१६ मार्च पासून आपण घरात आहे. खरंतर हे दिवस कसे जात आहेत हे कळतच नाही आहे. सकाळ होते,कामे सुरू होतात आणि लगेच दिवस संपतोय. सध्या सगळं कसं शांतपणे सुरू आहे. अगदी लहानपणीच्या काळात काहीवेळ हरवतोय की काय असं वाटायला लागलं आहे. ध्यानीमनी नसतांना मनात एक क्षण सुद्धा विचार नसताना गडबडीच्या काळात आपण एकदम करकचून ब्रेक मारल्यासारखे जागच्याजागी काही क्षण थांबलो आणि मग पुन्हा मागे वळून बघायला लागलो हे काय झालं आणि मानवी मन पुन्हा आठवणींच्या रस्त्यावर जायला लागलं. हे दिवस खरंतर जो आनंद देतात आहे तो शब्दांच्या पलीकडचा आहे. आज टीव्हीवरच्या डेली सोप आणि रिऍलिटी शो ची जागा रामायण,महाभारताने घेतली आणि सगळेजण पुन्हा एकत्र बसत त्याचा पुनःप्रत्ययाचा आनंद घेत आहे. आज कुटुंबातील सगळेच जण एकमेकांना अधिक वेळ देतो आहे. गप्पा,कॅरम,पत्ते,सापसिडी,बुद्धिबळ याने पुन्हा घर आनंदून जात आहे. बच्चे कम्पनी सुद्धा दंगा,मस्ती,चित्रकला यांसारख्या दुर्मिळ होत चालेल्या गोष्टींकडे पुन्हा अधिक आकर्षक व्हायला सुरुवात झाली आहे. अनेकांना पुन्हा पुस्तक वाचन आवडायला लागले आहे. जी कला कुठेतरी हरवली होती ती पुन्हा जागृत होऊन त्याचा आनंद आपण घ्यायला लागलो आहे. सकाळ-संध्याकाळ घरात पूजा दिवेलागणीला आपसूक शुभंकरोती-रामरक्षा सुरू झाले. लहानपणीच्या मित्र-मैत्रिणीसोबत आधुनिक माध्यमातून का होईना पण पुन्हा संवाद सुरू झाला. नात्यात बदल निर्माण झाला. एकमेकांना समजून घेतले जात आहे. नातवांचा आजी-आजोबांशी संवाद सुरू झाला आहे. सकाळ-संध्याकाळ सगळेजण एकत्र येत जेवण सुरू झाले आहे. जेवतांना गप्पा काही विषयांवर चर्चा सुरू झाल्या आहेत. एकमेकांशी फोन वर बोलताना सुद्धा आपलेपणा आणि आपुलकी निर्माण झाली आहे आणि मुख्य म्हणजे समाधानाने जगायला सुरुवात झाली आहे.
खरतरं हे सगळं कुठल्या कथा-कादंबरीच वर्णनं जगतोय असा भास हल्ली होतोय. पूर्वीच्या काळी सगळेजण मिळून-मिसळून गुण्या-गोविंदाने एकत्र कुटुंबात राहायचे. हात,पाय,स्वच्छ धूवुन मगच जेवायला मिळायचे. सकाळ-संध्याकाळ सात्विक जेवण मिळायचे. घरातील स्त्री ही सगळी कामे आनंदाने करत असे. प्रसंगी पुरुष ही मदत करत असत आणि आजही तेच चित्र दिसतं आहे. आपण ज्या संस्कृती चे पाईक आहोत आणि आज हीच संस्कृती जी कुठेतरी हरवली आहे अशी ओरड होत असतांना ती आपण सध्या जगतोय कारण शेकहॅन्ड चे रूपांतर नमस्कारात झाले,अंतर राखून बोलण्याच्या संस्कारातून आता आपण सहजपणे वाटचाल करतो आहे. बाहेर खाण्याचे प्रमाण पूर्णपणे बंद झाले आहे. त्याकाळी सुद्धा कमी गरजा असतांना आनंदाने जगण्याची शैली होती आणि आज आपणही तेच करतोय,कमी आणि काटकसर करत आनंदाने जगतोय. धकाधकीच्या जीवनात काही विसाव्याचे हे क्षण नक्कीच आनंददायी आहेत. आई-वडील नोकरीवर जाणाऱ्या लहान मुलांना आई-वडिलांच्या बरोबरचा वेळ मिळतोय. त्यांना जिव्हाळा,आत्मीयता ह्या शब्दांचे संस्कार या काळात मिळत आहे.
कधीकधी वाटतं कुठल्या तरी शक्तीने अचानक जादूची कांडी फिरवली आणि आपण २५ वर्ष मागे गेलो की काय पण कोरोना मुळे माणसातल्या माणूस म्हणून ओळखण्याची संधी मिळाली,जे संस्कार ज्या परंपरेचे पाईक आपण आहोत त्याच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. कारण माणूस म्हणून या अविश्रांत आणि भावनाशून्य असणाऱ्या मशीनला आता ब्रेक लागला आहे. पण हे मशीन पुन्हा ज्या वेगाने जाईल तो वेग आणि ते ठिकाण अधिक उन्नतीवर्धक आणि उत्साहवर्धक असणार हा विश्वास मला तरी वाटतो.
✍️ सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment