Sunday, October 22, 2023

⚜️ विज्ञानवादिनी - शिवरंजनी साठे !!


शिवरंजनी साठे हे अनेकांसाठी अगदीं नवं नाव आहे. या लेखमालिकेत तिच्याबद्दल शेवटी घेण्याचे कारण म्हणजे शिवरंजनी अमेरिकेत स्थायिक झाली आहे पण तिचे लहानपण आणि जडणघडण ही नागपुरात झाली आहे. तिचा आजवरचा प्रवास हा जिद्द आणि चिकाटीने झालेला आहे. काहीतरी चांगलं करण्याच्या उदात्त हेतूने ती अमेरिकेतील बोइंग येथे कार्यरत आहे. आजची नववी विज्ञानवादिनी आहे शिवरंजनी साठे.

शशांक व शुभा साठे या दाम्पत्याची ही कन्या शिवरंजनी हिचे प्राथमिक शिक्षण कोराडी वसाहतीतील मराठी शाळेतच झाले. त्यानंतर तिला पाचवीपासून सुप्रसिद्ध अशा सोमलवार शाळेत शिक्षण घ्यायचे तिने स्वतःच ठरवले होते. अभ्यासात बऱ्यापैकी ठीक होती. त्यावेळी गणित विषय कठीण जात होता पण चांगल्या ट्युशन क्लासेसने गणितात सुधारणा झाली आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत पूर्णच्या पूर्ण मार्क मिळाले. त्यानंतर अकरावी बारावी विज्ञान शाखेत तिने प्रवेश घेतला.

२००३ साली दूरदर्शनवर एक दुर्घटना तिने पाहिली. कल्पना चावलाच्या कोलंबियाला झालेला जीवघेणा अपघात! त्या प्रसंगाचा तिच्या मनावर खोलवर परिणाम झाला. एकदा तिने घरी आईला सांगितलं, “आई, मी कल्पना चावला होणार." म्हणजे काय ? आईने विचारले. ती म्हणाली, " मी तिच्यासारखं स्पेसमध्ये जाणार." आईने या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. म्हटलं, "तुला स्पेसमध्ये जायचं असेल तर आधी गणितात चांगले गुण मिळवून दाखव. कशी जाणार स्पेसमध्ये ? " तिने हे मनावर घेतलं आणि खरंच बोर्डाच्या परीक्षेत १५० पैकी १५० गुण तिने मिळवून दाखवले. त्यानंतर ती सतत 'कल्पना चावला','सुनीता विल्यम्स' यांच्याविषयी, अंतराळ संशोधनाविषयी वाचन करत होती. खरंतर तिने या विषयाचा ध्यासच घेतला होता.

बारावी नंतर हैद्राबाद येथील 'इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिकल इंजिनीअरिंग' या महाविद्यालयात तिला प्रवेश मिळाला. जेमतेम सतराव्या वर्षी महाराष्ट्राबाहेर हॉस्टेल मध्ये राहून ध्येयाच्या
दिशेने वाटचाल सुरू झाली. घर किती सुरक्षित असतं, बाहेर सगळ्यांशी जुळवून घेऊन राहणं, अभ्यास करणं किती कठीण असतं, याची जाणीव झाली. पण स्वप्नांचा पाठलाग करण्याची तिची धडपड होती. बी. टेक. नंतर एम. एस. इन एरोस्पेससाठी अमेरिकेत जायचं. त्यासाठी जी. आर. ई. आणि टोफेलची परीक्षा द्यायची. त्यातही चांगले गुण मिळाले आणि Auburnविद्यापीठात प्रवेश मिळाला. लहानपणापासून मनात बाळगलेलं ध्येय, स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून हे सगळं केलं प्रसंगी आर्थिक आणि मानसिक ताण सहन केला.

एम. एस. पूर्ण झाल्यावर मॉर्फिंग विंग्जवर तिने संशोधन केले. एअरक्राफ्टचे विंग्ज पक्ष्याच्या पंखाच्या हालचालीसारखी हालचाल करतील तर काय फायदे होतील ? लिफ्ट आणि ड्रग असे दोन फोर्स एअरक्राफ्टवर असतात. लिफ्ट फोर्स उडायला मदत करतात आणि ड्रग फोर्स अपोज करतात. जर मॉर्फिंग विंग्जचा वापर केला तर ड्रग फोर्स कमी होतो आणि एअरक्राफ्टचं फ्युएल (इंधन) पण वाचतं, असे तिचे संशोधन आहे. आयईईई एअरोस्पेस कॉन्फरन्स मध्ये 'व्होटींसीटी अॅप्रोचेस फॉर मॉर्फिंग विंग्ज' या शीर्षकांतर्गत पेपर प्रेझेंट केला. या कॉन्फरन्ससाठी पेपर सिलेक्ट होणं हेच खूप कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. बिग स्काय, मॉण्टाना या ठिकाणीही पेपर सादर केला.

स्वप्नांचा पाठलाग करतांना ज्या ध्येयासाठी शिवरंजनी प्रेरित झाली होती त्यासाठी तिला उत्तम असा जोडीदार मिळाला. क्रिस नेल्सन या अमेरिकन तरुणाशी तिची ओळख झाली. अनेक भेटीत, गप्पांमध्ये दोघांचे विचार आणि मनं जुळली. एकमेकांचे स्वभाव समजून घेतले. क्रिस नेल्सन अमेरिकन नेव्हीत आहे. शिवरंजनीची धडपड आणि वयाच्या तेराव्या वर्षी  अंतराळातील झेप घेण्यासाठी बघितलेलं स्वप्न पूर्ण होण्यासाठी यश मिळेल हा विश्वासच आहे. तिच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा.

सर्वेश फडणवीस

#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळनववी 


Saturday, October 21, 2023

⚜️ विज्ञानवादिनी : कल्पना के !


कल्पना के अर्थात कल्पना कालहस्ती यांची चंद्रयान ३ चे यशस्वी उड्डाण झाल्यानंतर देशाला खऱ्या अर्थाने ओळख झाली. चंद्रयान ३ प्रक्षेपणावेळी आपल्यापैकी अनेकांनी इसरोचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्या बाजूला प्रकल्प सहयोगी संचालक म्हणून एक महिला उपस्थित होती त्या म्हणजेच आजच्या विज्ञानवादिनी कल्पना के आहेत. 

कल्पना के यांचा जन्म बंगलोर मध्ये झाला आहे. शालेय शिक्षण त्यांनी बंगलोर येथेच पूर्ण केले त्यानंतर आयआयटी खडकपूर येथून ऐरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील उच्च न्यायालयात कर्मचारी होते, तर आई गृहिणी होती. कल्पना के यांनी लहानपणापासून इसरोमध्ये काम करण्याचे स्वप्न बघितले होते. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. २००३ साली त्या इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून रुजू झाल्या. सर्वात आधी श्रीहरिकोटा इथे पाच वर्ष त्यांनी काम केले आणि त्यानंतर २००५ मध्ये त्यांची बदली बंगळुरूमधील उपग्रह केंद्रात झाली. त्याठिकाणी पाच उपग्रहांच्या डिझाइनमध्ये त्यांनी सहभाग घेतला.  

२०१९ मध्ये श्रीहरिकोटा येथील रॉकेट सेंटरमधून प्रक्षेपित झालेल्या चांद्रयान-२ प्रकल्पातही कल्पना के यांचा सहभाग होता. चांद्रयान-२ मोहिमेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आणि सध्या त्या चांद्रयान-३ प्रकल्पाच्या सहयोगी संचालक म्हणून कार्यरत आहेत. ज्यावेळी चंद्रयान ३ चे यशस्वी उड्डाण झाले त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद संपूर्ण जगाने अनुभवला आहे. कुठलेही मिशन यशस्वी झाल्यावर सर्वसामान्य भारतीयाला जितका आनंद होतो त्याहून अधिक आनंद काम करणाऱ्या वैज्ञानिकांना नक्कीच होत असेल. मिशनवर काम करतांना आलेल्या असंख्य अडचणींवर मात करत ते सतत कार्यमग्न राहत असतात आणि हेच यांचे वेगळेपण आहे. 

चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर सहयोगी प्रकल्प संचालक म्हणून कल्पना के म्हणाल्या की, "माझ्या आणि माझ्या टीमसाठी हा सर्वात अविस्मरणीय क्षण आहे, आम्ही गेली अनेक वर्षे याचसाठी प्रयत्न करत होतो आणि आम्ही आमचे ध्येय साध्य केलं आहे." चांद्रयान-३ मोहिम यशस्वी होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रत्येकाला प्रेरणादायी आहे.

साधारणपणे एक सॅटेलाईट तयार करण्यासाठी पाच वर्षांपेक्षा जास्त वेळ लागतो. आधी डिझाईन, मग बाकी सगळी प्रोसेस पार पडते. त्यानंतर हे सर्व झाल्यावर अनेक चाचण्या करून पाहिल्या जातात. त्यानंतर त्याची पुन्हा चाचणी करून रॉकेटला जोडून ट्रायल्स घेतल्या जातात आणि त्यानंतर सॅटेलाईट उड्डाण होते. चांद्रयान-३ प्रकल्पादरम्यान चंद्र लँडर प्रणाली डिझाइन आणि ऑप्टिमाइझ यातील त्यांच्या कौशल्याने अनेक आव्हानांवर मात करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हरच्या यशस्वी लँडिंगनंतर, टीमला संबोधित करताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद संपूर्ण देशाने बघितला आहे. ही उत्तुंग कामगिरी केवळ जागतिक अंतराळ समुदायात भारताचे स्थान मजबूत करणारी नाही तर ज्या समर्पित व्यक्तींनी हे पराक्रम शक्य केले त्यांच्या अनुकरणीय योगदानावर प्रकाश टाकणारी आहे. कल्पना के यांनी जिद्द आणि मेहनतीने आजवरचा प्रवास यशस्वी केला आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे. 

सर्वेश फडणवीस 

#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळआठवी   


Friday, October 20, 2023

⚜️ विज्ञानवादिनी : सीता सोमसुंदरम !


सीता सोमसुंदरम इसरोमधील स्पेस इन्स्ट्रुमेंटेशन एक्सपर्ट म्हणून परिचित आहे. चंद्रयान २ ही अंतराळ मोहीम भारतासाठी गौरवाचा क्षण होता आणि याच मिशनवर कार्य करणाऱ्या आपल्या आजच्या विज्ञानवादिनी सीता सोमसुंदरम आहे. सीता सोमसुंदरम यांनी इसरोमध्ये काम करत असतांना विविध जबाबदारी अत्यंत समर्थपणे पूर्णत्वास नेली आहे.

सीता सोमसुंदरम यांनी दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजमधून बीएससी (ऑनर्स) पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी मद्रासच्या IIT मधून M.Sc पदवी मिळवली. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथून त्यांनी भौतिकशास्त्रात पीएचडी मिळवली आणि त्यानंतर इसरोमध्ये त्यांची निवड झाली आहे. खगोलशास्त्राची लहानपणापासून आवड असल्याने सोमसुंदरम यांना एक्स-रे आणि ऑप्टिकल बँडमधील वेरियेबल स्टार्स यात त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. याशिवाय, त्यांनी अनेक वर्षांपासून चाललेल्या स्पेस-आधारित खगोलशास्त्रीय प्रयोगांसाठी उपकरणे विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आहे.

सीता सोमसुंदरम इस्रोच्या स्पेस सायन्स कार्यालयात प्रोग्राम डायरेक्टर म्हणून होत्या. त्या अशा महिला वैज्ञानिक आहेत ज्यांनी मार्स ऑर्बिटर मिशनचे (MOM) यशस्वी नेतृत्व केले, ज्याला मिशन मंगळयान म्हणून ओळखले जाते. हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) द्वारे ५ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. सीता सोमसुंदरम त्यांच्या मुलाखतीत याबद्दल सांगतात की “मॉमच्या यशाची सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला.”

