आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय ते आहेत हत्ती मित्र आनंद शिंदे. मारुती चितमपल्ली म्हणतात,प्राण्यांच्या,पक्षांच्या जितके जवळ तितके ते आपल्याला जवळ करतात आणि जीवही लावतात. आनंद शिंदे हे असे नाव आहे, की जी व्यक्ती हत्तींशी सहज संवाद साधू शकते. आश्चर्य वाटतं पण ते म्हणतात, ‘प्राण्यांना काय बोलायचंय हे पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यांत दिसतं. मी हत्तींकडून माणुसकी शिकलो,' मुळात पत्रकार असलेले आनंद शिंदे यांना फोटोग्राफीची आवड त्यामुळे ते फोटो पत्रकार झाले. ह्या निमित्ताने संपूर्ण भारतभर त्यांचा प्रवास सुरु असतो. असंच एकदा केरळमध्ये मार्शल आर्ट आणि कथकलीवर फोटो फिचर करण्यासाठी ते गेले असता तिथे त्यांना हत्ती भेटले आणि या हत्तींनी त्यांचं अख्खं जगणंच व्यापून टाकले.
केरळमधलं प्रसिद्ध त्रिशूल नावाचं फेस्टिव्हल आनंद शिंदे ह्यांनी शूट केलं. त्या फेस्टिव्हलमध्ये असलेले हत्ती त्यांनी पहिल्यांदा शूट केले आणि रांगेत असलेले हत्ती ते बघत राहिले. हत्ती ताकदवान म्हणून त्यांना माहिती होते, पण त्याचं हृदय किती मऊ आहे हे त्यांना एका दृश्यानं दाखवलं. एका हत्तीचा माहूत त्याला पायाला सारखं टोचून पुढे चालायला भाग पाडत होता. त्यामुळे त्या हत्तीच्या पायाला खूप जखमा झाल्या होत्या. त्या हत्तीच्या पायाला जखमा होऊनही जेव्हा तीव्र उन्हाचे चटके माहुताला बसायला लागले, तेव्हा त्या हत्तीनं आपल्या चार पायांच्या मध्ये माहुताला बसायला जागा दिली. ते दृश्य पाहून आपण हत्तीला घाबरण्याची गरज नाही हे आनंद शिंदे ह्यांना सर्वप्रथम कळलं.
पुढे केरळमध्ये कृष्णा नावाच्या हत्तीच्या पिल्लाचा पाय मोडला होता. ते बघून त्यांना वाईट वाटत होतं. कृष्णा आपल्या आईशिवाय राहू शकत नव्हता. तो सारखा एका विशिष्ट पद्धतीनं आवाज काढायचा. एक हत्ती दुसर्या हत्तीशी संवाद साधण्यासाठी र्हमलिंगची भाषा वापरतो. सात किमी पर्यंत एक हत्ती दुसर्या हत्तीशी सहज संवाद साधू शकतो हे विशेष आणि आश्चर्यकारक आहे. हत्तीच्या पोटातून धुमारायुक्त आवाज ऐकायला येतो. आनंद शिंदे ह्यांनी भरपूर प्रयत्न केल्यावर त्यांना घशातून आवाज काढता आला. कृष्णाशी संवाद साधण्याच्या अथक प्रयत्नांनंतर कृष्णानं कान हलवून ते येण्याचा आनंद व्यक्त केला. खरंतर कृष्णा आणि आनंद शिंदे यांच्यात जवळीक निर्माण व्हायला दीड महिना गेला. सकाळ ते रात्रीपर्यंत आनंद शिंदे कृष्णाच्या पिंजर्याजवळ बसून राहायचे.
