Tuesday, March 17, 2020

कोरोनाचे सावट !!


कोरोना व्हायरस राष्ट्रीय आपत्ती जाहीर झाली आणि जग आज एका महामारीचा सामना करतोय. ह्या महामारीचा सामना करण्यासाठी सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करते आहे आणि आता आपली एक जागरूक नागरिक म्हणून सजग राहण्याची वेळ आली आहे. आज सोशल मीडिया हे आपले मत मांडण्यासाठी प्रभावी माध्यम आहे. आपण व्यक्त होत असतांना जागरूक आणि कर्तव्यदक्ष आहोत हीच भावना आपण प्रत्येकवेळी दर्शवण्याची आवश्यकता आहे. कोरोनाची भयानकता भीषण आहे. आज सगळं ठप्प झाले आहे. बाजार,शेयर मार्केट,सोनं, चांदी,सारं काही वेगळ्या दिशेने जात असतांना आपण या महामारीची व्यापकता समजू शकतो. संकट हे कधी सांगून येत नसतं. सगळ्या गोष्टी सरकारवर ढकलून चालणार नाही. आपण ही आपल्या कर्तव्याची जाण ठेवत खबरदारीचे पाऊल टाकण्याची वेळ आपल्यावर आली आहे. 

सर्वांना एक नम्र विनंती आहे, की स्वतःहून काही शिस्त पाळा आपल्या संपर्कातील प्रत्येकाला काही हवे असल्यास सढळ हाताने मदत करा. माणसाने माणसाशी माणसासम वागण्याची हीच वेळ आहे. पक्षीय राजकरण,सगळे मतभेद आणि मनभेद विसरून एक होण्याची हीच वेळ आहे.  वसूधैव कुटूंबकम हा मंत्र आपण जगाला दिला आहे. आपल्याला अनेक पिढ्यानपिढ्या मिळालेले दातृत्वाचे देणं जगाला देण्याची गरज आहे. जेणेकरून सगळ्यांवरचा ताण आणि ओझं कमी होईल. आपण सर्व मिळून या संकटाचा सामना करुया.

भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने कोरोनाविरुद्ध पावले उचलत आहेत ते कौतुकास्पद आहे. टीकाकार न होता त्यांना पूर्ण साथ द्या आपण त्यांच्याप्रति आलेल्या परिस्थितीत धैर्याने सोबत आहे हाच विश्वास दाखवण्याची आता वेळ आली आहे. चला जग जिंकूया आणि या कोरोनाचे सावट दूर करण्यासाठी आपल्या इष्ट देवतेच्या चरणी प्रार्थना करूया… 

✍️ सर्वेश फडणवीस

No comments:

Post a Comment