Tuesday, March 31, 2020

Rewinding Life Again!! Thanks to Corona

१६ मार्च पासून आपण घरात आहे. खरंतर हे दिवस कसे जात आहेत हे कळतच नाही आहे. सकाळ होते,कामे सुरू होतात आणि लगेच दिवस संपतोय. सध्या सगळं कसं शांतपणे सुरू आहे. अगदी लहानपणीच्या काळात काहीवेळ हरवतोय की काय असं वाटायला लागलं आहे. ध्यानीमनी नसतांना मनात एक क्षण सुद्धा विचार नसताना गडबडीच्या काळात आपण एकदम करकचून ब्रेक मारल्यासारखे जागच्याजागी काही क्षण थांबलो आणि मग पुन्हा मागे वळून बघायला लागलो हे काय झालं आणि मानवी मन पुन्हा आठवणींच्या रस्त्यावर जायला लागलं. हे दिवस खरंतर जो आनंद देतात आहे तो शब्दांच्या पलीकडचा आहे. आज टीव्हीवरच्या डेली सोप आणि रिऍलिटी शो ची जागा रामायण,महाभारताने घेतली आणि सगळेजण पुन्हा एकत्र बसत त्याचा पुनःप्रत्ययाचा आनंद घेत आहे. आज कुटुंबातील सगळेच जण एकमेकांना अधिक वेळ देतो आहे. गप्पा,कॅरम,पत्ते,सापसिडी,बुद्धिबळ याने पुन्हा घर आनंदून जात आहे. बच्चे कम्पनी सुद्धा दंगा,मस्ती,चित्रकला यांसारख्या दुर्मिळ होत चालेल्या गोष्टींकडे पुन्हा अधिक आकर्षक व्हायला सुरुवात झाली आहे. अनेकांना पुन्हा पुस्तक वाचन आवडायला लागले आहे. जी कला कुठेतरी हरवली होती ती पुन्हा जागृत होऊन त्याचा आनंद आपण घ्यायला लागलो आहे. सकाळ-संध्याकाळ घरात पूजा दिवेलागणीला आपसूक शुभंकरोती-रामरक्षा सुरू झाले. लहानपणीच्या मित्र-मैत्रिणीसोबत आधुनिक माध्यमातून का होईना पण पुन्हा संवाद सुरू झाला. नात्यात बदल निर्माण झाला. एकमेकांना समजून घेतले जात आहे. नातवांचा आजी-आजोबांशी संवाद सुरू झाला आहे. सकाळ-संध्याकाळ सगळेजण एकत्र येत जेवण सुरू झाले आहे. जेवतांना गप्पा काही विषयांवर चर्चा सुरू झाल्या आहेत. एकमेकांशी फोन वर बोलताना सुद्धा आपलेपणा आणि आपुलकी निर्माण झाली आहे आणि मुख्य म्हणजे समाधानाने जगायला सुरुवात झाली आहे. 

खरतरं हे सगळं कुठल्या कथा-कादंबरीच वर्णनं जगतोय असा भास हल्ली होतोय. पूर्वीच्या काळी सगळेजण मिळून-मिसळून गुण्या-गोविंदाने एकत्र कुटुंबात राहायचे. हात,पाय,स्वच्छ धूवुन मगच जेवायला मिळायचे. सकाळ-संध्याकाळ सात्विक जेवण मिळायचे. घरातील स्त्री ही सगळी कामे आनंदाने करत असे. प्रसंगी पुरुष ही मदत करत असत आणि आजही तेच चित्र दिसतं आहे. आपण ज्या संस्कृती चे पाईक आहोत आणि आज हीच संस्कृती जी कुठेतरी हरवली आहे अशी ओरड होत असतांना ती आपण सध्या जगतोय कारण शेकहॅन्ड चे रूपांतर नमस्कारात झाले,अंतर राखून बोलण्याच्या संस्कारातून आता आपण सहजपणे वाटचाल करतो आहे. बाहेर खाण्याचे प्रमाण पूर्णपणे बंद झाले आहे. त्याकाळी सुद्धा कमी गरजा असतांना आनंदाने जगण्याची शैली होती आणि आज आपणही तेच करतोय,कमी आणि काटकसर करत आनंदाने जगतोय. धकाधकीच्या जीवनात काही विसाव्याचे हे क्षण नक्कीच आनंददायी आहेत. आई-वडील नोकरीवर जाणाऱ्या लहान मुलांना आई-वडिलांच्या बरोबरचा वेळ मिळतोय. त्यांना जिव्हाळा,आत्मीयता ह्या शब्दांचे संस्कार या काळात मिळत आहे. 

कधीकधी वाटतं कुठल्या तरी शक्तीने अचानक जादूची कांडी फिरवली आणि आपण २५ वर्ष मागे गेलो की काय पण कोरोना मुळे माणसातल्या माणूस म्हणून ओळखण्याची संधी मिळाली,जे संस्कार ज्या परंपरेचे पाईक आपण आहोत त्याच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. कारण माणूस म्हणून या अविश्रांत आणि भावनाशून्य असणाऱ्या मशीनला आता ब्रेक लागला आहे. पण हे मशीन पुन्हा ज्या वेगाने जाईल तो वेग आणि ते ठिकाण अधिक उन्नतीवर्धक आणि उत्साहवर्धक असणार हा विश्वास मला तरी वाटतो. 

✍️ सर्वेश फडणवीस

Thursday, March 19, 2020

जंगल सफारी : एक भन्नाट अनुभव !!

कधीकधी स्वत:लाच वेळ देण्यासाठी नव्याने ओळखण्यासाठी ठिकठिकाणी केलेली भटकंती महत्त्वाची ठरते. रोजच्या व्यग्र आयुष्यात आलेला कंटाळा,थकवा चटकन नाहीसा होतो ते ठिकठिकाणी केलेल्या भ्रमंतीमुळेच आणि त्यात जंगल सफारीचा अनुभव तर कायमच अविस्मरणीय आणि रोमांचकारी असाच असतो. 

पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात जंगल सफारी करण्याचा अनुभव आयुष्यात एकदा तरी प्रत्येकानी घ्यावा. हा अनुभव प्रत्येकाला काही तरी देतच असतो. आज सर्वजण मनःशांती च्या शोधार्थ इकडे तिकडे भटकत असताना एकदा तरी जंगलात सफारी करावीच. भल्या पहाटे सकाळी ओपन जिप्सी तुन जंगल भ्रमणाला सुरुवात होते. जंगलात फिरताना सुसाट धावणाऱ्या ओपन जिप्सीत बसल्यावर बोचणारा थंडगार वारा आणि भर मार्च महिन्याच्या मध्यात सकाळचं वातावरण प्रसन्न आणि आल्हाददायक होतं. हळू हळू सूर्याची किरणे वर येत आणि नागमोडी वळण घेत सफारी सुरू झाली . एक अद्भुत,नयनरम्य,विलोभनीय निसर्ग सौंदर्य बघताना एक वेगळाच आनंद होत होता. लाल माती आणि आजूबाजूला मोठं मोठी सागाची ची उंचच उंच झाडी बघताना निसर्ग आणि त्याची अद्भुत किमया प्रत्येक ठिकाणी जाणवत होती आणि त्याच अस्तित्व मान्य हे करावंच लागतं. वेगवेगळ्या आकाराची झाडे विविध रंगाची फुले बघताना मनाला वेगळाच आनंद होतो.जसजसे जंगलात आत जात होतो तसे विविध पक्षांचे आवाज गुंजारव करत होते. मग पुढे हळूहळू दिसू लागतात एक एक प्राणी  हरीण,माकड,सांबर, पिसारा फुलवलेला मोर आणि लांडोर,पुढे रानगवा ,रान कोंबडी या प्राणांच्या लीलया आणि त्यांचा मुक्त संचार बघताना खूप छान वाटत होते. आणि त्यात अचानक भर पडते ते म्हणजे भुताच झाड याचा आकार ही विचित्रच असतो.

पुढे पाच तासांच्या सफरीत अचानक ढग दाटून आले आणि धुंवाधार पाऊस अनुभवला. कान्हा च्या जंगलात आणि आज पर्यंतच्या सफरीतला अविस्मरणीय अनुभव होता.  त्या पावसात सफारी करतांना पण वेगळीच मजा होती. जंगलातील हरणं आणि त्यांचे जत्थे बागडत असतांना छान वाटत होते. पुढे जात असतांना मस्तीत आणि सुस्तीत पडलेला वाघ ही बघितला. 