१९८०च्या दशकात, जेव्हा सीता सोमसुंदरम यांनी इसरोमध्ये काम करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्याठिकाणी महिलांची संख्या अगदीं बोटावर मोजण्याइतकी होती. त्यांच्या वरिष्ठांना प्रश्न पडला की या महिला अंतराळ क्षेत्रांतील बारकावे हाताळू शकतील का? त्यांना विश्वास होता की महिला मर्यादित तास काम करतील पण त्यांना घरी जाणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर त्या पुन्हा येणार नाहीत. पण अशा महिला वैज्ञानिकांनी त्यांच्या अथक परिश्रमाने वरिष्ठांची ही भावना दूर केली आणि आज आपण बघू शकतो की इसरोमधील महिलांनी मोठ्या पदावर काम करताना अनेक मिशन यशस्वी करून दाखवले आहे.

एस्ट्रोसॅटचे प्रिंसिपल इन्वेस्टीगेटर म्हणून सीता सोमसुंदरम यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. एस्ट्रोसॅट भारतातील पहिली अंतराळ दुर्बीण आहे जी काही वर्षांपूर्वी प्रक्षेपित करण्यात आली होती. ही दुर्बिणी एकाच वेळी एक्स-रे, ऑप्टिकल आणि यूव्ही स्पेक्ट्रल बँडमध्ये आकाशाचे निरीक्षण करू शकते. यावर काम करतांना अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागला पण हे करत असतांना त्यांना त्यांच्या कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळाला. त्यांच्या आणि टीमच्या साहाय्याने मिशन यशस्वी झाले. मंगळयानचे पेलोड कॅरेक्टरायझेशन आणि कॅलिब्रेशनमध्येही सीता सोमसुंदरम यांचा सहभाग होता.

सीता सोमसुंदरम यांना त्यांच्या कारकिर्दीत विविध पुरस्कार मिळाले आहेत. २००३ साली त्यांना भौतिकशास्त्रातील सी व्ही रमन यंग वैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना अस्ट्रोनॉटिका सोसायटी ऑफ इंडियाकडून २०१२ सालचा सर्वोत्कृष्ट महिला वैज्ञानिक पुरस्कारही मिळाला आहे. महिला म्हणून त्यांनी अनेक आव्हानांचा सामना करत अत्यंत परिश्रमाने स्वतःची योग्यता सिद्ध करत यशस्वी टप्पा गाठला आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे.

सर्वेश फडणवीस

#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळसातवी 


Thursday, October 19, 2023

⚜️ विज्ञानवादिनी : मौमिता दत्ता !


मौमिता दत्ता हे नाव आपल्यापैकी अनेकांना परिचित असे नाही पण अहमदाबाद मधील इसरोच्या स्पेस एप्लिकेशन सेंटर मध्ये भौतिकशास्त्र वैज्ञानिक म्हणून मौमिता दत्ता यांच्याबद्दल नितांत आदर आहे. आजच्या सहाव्या विज्ञानवादिनी आहेत मौमिता दत्ता. मौमिता दत्ता या प्रामुख्याने पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी आणि ग्रहांच्या मोहिमांसाठी ऑप्टिकल सेन्सरवर काम करत आहेत.

मौमिता दत्ता यांचा जन्म पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे झाला. शालेय जीवनापासून त्या हुशार आहेत. प्राथमिक शिक्षण त्यांनी बंगाली भाषेतूनच घेतले आणि त्यानंतर कोलकाता विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले. अप्लाइड फिजिक्समध्ये एम टेक पदवी मिळवल्यानंतर मौमिता दत्ता यांनी ऑप्टिक्समध्ये स्पेशलायझेशन केले. शाळेत एका प्रयोगात प्रिझममधून भव्य रंग बाहेर येताना पाहून मौमिता दत्ता यांना भौतिकशास्त्र विषयांत आवड निर्माण झाली आणि त्यामुळे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण त्यांनी भौतिकशास्त्र विषयातच पूर्ण केले.

मौमिता दत्ता यांनी लहानपणी अंतराळ, एलियन, ब्रह्मांड, तारे - विशेषतः एलियन्सबद्दल त्यांना विशेष आकर्षण होते  पण अंतराळ संशोधनात कार्य करण्याची संधी त्यांना मिळेल असे कधीही स्वप्नात वाटले नाही. २००४ मध्ये त्यांनी स्थानिक वर्तमानपत्रात वाचले की भारत त्याच्या पहिल्या चंद्र मोहिमेची तयारी करत आहे. त्यावेळी त्यांनी ऑप्टिक्समध्ये विशेष प्राविण्य मिळवले होते त्यामुळे त्यांनी इसरोमध्ये अर्ज केला आणि मौमिता दत्ता यांना तब्बल दीड वर्षांनंतर इसरोमध्ये काम करण्याची संधी मिळाली. चांद्रयान १ प्रकल्पावर उडणाऱ्या दोन सेन्सरवर त्यांनी काम पूर्ण केले. चांद्रयान १ ही भारताची पहिली चंद्र मोहीम होती, जी २००८ मध्ये प्रक्षेपित करण्यात आली होती. यात पृथ्वीशी संपर्क तुटण्यापूर्वी पाण्याचे पुरावे देखील सापडले होते आणि बऱ्यापैकी पहिल्या प्रयत्नात काही अंशी ही मोहीम यशस्वी झाली होती.

मौमिक दत्ता २००६ मध्ये स्पेस ऍप्लिकेशन सेंटर, अहमदाबाद येथे रुजू झाल्या आणि तेव्हापासून त्या ओशनसॅट, रिसोर्ससॅट, हायसॅट, चांद्रयान १ आणि मार्स ऑर्बिटर मिशन सारख्या अनेक प्रतिष्ठित प्रकल्पांमध्ये सहभागी झाल्या आहेत. याशिवाय, मंगळ मोहिमेत मिथेन सेन्सरसाठी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून त्यांची निवड झाली आहे. त्यांना संपूर्ण ऑप्टिकल प्रणाली, ऑप्टिमायझेशन, त्यातील वैशिष्ट्ये आणि बारकावे त्यातील सेन्सरचे कॅलिब्रेशन विकसित करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. सध्या, त्या ऑप्टिकल उपकरणांच्या स्वदेशी विकासात एका टीमचे नेतृत्व करत आहे. यासोबतच त्या ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला साकार करण्यासाठी काम करत आहे.

मार्स ऑर्बिटर मिशनच्या विकासात भारतीय भौतिकशास्त्रज्ञ असलेल्या मौमिता दत्ता यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या विविध प्रकल्पातील उल्लेखनीय कार्यासाठी,त्यांना 'इस्रो टीम ऑफ एक्सलन्स' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. टेडक्स टॉक मध्येही मौमिता दत्ता याना आमंत्रित करण्यात आले आहे.अत्यंत परिश्रमाने त्यांनी आजवरचा यशस्वी टप्पा गाठला आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे.

सर्वेश फडणवीस

#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळसहावी

Wednesday, October 18, 2023

⚜️ विज्ञानवादिनी : मीनल संपत


मीनल संपत अर्थात मीनल रोहित आज हे नाव इसरोमध्ये अत्यंत आदराने घेतले जाते. भारताची मंगळ मोहीम आजपर्यंत देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी अंतराळ प्रकल्पांपैकी एक होती. ही मोहीम यशस्वी करण्यात अनेक वैज्ञानिकांचा हातभार लागला आणि यातील अग्रक्रमाने नाव घेता येईल अशा आजच्या विज्ञानवादिनी वैज्ञानिक मीनल संपत आहेत. मीनल संपत सिस्टीम इंजिनीयर आहेतच पण खिडकी नसलेल्या खोलीत सलग १८ तास काम करत ही मोहीम त्यांनी पूर्णत्वास नेली आहे. मंगळ मोहिमेच्या वेळी दोन वर्षे त्यांनी सुट्टी घेण्याचेही टाळले.

मीनल संपत यांचा जन्म गुजरातमधील राजकोट येथे सर्वसामान्य कुटुंबात  झाला. लहानपणी त्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते, पण टीव्हीवरील एका स्पेस कार्यक्रमाने आठव्या वर्गात असतांना त्यांचा विचार बदलला आणि त्यानंतर त्यांनी अंतराळ क्षेत्रात कार्य करण्याचे निश्चित केले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला. लहानपणापासून हुशार असलेल्या मीनल संपत यांनी १९९९ साली गुजरात युनिव्हर्सिटीच्या अहमदाबाद येथील निरमा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही.

मीनल संपत यांनी आपल्याला कारकिर्दीला इस्रोमध्ये सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी सॅटकॉम इंजिनियर म्हणून काम केले. त्यानंतर स्पेस अप्लिकेशन सेंटरमध्ये त्यांची बदली करण्यात अली. त्यांनी स्पेस अप्लिकेशन सेंटरमधून मार्स ऑर्बिटर मिशन पेलोड विकसित आणि वितरित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मंगळ मोहिमेवर काम करणाऱ्या ५०० शास्त्रज्ञ व अभियंत्यांपैकी त्या एक होत्या आणि मिशनसाठी सिस्टम इंजिनीअर म्हणून, त्यांनी ऑर्बिटर वाहून नेत असलेले सेन्सर्स एकत्रित करण्यात आणि चाचणी करण्यात मदत केली. मिथेन सेन्सर (एमएसएम), लायमन - अल्फा फोटोमीटर (एलएपी), थर्मल इन्फ्रारेड इमेजिंग स्पेक्ट्रोमीटर (टीआयएस), आणि मार्स कलर कॅमेरा (एमसीसी) चे घटक समाविष्ट करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांची कामाप्रति असलेली जिद्द म्हणजे त्यांनी या काळात दोन वर्षे कोणतीही सुटी घेणे टाळले. यासाठी त्यांच्या जिद्दीला प्रणाम आहे.

मीनल संपत यांना २००७ मध्ये इसरोकडून त्यांच्या टेलिमेडिसिन कार्यक्रमातील योगदानासाठी 'यंग सायंटिस्ट मेरिट' पुरस्कार आणि २०१३ मध्ये INSAT 3D हवामानशास्त्रीय पेलोड्सवरील कामासाठी 'इसरो टीम एक्सलन्स' अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मंगळ मोहिमेत असतांना त्यांच्या कामाबद्दल आणि एकूणच प्रकल्पाबाबत, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या एका भाषणात मीनल संपत आणि टीमचे दिलेल्या वेळेच्या मर्यादेसह मिशन पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या कामाचे कौतुक केले होते.

मीनल संपत यांनी चांद्रयान २ सारख्या प्रकल्पांसाठी मुख्य अभियंता आणि प्रकल्प व्यवस्थापक म्हणूनही काम केले आहे.  सध्या त्यांच्याकडे उपप्रकल्प संचालक म्हणून जबाबदारी आहे. नॅशनल स्पेस एजन्सीच्या प्रमुखपदी पहिल्या महिला संचालक होण्याचे त्यांचे ध्येय आहे. मीनल संपत यांचे हे स्वप्न नक्की पूर्णत्वास जाईल हा विश्वासच आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे.

सर्वेश फडणवीस

#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळपाचवी

Tuesday, October 17, 2023

⚜️ विज्ञानवादिनी : मुथय्या वनिता !


मुथय्या वनिता हे नाव इसरोमधील अत्यंत आदरार्थी आणि साधेपणा कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणून  प्रसिद्ध आहे. कनिष्ठ अभियंता म्हणून सुरू झालेला आणि त्यानंतर चंद्रयान २ मोहिमेच्या प्रोजेक्ट डायरेक्टर इथवरचा इसरोमधील त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. अंतराळ संशोधनात त्यांचे योगदान कौतुकास्पद आहे. मुथय्या वनिता या एम.वनिता म्हणून सुपरिचित आहेतच पण त्या प्रसिद्धी परांगमुख आहेत. महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांची सार्थ ओळख आहे. आजच्या चौथ्या विज्ञानवादिनी आहेत मुथय्या वनिता.

एम. वनिता यांचा जन्म २ ऑगस्ट १९६४ साली चेन्नईमध्ये झाला. सर्वसामान्य कुटूंबात लहानपण गेल्याने साधेपणा हा उपजत होता. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे एम वनिता आहेत. त्यांचे शालेय शिक्षण बॉयलर प्लांट स्कूल त्रिची येथे झाले आणि कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, गिंडी येथून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. डिझाईन अभियंता विषयात त्यांनी आपले पदवी शिक्षण पूर्ण केले.

एम. वनिता या तीन दशकांहून अधिक काळ इस्रोमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी सुरुवातीला इसरोमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून काम केले, विविध हार्डवेअर सिस्टम मध्ये त्यांनी कार्ये केली. त्यानंतर त्यांनी इसरोच्या सॅटेलाइट सेंटरच्या डिजिटल सिस्टम्स ग्रुपमध्ये टेलीमेट्री आणि टेलिकमांड डिव्हिजनची देखरेख करत मॅनेजर होण्यासाठी रँकमधून त्यांना बढती मिळाली.

इसरोमध्ये काम करतांना त्यांनी प्रकल्पाच्या उपसंचालक म्हणून अनेक उपग्रहांसाठी डेटा ऑपरेशन्स हाताळल्या. याव्यतिरिक्त, त्यांनी २०१३ च्या मंगलयान मंगळ मोहिमेत भाग घेतला, जो यशस्वी झाला. इस्रोच्या चांद्रयान-2 चंद्र मोहिमेसाठी, वनिता यांना सहयोगी संचालक ते प्रकल्प संचालक बनवण्यात आले. इस्रोकडे यापूर्वी कधीही महिला मिशन कमांडर नव्हती. एम वनिता यांनी चांद्रयान-१ मोहिमेच्या वेळी डीकोडर म्हणूनही काम केले होते. कार्टोसॅट-१, ओशनसॅट-२ आणि मेघा-ट्रॉपिक्ससह अनेक प्रकल्पांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

प्रकल्पातील अनेक वैविध्यपूर्ण कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २००६ साली एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाने एम वनिता यांना 'सर्वोत्कृष्ट महिला शास्त्रज्ञ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. खगोलशास्त्रीय सेवांमधील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल अनेक वरिष्ठांनी वेळोवेळी कौतुक केले आहे.

त्यांच्या एका मुलाखतीत त्या सांगतात की, चंद्रयान २ या चंद्र मोहिमेसाठी प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून त्या मुळीच तयार नव्हत्या पण प्रकल्प संचालक अन्नादुराई यांच्याकडून संपूर्ण मिशन समजावून घेतल्यावर आणि खात्री करून घेतल्यानंतर त्यांनी शेवटी आपला विचार बदलला. प्रकल्प संचालक म्हणून, एम.वनिता यांनी चांद्रयान-२ मोहिमेची व्यवस्थित आखणी केली आणि संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेला. चंद्रयान २ मोहीम यशस्वी झाली नाही हे आपल्याला माहिती आहेच पण अनेक प्रकल्पाच्या संकल्पनेपासून ते पूर्णत्वास नेण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे.

सर्वेश फडणवीस

#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळचौथी

Monday, October 16, 2023

⚜️ विज्ञानवादिनी : टी.के.अनुराधा

टी.के.अनुराधा हे नाव इसरोमधील यशस्वी वैज्ञानिक म्हणून आजही आदराने घेतले जाते. आता त्या सेवेतून निवृत्त झाल्या तरी देशासाठी आणि अंतराळ संशोधनासाठी तत्पर असतात हे नुकतेच चंद्रयान मोहिमेच्यावेळी देशाने अनुभवले आहे. आजच्या तिसऱ्या विज्ञानवादिनी आहेत वैज्ञानिक टी.के.अनुराधा. 

साधारणपणे १९६९ सालची घटना असावी नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पाऊल ठेवले आणि त्यावेळी शाळकरी पोर असणाऱ्या टी.के.अनुराधा यांनी स्वप्न बघितले की आपणही अंतराळ क्षेत्रांत काहीतरी कार्य करायचे. लहान असल्याने त्यावेळी समज नव्हती पण घरच्यांशी सतत याच विषयावर बोलत राहणे हाच त्यांचा नित्य ध्यास होता आणि काही काळाने तेच स्वप्न सत्यात उतरले आणि पुढे इसरो सारख्या संस्थेत टी.के.अनुराधा या रुजू झाल्या. 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात (ISRO) मधील GSAT-12 या उपग्रहाच्या प्रकल्प संचालक ( प्रोजेक्ट Director) म्हणून त्यांनी आपली उत्तम कामगिरी पार पाडली. टी.के अनुराधा यांनी हसनमधील नियंत्रण सुविधेतून पार पडलेल्या महत्त्वाच्या ऑपरेशन्सद्वारे GSAT-12 ला त्याच्या अंतिम कक्षेत यशस्वीपणे चालवले. त्यावेळी हसन येथे प्रथमच सर्व इसरोमधील महिला टीमने हे काम केले आणि त्याचे नेतृत्व टी.के.अनुराधा यांनी केले. 

टी.के.अनुराधा यांचे लहानपण बंगलोर शहरात गेले. कौटुंबिक वातावरणही चांगले होते. त्यांचे वडील संस्कृतचे प्राध्यापक होते आणि आई गृहिणी होती. त्यांना चार बहिणी होत्या आणि आईने लहानपणापासून योग्य संस्कार केल्याने त्यांच्या आईकडून त्यांना कायम प्रेरणा मिळाली. कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी त्यांची आई सतत प्रोत्साहन द्यायची. टी.के अनुराधा यांच्या मोठी बहिणीने वैद्यकीय क्षेत्र आणि दोन लहान बहिणी यांनी अभियांत्रिकी क्षेत्र स्वीकारले. 

टी. के अनुराधा यांचे प्राथमिक शिक्षण बंगलोर येथे झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी नागपूर येथील विश्वेश्वरय्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. लहानपणापासून विज्ञान विषयाची आवड असल्याने अंतराळ क्षेत्रात कार्य करण्याचे स्वप्न असल्याने त्यांनी इलेक्ट्रॉनिक विषयात प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) कडून मास्टर ऑफ सायन्सचा अभ्यास करण्याची ऑफर नाकारून त्यांनी स्पेस एजन्सीमध्ये नोकरी पत्करली.

कालांतराने टी.के अनुराधा यांचे लग्न अशा कुटुंबात झाले आहे ज्यात प्रत्येकाला इलेक्ट्रॉनिक्सची आवड होती. टी.के अनुराधा यांचे यजमान भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये जनरल मॅनेजर होते. त्यांची मोठी मुलगी अमेरिकेत संगणक विज्ञान अभियंता आहे आणि दुसरी मुलगी इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी शाखेतच कार्यरत आहे. टी.के.अनुराधा त्यांच्या मुलाखतीत छान सल्ला देतात त्या म्हणतात, "तुम्ही काय करू शकता याला काही मर्यादा आहे असा विचार करू नका. तुम्हाला काही करायचे असेल तर त्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यास सुरुवात करा."

टी.के.अनुराधा यांचे पहिले काम बंगलोर येथील सॅटेलाइट सेंटरमध्ये उपग्रहांची चाचणी करण्याचे होते आणि त्यावेळी त्यांचे प्रो. यू.आर. राव हे बॉस होते. त्यांच्याकडून टी.के.अनुराधा यांना यातील अनेक बारकावे समजून घेता आले. त्यानंतर १९८४ ते १९९४ पर्यंत एजन्सीचे अध्यक्ष म्हणून टी.के.अनुराधा यांनी काम केले. अनेक उपग्रहांसाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे विकसित केली. त्यावेळीही इस्रो हा पुरुष शास्त्रज्ञांचा बालेकिल्ला नव्हता आणि इसरोमध्ये स्त्री पुरुष भेदभाव नव्हता हे त्या आवर्जून सांगतात.

टी के. अनुराधा यांनी प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम केले आहेच त्यासोबत कम्युनिकेशन सॅटेलाइट्समध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केले. GSAT-12 आणि GSAT-10 या उपग्रहांच्या प्रक्षेपणाच्या वेळी त्यांनी त्यासाठी जवळून काम केले आणि १९८२ पासून इसरोमधील सर्वात ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. टी.के. अनुराधा यांनी भारतीय अंतराळ कार्यक्रमांचे नेतृत्व केले आणि त्यांच्या कामासाठी आणि विशेष योगदानासाठी 2012 ASI- ISRO टीम पुरस्कार त्यांना मिळाला होता. अंतराळ क्षेत्रात काही तरी करण्याच्या ध्यासाने टी.के.अनुराधा यांनी केलेले इसरोमधील कार्य एकमेवाद्वितीय असेच आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे. 

सर्वेश फडणवीस 

#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळतिसरी 



Sunday, October 15, 2023

⚜️ विज्ञानवादिनी : नंदिनी हरिनाथ

नंदिनी हरिनाथ हे नाव मिशन मंगळ मोहीम यशस्वी झाली त्यानंतर घराघरात पोहोचले. आपल्या कर्तृत्ववाने इसरोबरोबर देशाचे नाव उंचावर घेऊन जाणाऱ्या आणि मिशन मंगळ मोहीम यशस्वी करणाऱ्या आजच्या दुसऱ्या विज्ञानवादिनी आहेत वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ.

यशस्वी अशा मंगळ मोहिमेसाठी काम केलेल्या वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ यांनी, आपण कधी इस्रोमध्ये काम करू, असा विचारही केला नव्हता. लहानपणी बघितलेला 'स्टार ट्रेक' या टीव्हीवरील कार्यक्रमामुळे त्यांना विज्ञानाची आवड निर्माण झाली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलेच नाही. मंगळयान यशस्वीपणे अवकाशात पाठवल्यानंतर त्यांना स्वतःबद्दल अभिमान वाटतो. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी त्यांच्या स्वभावात सहज जाणवते आणि अंतराळ क्षेत्रांत महिलांनी आवर्जून यावे यासाठी तत्पर असणाऱ्या वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ आजही जगात कुठेही मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून जातात.

नंदिनी हरिनाथ यांचा जन्म तामिळनाडू येथे झाला. कुटुंबात सर्वजण बहुतांश शिक्षक आणि इंजिनिअर असल्याने विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयी स्वाभाविक लहानपणापासून त्यांना आवड निर्माण झाली. आई गणिताची शिक्षिका आणि वडील इंजिनिअर असल्याने घरातील वातावरण शिक्षित होते. शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी तामिळनाडू येथेच पूर्ण केले.

कालांतराने शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी इसरोमध्ये प्रवेश केला. पहिल्याच नोकरीची संधी त्यांना इसरो येथे मिळाली. वीस वर्षे झाली त्या इसरो येथे कार्यरत आहे. जवळपास १४ मिशन मध्ये त्यांनी काम केले आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून, मुलांचा अभ्यास घेऊन काही काळ १२-१४ तास त्यांनी अथक काम केलं आहे. त्यांच्या एका मुलाखतीत त्या म्हणतात, "आज जेव्हा वैज्ञानिक म्हणून आम्हाला ओळखलं जातं, तेव्हा त्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. आता इसरोमध्ये २० वर्षे झाली आहेत आणि आजपर्यंत मागे वळून पाहिले नाही." मंगळ मोहिमेचा भाग होणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता." खरंतर मिशन मंगळ मोहीम ही फक्त इस्रोसाठीच नाही तर भारतासाठी खूप महत्वाची मोहीम होती. ही मोहीम यशस्वी झाल्यावर जगाने भारताच्या वैज्ञानिकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आणि आज आंतरराष्ट्रीय संस्था आपल्या वैज्ञानिकांच्या मदतीची अपेक्षा करत आहे.

