भारतीय संस्कृतीत सणांची जी रचना आहे ती इतकी जाणीवपूर्वक केली आहे की, त्यावर विचार करायला गेलो तरी आपण या संस्कृतीचे पाईक आहोत याचा अभिमान वाटतो. आपण सगळेजण काहीतरी नित्यकर्म करत असतो पण ते करत असताना त्यामागचा जो काही विचार आहे त्यातून आपल्याला जे शिकणे अपेक्षित आहे ते आपल्याला माहिती नसतं किंवा मग आजच्या धावपळीच्या दिवसात त्याबद्दल आपण जाणून घेत नाही. असाच मध्यंतरी एका पूजेत बसलो असतांना गुरुजींनी संकल्प सांगितला. पूजा म्हंटल की संकल्प हा त्याचा भाग आलाच. संकल्प म्हणतांना ' शालिवाहन शके ( नाव ) संवत्सरे असा उल्लेख केला. पूजा संपली आणि त्यातील शालिवाहन शके आणि संवत्सराबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा झाली. अभ्यास आणि वाचून जे हाती आले ते असे..
शालिवाहनाने सुरु केलेल्या कालगणनेला शालिवाहन शक म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीला गुढीपाडवा हे नाव आहे. या दिवशी हिंदूूंच्या नवीन वर्षांची सुरुवात होते म्हणून या दिवसाला वर्ष प्रतिपदा असेही आपण म्हणतो. खरंतर भारतीय परंपरेमध्ये अतिशय मोठय़ा प्रमाणात वापरला गेलेला आणि शालिवाहन शक नावाने प्रसिद्ध असलेला संवत्सर या दिवशी सुरू होतो. या संवत्सराची स्थापना शालिवाहन म्हणजे सातवाहन या राजाने शक राजांचा पराभव करून केली असे आपण मानून याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी आपापल्या घरांवर गुढय़ा उभारतो असं ही म्हणतात. श्रीराम अयोध्येत परत आले तो दिवसही चैत्र शु.प्रतिपदा म्हणूनही गुढी उभारली जाते. पण थोडं अजून इतिहासात शिरत गेल्यावर काही माहिती मिळाली.
शक संवत्सराची मुख्य गोष्ट घडली इसवी सनाच्या ७८व्या वर्षी. सातवाहन आणि क्षत्रप किंवा शक, अशी दोन घराणी होती. या काळात शकांमधील क्षहरात या घराण्याची गुजरातच्या भागात राजवट होती. त्यावेळी महाराष्ट्रात सातवाहन राजे राज्य करत होते. क्षहरात घराण्यातील नहपान नावाचा राजा पराक्रमी होता आणि त्याला महाराष्ट्रामध्ये रस होता. त्याचे कारण होते येथून चालणारा व्यापार. गुजरातमधील या क्षहरातांच्या ताब्यात भडोच हे बंदर होते. सातवाहनांच्या ताब्यात कोकण किनारपट्टी आणि घाटवाटा होत्या. प्राचीन काळामध्ये ग्रीक व रोमनांशी या मार्गाने व्यापार चालायचा. कल्याण, सोपारा, चौल अशा बंदरांवर माल उतरायचा आणि नाणेघाटासारख्या घाटवाटांतून तो पैठण, जुन्नर अशा मोठ्या बाजारपेठांमध्ये पोहोचायचा. या साऱ्या व्यापारावर सातवाहनांचा ताबा होता. त्या काळातील परकीय व्यापाऱ्यांच्या रोजनिशींतून किंवा पत्रांमधून या व्यापाराची आणि त्यातून आलेल्या समृद्धीची कल्पना करता येते. नाणेघाटातील सातवाहन साम्राज्ञी नागणिकेच्या शिलालेखात नोंदविलेल्या दानांवरूनही ते समजते.
नहपानाने या भागात असलेल्या महाभोजांसारख्या छोट्या राजांशी हातमिळवणी केली आणि आपला एक गट तयार केला. या गटाने सातवाहनांशी युद्ध सुरू केले. नहपानाने साधारण इसवीसन ५० मध्ये नाशिकचा भाग ताब्यात घेतला. या भागात मिळणारी नाणी आणि नाशिकमधील पांडवलेणीच्या गुहा क्र. १० मध्ये असलेल्या शिलालेखामुळे ही गोष्ट समजते. हळूहळू त्याच्या गटाने पुढे शिरकाव करायला सुरुवात केली. हे करत असताना त्यांनी मिळालेल्या भागात नागरिकांसाठी सोयी-सुविधा निर्माण केल्या. पांडवलेणीमधील शिलालेख नहपानाचा जावई उषवदात याने कोरला आहे. त्यामध्ये तो केलेल्या कामांची माहिती सांगतो. या माहितीवरून त्यांनी गुजरात, खासकरून भडोच आणि सोपारा या दोन बंदरांना जोडणाऱ्या खुष्कीच्या मार्गावर बऱ्यापैकी काम केले होते, असे दिसते. पांडवलेणी, जुन्नर वगैरे भागांमध्ये क्षत्रपांचे शिलालेख आहेत. त्यामध्ये त्यांनी सामान्यांसाठी केलेल्या कामांची आवर्जून नोंद घेतली आहे. त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात दानेही दिली आहेत.