प्राणी, पक्षी यांचं निरीक्षण करण्याची माझी आवड मला स्वस्थ बसू देत नाही. अभयारण्याच्या गेटवरच एक नीलगाय आमच्या स्वागतासाठी उभी होती. पण, त्या दिवसाचं आकर्षण ठरलं ते तिथले रानटी कुत्रे. वाघापेक्षाही क्रूर असणारे असे हे कुत्रे कळपाने फिरतात आणि शिकार करतात. आणि गाईड म्हणाला तसं हे कळपात फिरतांना कमीवेळा दिसत असतात. 

वाइल्ड लाइफची आवड असल्यामुळे रानावनात फिरण्याचा मोह मला आवरता येत नाही. जंगल सफारी करतानाची मजा औरच आहे. एरव्ही फक्त विशिष्ट वाहिन्यांवरच असे प्राणी-पक्षी बघता येतात. अशा भ्रमंतीतून त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. ताडोबा,कान्हा, बांधवगड, इथे आजपर्यंत वाघांचं दर्शन झालं. 

विविध ठिकाणी भटकंती केल्याने रोजच्या व्यग्र आयुष्यात आलेला कंटाळा,थकवा चटकन नाहीसा होतो. वेगळ्या वातावरणात,लोकांमध्ये गेल्यामुळे एक वेगळाच ताजेपणा येतो. काही वेळा केवळ आराम करण्यासाठीही अशा नव्या ठिकाणी जावं. कधीकधी एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठीही विविध ठिकाणी भेट द्यावी. तर कधी कधी स्वत:ला वेळ देण्यासाठी एकटेपणा अनुभवण्यासाठी तर स्वत:लाच नव्याने ओळखण्यासाठी अशी भटकंती महत्त्वाची ठरते..शहराच्या लांब आणि भौतिक आणि सुखाच्या खूप दूर अशा निसर्ग सौंदर्य भरलेल्या जंगलात भटकताना वाटतं  की आपण काहीच नाही आहोत आणि आपली किंमत अर्थशून्य आहे असं वाटायला लागतं. मी..माझं..मला...या साठी आपण जो अट्टहास करतो तो क्षणात विरघळून जातो.अशा वातावरणात गेलो की मन स्वच्छ आणि आनंदी होतं.आणि हाच आनंद अनुभवण्यासाठी जंगल सफारी नक्की करावी.

सर्वेश फडणवीस  

Tarun Bharat #Coulmn #युथडेस्टिनेशन

Tuesday, March 17, 2020

कोरोनाचे सावट !!


कोरोना व्हायरस राष्ट्रीय आपत्ती जाहीर झाली आणि जग आज एका महामारीचा सामना करतोय. ह्या महामारीचा सामना करण्यासाठी सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करते आहे आणि आता आपली एक जागरूक नागरिक म्हणून सजग राहण्याची वेळ आली आहे. आज सोशल मीडिया हे आपले मत मांडण्यासाठी प्रभावी माध्यम आहे. आपण व्यक्त होत असतांना जागरूक आणि कर्तव्यदक्ष आहोत हीच भावना आपण प्रत्येकवेळी दर्शवण्याची आवश्यकता आहे. कोरोनाची भयानकता भीषण आहे. आज सगळं ठप्प झाले आहे. बाजार,शेयर मार्केट,सोनं, चांदी,सारं काही वेगळ्या दिशेने जात असतांना आपण या महामारीची व्यापकता समजू शकतो. संकट हे कधी सांगून येत नसतं. सगळ्या गोष्टी सरकारवर ढकलून चालणार नाही. आपण ही आपल्या कर्तव्याची जाण ठेवत खबरदारीचे पाऊल टाकण्याची वेळ आपल्यावर आली आहे. 

सर्वांना एक नम्र विनंती आहे, की स्वतःहून काही शिस्त पाळा आपल्या संपर्कातील प्रत्येकाला काही हवे असल्यास सढळ हाताने मदत करा. माणसाने माणसाशी माणसासम वागण्याची हीच वेळ आहे. पक्षीय राजकरण,सगळे मतभेद आणि मनभेद विसरून एक होण्याची हीच वेळ आहे.  वसूधैव कुटूंबकम हा मंत्र आपण जगाला दिला आहे. आपल्याला अनेक पिढ्यानपिढ्या मिळालेले दातृत्वाचे देणं जगाला देण्याची गरज आहे. जेणेकरून सगळ्यांवरचा ताण आणि ओझं कमी होईल. आपण सर्व मिळून या संकटाचा सामना करुया.

भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने कोरोनाविरुद्ध पावले उचलत आहेत ते कौतुकास्पद आहे. टीकाकार न होता त्यांना पूर्ण साथ द्या आपण त्यांच्याप्रति आलेल्या परिस्थितीत धैर्याने सोबत आहे हाच विश्वास दाखवण्याची आता वेळ आली आहे. चला जग जिंकूया आणि या कोरोनाचे सावट दूर करण्यासाठी आपल्या इष्ट देवतेच्या चरणी प्रार्थना करूया… 

✍️ सर्वेश फडणवीस

नर्मदेचा 'भेडाघाट' !!

सबिन्दुसिन्धुसुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं
द्विषत्सु पापजातजातकादिवारिसंयुतम् ।
कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ।। 

आदि शंकराचार्य यांनी नर्मदाष्टकात नर्मदेची स्तुती केली आहे. ही स्तुती म्हणतांना सुद्धा नर्मदा आणि तिचा खळखळणारा आवाज आजही मनाला रुंजी घालत असतो. नर्मदा, अखंड,वैराग्य आणि आनंद देणारी नदी. नर्मदा नदी जगातल्या प्राचीन नद्यांपैकी एक. धार्मिक व आध्यात्मिक कारणासाठी जगामध्ये एकमेव नदी जिची संपूर्ण प्रदक्षिणा आजही आपण करू शकतो. ठराविक यम-नियम पाळून हीची प्रदक्षिणा नक्कीच अंतर्मुख करते कारण नर्मदा नदी ही आनंददायिनी,सुख व कल्याण करणारी आहे. 

नर्मदेचा सुंदर किनारा,किनाऱ्यावरची वनं, विस्तीर्ण होत जाणारे तिचे पात्र,साधू संतांच्या तपसाधनेने पवित्र झालेला परिसर म्हणजे नर्मदा नदी आणि ह्याच नर्मदेवर पुढे संगमरवरी चमत्काराच्या भेडाघाट चा ​"धुवांधार" धबधबा आहे. स्तिमित कारणा-या ​संगमरवरी पहाडांचे अभूतपूर्व​ दर्शन घडवणा​-या​ भेडाघाटला ​नर्मदा​ अर्धवर्तुळाकृती कड्यावरून ​​"धुवांधार" या अतिव सुंदर धबधब्या च्या रुपात खाली झेपावते. शुभ्र फेसाळत्या पाण्याचा हा धुवांधार उंचीने कमी असला तरी जलप्रपात सौंदर्यात मात्र सर्वोत्तम आहे नायगरा ची आठवण करून देणारा आहे.​ ​दगडगोट्यांवरून तोल सावरण्याची कसरत करत,​ ​तुषार अंगावर घेत, जल​ ​धुक्यात वेढलेला लावण्यमय​ धुवांधार जवळून ​बघणं​​ हा एक रोमांचक अनुभव दरवेळी आनंद देत असतो. उंची कमी असल्याने तो पावसाळ्यात नदीचं पाणी वाढल्यावर  लुप्त होवून जातो. 

धुवांधार ला गाजावाजा करत मोठया आवेशात उडी मारणारी नर्मदा नंतर संगमरवरी कड्यांच्या बंधनात जखडल्यावर एकदम शांत होते. आकाशात झेपावणारे नर्मदातटाचे शेकडो फूट उंचीचे हे संगमरवरी खडक सौंदर्याच्या​​ ​चमत्काराचे आल्हाददायक दर्शन घडवतात. नर्मदेच्या ​पारदर्शी,​नितळ, संथ पाण्यात पडलेल्या या कड्यांच्या वैविध्यपूर्ण  नयनमनोहारी जलदृष्य देखावे मन मोहून घेतात. दिवसा, चकाकत्या सूर्यप्रकाशात हे दृश्य अधिकच झळाळून आकर्षक होते; तर चांदण्यारात्री या खडकांची दिसणारी शोभा काही औरच असते आणि ती अनुभवण्यासाठी एकदा शरद पौर्णिमेच्या रात्री शारदीय चांदण बघायला भेडाघाटला नक्की जायला हवे.  

