मुथय्या वनिता हे नाव इसरोमधील अत्यंत आदरार्थी आणि साधेपणा कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणून प्रसिद्ध आहे. कनिष्ठ अभियंता म्हणून सुरू झालेला आणि त्यानंतर चंद्रयान २ मोहिमेच्या प्रोजेक्ट डायरेक्टर इथवरचा इसरोमधील त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. अंतराळ संशोधनात त्यांचे योगदान कौतुकास्पद आहे. मुथय्या वनिता या एम.वनिता म्हणून सुपरिचित आहेतच पण त्या प्रसिद्धी परांगमुख आहेत. महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांची सार्थ ओळख आहे. आजच्या चौथ्या विज्ञानवादिनी आहेत मुथय्या वनिता.
एम. वनिता यांचा जन्म २ ऑगस्ट १९६४ साली चेन्नईमध्ये झाला. सर्वसामान्य कुटूंबात लहानपण गेल्याने साधेपणा हा उपजत होता. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे एम वनिता आहेत. त्यांचे शालेय शिक्षण बॉयलर प्लांट स्कूल त्रिची येथे झाले आणि कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, गिंडी येथून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. डिझाईन अभियंता विषयात त्यांनी आपले पदवी शिक्षण पूर्ण केले.
एम. वनिता या तीन दशकांहून अधिक काळ इस्रोमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी सुरुवातीला इसरोमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून काम केले, विविध हार्डवेअर सिस्टम मध्ये त्यांनी कार्ये केली. त्यानंतर त्यांनी इसरोच्या सॅटेलाइट सेंटरच्या डिजिटल सिस्टम्स ग्रुपमध्ये टेलीमेट्री आणि टेलिकमांड डिव्हिजनची देखरेख करत मॅनेजर होण्यासाठी रँकमधून त्यांना बढती मिळाली.
इसरोमध्ये काम करतांना त्यांनी प्रकल्पाच्या उपसंचालक म्हणून अनेक उपग्रहांसाठी डेटा ऑपरेशन्स हाताळल्या. याव्यतिरिक्त, त्यांनी २०१३ च्या मंगलयान मंगळ मोहिमेत भाग घेतला, जो यशस्वी झाला. इस्रोच्या चांद्रयान-2 चंद्र मोहिमेसाठी, वनिता यांना सहयोगी संचालक ते प्रकल्प संचालक बनवण्यात आले. इस्रोकडे यापूर्वी कधीही महिला मिशन कमांडर नव्हती. एम वनिता यांनी चांद्रयान-१ मोहिमेच्या वेळी डीकोडर म्हणूनही काम केले होते. कार्टोसॅट-१, ओशनसॅट-२ आणि मेघा-ट्रॉपिक्ससह अनेक प्रकल्पांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रकल्पातील अनेक वैविध्यपूर्ण कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २००६ साली एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाने एम वनिता यांना 'सर्वोत्कृष्ट महिला शास्त्रज्ञ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. खगोलशास्त्रीय सेवांमधील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल अनेक वरिष्ठांनी वेळोवेळी कौतुक केले आहे.
त्यांच्या एका मुलाखतीत त्या सांगतात की, चंद्रयान २ या चंद्र मोहिमेसाठी प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून त्या मुळीच तयार नव्हत्या पण प्रकल्प संचालक अन्नादुराई यांच्याकडून संपूर्ण मिशन समजावून घेतल्यावर आणि खात्री करून घेतल्यानंतर त्यांनी शेवटी आपला विचार बदलला. प्रकल्प संचालक म्हणून, एम.वनिता यांनी चांद्रयान-२ मोहिमेची व्यवस्थित आखणी केली आणि संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेला. चंद्रयान २ मोहीम यशस्वी झाली नाही हे आपल्याला माहिती आहेच पण अनेक प्रकल्पाच्या संकल्पनेपासून ते पूर्णत्वास नेण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे.
सर्वेश फडणवीस
#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळचौथी
No comments:
Post a Comment