Wednesday, April 20, 2022

शालिवाहन शक आणि संवत्सर



भारतीय संस्कृतीत सणांची जी रचना आहे ती इतकी जाणीवपूर्वक केली आहे की, त्यावर विचार करायला गेलो तरी आपण या संस्कृतीचे पाईक आहोत याचा अभिमान वाटतो. आपण सगळेजण काहीतरी नित्यकर्म करत असतो पण ते करत असताना त्यामागचा जो काही विचार आहे त्यातून आपल्याला जे शिकणे अपेक्षित आहे ते आपल्याला माहिती नसतं किंवा मग आजच्या धावपळीच्या दिवसात त्याबद्दल आपण जाणून घेत नाही. असाच मध्यंतरी एका पूजेत बसलो असतांना गुरुजींनी संकल्प सांगितला. पूजा म्हंटल की संकल्प हा त्याचा भाग आलाच. संकल्प म्हणतांना ' शालिवाहन शके ( नाव ) संवत्सरे असा उल्लेख केला. पूजा संपली आणि त्यातील शालिवाहन शके आणि संवत्सराबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा झाली. अभ्यास आणि वाचून जे हाती आले ते असे..

शालिवाहनाने सुरु केलेल्या कालगणनेला शालिवाहन शक म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीला गुढीपाडवा हे नाव आहे. या दिवशी हिंदूूंच्या नवीन वर्षांची सुरुवात होते म्हणून या दिवसाला वर्ष प्रतिपदा असेही आपण म्हणतो. खरंतर भारतीय परंपरेमध्ये अतिशय मोठय़ा प्रमाणात वापरला गेलेला आणि शालिवाहन शक नावाने प्रसिद्ध असलेला संवत्सर या दिवशी सुरू होतो. या संवत्सराची स्थापना शालिवाहन म्हणजे सातवाहन या राजाने शक राजांचा पराभव करून केली असे आपण मानून याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी आपापल्या घरांवर गुढय़ा उभारतो असं ही म्हणतात. श्रीराम अयोध्येत परत आले तो दिवसही चैत्र शु.प्रतिपदा म्हणूनही गुढी उभारली जाते.  पण थोडं अजून इतिहासात शिरत गेल्यावर काही माहिती मिळाली. 

शक संवत्सराची मुख्य गोष्ट घडली इसवी सनाच्या ७८व्या वर्षी. सातवाहन आणि क्षत्रप किंवा शक, अशी दोन घराणी होती. या काळात शकांमधील क्षहरात या घराण्याची गुजरातच्या भागात राजवट होती. त्यावेळी महाराष्ट्रात सातवाहन राजे राज्य करत होते. क्षहरात घराण्यातील नहपान नावाचा राजा पराक्रमी होता आणि त्याला महाराष्ट्रामध्ये रस होता. त्याचे कारण होते येथून चालणारा व्यापार. गुजरातमधील या क्षहरातांच्या ताब्यात भडोच हे बंदर होते. सातवाहनांच्या ताब्यात कोकण किनारपट्टी आणि घाटवाटा होत्या. प्राचीन काळामध्ये ग्रीक व रोमनांशी या मार्गाने व्यापार चालायचा. कल्याण, सोपारा, चौल अशा बंदरांवर माल उतरायचा आणि नाणेघाटासारख्या घाटवाटांतून तो पैठण, जुन्नर अशा मोठ्या बाजारपेठांमध्ये पोहोचायचा. या साऱ्या व्यापारावर सातवाहनांचा ताबा होता. त्या काळातील परकीय व्यापाऱ्यांच्या रोजनिशींतून किंवा पत्रांमधून या व्यापाराची आणि त्यातून आलेल्या समृद्धीची कल्पना करता येते. नाणेघाटातील सातवाहन साम्राज्ञी नागणिकेच्या शिलालेखात नोंदविलेल्या दानांवरूनही ते समजते.

नहपानाने या भागात असलेल्या महाभोजांसारख्या छोट्या राजांशी हातमिळवणी केली आणि आपला एक गट तयार केला. या गटाने सातवाहनांशी युद्ध सुरू केले. नहपानाने साधारण इसवीसन ५० मध्ये नाशिकचा भाग ताब्यात घेतला. या भागात मिळणारी नाणी आणि नाशिकमधील पांडवलेणीच्या गुहा क्र. १० मध्ये असलेल्या शिलालेखामुळे ही गोष्ट समजते. हळूहळू त्याच्या गटाने पुढे शिरकाव करायला सुरुवात केली. हे करत असताना त्यांनी मिळालेल्या भागात नागरिकांसाठी सोयी-सुविधा निर्माण केल्या. पांडवलेणीमधील शिलालेख नहपानाचा जावई उषवदात याने कोरला आहे. त्यामध्ये तो केलेल्या कामांची माहिती सांगतो. या माहितीवरून त्यांनी गुजरात, खासकरून भडोच आणि सोपारा या दोन बंदरांना जोडणाऱ्या खुष्कीच्या मार्गावर बऱ्यापैकी काम केले होते, असे दिसते. पांडवलेणी, जुन्नर वगैरे भागांमध्ये क्षत्रपांचे शिलालेख आहेत. त्यामध्ये त्यांनी सामान्यांसाठी केलेल्या कामांची आवर्जून नोंद घेतली आहे. त्यांनी सुद्धा  मोठ्या प्रमाणात दानेही दिली आहेत.