भेडाघाटच्या पुढे पंचवटीत पाऊण तासाचा नौकाविहार ही महा विलक्षण अनुभूती आहे. पांढ-या खेरीज गुलाबी,निळसर नटलेले हे संगमरवरी कडे,काही ठिकाणी गडद रंगांच्या भेगा,भोकं, यांनी उठावदार झाले असून,खडकांना नानाविध आकार प्राप्त झालेले आहेत. नौकाविहार करतांना ते अनुभवता येणं म्हणजे सुखद अनुभव असतो. आजोळ जबलपूर ला असल्यामुळे नर्मदेचे चे दर्शन होतेच. भेडाघाटच्या संगमरवरी खडकात शांत झालेली नर्मदा आणि धुवांधारला रौद्र आवाज करत कोसळणारी नर्मदा हीचे दोन विविध रूपे एकाच ठिकाणी बघायला मिळतात. आणि ह्याची अनुभूती घेण्यासाठी नर्मदा कायमच खुणावत असते.. 

✍️ सर्वेश फडणवीस

Sunday, March 8, 2020

होलिकोत्सव !!


फाल्गुन पौर्णिमेला वेध लागतात ते होळीचे. पारंपरिक भारतीय सणांच्या रचनेमध्ये वर्षाचा शेवटचा सण म्हणजे होळी. फाल्गुन पौर्णिमेला संध्याकाळीच होळी करतात. विधिपूर्वक पवित्र अग्नी होळीमध्ये प्रज्वलित केला जातो. साधारणपणे पौर्णिमा ते वद्य पंचमी असा हा रंगोत्सव. 

अग्नी ही एकच देवता हव्य,कव्य वहन करणारी आहे. काहीही हवनद्रव्य दिले की ते ज्या देवतेच्या नावाने दिले जाईल त्या देवतेपर्यंत ते पोहोचवायचा त्या अग्नीलाच फक्त अधिकार असतो. म्हणून शास्त्रोक्त अग्नी स्थापना करून होळी साजरी केली जाते.

वद्य प्रतिपदेला “धूलिवंदन” असते. त्या दिवशी होळीच्या राखेची किंवा धूळीची पूजा करतात. पारंपरिक पुरणपोळीच्या नैवेद्याच्या रूपाने आपण होळीला आपली कर्मे व कर्तृत्ववाचा अहंकार हेच अर्पण करायचे असते. अशा समर्पित भावनेनंतर दुसरा दिवस येतो तो रंगपंचमीचा. 

आज हीच रंगपंचमी आहे. पिचकरीने रंग उडवण्याची मजा वेगळीच असते. पळसाची फुलं पाण्यात भिजवून त्या रंगाच्या पाण्याने रंगोत्सव आणखीनच उत्साह प्रदान करतो. रांगोत्सवातुन निखळ प्रेम आणि सुख हेच मिळतं. आणि यातूनच येणाऱ्या नवीन वर्षात पदार्पण करण्यासाठी ज्याप्रमाणे रंगांची उधळण करून रंगोत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे येणारे वर्ष सर्व रंगानी युक्त, मुक्त बहरत जीवन अधिक जबाबदारी आणि प्रत्येकाप्रति प्रेम भाव निर्माण करो याचसाठी रंगपंचमी हा दिवस.

वृंदावनातील रंगोत्सव हा जगभरातील आकर्षणाचा विषय आहे. श्री भगवंत व गोपी यांच्यातील रंगोत्सव म्हणजे बघण्यासारखा सोहळा आहे. रंग खेळण्यासाठी प्रामुख्याने वापरतात तो गुलाल म्हणजे प्रेमातला आनंद आणि या आनंदाची उधळण म्हणून गुलाल. गुलाल हे भगवतप्रेमातील आनंदाचे प्रतीक आहे. म्हणून जन्मोत्सव झाल्यावर गुलालाची मुक्त उधळण करतात. गुलाल हा प्रेमाचा रंग आहे.आणि याची मुक्त बरसात करण्यासाठी हा रंगपंचमीचा दिवसाची योजना असावी. 

