कधीकधी स्वत:लाच वेळ देण्यासाठी नव्याने ओळखण्यासाठी ठिकठिकाणी केलेली भटकंती महत्त्वाची ठरते. रोजच्या व्यग्र आयुष्यात आलेला कंटाळा,थकवा चटकन नाहीसा होतो ते ठिकठिकाणी केलेल्या भ्रमंतीमुळेच आणि त्यात जंगल सफारीचा अनुभव तर कायमच अविस्मरणीय आणि रोमांचकारी असाच असतो.
पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात जंगल सफारी करण्याचा अनुभव आयुष्यात एकदा तरी प्रत्येकानी घ्यावा. हा अनुभव प्रत्येकाला काही तरी देतच असतो. आज सर्वजण मनःशांती च्या शोधार्थ इकडे तिकडे भटकत असताना एकदा तरी जंगलात सफारी करावीच. भल्या पहाटे सकाळी ओपन जिप्सी तुन जंगल भ्रमणाला सुरुवात होते. जंगलात फिरताना सुसाट धावणाऱ्या ओपन जिप्सीत बसल्यावर बोचणारा थंडगार वारा आणि भर मार्च महिन्याच्या मध्यात सकाळचं वातावरण प्रसन्न आणि आल्हाददायक होतं. हळू हळू सूर्याची किरणे वर येत आणि नागमोडी वळण घेत सफारी सुरू झाली . एक अद्भुत,नयनरम्य,विलोभनीय निसर्ग सौंदर्य बघताना एक वेगळाच आनंद होत होता. लाल माती आणि आजूबाजूला मोठं मोठी सागाची ची उंचच उंच झाडी बघताना निसर्ग आणि त्याची अद्भुत किमया प्रत्येक ठिकाणी जाणवत होती आणि त्याच अस्तित्व मान्य हे करावंच लागतं. वेगवेगळ्या आकाराची झाडे विविध रंगाची फुले बघताना मनाला वेगळाच आनंद होतो.जसजसे जंगलात आत जात होतो तसे विविध पक्षांचे आवाज गुंजारव करत होते. मग पुढे हळूहळू दिसू लागतात एक एक प्राणी हरीण,माकड,सांबर, पिसारा फुलवलेला मोर आणि लांडोर,पुढे रानगवा ,रान कोंबडी या प्राणांच्या लीलया आणि त्यांचा मुक्त संचार बघताना खूप छान वाटत होते. आणि त्यात अचानक भर पडते ते म्हणजे भुताच झाड याचा आकार ही विचित्रच असतो.
पुढे पाच तासांच्या सफरीत अचानक ढग दाटून आले आणि धुंवाधार पाऊस अनुभवला. कान्हा च्या जंगलात आणि आज पर्यंतच्या सफरीतला अविस्मरणीय अनुभव होता. त्या पावसात सफारी करतांना पण वेगळीच मजा होती. जंगलातील हरणं आणि त्यांचे जत्थे बागडत असतांना छान वाटत होते. पुढे जात असतांना मस्तीत आणि सुस्तीत पडलेला वाघ ही बघितला.
प्राणी, पक्षी यांचं निरीक्षण करण्याची माझी आवड मला स्वस्थ बसू देत नाही. अभयारण्याच्या गेटवरच एक नीलगाय आमच्या स्वागतासाठी उभी होती. पण, त्या दिवसाचं आकर्षण ठरलं ते तिथले रानटी कुत्रे. वाघापेक्षाही क्रूर असणारे असे हे कुत्रे कळपाने फिरतात आणि शिकार करतात. आणि गाईड म्हणाला तसं हे कळपात फिरतांना कमीवेळा दिसत असतात.
वाइल्ड लाइफची आवड असल्यामुळे रानावनात फिरण्याचा मोह मला आवरता येत नाही. जंगल सफारी करतानाची मजा औरच आहे. एरव्ही फक्त विशिष्ट वाहिन्यांवरच असे प्राणी-पक्षी बघता येतात. अशा भ्रमंतीतून त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. ताडोबा,कान्हा, बांधवगड, इथे आजपर्यंत वाघांचं दर्शन झालं.
विविध ठिकाणी भटकंती केल्याने रोजच्या व्यग्र आयुष्यात आलेला कंटाळा,थकवा चटकन नाहीसा होतो. वेगळ्या वातावरणात,लोकांमध्ये गेल्यामुळे एक वेगळाच ताजेपणा येतो. काही वेळा केवळ आराम करण्यासाठीही अशा नव्या ठिकाणी जावं. कधीकधी एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठीही विविध ठिकाणी भेट द्यावी. तर कधी कधी स्वत:ला वेळ देण्यासाठी एकटेपणा अनुभवण्यासाठी तर स्वत:लाच नव्याने ओळखण्यासाठी अशी भटकंती महत्त्वाची ठरते..शहराच्या लांब आणि भौतिक आणि सुखाच्या खूप दूर अशा निसर्ग सौंदर्य भरलेल्या जंगलात भटकताना वाटतं की आपण काहीच नाही आहोत आणि आपली किंमत अर्थशून्य आहे असं वाटायला लागतं. मी..माझं..मला...या साठी आपण जो अट्टहास करतो तो क्षणात विरघळून जातो.अशा वातावरणात गेलो की मन स्वच्छ आणि आनंदी होतं.आणि हाच आनंद अनुभवण्यासाठी जंगल सफारी नक्की करावी.
सर्वेश फडणवीस
Tarun Bharat #Coulmn #युथडेस्टिनेशन
No comments:
Post a Comment