व्यापार आणि अर्थात त्यांच्या सेनेची हालचाल वेगाने व्हावी आणि हे होताना स्थानिक खूष असावे, यासाठीची काळजी त्यांनी घेतलेली दिसते. हा भाग पूर्णपणे ताब्यात आल्यानंतर त्यांनी पुढील हालचाल केली आणि कोकण ताब्यात घेतले. साधारण इसवी सन ७० च्या आसपास त्यांनी सातवाहनांचे महत्त्वाचे आणि टांकसाळ असलेले जुन्नर हे शहरदेखील ताब्यात घेतले. याविषयीचे पुरावे नाणी, शिलालेखांद्वारे आपल्याला मिळतात. नहपानाने येथे सातवाहनांच्या छापासारखी नाणी पाडली. विशेषतः सिंहाचा छाप असलेली. त्याने सातवाहनांच्या नाण्यांवर आपली मुद्रा उमटवली आणि आपल्या साम्राज्याची द्वाही फिरवली. जुन्नर ताब्यात घेतल्यानंतर नहपान स्वतःला महाक्षत्रप म्हणून घेऊ लागला. नहपानाचा महाराष्ट्रात शिरकाव सुरू झाला, तसे सातवाहन मागे सरकू लागले. त्यांचे राज्य पुणे आणि पैठण एवढ्या भागात मर्यादित राहिले. गौतमीपुत्र सातकर्णी याचे वडील किंवा भाऊ यांच्या काळात या घडामोडी घडल्या. यानंतर सातवाहन आंध्र भागात सरकले. त्यांनी तेथे आपला राज्यविस्तार केला. 

गौतमीपुत्र सातकर्णी इसवीसनाच्या ६० साली गादीवर आला. तो पराक्रमी होता. शेवटी त्याने शकांचा पराभव केला. अर्थात, ही गोष्ट काही एका रात्रीत घडली नाही. नहपानाचा पराभव केला, तेव्हा गौतमीपुत्राचे राज्यवर्ष होते १८. याचा अर्थ राज्यावर आल्यापासून पुढील १८ वर्षे तो शकांशी लढत होता. त्याचवेळी राज्य बळकट करत होता. जुन्नरचा पाडाव झाल्यानंतर सातवाहनांची राजधानी पैठणला हलली होती. नहपान पैठणच्या जवळ पोहोचला होता; परंतु त्याला दूर लोटण्यास गौतमीपुत्राला यश मिळाले. गौतमीपुत्राने विदर्भ प्रांत सुरक्षित करून कल्याण भागात हालचाली सुरू केल्या. त्यामुळे नहपानाला तेथे लक्ष देणे गरजेचे झाले. हे करताना त्याने नहपानाला मिळालेल्या काही राजांचा पराभव केला, तर काहींना आपल्याकडे वळविले. कोकण किनारपट्टी, मराठवाडा, विदर्भ या भागातून दबाव आणत त्याने नहपानाची कोंडी केली. शेवटचे मोठे युद्ध नाशिकजवळ गोवर्धन नावाच्या गावाशी झाले, असे अभ्यासकांचे मत आहे. या युद्धात नहपानाचा संपूर्ण पराभव झाला. नहपान मारला गेला. क्षहरात शकांचा उच्छेद झाला आणि सातवाहनांनी आपले राज्य मिळविले. हे युद्ध इसवीसन ७८ मध्ये झाले, असे अभ्यासकांनी मांडले आहे. 

वाकाटक राजा देवसेन याच्या विदर्भातील हिस्सेबोराळा येथील लेखामध्ये सर्वप्रथम याचा ‘शकांचा ३८०’ असा उल्लेख सापडतो. त्यानंतर चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याच्या ऐहोळे प्रशस्तीमध्येही शक राजांचा काल असा उल्लेख सापडतो. त्यामुळे शक राजांनी सुरू केलेली कालगणना आम्ही वापरत आहोत हे सर्वानी स्पष्ट सांगितले आहे. या सर्व लेखांमध्ये ‘शक’ शब्दाचा अर्थ संवत्सर असा नसून त्या लोकांचे नाव असा आहे. येथे कुठेही हा सातवाहनांचा संवत्सर आहे असे म्हटले नाहीये. इसवी सनाच्या बाराव्या शतकापासून या संवत्सराचा संबंध शालिवाहनांशी जोडला गेलेला दिसतो. तेव्हापासूनच ‘शक’ या शब्दाचा अर्थही संवत्सर असा झालेला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनीही त्यांच्या राज्याभिषेकानंतर ‘राज्याभिषेक शक’ सुरू केला. या नावात ‘शक’ हा शब्द ‘संवत्सर’ या शब्दाशी समानार्थी आहे. हीच परंपरा आजपर्यंत सुरू आहे.

प्राचीन भारतीय लोकपरंपरा मात्र असे सांगते की शालिवाहनानी शकांचा पराभव केल्यावर हा संवत सुरू झाला किंबहुना तो सातवाहनांनीच सुरू केला. पण त्यांनी तो अजिबात वापरला नाही असे दिसते. कारण गौतमीपुत्र सातकर्णीनंतर त्याचा मुलगा जेव्हा गादीवर आला, तेव्हा त्याने स्वत:चा नवीन राज्य संवत्सर सुरू केला. तसेच खुद्द गौतमीपुत्रानेही तो कधी वापरला नाही. वापरायचा नव्हता तर कशाला सुरू केला असा प्रश्न आपल्याला पडणे साहजिक आहे. पण खरा इतिहास पाहिला तर असे दिसते की सातवाहनांनी एका शक राजाला म्हणजे नहपानाला हरवले तेव्हा दुसरा शक राज म्हणजे चष्टन गादीवर आला. त्याने जो संवत्सर सुरू केला, तो पुढे सलग ३०० वर्षे वापरला गेला आणि ‘शक राजांचा संवत’ या नावाने इतर अनेक राजांनी तो वापरला, कारण दरवर्षी नवीन राज्य वर्ष देण्यापेक्षा हे जास्त सोयीचे होते. तो इतका लोकप्रिय झाला की पुढे शक या शब्दाचा अर्थ संवत्सर असा घेतला जाऊ लागला. त्यानंतर तो भारतभर, एवढेच नव्हे तर आग्नेय आशियातही काही देशांमध्ये वापरला जाऊ लागला. 

भारतीय लोकांनी मात्र यामध्ये शालिवाहन राजाने शक राजाला हरविल्याची स्मृती कायम ठेवली, पण संवत्सर सुरू करणारा राजा हा कोणीतरी दुसराच होता हे ते विसरून गेले. त्यामुळे शालिवाहन शक असे नाव त्याला मिळाले आणि तेच वापरले जाऊ लागले. या विजयाप्रीत्यर्थ गुढी तोरणे इ. उभारून तो दिवस साजरा केला जाऊ लागला. पण चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच ही घटना घडली का हे सांगणे आज अवघड आहे. या संवत्सराचा वापर दक्षिण भारतात आणि उत्तर भारतातील काही भागात होतो. गुढीपाडव्याच्या दिवशी पंजाबी, सिंधी, कन्नड लोकांचेही नवीन वर्ष सुरू होते. मात्र या सर्वाच्या बाबतीत वेगवेगळ्या कथा आणि परंपरा आहेत. भारतीय सणांमधील शास्त्रीय, सामाजिक, व धार्मिक कारणे समजून घेतले तर जाणीवपूर्वक हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होईल आणि आज त्याची जबाबदारी आपल्यावर आहे. 

संदर्भ - सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास - डॉ.  वा.वि. मिराशी 

सर्वेश फडणवीस 





Monday, April 18, 2022

● धैर्याचा महामेरू भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे

आपल्या पूर्वजांचे स्मरण म्हणजे कर्तृत्वाच्या प्रेरणेचा अखंड स्रोतच आहे. त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला नेहमीच बोध आणि मार्गदर्शन मिळत आलेले आहे. केवळ भारतीयांनाच नव्हे,तर जगातील साऱ्या मानवांना आपले हे सांस्कृतिक धन एक कुतूहलाचा विषय आहे. याच श्रेणीत शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणारे स्त्री शिक्षणाचे प्रणेते महर्षी धोंडो केशव कर्वे. महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांची आज जयंती आहे.  त्यांचे विचार आजही प्रासंगिक वाटतात.

महर्षी कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल, इ.स. १८५८ साली रत्नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. ते स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक होते. इ.स. १९०७ साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. त्यांनी एसएनडीटी या महिला महाविद्यालयाचीही स्थापन केली होती. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून १९५८ साली वयाच्या १००व्या वर्षी त्यांना "भारतरत्न" या सर्वोच्च किताबाने गौरविण्यात आले होते.

बालपण आणि तारूण्य

रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड हे अण्णांचे गाव. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली. इ.स. १८८१ मधे मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मुंबईच्या एल्फिन्सटन कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला. त्याच वर्षी अण्णासाहेबांनी फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे इ.स. १९१४ पर्यंत त्यांनी ही नोकरी केली. अण्णा गणित विषयाचे तज्ञ होते. लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत ते उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले. इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला.

वयाच्या १४ वर्षीच अण्णांचे लग्न झाले होते. इ.स. १८९१ मध्ये त्यांच्या सहचारिणी राधाबाई कालवश झाल्या. त्या वेळी अण्णांचे वय पंचेचाळीसच्या आसपास होते. प्रौढ वयात विधुर झालेल्या पुरुषानेही अल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या काळात प्रथा होती. लहान वयात मुलींची लग्न होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे. ही समाज रीत नाकारणाऱ्या अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. ही गोष्ट त्या काळी पटणारी नव्हती. अण्णा पत्नीसह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदीबाई कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. अण्णासाहेबांच्या कार्यात आनंदीबाई कर्वे यांचा सक्रिय वाटा होता.

अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती. घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या हेतूने २१ मे, इ.स. १८९४ या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक‘ मंडळाची स्थापना केली. विधवा-विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालणे हे या मंडळाचे काम होते. बालविवाह, केशवपन यासारख्या अन्याय्य रूढींत अडकलेल्या स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून इ.स. १८९६ मध्ये अण्णांनी सहा विधवा महिलांसह ‘अनाथ बालिकाश्रम‘ काढला. ‘विधवा विवाहोत्तेजक‘ मंडळाची स्थापना केली. रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि रु. ७५० संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांकडे सुपूर्द केले. या उजाड माळरानावर १९०० मध्ये अण्णांनी एक झोपडी बांधली. गावोगाव फिरून अण्णांनी यासाठी पैसा गोळा केला. आश्रम चालवताना अण्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. रोज सायंकाळी त्यांना पुण्याहून हिंगण्याला चार मैल पायी जावे लागायचे. वारा असो,पाऊस असो किंवा थंडी असो त्रेचाळीस वर्षाचे अण्णा पाठीवर स्वयंपाकाला लागणारे सगळं सामान घेऊन रस्त्याने पायी जात असत. सतत दोन वर्षे त्यांची ही सेवा सुरू होती. याविषयी अण्णांनी आपल्या आत्मचरित्रात विस्तृत लिहिलेलं आहे. 

१९०७ साली अण्णांनी पुण्यात ‘ महिला विद्यालय’ सुरू केले. मुख्य उद्देश स्त्रियांमध्ये ज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा हा होता. यासाठी दोन निधी उभारले गेले . एक ‘ ब्रह्मचर्य निधी’व दुसरा ‘शिक्षण निधी’. उद्देश असा होता की मुलीने वीस वर्षाची होईपर्यंत विवाह करु नये व तोपर्यंत शिकत रहावे. 

