Saturday, April 22, 2023

आयुष्यभर मैत्री जपणारी गोष्ट म्हणजे पुस्तक 📚


२३ एप्रिल "जागतिक पुस्तक दिन" म्हणून जगभर सगळीकडे उत्साहाने साजरा होतो. युनेस्को आणि त्यासंबंधित संस्था जगभरात जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा करतात. लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे. 

विल्यम शेक्सपियर, मिगुएल सर्व्हांटिस आणि इंका गार्सिलोसो या ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, युनेस्कोने २३ एप्रिलला 'जागतिक पुस्तक दिन' म्हणून घोषित केले. हा दिवस पहिल्यांदा २३ एप्रिल १९२३ रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला. स्पेनमध्ये मिगेल डे सर्व्हांटिसच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर १९९५ मध्ये पॅरिसमध्ये युनेस्कोची सर्वसाधारण सभा झाली, ज्यात जगभरातील लेखकांना आदर आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पुस्तकांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी जागतिक पुस्तक दिन प्रत्येक वर्षी साजरा केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला. २३ एप्रिल हा दिवस जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये अनोख्या पद्धतींनी साजरा केला जातो. काहीजण पुस्तके विनामूल्य वितरित करतात, तर कुठे स्पर्धा आयोजित केली जाते पण या निमित्ताने पुस्तकांशी अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न असतो..

विल्यम शेक्सपिअर यांचा जन्म आणि योगायोगाने मृत्यूदिनाचीही तारीख २३ एप्रिल आहे. जन्मगाव आणि मृत्यूगावही एकच आहे. शेक्सपिअर यांना अवघं पन्नास वर्षाचे आयुष्यमान लाभले पण त्यांच्या लेखनानं निर्माण झालेली कीर्ती अमर ठरली आहे. लेखन क्षेत्रात सर्वोच्च कीर्ती अर्थात प्रसिद्धी आणि सर्वोच्च श्रीमंती अर्थात आर्थिक सुबत्ता लाभलेला बहुधा हा एकमेव माणूस. 3८ नाटकं व १५४ कविता ही त्यांची लेखन संपदा. ३८ नाटकांपैकी १० नाटके ऐतिहासिक, १६ नाटके सुखात्मक व १२ नाटके शोकात्मक आहेत. शेक्सपिअरच्या साहित्य संपदेचं वैशिष्ठ्य म्हणजे जगात ज्ञात असलेल्या सर्वच भाषांत त्यांची पुस्तके अनुवादित झालेली आहेत आणि आजही वाचकांच्या संग्रही त्यांची ही पुस्तके असतात. 

खरंतर पुस्तकांचे विश्व मोठे अजब असते. मन मोहून टाकणारे, जीवन बदलवून टाकणारे असते. आपल्या आयुष्यावर जवळच्या आप्तमित्रांचा जसा प्रभाव पडतो, तसा पुस्तकांचाही पडतो. प्राजक्ताची फुले माळताना दोरा सुद्धा रंगीत होतो,गंधित होतो त्याचप्रमाणे चैतन्यमय अक्षरे वाचत राहिल्याने मन सजीव होते. प्रत्येक घरात देवघर असते, त्याप्रमाणे एक कोपरा तरी ग्रंथाने - पुस्तकाने भरला तर अनेक मने विचारांनी - ज्ञानांनी भरली जातील हाच विश्वास वाटतो. 

पुस्तकांचं योगदान अमूल्य असंच आहे. आपल्याला जन्मापासून नात्यांसोबतच ओळख होते ती अक्षरांची, शब्दांची आणि कालांतराने हे शब्द कायम आपल्यासोबत असतात ते अखेरच्या श्वासापर्यंत. आपण बोलतो त्या भाषेच्या रूपात तर ते असतातच. पण पुस्तकांच्या रूपात ते अगदी आपले जीवाभावाचे मित्र बनतात. इतिहासापासून ते विज्ञानापर्यंत आणि परीकथांपासून ते गणितापर्यंत अनेक गोष्टी पुस्तकंच आपल्याला शिकवतात. पुस्तकांबद्दल प्रेम वाढावं, जागरूकता निर्माण व्हावी यासाठी जागतिक पुस्तक दिन साजरा केला जात असावा असंच वाटतं. 

