॉ.सलीम अली ह्या जगप्रसिद्ध पक्षिशास्त्रज्ञाशी निकटचा संपर्क आल्याने "पक्षीनिरीक्षण" ह्या लेखात त्यांनी अनेक बारकावे टिपले आहेत. खरंतर सामान्यपणे जंगलात गेल्यावर वाघ दिसावा ह्या आशेनं जाणाऱ्या प्रत्येकाला चांगलाच धडा मिळणार आहे. कारण "अरण्यवाचन" ह्या नावाने स्वतंत्र लेखन चितमपल्ली ह्यांनी ह्या पुस्तकांत केले आहे. "पाडस" ह्या लेखात भामरागड आणि माडिया गोंड आदिवासींच्या विषयीं चांगली माहिती दिली आहे. १९७८ साली डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ.मंदाकिनी आमटे ह्यांच्याविषयी ऐकून,प्राणिसंग्रहालयाविषयी जाणून त्यांनी घेतलेली भेट आणि त्या संपूर्ण परिसराविषयी जे वर्णन करून ठेवले आहे ते जास्त भावले कारण नुकतंच हेमलकसा येथे भेट दिल्यामुळे ही असेल पण १९७८ साली परिस्थितीचा विचार करता अंगावर काटा येतो आणि त्यावेळी ह्या पती-पत्नी ह्यांनी ज्या ध्येयाने प्रेरित होऊन कार्य सुरू केले ते ही स्वप्नांच्या पलीकडचे आहे हे वाचतांना आपण अभिमानाने काही काळ भारावून जातो.
रानवाटा वाचून वन्यजीवन,जंगलभटकंती,पक्षीनिरीक्षण, रानातील घर,प्राणी आणि पक्षांच्या विविध प्रजाती,झाडांची माहिती ह्याची सुंदर अनुभूती वाचकाला मिळते. पुस्तकाच्या शेवटच्या पानावरील "जो माणूस वनात रमतो,चाफा त्याच्या मनात फुलतो" ही ओळ मनात घर करून जाते. साहित्य प्रसार केंद्राचे मकरंद कुलकर्णी ह्यांनी कैद केलेलं मुखपृष्ठ ही देखणे आहे. वाचनीय आणि संग्रही असे पुस्तक - "रानवाटा".
रानवाटा - मारुती चितमपल्ली
साहित्य प्रसार केंद्र
₹ २००
✍️ सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment