मौमिता दत्ता हे नाव आपल्यापैकी अनेकांना परिचित असे नाही पण अहमदाबाद मधील इसरोच्या स्पेस एप्लिकेशन सेंटर मध्ये भौतिकशास्त्र वैज्ञानिक म्हणून मौमिता दत्ता यांच्याबद्दल नितांत आदर आहे. आजच्या सहाव्या विज्ञानवादिनी आहेत मौमिता दत्ता. मौमिता दत्ता या प्रामुख्याने पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी आणि ग्रहांच्या मोहिमांसाठी ऑप्टिकल सेन्सरवर काम करत आहेत.
मौमिता दत्ता यांचा जन्म पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे झाला. शालेय जीवनापासून त्या हुशार आहेत. प्राथमिक शिक्षण त्यांनी बंगाली भाषेतूनच घेतले आणि त्यानंतर कोलकाता विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले. अप्लाइड फिजिक्समध्ये एम टेक पदवी मिळवल्यानंतर मौमिता दत्ता यांनी ऑप्टिक्समध्ये स्पेशलायझेशन केले. शाळेत एका प्रयोगात प्रिझममधून भव्य रंग बाहेर येताना पाहून मौमिता दत्ता यांना भौतिकशास्त्र विषयांत आवड निर्माण झाली आणि त्यामुळे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण त्यांनी भौतिकशास्त्र विषयातच पूर्ण केले.
मौमिता दत्ता यांनी लहानपणी अंतराळ, एलियन, ब्रह्मांड, तारे - विशेषतः एलियन्सबद्दल त्यांना विशेष आकर्षण होते पण अंतराळ संशोधनात कार्य करण्याची संधी त्यांना मिळेल असे कधीही स्वप्नात वाटले नाही. २००४ मध्ये त्यांनी स्थानिक वर्तमानपत्रात वाचले की भारत त्याच्या पहिल्या चंद्र मोहिमेची तयारी करत आहे. त्यावेळी त्यांनी ऑप्टिक्समध्ये विशेष प्राविण्य मिळवले होते त्यामुळे त्यांनी इसरोमध्ये अर्ज केला आणि मौमिता दत्ता यांना तब्बल दीड वर्षांनंतर इसरोमध्ये काम करण्याची संधी मिळाली. चांद्रयान १ प्रकल्पावर उडणाऱ्या दोन सेन्सरवर त्यांनी काम पूर्ण केले. चांद्रयान १ ही भारताची पहिली चंद्र मोहीम होती, जी २००८ मध्ये प्रक्षेपित करण्यात आली होती. यात पृथ्वीशी संपर्क तुटण्यापूर्वी पाण्याचे पुरावे देखील सापडले होते आणि बऱ्यापैकी पहिल्या प्रयत्नात काही अंशी ही मोहीम यशस्वी झाली होती.
मौमिक दत्ता २००६ मध्ये स्पेस ऍप्लिकेशन सेंटर, अहमदाबाद येथे रुजू झाल्या आणि तेव्हापासून त्या ओशनसॅट, रिसोर्ससॅट, हायसॅट, चांद्रयान १ आणि मार्स ऑर्बिटर मिशन सारख्या अनेक प्रतिष्ठित प्रकल्पांमध्ये सहभागी झाल्या आहेत. याशिवाय, मंगळ मोहिमेत मिथेन सेन्सरसाठी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून त्यांची निवड झाली आहे. त्यांना संपूर्ण ऑप्टिकल प्रणाली, ऑप्टिमायझेशन, त्यातील वैशिष्ट्ये आणि बारकावे त्यातील सेन्सरचे कॅलिब्रेशन विकसित करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. सध्या, त्या ऑप्टिकल उपकरणांच्या स्वदेशी विकासात एका टीमचे नेतृत्व करत आहे. यासोबतच त्या ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला साकार करण्यासाठी काम करत आहे.
मार्स ऑर्बिटर मिशनच्या विकासात भारतीय भौतिकशास्त्रज्ञ असलेल्या मौमिता दत्ता यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या विविध प्रकल्पातील उल्लेखनीय कार्यासाठी,त्यांना 'इस्रो टीम ऑफ एक्सलन्स' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. टेडक्स टॉक मध्येही मौमिता दत्ता याना आमंत्रित करण्यात आले आहे.अत्यंत परिश्रमाने त्यांनी आजवरचा यशस्वी टप्पा गाठला आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे.
सर्वेश फडणवीस
#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळसहावी
No comments:
Post a Comment