आज ज्यांच्या बद्दल लिहायला घेतोय त्या आहेत मुक्ता पुणतांबेकर. त्यांची ह्या माध्यमातील प्रत्येक पोस्ट सकारात्मकता देणारी असते. मुक्तांगण सारख्या व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करणारे डॉ.अनिल अवचट आणि डॉ.अनिता अवचट. साहित्यिक म्हणून परिचित असलेले अनिल अवचट असंख्य व्यसनी लोकांना नवजीवन देणारे त्यांचे 'बाबा' म्हणूनही आज परिचित आहेत. चौतीस वर्षांपूर्वी त्यांनी लावलेला मुक्तांगणचा वटवृक्ष चांगलाच बहरला आहे आणि आज मुक्ता पुणतांबेकर ही डॉ. अनिल व अनिता अवचट ह्यांची कन्या त्याच आत्मीयतेने मुक्तांगणचा सांभाळ करते आहे.
खरंतर मुक्तांगणची प्रवास म्हणावा तसा सोपा नव्हता. जवळ पैसे नव्हते. खूप अडचणींना सामोरे जात मुक्तांगण उभे राहिले आणि आज एक रोल मॉडेल म्हणून ही वास्तू उभी आहे. हा प्रवास खरंतर शून्यातून सुरू झाला आहे. त्याच्या स्थापनेचा इतिहासही रंजक आहे. मुंबईत केईएम रुग्णालयात डॉ.आनंद नाडकर्णी व्यसनमुक्ती प्रकाराचा प्रयोग करत होते, आणखी एक दोन हॉस्पिटलमध्ये व्यसनमुक्ती केंद्र सुरु होती, मात्र केईएम वगळता बाकीची केंद्रे बंद पडली होती. पुढे डॉ.आनंद नाडकर्णी ह्यांच्याशी चर्चा करून,त्यांच्या कामाचे प्रत्यक्ष स्वरूप बघून डॉ.अनिल अवचट आणि मानसोपचार तज्ञ असलेल्या त्यांच्या पत्नी डॉ.अनिता अवचट ह्यांनी २९ ऑगस्ट १९८६ रोजी सर्व तयारीनिशी मुक्तांगणची स्थापना केली. खुद्द पु.ल.देशपांडे आणि सुनीताबाई उद्घाटनाला आले आणि पु.ल. ह्यांनी शुभेच्छा देतांना हे केंद्र लवकर बंद व्हावे हीच अपेक्षा ठेवली.
आज मुक्तांगणात समाजातील सर्व स्तरातील, तसेच गुन्हेगारी क्षेत्रातले रुग्ण आहेत. त्या सर्वांना एकसारखी वागणूक दिली जाते. स्वावलंबित्व शिकवले जाते. त्यांच्याकडून सर्व प्रकारची कामे करून घेतली जातात. काम करायला कर्मचारी मिळतोय म्हणून नाही, तर व्यसनी रुग्णाला कामात सतत गुंतवून ठेवणे, हा त्यामागील शुद्ध हेतू असतो. रिकाम्या डोक्याने वावरणाऱ्या व्यसनी माणसाला वारंवार व्यसन करण्याची इच्छा होऊ शकते म्हणून त्याच्या हाताला आणि मेंदूला काम देण्याचा मुक्तांगणचा अट्टहास असतो.सुरुवातीला काही दिवस रुग्णाची खूप चिडचिड होते, पण ते नंतर एवढे तयार होतात की आपणहून प्रत्येक कामासाठी पुढाकार घेतात. मुक्ता ताईंच्या एका मुलाखतीत एका रुग्णाचा अनुभव ऐकला त्यात ते सांगतात की आज व्यसनमुक्ती मुळे हाताला मिळेल ते काम करतो, मग तो विचारही मनात येत नाही.
आज मुक्तांगणात आलेल्या रुग्णांना दारू न पिताही एकत्र बसता येते, ह्याचे कारण म्हणजे तेथील घरगुती वातावरण आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये जसे खेळीमेळीचे वातावरण असते,तसेच मुक्तांगण येथे आहे. इथे येणारे रुग्ण खरंतर वेगवेगळ्या क्षेत्रातले असतात, कोणी कलाकार तर कोणी कवी,कोणी गायक तर कोणी वकील. जे त्यांच्या व्यसनापायी घरच्यांच्या आणि समाजाच्या नजरेतून उतरलेले असतात असा प्रत्येकजण इथे येत असतो. मुक्तांगणमध्ये मात्र त्यांना त्यांचा मान परत मिळवून दिला जातो. त्यांचीच ओळख त्यांना नव्याने करून दिली जाते,जगण्याची उमेद जागवली जाते. त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. त्यामुळे इथून व्यसनमुक्त झालेले रुग्ण नवीन आयुष्याची पुन्हा नव्याने त्याच जिद्दीने सुरुवात करतात. काही जण बरे झाल्यावरही इतर पीडित रुग्णांना त्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी मित्रत्वाच्या नात्याने मदत करतात आणि ते तेथून जातच नाही. तिथे आलेल्या प्रत्येक रुग्णाला भूतकाळ विसरून वर्तमानकाळात जगण्याचे प्रशिक्षण दिले जाते, नव्हे तशी सवयच लावली जाते.
ह्याच व्यसनमुक्तीच्या अवतीभवती असलेली सगळी बाजू जी दुर्लक्षित होणार नाही ह्याची ही काळजी मुक्तांगण मध्ये घेतली जाते. आज व्यसनांपायी उध्वस्त झालेल्या संसाराची घडी बसावी म्हणून सहजीवन सभा भरतात. बायकांना त्यांच्या अडचणी मोकळेपणाने सांगता याव्यात म्हणून सहचारी गट चालवतात. अंकुर सारख्या उपक्रमातून व्यसनी बापाच्या वागणुकीने कंटाळून झालेल्या मुलांना एकत्रित करत मनोरंजनातून सुखाचे क्षण मिळवून देत आहे.
मुक्तांगणाने केवळ रुग्णाचा आणि त्याच्या कुटुंबीयांचाच नाही,तर पोलीस,न्यायव्यवस्था ह्यांचाही दृष्टिकोन बदलला आहे. व्यसनी गुन्हेगाराकडे सुधारणेच्या दृष्टीने पाहावे, त्याची शिक्षा कमीतकमी असावी, त्याला चांगले जगण्यास उत्तेजन मिळावे, यासारख्या गोष्टी कायदेतज्ञांच्या मदतीने त्यांनी कायद्यात आणल्या आहे. आपल्या स्वयं च्या मुलाखतीत मुक्ताताई सांगतात, आनंद मिळवण्याचे अनेक रस्ते आहेत, ते शोधून काढा. निसर्गात,संगीतात,वाचनात,कामात स्वत:ला अडकवून घ्या, म्हणजे व्यसनाची गरज लागणार नाही. घरी एकत्र येत एकमेकांना वेळ द्या,रात्री शक्यतोवर एकत्र जेवायला बसा, संवाद साधा,सोशल मीडियाच्या जगात असल्याने संवादाचा अभाव आज दिसतोय आणि त्यावरही त्या चिंता व्यक्त करतात. आज सर्वप्रथम आपल्या आयुष्याच्या मुक्तांगणात स्वच्छंदपणे फिरून या आणि ते शक्य झाले नाही, तर मुक्तांगणाला जरूर भेट द्या.
✍️ सर्वेश फडणवीस
#अलौकिक_नोहावे
No comments:
Post a Comment