आपल्या देव देवता म्हणजे शक्ती आहेत. शक्तीला तिच्या तेजामुळे देवी हे अभिधान प्राप्त झाले. गेल्या चार वर्षांपासून आदिशक्तिच्या पर्वकाळात विविध विषयांवर या माध्यमातून लेखन झाले. "उत्सव आदिशक्तीचा" शीर्षकांतर्गत विदर्भातील देवी स्थानांवर, "त्वं ही दुर्गा" अंतर्गत सामाजिक क्षेत्रांत कार्य करणाऱ्या स्त्रियांवर, "कर्तृत्वशालिनी" या अंतर्गत संरक्षण दलातील कार्यरत मातृशक्तीवर आणि मागच्यावर्षी "आधारवेल" अंतर्गत गेल्या शतकातील आणि आताच्या ऐतिहासिक स्त्री चरित्रांवर लिहिण्याचा प्रयत्न केला. यावेळी विज्ञानवादिनी अर्थात वैज्ञानिक क्षेत्रांत महिलांनी केलेल्या कार्याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
घटस्थापनेपासून नवरात्रोत्सव जागर उत्सवाला सर्वत्र उत्साहात सुरुवात होणार आहे. नवरात्रात खरं तर जागर हा स्त्री शक्तीचा व्हायला हवा. अनेकजण या माध्यमातून तो करतांना दिसत आहेत. वेद उपनिषद काळापासून स्त्री ही खरं तर पूजनीय, वंदनीय आहे. ती ब्रह्मवादिनी आहे. वैदिक काळापासून ती शिक्षित आणि उच्च विद्याविभूषित अशीच होती आणि आजही हे संचित कायम आहे. तिचा प्रतिकात्मक नऊ दिवस आणि सदैव केलेला आदर आणि सन्मान म्हणजेच नवरात्र.
आज सर्व क्षेत्रात ती कार्य करते आहे आणि सर्व शिखर पादाक्रांत करते आहे. हे करण्याचे धैर्य तिला इतिहासातून मिळाले आहे. संस्कारांचे बाळकडू घेऊन स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्र स्वतःच्या कर्तृत्ववाने यशोशिखरावर नेले आहे. आज प्रत्येक कार्यक्षेत्रात झोकून काम करायला सदैव तयार असणारी, नव्हे अग्रेसर असणारी स्त्री आहे. ज्या भारताला आम्ही मातेचा दर्जा देतोय त्या भारतातील स्त्री वंदनीय आहे. समाजातील विकृतीला सुद्धा प्रसंगी धैर्याने लढणारी रणरागिणी म्हणजे सुद्धा एक स्त्रीच आहे इतिहासातून मिळालेल्या सद्गुणांचा संचय करत तिची वाटचाल प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास वेद आणि उपनिषदांच्या काळापासून तिच्या पराक्रमाने उन्नत झाला आहे. आपल्या पराक्रमाच्या गाथा तिने त्रिखंडात गाजवलेल्या आहेत. प्रत्येकाला गर्व वाटेल अशीच स्त्रीची वाटचाल आहे.
खरंतर आज विज्ञान क्षेत्रात महिलांनी अद्भुत आणि अविस्मरणीय कार्य केले आहे. वैज्ञानिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्या सदैव स्मरणात राहणाऱ्या आहेत अशाच विज्ञानवादिनी महिलांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करतोय."विज्ञानवादिनी" या Dhanashree Lele ताईंनी दिलेल्या बिरुदावलीत थोडीफार मांडणी करण्याचा प्रयत्न सलग ९ दिवस करणार आहे.
आज जागतिकीकरणात 'ती' स्वतःला सिद्ध करत जी यशस्वी वाटचाल करते आहे त्या तिच्या कर्तृत्वाने अशीच उंच भरारी घेत रहावी हीच सदिच्छा आहे आणि त्यातूनच हे लेखन करण्याचा प्रयत्न असणार आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
#विज्ञानवादिनी #नवरात्र #लेखमाला
No comments:
Post a Comment