आनंद शिंदे ह्यांना हत्तींनी झपाटून टाकले होते. कारण त्यांना हत्तींच्या संदर्भात अनेक गोष्टी कळत होत्या. वय वाढतं तसा हत्तीमध्येही पोक्तपणा येतो. तसच ते एकमेकांची थट्टा, चेष्टा करत असतात, इतकंच काय माणसाला मित्र मानल्यावर त्याचीही ते चेष्टा करतात. ह्याबाबत त्यांच्या मुलाखतीत त्यांनी अनेक किस्से सांगितले आहेत. हत्तीच्या ह्याच वेडामुळे ह्यांच्या पत्नीने अर्थात श्रेया शिंदे ह्यांनी त्यांचं मन ओळखून, हत्तीशिवाय जगू शकत नाही हे कळल्यामुळे त्यांचा नोकरीचा राजीनामा पाठवून दिला आणि ‘आपण आर्थिक बाजू सांभाळू तू हे काम निर्धास्तपणे कर’ असं सांगून खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या पुढे आनंद शिंदे ह्यांनी ‘ट्रंक कॉल वाईल्ड लाईफ फाउंडेशन’ ही विनय सहस्त्रबुद्धे यांच्या पुढाकाराने एक संस्था स्थापन केली. हत्तींची कमी होणारी संख्या, हत्तींचं जतन, हत्तींशी संवाद, हत्तींचं नैराश्य यांच्यावर ह्या संस्थेच्या माध्यमातून आज काम केलं जातं.
असं काही काम करत असतानाच आपल्याला नकळत मार्गदर्शक ही मिळतोच. डॉ. जेकब अॅलेक्झांडर जे त्रिवेंद्रम झोनचे व्हेर्टनरी डॉक्टर आहेत. यांनी आनंद शिंदे ह्यांना खूप मदत केली प्रसंगी मार्गदर्शन ही केले. कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत हे सांगितलं आणि ह्यातूनच आनंद शिंदे आता वाघ, बिबट्या, सिंह यावरही अभ्यास करत आहे. हत्तींप्रमाणेच इतर प्राण्यांशी संवाद साधणंही आनंद शिंदे ह्यांना जमायला लागलं आहे. डॉ.जेकब अॅलेक्झांडरच्या संधीमुळेच त्यांना अशा अनेक गोष्टी करता आल्या. खरंतर हत्तीमित्र म्हणून आनंद शिंदे आज पूर्ण हत्तीमय झाले आहेत. ‘प्राण्यांना काय बोलायचंय हे त्यांच्या डोळ्यात त्यांना पहिल्यांदा दिसतं.पसायदानात आपण नेहमी म्हणतो, "भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे" पण खऱ्या अर्थाने ही ओवी आचरणात आणणारे आहेत आनंद शिंदे. नुकतीच विदर्भातील बऱ्याच भागात पूरग्रस्त परिस्थिती होती. गडचिरोली भागामध्ये आलेल्या महापुरात ब्रम्हपुरी परिसरातील गावांसाठी आनंद शिंदे ह्यांच्या ट्रंक कॉल द वाईल्डलाईफ फाउंडेशन संस्थेमार्फत मदत म्हणून गुरांसाठी चारा पाठवण्यात आला.कारण या संस्थेचे मुख्य काम हे हत्ती संवर्धन बरोबर वन्य जीवन संदर्भात चालतं. स्थानिक वृत्तपत्रात ही बातमी झळकली नाहीच. पण पूरग्रस्तांना ट्रक भरलेले पशुखाद्य मिळाले. यापूर्वी देखील ट्रंक कॉल द वाईल्ड लाईफ फाउंडेशनने जमेल तशी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वेगवेगळ्या मदती केलेल्या आहेत. लॉकडाऊन च्या काळात सुद्धा रस्त्यावरील कुत्र्यांना अन्न पुरवण्याचे महत्वपूर्ण काम संस्थेने केले आहे.
आनंद शिंदे ह्यांनी हत्ती ह्या महाकाय प्राण्याकडे बघण्याची नवी दृष्टी दिलीच पण मदतीसाठी सुद्धा तत्परता दाखवण्याची दृष्टी दिली आहे. आनंद शिंदे ह्याच्यासाठी स्वतःचा प्रवास नावाप्रमाणेच आनंद देणारा असला तरी तुम्हांआम्हां साठी रोमांचित करणारा आणि प्रेरणादायी असा आहे आणि जगण्याचं एक नवं भानही देणारा आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
#अलौकिक_नोहावे
No comments:
Post a Comment