अनाथ बलिकाश्रम , महिला विद्यालय यासारख्या संस्था चालवायला सेवाभावी कार्यकर्त्यांची गरज होती. अण्णांना एक कल्पना सुचली आपल्या लोकांनी आपल्याच समाजाची सेवा केली तर आपलाच विकास होईल. समाजसेवेची परंपरा निर्माण व्हावी म्हणून त्यांनी ‘सेवाभावी कार्यकर्ते’ निर्माण करणारी संस्था काढली. अण्णांनी निःस्वार्थ बुद्धीने सेवा करणारी संस्था स्थापण्याची शपथ घेतली. आपली सगळी कमाई संस्थेला अर्पण करायची व अत्यंत साधे जीवन जगायला आवश्यक असणारा पैसाच फक्त संस्थेकडून घ्यायचा असे त्यांनी ठरवले. १९१६ ला अण्णांच्या डोक्यात भारतीय स्त्रियांसाठी आपण एखादे विद्यापीठ स्थापन करावे अशी कल्पना साकारत गेली. विद्यापीठ स्थापनेचे उद्देश होते की 

१. स्त्रियांना असे शिक्षण मिळावे की जेणेकरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा. 

२. जर विवाहित असतील तर त्या सक्षम पत्नी व माता व्हाव्यात आणि 

३. राष्ट्र उभारणीत आपलाही सहभाग आहे या दृष्टीने त्यांचे प्रशिक्षण व्हावे. 

विद्यापीठाचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे इथे शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असायला हवे. विद्यार्थ्याला मातृभाषा सोडून इतर भाषेच्या माध्यमातून जर शिकावे लागले तर ते त्याच्यावर अकारण ओझे होईल. अण्णांना माहिती होते की ज्ञानप्राप्तीचे सर्वात मोठे साधन म्हणजे फक्त मातृभाषा होय. 

मान्यताप्राप्त मोठेपणा 

१८ एप्रिल १९२८ वयाच्या एकाहत्तरी ला पुणे नगरपालिकेने एक मोठा सत्कार करून पुण्यातील एका प्रमुख रस्त्याला ‘कर्वे रोड’असे नाव देण्यात आले. १९२९ मध्ये अण्णा युरोप, अमेरिका व आशिया खंडातील अनेक देशांना भेटी देऊन आलेत. या प्रवासात बर्लिनमध्ये जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईन बरोबर शिक्षण या विषयावर विचार विनिमय केला. परदेश दौऱ्यातुन आल्यावर अण्णांच्या जनसेवेच्या कार्यातील उत्साह किंचितही कमी झाला नव्हता. पुढे त्यांनी आपले लक्ष लहान मुलांच्या शिक्षणाकडे वळवले. महाराष्ट्रातील अनेक खेड्यांमध्ये त्याकाळी प्राथमिक शाळा नव्हत्या. त्यांनी सामूहिक प्रयत्नातून अशा शाळा सुरू केल्या. यासाठी त्यांनी ‘प्राथमिक शिक्षण संस्थेची’स्थापना केली. १९४८ मध्ये सरकारने या शाळांचा ताबा घेतला. तोपर्यंत अण्णांनी त्या चालविल्या. 

माणसा माणसात कुठलाही भेद नाही, सर्व एकच आहेत.’ अशाप्रकारची वृत्ती जनमानसात रुजावी ही अण्णांची इच्छा होती. म्हणून त्यांनी ‘एकता परिषद’ ही संस्था सुरू केली. त्यावेळी त्यांचे वय छ्याऐंशी होते. हा एकतेचा संदेश प्रसारित करण्याच्या उद्देशाने त्यांनी तेव्हा साऱ्या देशभर प्रवास केला. अण्णांनी आपले सारे आयुष्य जनसेवेसाठी वेचले. सरकार व अन्य संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सन्मानित केले. बनारस हिंदू विद्यापीठाने ‘साहित्याचार्य’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. १९५५ मध्ये भारत सरकारने ‘ पद्मविभूषण’ हा किताब देऊन त्यांना भूषविले. अण्णांचा १९५८ मध्ये शंभरावा वाढदिवस मोठ्या समारंभापूर्वक साजरा करण्यात आला. त्याचवेळी त्यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट ही प्रसिद्ध करण्यात आले. भारताच्या राष्ट्रपतीनी त्यांना ‘भारतरत्न’देऊन गौरविले. संपूर्ण देशाने त्यांना सन्मानित केले. त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

९ नोव्हेंबर १९६२ ला अण्णांनी जगाचा निरोप घेतला. मृत्यूशय्येवर असताना ते म्हणाले होते. ‘जर स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करायचे असेल तर सर्वांनी एकाच पवित्र मंत्राचा जप करणे आवश्यक आहे. तो मंत्र म्हणजे आपल्या पुरातन धर्मग्रंथानी जे सांगितले ,की ‘ सर्वांचं चांगलं व्हावे’हा विचार. भारतीय स्त्रीला अंधकारातून प्रकाशाकडे व अज्ञानातून ज्ञानाकडे नेले. दुष्ट अशा अंधश्रद्धांच्या रुढीच्या विळख्यातून तिला मुक्त केले अशी थोर व्यक्ती एक महर्षी ऋषितुल्य व्यक्तित्वच म्हणता येईल. 