खरंतर मिशन मंगळवेळी इस्रोने पहिल्यांदाच लोकांना आत काय घडत आहे ते पाहण्याची परवानगी दिली होती. आज अनेक शास्त्रज्ञ सोशल मीडियावर आहेत. अशा कामगिरीमुळे आज तरुणांचे रोल मॉडेल म्हणून यांच्याकडे बघितल्या जाते आणि वैज्ञानिक असलेल्या नंदिनी हरिनाथ यांना याबद्दल अभिमान वाटतो आणि त्याचा त्या आनंदही घेतात. परिश्रम आणि प्रयत्नाने इथवर आल्याचे त्या आवर्जून सांगतात. वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ ज्यावेळी मिशन मंगळसाठी कार्य करत होत्या त्यावेळी नंदिनी यांची आई आंध्रप्रदेश येथून बंगलोरला येत असत. कारण त्यावेळी नंदिनी हरिनाथ यांची मुलगी बारावीत शिकत होती. मुलींना वेळ देता यावा म्हणून त्या पहाटे ४ वाजता उठत असत आणि दोघीजणी एकत्रित अभ्यास करत असत.

२००० रुपयांच्या नोटेवर झळकणारे मंगळयान मोहिमेचे चित्र पाहून नंदिनी हरिनाथ यांना खूप समाधान वाटले या मोहिमेच्या वेळी सुरुवातीला, शास्त्रज्ञांनी दिवसाचे सुमारे १० तास काम केले, परंतु प्रक्षेपणाची तारीख जवळ येत असताना काम १२ ते १४ तासांपर्यंत गेले आणि प्रत्यक्ष प्रक्षेपणाच्या वेळी ते जेमतेम कार्यालयातून बाहेर पडत असत. अत्यंत परिश्रमाने वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ आणि त्यांच्या संपूर्ण टीम ने मंगळयान मोहीम यशस्वी करून दाखवली. मंगळयान प्रक्षेपणाच्या काही दिवस आधी वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ घरीदेखील जात नव्हत्या. कामाप्रती समर्पित भाव कसा असू शकतो याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ आहेत. मंगळयान अभियानाचं यश हा भूतकाळ झाला, आता भविष्याचा विचार करायचा आहे, असा निर्धार त्या व्यक्त करतात. वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ यांच्या कामाच्या कटिबद्धतेला नमन आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे.

सर्वेश फडणवीस

#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळदुसरी

Saturday, October 14, 2023

⚜️ विज्ञानवादिनी - रितू करिधाल श्रीवास्तव !


रितू करिधाल श्रीवास्तव हे नाव खरंतर मिशन चंद्रयानमुळे संपूर्ण देशाला परिचित झाले. आपल्या कर्तृत्वाच्या तेजाने इसरोसोबतच देशाचे नाव उंचावणाऱ्या रॉकेट वूमन म्हणून ओळख असलेल्या आजच्या पहिल्या विज्ञानवादिनी आहेत वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव. 

पत्नी, आई, सून, बहीण, मैत्रीण या प्रत्येक नात्याला योग्य न्याय देणाऱ्या वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव या दुसऱ्या मिशन चांद्रयानामुळे घराघरात पोहोचल्या. कर्तव्यनिष्ठ, यशस्वी आणि प्रतिभासंपन्न वैज्ञानिक म्हणून जबाबदारी पार पाडणे निश्चितच सोपे नाही. त्यासाठी नियोजनपूर्वक कार्यप्रणाली आखणे अन् पूर्णतः झोकून देऊन काम पूर्ण करणाऱ्या वैज्ञानिक म्हणून रितू करिधाल श्रीवास्तव यांची ओळख आज यथार्थ ठरेल. 

इसरोमधील एक महिला वैज्ञानिक म्हणून त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने भारताचे नाव उंचावले आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव आहेत. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या रितू करिधाल श्रीवास्तव यांनी प्रथमतः स्वतःला सिद्ध केले. सर्वसामान्य घरातून आलेल्या रितू करिधाल श्रीवास्तव यांनी आपल्या बुद्धिमान कौशल्याने आणि जिद्दीने भौतिकशास्त्र विषयांत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे आचार्य पदवीसाठी लखनऊ येथे त्यांनी संशोधन सुरू केले. त्यांनतर गेट परीक्षा उत्तीर्ण करून इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर इथे एअरोस्पेस इंजिनिअरींगच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि हाच त्यांच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा ठरला. 

अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी इसरोतील नोकरीसाठी प्रयत्न केला आणि त्यांची निवडही झाली आणि निकालानंतर रितू करिधाल श्रीवास्तव इसरोमध्ये रुजू झाल्या. बालपणापासून बघितलेल्या स्वप्नांना आता प्रत्यक्षात सुरुवात झाली आणि एका नव्या स्वप्नाचा आणि ध्येयाचा प्रवास सुरु झाला. सुरुवातीला ज्येष्ठ वैज्ञानिकांसोबत काम करताना त्यातील आव्हानांना पेलण्याची क्षमता त्यांनी प्राप्त केली. वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव यांचे आज २० हुन अधिक संशोधन निबंध प्रसिद्ध झाले असून त्यांना अनेक सन्मान आणि पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते यंग सायंटिस्ट अवॉर्ड, सोसायटी ऑफ इंडियन एरोस्पेस टेक्नॉलॉजीज अँड इंडस कडून इसरो टीम अवॉर्ड फॉर मॉम, एएसआयटीकडून वुमन अचिव्हर्स इन एअरोस्पेस अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. 