आज इंटरनेट, मोबाइलच्या या जमान्यात आमच्यासारख्या नव्या पिढीने पुस्तकांकडे जणू पाठच फिरवली आहे अशी सगळीकडे ओरड असताना आज सगळ्यात जास्त पुस्तके ही तरुण आणि युवा वाचतात फक्त त्यांची आवड ही बदलली आहे. आज इंग्रजी पुस्तकं वाचण्याचा ट्रेंड आहे. आणि मराठी पुस्तकं कमी प्रमाणात वाचली जातात हे ही तितकेच खरे आहे. सोशल मीडियावर अनेक तरुण व्यक्त होताना अनेक पुस्तकांचा संदर्भ देत असतात. असे असताना युवा वर्ग वाचत नाही हे म्हणणे बरोबर ठरणार नाही. काळाप्रमाणे वाचनाची सवय बदलली असल्याने आज पुस्तकं घेऊन कमी प्रमाणात वाचली जातात कारण किंडल वर पुस्तकं वाचण्याचा जमाना आला आहे. सध्या मोबाइलवर ही पुस्तक वाचण्याचे अनेक अँप उपलब्ध आहेत. पण नवंकोरं पुस्तक वाचनाची सवय पण अनेकांची आहे. नव्या पुस्तकाचा गंधही मुळात वेगळीच गोष्ट आहे. असो..

वाचन हा एक संवाद आहे. लहान मुलांनी पुस्तकांचं वाचन हे मोठ्यानेच करायला हवं. यामुळे शब्दांच्या उच्चाराला धार येते आणि वेग वाढतो. त्यातून मग एखादा प्रसंग आला की त्यावर चर्चा होते. त्यामुळे वाचलेलं मनात पेरले जातं आणि ते चांगलं लक्षात राहातं. म्हणून पुस्तकं ही वाचायलाच हवी. पुस्तकां व्यतिरिक्त जी इतर माध्यमं आहेत ती खत-पाणी म्हणून वापरावी. तरुणही आज वाचन समृद्ध करून व्यक्त होण्यासाठी प्रयत्नरत होत आहे. वाचनाच्या आवडीसाठी ही पुस्तकेच येणारा प्रत्येक दिवस आनंद आणि उत्साह देतात. निवांत क्षणी माणसाचा एकटेपणा घालवण्याचा सगळ्यात चांगला सोबती म्हणजे ही पुस्तके. एकवेळ मित्र नसतील तर चालतं पण पुस्तकांशी केलेली मैत्री कायम उत्साह प्रदान करते. म्हणून पुस्तकं ही आयुष्यभर मैत्रीच्या रूपाने जपण्याची गोष्ट आहे. 

वाचनाशी माणसाची मैत्री असावी. ज्याप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे पांथस्थाला जशी सावली देतात आणि सुखाच्या प्रवासात सोबतीने भागीदारी करतात तसं मानवी जीवनप्रवासात पुस्तके ही आयुष्याचा प्रवास समृद्ध करतात. सर्जनशीलतेचा महामार्ग पुस्तकांच्या पानापानांतूनच जातो. आपल्या मराठी भाषेतही विपुल साहित्यसंपदा उपलब्ध आहे. वि. वा. शिरवाडकरांपासून आजपर्यंतच्या लेखकांनी त्यांच्या साहित्यिक योगदानाने ही भाषा समृद्ध केली आहेच पण काही लेखकांची पुस्तके अनेक भाषांत भाषांतरीत झाली आहेत.लिहिणार्‍याने लिहीत जावे…वाचणार्‍याने वाचत जावे, कधीतरी वाचणार्‍याने 

लिहिणार्‍याचे शब्द घ्यावे, इतकं सुंदर आहे हे वाचणं. वाचनाने आपली भाषा, विचार समृद्ध होत जातात. विचारांची ही श्रीमंती आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. वाचनाने विचार आणि वाचा यात प्रगल्भता येते. म्हणून वाचाल तर वाचाल आणि समृद्धपणे जगाल असं म्हंटल्या जातं. आपल्या खऱ्या आणि अखेरच्या श्वासापर्यंत सच्ची सोबत देणाऱ्या या मित्रांना अर्थात पुस्तकांना सॅल्युट आहे. चला वाचनाची सवय अधिक वृद्धिंगत करत नवनवीन पुस्तकांची सोबत करत आयुष्य अधिक समृद्ध करूया.

जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा

सर्वेश फडणवीस