आज अण्णांनी स्थापन केलेल्या सर्व संस्था प्रगतीपथावर आहेत. महिला अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून कर्वे संस्था कार्यरत आहे. अनेक मुली आज या क्षेत्रात दैदीप्यमान अशी कामगिरी करत आहेत. आजची स्त्री शिक्षित होऊन आपले उज्वल ध्येय गाठण्यासाठी जागृत आहे. व यात कर्वे शिक्षण संस्थेचे बहुमूल्य असेच योगदान आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस

Friday, April 8, 2022

आल्हाददायक संध्याकाळ..


मध्यंतरी फिरणाऱ्या चाकावर मातीला आकार देतांनाचा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याबद्दल अधिक विचारणा होऊ लागली. ज्यावेळी पचधार या गावी गेलो आणि तेथील फिरत्या चाकावरील मातीला आकार देताना बघितलं आणि मन काहीकाळ एका वेगळ्याच विश्वात रमले होते. माणूस हा मुळात संवेदनशील प्राणी आहे. माणसाने नवे काही आनंद देणारे बघितले की मनाला जे स्थैर्य मिळते त्यासाठी तो कायमच त्याच्या शोधात असतो. खरंतर भटके जीवन जगणाऱ्या अश्मयुगीन मानवाला चाकाचा शोध लागला आणि त्यामुळे त्याच्या जीवनाला गती आली. पण जिला बघून ‘फिरत्या चाकावरती देसी, कुटुंबाला आधार’ अशा ओळी सुचाव्यात अशी घटना नुकतीच घडली. 

फिरत्या चाकावरून मातीला आकार देऊन तयार केलेली भांडेच आज ज्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आधार ठरली आहेत ते pottery village नावाने प्रसिद्ध असलेले मध्य प्रदेश मधील पचधार हे छोटसं पण समृद्ध गाव आहे. जबलपूर रोड वरील महाराष्ट्र-मध्यप्रदेश बॉर्डरवरील खवासा हे चेकपोस्ट ठिकाण आणि त्याच्या जवळच हे गाव आहे. गाव म्हणजे फक्त १०० घरांचे आहे. या गावातील सगळे रहिवासी मूळचे राजस्थानी आहेत. आधीच्या पिढीतील माणसे या गावी आले आणि इथेच स्थायिक झाले आणि पुढे इथलेच होऊन गेले.आज सगळेजण एकत्र गुण्या-गोविंदाने नांदत आहेत. हे सर्व प्रजापती कुंभार आहेत. गावात प्रवेश केल्यावर गावातील प्रत्येक घरासमोर चिकण मातीची भांडी, त्याचे विविध आकार, काही घरांसमोर छान लहान मोठी भांडी रचून ठेवलेली दिसतात. माती वापरुन भांडी करणे हे अतिशय कौशल्याचे काम आज या गावात शांतपणे सुरू आहे. याच गावातील मातीच्या वस्तू महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक शहरात विक्रीस जातात. 

आता उन्हाळ्याची चाहूल लागताच साधारणपणे प्रत्येकांकडे पाणी पिण्यासाठी माठ आलेला असेलच. पण या ठिकाणी वेगवेगळ्या आकाराचे माठ, विशिष्ट आकाराचे मातीचे भांडे, ग्लास अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहेत. हे सगळं बघतांना वाटलं की, आज नाविन्याचा अट्टहास असताना पारंपरिक जुन्या वस्तूं या नव्या रुपात आल्या आहे. काही क्षण वाटले की ज्या मातीतून निर्माण झाले परत त्याच मातीत हे परत करायचे आहे. पर्यावरण संतुलनासाठी आणि प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी नव्याने आलेले हे मातीचे विविध प्रकारातील भांडे वापरण्यासाठी चांगले आहे. कुकर, कढई, तवा, पोळपाट, फुलांची परडी, असे विविध प्रकार इथे बघायला मिळतात.

आज माणसाच्या जीवनशैलीत बराच बदल झालेला आहे. माणूस विज्ञानाच्या आणि आधुनिकीकरणाच्या आहारी गेला आहे असे असताना या गावातील समृद्धी आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील तृप्ती आणि समाधान अनुभवले आणि छान वाटलं. इथे येण्याचं सार्थकी लागलं त्याबद्दल ज्या 'द कॅम्प पेंच' रिसॉर्ट मध्ये मुक्काम होता त्याचे सर्वेसर्वा वरूण दादा आणि अजय काका यांचे विशेष धन्यवाद आहे. श्री प्रकाश शनीचरे यांच्याकडे ते घेऊन गेले. त्यांच्यामुळे हे छानसं गाव आणि येथील विविध वस्तू बघता आल्या आहेत. पेंचच्या जंगलात गेल्यावर जंगलाची शांतता खूप अंतर्मुख करून जाते. पण याच जंगलात जातांना आधी या गावी एकदा नक्की भेट द्यावी. हे सगळं बघून जी मनःशांती आणि आनंदाची अनुभूती मिळते ती शब्दांत व्यक्त करताच येत नाही. 

सर्वेश फडणवीस

#pottery #PotteryVillage #pachdhar

Tuesday, April 5, 2022

नात्यातील गोडवा जपणारे चितळे बंधू मिठाईवाले


आज चितळे बंधू या नावातच प्रत्येक मराठी माणसाला आपलेपण आणि अभिमान वाटतो. चितळे यांच्या कुठल्याही दुकानात गेल्यावर बाकरवडी आणि आंबा वडी घेवून बाहेर पडणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर कृतार्थ भाव सहज बघायला मिळतात. पण हा इथवरचा प्रवास म्हणावा तसा सोपा नाही. या कुटुंबाने चार पिढ्यांचा वारसा जपलेला आहे. प्रत्येक पिढीने आपले पूर्ण समर्पण भावनेने कार्य करत आज चितळे बंधू या ब्रँडने जी उंची गाठली आणि सतत नवनवीन प्रयोग करत हा उद्योग यशोशिखरावर नेताना त्यांनी आपल्या प्रत्येक सहकाऱ्यांबरोबर जी सहजता आणि जे विश्वासाचे नाते निर्माण केलें आहे ते फॅक्टरी मध्ये गेल्यावर पदोपदी जाणवतं.