आपल्या संस्कृतीत जी सणांची मांडणी केली आहे ती अतिशय जाणीवपूर्वक केली आहे असे वाटते. अविद्येची,अज्ञानाची, अपूर्णतेची, विकारांची होळी करून ज्ञानाचा,तेजाचा,सद्गुणांचा, सत्त्वाचा स्निग्ध प्रकाश पसरवणारा हा तेजोत्सव अर्थात होलिकोत्सव! प्रत्येकाच्या जीवनात आनंद व उत्साह प्रदान करून ही होळी आनंदाची अनुभूती प्रदान करो हीच सदिच्छा !! 

सर्वेश फडणवीस

Saturday, March 7, 2020

अष्टावधानी !!

८ मार्च !!  जागतिक महिला दिन. 

महिला ,स्त्री याचा समानार्थी शब्द अर्थात अष्टभुजा !!  सारी प्रतीके जिच्या हाती आहेत ती अष्टभुजा. आणि ती अष्टावधानीच असली पाहिजे हा विश्वास आहे. महत्वाच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्वापार तिने सांभाळल्या आहेत. शिक्षण देण्याची जबाबदारी सरस्वतीची,अन्नधान्य पुरवठा करण्याची जबाबदारीअन्नपूर्णेकडे, पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी गंगेकडे, अर्थाची जबाबदारी लक्ष्मीकडे,रक्षणाची जबाबदारी दुर्गेकडे. प्रत्येक कर्तव्य करताना अष्टवधान जागरूक होऊनच ती मार्गक्रमण करते आहे.  

अष्टभुजा ही कालानुरूप बदलत गेली..मध्ययुगात तिने यशस्वी राज्यकारभार बघितला. त्याचा आदर्श जिजाबाई,अहिल्याबाई आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे. त्यांचे वैशिष्ट्य ही एकच अष्टावधान..

असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे खंबीर स्त्री असते आणि तिच्यात ज्या गुणांचा संचय जसा ती वृत्ती,प्रवृत्ती आणि प्रकृती असेल तर तो माणूस सद्गुणी झाला म्हणूनच समजा. ज्याच्या अंगी माया,ममता आणि बंधुत्व असेल तर तो समन्वय साधला जातो. श्रद्धा ,भक्ती असेल तर तो परमार्थ घडतो. निष्ठा आणि जिद्द असेल तर तो निर्धार होतो. ती कल्पना,आणि कविता असेल तर तो कवी होतो. ती एकाग्रता आणि कुशाग्र असेल तर तो  निकाल उत्तम लागतो. ती माता आणि जननी झाली तर तो पुत्र होतो. आणि शेवटी मुक्ती मिळाली की तो मोक्ष होतो. ती असताना तो असल्याचा आनंदच वेगळा असतो. 

खरंच स्त्री ही अष्टभुजाच आहे. सारे गुणात्मक स्त्रीलिंगी शब्द हे तिचेच आहेत. आज काळानुसार काही पारंपरिक तर काही आधुनिक आयुधं तिच्याकडे आहेच एका हातात भाजीची पिशवी, दुधाची पिशवी,झारा, झाडू, टॅब, स्टेथ्यस्कोप ,पुस्तक,गिटार अशी साधने आहेत. आणि गळ्यात मोबाईल व ही सगळी आयुधं यशस्वीपणे आणि जबाबदारीने वापरताना स्त्री ही अर्थात अष्टभुजा दिसते आहे. तेव्हा अष्टवधान जागृत असलेली स्त्रीची भारतमाता विश्वपटलावर वाट पाहतो आहे. कारण आज तिच्या अष्टावधानाची गरज आहे. आणि तिच्या जागृतीनेच भारतमाता ही विश्वपटलावर जगाचे नेतृत्व करण्यासाठी कटिबद्ध आहे. 

सर्वेश फडणवीस.