चांद्रयान- २ मिशन डायरेक्टर आणि मंगलयान मोहिमेच्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर म्हणून त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली आहे.  'मिशन मंगल' या गाजलेल्या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन हिने साकारलेली भूमिका रितू करिधाल श्रीवास्तव यांच्या व्यक्तिमत्त्वावरूनच प्रेरित झाली आहे. आज प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा चांद्रयान ३ मिशनचे नेतृत्त्व वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव यांच्याकडेच आहे. आपल्या कुटुंबाचे सहकार्य आणि त्यातून मिळालेल्या समाधानातूनच आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून दृढतेने काम करण्याची इच्छाशक्ती आणि जबाबदारी रितू करिधाल श्रीवास्तव सहजतेने सांभाळत आहेत. आदित्य आणि अनिशा या दोन मुलांना मोठं करणे, त्यांचा शाळेचा अभ्यास घेणे, त्यांच्याशी खेळणे, त्यांच्या आवडीचे पदार्थ करून खाऊ घालणे अशी कौटुंबिक सगळी जबाबदारी त्या आनंदाने पार पाडत असतात. 

१९९७ पासून वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव इसरोत कार्यरत असून अनेक प्रकल्पांमध्ये त्यांनी काम केले आहे. आपले पती अविनाश श्रीवास्तव आणि मुलांसोबत घालविलेले क्षण कामाची ऊर्जा देतात, असे त्यांचे स्पष्ट मत आहे. महिला सक्षमीकरणाच्या समर्थक असणाऱ्या वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव यांनी महिलांनी अंतरीक्ष क्षेत्रात यावे यासाठी आग्रही आहेत आणि त्यासाठी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यास त्या नेहमीच इच्छुक असतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आज रॉकेट वूमन म्हणून ज्यांनी आपली ओळख सार्थ ठरवली आहे अशा आजच्या विज्ञानवादिनी वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव यांचे जीवन प्रेरणादायी आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहेत. 

सर्वेश फडणवीस 

#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळपहिली

Friday, October 13, 2023

🔸 विज्ञानवादिनी

आपल्या देव देवता म्हणजे शक्ती आहेत. शक्तीला तिच्या तेजामुळे देवी हे अभिधान प्राप्त झाले. गेल्या चार वर्षांपासून आदिशक्तिच्या पर्वकाळात विविध विषयांवर या माध्यमातून लेखन झाले. "उत्सव आदिशक्तीचा" शीर्षकांतर्गत विदर्भातील देवी स्थानांवर, "त्वं ही दुर्गा" अंतर्गत सामाजिक क्षेत्रांत कार्य करणाऱ्या स्त्रियांवर, "कर्तृत्वशालिनी" या अंतर्गत संरक्षण दलातील कार्यरत मातृशक्तीवर आणि मागच्यावर्षी "आधारवेल"  अंतर्गत गेल्या शतकातील आणि आताच्या ऐतिहासिक स्त्री चरित्रांवर लिहिण्याचा प्रयत्न केला. यावेळी विज्ञानवादिनी अर्थात वैज्ञानिक क्षेत्रांत महिलांनी केलेल्या कार्याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

घटस्थापनेपासून नवरात्रोत्सव जागर उत्सवाला सर्वत्र उत्साहात सुरुवात होणार आहे. नवरात्रात खरं तर जागर हा स्त्री शक्तीचा व्हायला हवा. अनेकजण या माध्यमातून तो करतांना दिसत आहेत. वेद उपनिषद काळापासून स्त्री ही खरं तर पूजनीय, वंदनीय आहे. ती ब्रह्मवादिनी आहे. वैदिक काळापासून ती शिक्षित आणि उच्च विद्याविभूषित अशीच होती आणि आजही हे संचित कायम आहे. तिचा प्रतिकात्मक नऊ दिवस आणि सदैव केलेला आदर आणि सन्मान म्हणजेच नवरात्र. 

आज सर्व क्षेत्रात ती कार्य करते आहे आणि सर्व शिखर पादाक्रांत करते आहे. हे करण्याचे धैर्य तिला इतिहासातून मिळाले आहे. संस्कारांचे बाळकडू घेऊन स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्र स्वतःच्या कर्तृत्ववाने यशोशिखरावर नेले आहे. आज प्रत्येक कार्यक्षेत्रात झोकून काम करायला सदैव तयार असणारी, नव्हे अग्रेसर असणारी स्त्री आहे. ज्या भारताला आम्ही मातेचा दर्जा देतोय त्या भारतातील स्त्री वंदनीय आहे. समाजातील विकृतीला सुद्धा प्रसंगी धैर्याने लढणारी रणरागिणी म्हणजे सुद्धा एक स्त्रीच आहे इतिहासातून मिळालेल्या सद्गुणांचा संचय करत तिची वाटचाल प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास वेद आणि उपनिषदांच्या काळापासून तिच्या पराक्रमाने उन्नत झाला आहे. आपल्या पराक्रमाच्या गाथा तिने त्रिखंडात गाजवलेल्या आहेत. प्रत्येकाला गर्व वाटेल अशीच स्त्रीची वाटचाल आहे. 

खरंतर आज विज्ञान क्षेत्रात महिलांनी अद्भुत आणि अविस्मरणीय कार्य केले आहे. वैज्ञानिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्या सदैव स्मरणात राहणाऱ्या आहेत अशाच विज्ञानवादिनी महिलांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करतोय."विज्ञानवादिनी" या Dhanashree Lele  ताईंनी दिलेल्या बिरुदावलीत थोडीफार मांडणी करण्याचा प्रयत्न सलग ९ दिवस करणार आहे. 

आज जागतिकीकरणात 'ती' स्वतःला सिद्ध करत जी यशस्वी वाटचाल करते आहे त्या तिच्या कर्तृत्वाने अशीच उंच भरारी घेत रहावी हीच सदिच्छा आहे आणि त्यातूनच हे लेखन करण्याचा प्रयत्न असणार आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

 #विज्ञानवादिनी #नवरात्र #लेखमाला