मधल्या काळात पुण्यात आपल्यापैकी कुणीही आणि कधीही गेले तरी बाकरवडी आणि आंबा वडी घेऊनच या असा आग्रह आपण करायचो. या दोन्ही पदार्थांबद्दल प्रत्येकाच्या मनात कायमच कुतूहल होते. हे कसे तयार होतात ? आज इतकी मोठी मागणी असून सुद्धा कुठेही याच्या चवीत फरक पडलेला नाही आणि संपली असे कुठेही ऐकीवात नाही. मध्यंतरी पुणे मुक्कामी असतांना चितळे बंधू पार्टनर इंद्रनील चितळे यांना हक्काने फॅक्टरी बघण्याचा आग्रह धरला. त्यांनी ही विनंती मान्य केली आणि पुण्यातील खेड-शिवापूर येथील रांझेगाव येथे पोहोचलो. खरंतर फॅक्टरी बघण्याचा हा पहिलाच अनुभव होता पण ज्या पद्धतीने आणि शिस्तीत इथे काम चालते ते बघून आपण थक्क होतो आणि अडीच-तीन तास संपूर्ण फॅक्टरी बघून आपल्याला अभिमान वाटतो आणि मनात आपलेपणाची भावना निर्माण होते. मराठी उद्योजकाची ही भरारी आणि आजवरचा प्रवास बघतांना आपण थक्क होतो. एका रात्रीत हे वैभव उभे झाले नाही. प्रत्येक पिढीने त्याग, परिश्रम, जिद्द, चिकाटीने हा व्यवसाय केला आहे आणि येणारी चौथी पिढीही त्याच जिद्दीने करते आहे.

या फॅक्टरीत दररोज जवळपास २० तास काम चालते. सकाळी पावणे पाचला येथील दिवस सुरू होतो आणि सणासुदीच्या काळात २४ तास काम चालू असतं. दुकान उघडताच अवघ्या ३-४ तासांमध्ये दुकानातील बाकरवडीचा संपूर्ण माल संपून जातो, म्हणजे या बाकरवडीचे लोक किती चाहते आहेत याची कल्पना येईल. पण बाकरवडी संपली या बद्दल बडेजाव न बाळगता का संपली याबद्दल विचार होऊ लागला, मागणी वाढली आणि तिचा पुरवठा आपण करू शकत नाही तर हे आपले अपयश आहे असा विचार आताच्या पिढीने केला आणि मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. आज बाकरवडी संपली हे कुठेही ऐकू येत नाही. ग्राहकांना संतुष्ट करणे हाच ध्यास घेऊन बाकरवडीचे उत्पादन वाढत गेले. पण बाकरवडीच्या तिखट आणि आंबट – गोड चवीची जादू ही महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता आता सातासमुद्रापार गेली आहे .

खरंतर या सगळ्याची सुरुवात श्री भास्कर गणेश चितळे यांनी  १९३९ साली सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे 'चितळे डेअरी'  नावाने केली. त्यांनी असाच उपक्रम आधी सुरू केला होता पण दुर्दुवाने त्यात त्यांना अपयश आले. अपयशामुळे खचून न जाता त्यांनी पुन्हा नवा व्यवसाय सुरु केला. पुढे या व्यवसायात अतिशय उत्तम प्रतिसादामुळे श्री रघुनाथ भास्करराव चितळे यांनी व्यवसाय विस्तारण्याचे काम हाती घेऊन, मुंबईतही अनेक वर्षे दुधाचा पुरवठा केला आणि कालांतराने ते पुण्यात स्थायिक झाले. १९५० साली श्री रघुनाथराव चितळे (भाऊ साहेब) व श्री नरसिंहराव चितळे (राजाभाऊ) या दोन बंधूंनी पुण्यात 'चितळे बंधू मिठाईवाले' ची पहिली शाखा सुरु केली. दुध आणि दुग्धजन्य पदार्थ पासून सुरू झालेला हा प्रवास श्रीखंड, चिवडा, फरसाण, शेव, अशा चटपटीत पदार्थांचे उत्पादनापर्यंत वाढतच गेला. या व्यवसायात यश मिळत गेले आणि त्यांनी १९५० सालच्या मध्यात पुण्यात डेक्कन जिमखाना येथे भाड्याने जागा विकत घेतली आणि पहिले दुकान सुरू झाले.

दुधाच्या व्यवसायात वृद्धी होत असतांना नरसिंहराव चितळे यांना
कारखान्यात एका गुजराती आचारीने बाकरवडी दाखवली होती, त्यात त्यांनी बदल करून ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली. दुकानात विक्रीसाठी उपलब्ध असलेली बाकरवडी पुण्यातील खवय्यांना इतकी भावली की आज ती जगभ्रमंती करते आहे आणि याच बाकरवडी ने चितळे बंधूंना जगभर पोहोचवले आणि मराठी उद्योजकांच्या यादीतील मानाचे पान त्यांच्या नावावर झाले आहे.

पुढे १९७० च्या दशकात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे नरसिंहरावांना जपान दौऱ्यावर पाठवण्यात आले होते. तिथल्या उद्योगांचे झालेले यांत्रिकीकरण पाहून ते थक्कच झाले. जितक्या वेगानं तिथे कामे होत होती, ते पाहून त्यांना नवी प्रेरणा मिळाली आणि त्याच प्रेरणेतून १९८९ साली काही संशोधनाने जर्मनी आणि युरोपमधून खास बाकरवडी बनवण्यासाठी मशीन डिजाईन करून घेऊन त्या मशीन्स भारतात आणल्या. यामुळे आता चितळे बंधू मिठाईवाले यांचे अर्धे काम सोपें झाले आहे. ९० च्या दशकात बाकरवडी चे उत्पादन व खप हे दिवसाला ३०० किलो इतके होते. वाढत्या मागणीमुळे त्याकाळात रघुनाथरावांनी मुंबईच्या प्रभादेवी बरोबर, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात येथे हि चितळे बंधूंच्या शाखा सुरु केल्या. त्याकाळी शाखा असणं ही जरा निराळी आणि नवीन गोष्ट होती. पण चितळेंनी त्यात यश मिळवून दाखवले. आज हा आकडा भरपूर वाढलेला दिसून येतो,

आज बाकरवडी चे एका तासाला ११०० किलो उत्पादन होते त्यातील ८० % पाकिटबंद विकले जाते, २०% पुण्यातील स्टोअरमध्ये विक्रीस उपलब्ध केले जाते आणि विशेष म्हणजे इतके उत्पादन करूनही बाकरवडी शिल्लक राहत नाही. चितळे एक्सप्रेस नावाने नवी दालने उभी झाली आहेत तेथेही चितळे यांचा सगळा माल उपलब्ध होतो आहे. एक्सप्रेस मध्ये पण बाकरवडी आणि अन्य पदार्थ वेळेत पोहोचवणे, त्याची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी विविध संशोधन सुरू झाले आणि बऱ्याच संशोधनात यश हाती आले आहे. आज पॅकिंग सुद्धा मशीन ने होत असल्यामुळे बाकरवडीची शेल्फ लाईफ ही वाढली आहे,  ज्यामुळे विदेशातून होणारी बाकरवडीची मागणी सुद्धा वेळेत पूर्ण करण्यात चितळे बंधू मिठाईवाले यांना मोठं यश आले आहे.

आज फक्त पुण्यातील २४ मोठ्या स्टोअर्सद्वारे किरकोळ विक्री सुरू आहे. चितळे एक्सप्रेस नावाने उघडले जाणारे आउटलेट महाराष्ट्र आणि गोव्यात ४० हुन अधिक आहेत. संपूर्ण भारतात १० हुन अधिक राज्यातील २ लाखांहून अधिक किरकोळ विक्रेते चितळे यांची उत्पादने विकत आहेत आणि सर्व खंडांमध्ये निर्यात होते आहे. चितळेंच्या सगळ्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय उत्पादनांपैकी, म्हणजे आंबा बर्फी, पेढे, श्रीखंड,  बाकरवडी सगळ्यात जास्त विकली जाते आणि त्याची शेल्फ लाईफ वाढल्याने मागणी आणि पुरवठा दोन्ही वाढला आहे. प्रक्रियेतील  जागतिक विस्तारामुळे, नवीन उत्पादन युनिटची आवश्यकता होती आणि तेच लक्षात घेऊन सध्याच्या रांझेगाव फॅक्टरीला लागूनच असलेल्या नवीन जागेत उत्पादन सुरु होणार आहे.

चितळे बंधू मिठाईवाले यांची बाकरवडी आज जगन्मान्य ओळख बनली असली तरी 'बाकरवडी म्हणजे चितळे' हे समीकरण जगाच्या पाठीवर कुठेही मराठी माणूस असेल त्याच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. कारण बाकरवडी वर मूळ हक्क जरी गुजरातचा असला तरी तिला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकमान्यता मिळवण्यासाठी चितळे यांनी घेतलेले कष्ट जगजाहीर आहे. विश्वसनीयता, उच्च गुणवत्ता आणि सचोटीपूर्ण पारदर्शी व्यवहार यातूनच त्यांनी आपले नाव कमावलेले आहे. चार पिढ्यांनी आपल्या चिकाटीने व बदलत्या काळाशी मैत्री करून त्या प्रमाणे स्वतःत अजून सुधारणा व बदल करून एवढे मोठे साम्राज्य उभे करून दाखवले आहे आणि याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हा कौटुंबिक व्यवसाय आहे. कुठल्याही उद्योजकाने चितळे बंधू उद्योगाकडून शिकण्यासारखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मालाची गुणवत्ता आणि व्यवहारातील सचोटी या दोन्ही बाबत ते सतत दक्ष आहेत म्हणून त्यांचा आज नावलैकिक टिकून आहे आणि नात्यातील गोडवा जपण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहेत.

✍️ सर्वेश फडणवीस 

#ChitaleBandhuMithaiwale

Friday, April 1, 2022

केशवाष्टक

 

डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक त्यांच्या स्वतःच्याच जीवनकार्याला हे अष्टक तंतोतंत लागू पडते. खरोखरच, डॉक्टरांसारखा संघटक, महापुरुष क्षणाक्षणाला जन्माला येत नाही. आपल्या राष्ट्राचं भाग्य थोर म्हणूनच डॉक्टरांसारख्या विभूतिमत्त्वाचा या देशात जन्म झाला. संघ समजून घ्यायचा असेल तर आधी डॉक्टरांचे चरित्र अभ्यासायला हवे. कारण डॉक्टर त्यांच्या कार्याशी इतके एकरूप झाले होते की, त्यांचा जीवनपट म्हणजे संघाचा इतिहासच आहे. काही वर्षांपूर्वी तृतीय शिक्षा वर्गात प्रबंधक असतांना केशवाष्टक सर्वप्रथम ऐकले. केरळ मधील सर्व स्वयंसेवक पहाटे एकत्रित यायचे आणि याचे सामूहिक पठण करत असत. हे अष्टक  प्रत्येक स्वयंसेवकाला स्फूर्ती आणि नवचैतन्य देणारे आहे. 

हिन्दुर्विशाल गुणसिन्धुरपीहलोके
बिन्दूयते विघटितो न करोति किञ्चित्
सत् संहतिं घटयितुं जननं यदीयम्
तं केशवं मुहुरहं मनसा स्मरामि ।।१।।

हिंदूंच्या विशाल गुणरूपी सागराला जो या जगात बिंदूंप्रमाणे जोडतो आणि किंचितही विघटन करत नाही, सज्जनांचे संघटन करण्यासाठी ज्यांचा जन्म आहे त्या केशवाचे मी पुन्हा पुन्हा मनाने स्मरण करतो ।।१।।

भव्यं वपु: स्मितमुदारमुदग्रमोज:
सस्नेह गद्गदवचो मधुरं हितञ्च
वात्सल्यपूर्णममलं हृदयं यदीयं
तं केशवं मुहुरहं मनसा स्मरामि ।।२।।

भव्य शरीर, उदार स्मित, आत्यंतिक तेज; स्नेहपूर्ण, मधुर आणि हितकारक वाणी, वात्सल्यपूर्ण आणि निर्मळ हृदय ज्यांचे आहे
त्या केशवाचे मी पुन्हा पुन्हा मनाने स्मरण करतो. ।। २ ।।

सङघे कलौभवतिशक्तिरिति: प्रसिद्धं
जानाति हिन्दुजनता न तु तत्कथञ्चित्
सम्यग्विनेतुमिहतद्धृतवान् वपुर्य:
तं केशवं मुहुरहं मनसा स्मरामि ।। ३ ।।

कलियुगात संघटन शक्ती आहे, हे प्रसिद्ध आहे ते हिंदू लोकांना कसे बरे माहीत नाही? त्याचे योग्यप्रकारे समूदेशन करण्यासाठी ज्यांनी शरीर धारण केले. त्या केशवाचे मी पुन्हा पुन्हा मनाने स्मरण करतो....।। ३ ।।

क्षुद्रं न किञ्चिदिहनानुपयोगि किञ्चित्
सर्वं हि सङ्घहितमत्र भवेत्फलाय
इत्थं जनं विनयतिस्म निरन्तरं य:
तं केशवं मुहुरहं मनसा स्मरामि ।। ४ ।। 

इथे कुणीही शूद्र नाही, कुणीही निरुपयोगी नाही,इथे सर्वच संघाच्या उपयोगाचे आणि फलदायी होईल असे ज्यांनी लोकांना नेहमी शिकवले असे त्या केशवाचे मी पुन्हा पुन्हा मनाने स्मरण करतो.।४।।

आर्यक्षितेरिहसमुद्धरणाय दास्यात्
दास्यामि देहमिहसङघटनां विधातुं
निश्चित्यभीष्ममचरत् सततं व्रतं य:
तं केशवं मुहुरहं मनसा स्मरामि।। ५ ।।

आर्यभूमीचा पारतंत्र्यातून उद्धार करण्यासाठी मी हा देह संघटन करण्याकरिता अर्पण करेन असा निश्चय करून ज्यांनी भीष्मव्रताचे आचरण केले त्या केशवाचे मी पुन्हा पुन्हा मनाने स्मरण करतो....।। ५ ।।

यो डॉक्टरेति भिषजां पदमादधानो
विज्ञातवान् भरतभूमि रुजां निदानम्
सङघौषधं समुदपादिनवञ्चयेन
तं केशवं मुहुरहं मनसा स्मरामि।। ६ ।।

जे 'डॉक्टर' अशी वैद्यक पदवी धारण करणारे होते, त्यांनी भरतभूमीच्या वेदनेचे निदान जाणले (आणि) संघरुपी औषध निर्माण केले व योजले त्या केशवाचे मी पुन्हा पुन्हा मनाने स्मरण करतो....।। ६ ।।

एको बहु किल भवेयमितिश्वरेच्छा:
सेवाभवत्सततमेव परायदन्त:
एकश्चयो विहितवानिहसङ्घसर्गम्
तं केशवं मुहुरहं मनसा स्मरामि ।। ७ ।।

'एक असून अनेक होईन' ही ईश्वराची इच्छा आहे. शेवटपर्यंत लोकांची सेवा घडावी हा एक निश्चय करून संघ निर्मिती केली त्या केशवाचे मी पुन्हा पुन्हा मनाने स्मरण करतो....।। ७ ।।

एषं हि कार्यमिदमित्यवगत्य सम्यक्
सङ्घक्रतो घृतमिवात्पयदायुराज्यम्
यो जीर्णदेहमजहान्नवताम् समेतुम्
तं केशवं मुहुरहं मनसा स्मरामि ।। ८ ।।

'हेच कार्य आहे' असे चांगल्या प्रकारे ओळखून संघरुपी यज्ञामध्ये तुपाप्रमाणे ज्यांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली ज्यांनी जीर्ण झालेल्या देहाचा त्याग नवीन देहप्राप्ती करता केला. त्या केशवाचे मी पुन्हा पुन्हा मनाने स्मरण करतो....।। ८ ।।

अष्टकं केशवस्येदं प्रातर्नित्यं पठन्ति ये।
सङ्घकार्ये न काठिण्यं तेषां भवति कर्हिचित् ॥

हे केशवाचे अष्टक रोज सकाळी जे पठण करतात त्यांना संघकार्यात कधीही काठीणता येत नाही.

संकलक - सर्वेश फडणवीस 

संदर्भ - युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार-सांस्कृतिक वार्तापत्र, गीतगंगा, डॉ. हेडगेवार ( सचित्र चरित्र)