व्यापार आणि अर्थात त्यांच्या सेनेची हालचाल वेगाने व्हावी आणि हे होताना स्थानिक खूष असावे, यासाठीची काळजी त्यांनी घेतलेली दिसते. हा भाग पूर्णपणे ताब्यात आल्यानंतर त्यांनी पुढील हालचाल केली आणि कोकण ताब्यात घेतले. साधारण इसवी सन ७० च्या आसपास त्यांनी सातवाहनांचे महत्त्वाचे आणि टांकसाळ असलेले जुन्नर हे शहरदेखील ताब्यात घेतले. याविषयीचे पुरावे नाणी, शिलालेखांद्वारे आपल्याला मिळतात. नहपानाने येथे सातवाहनांच्या छापासारखी नाणी पाडली. विशेषतः सिंहाचा छाप असलेली. त्याने सातवाहनांच्या नाण्यांवर आपली मुद्रा उमटवली आणि आपल्या साम्राज्याची द्वाही फिरवली. जुन्नर ताब्यात घेतल्यानंतर नहपान स्वतःला महाक्षत्रप म्हणून घेऊ लागला. नहपानाचा महाराष्ट्रात शिरकाव सुरू झाला, तसे सातवाहन मागे सरकू लागले. त्यांचे राज्य पुणे आणि पैठण एवढ्या भागात मर्यादित राहिले. गौतमीपुत्र सातकर्णी याचे वडील किंवा भाऊ यांच्या काळात या घडामोडी घडल्या. यानंतर सातवाहन आंध्र भागात सरकले. त्यांनी तेथे आपला राज्यविस्तार केला.
गौतमीपुत्र सातकर्णी इसवीसनाच्या ६० साली गादीवर आला. तो पराक्रमी होता. शेवटी त्याने शकांचा पराभव केला. अर्थात, ही गोष्ट काही एका रात्रीत घडली नाही. नहपानाचा पराभव केला, तेव्हा गौतमीपुत्राचे राज्यवर्ष होते १८. याचा अर्थ राज्यावर आल्यापासून पुढील १८ वर्षे तो शकांशी लढत होता. त्याचवेळी राज्य बळकट करत होता. जुन्नरचा पाडाव झाल्यानंतर सातवाहनांची राजधानी पैठणला हलली होती. नहपान पैठणच्या जवळ पोहोचला होता; परंतु त्याला दूर लोटण्यास गौतमीपुत्राला यश मिळाले. गौतमीपुत्राने विदर्भ प्रांत सुरक्षित करून कल्याण भागात हालचाली सुरू केल्या. त्यामुळे नहपानाला तेथे लक्ष देणे गरजेचे झाले. हे करताना त्याने नहपानाला मिळालेल्या काही राजांचा पराभव केला, तर काहींना आपल्याकडे वळविले. कोकण किनारपट्टी, मराठवाडा, विदर्भ या भागातून दबाव आणत त्याने नहपानाची कोंडी केली. शेवटचे मोठे युद्ध नाशिकजवळ गोवर्धन नावाच्या गावाशी झाले, असे अभ्यासकांचे मत आहे. या युद्धात नहपानाचा संपूर्ण पराभव झाला. नहपान मारला गेला. क्षहरात शकांचा उच्छेद झाला आणि सातवाहनांनी आपले राज्य मिळविले. हे युद्ध इसवीसन ७८ मध्ये झाले, असे अभ्यासकांनी मांडले आहे.
वाकाटक राजा देवसेन याच्या विदर्भातील हिस्सेबोराळा येथील लेखामध्ये सर्वप्रथम याचा ‘शकांचा ३८०’ असा उल्लेख सापडतो. त्यानंतर चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याच्या ऐहोळे प्रशस्तीमध्येही शक राजांचा काल असा उल्लेख सापडतो. त्यामुळे शक राजांनी सुरू केलेली कालगणना आम्ही वापरत आहोत हे सर्वानी स्पष्ट सांगितले आहे. या सर्व लेखांमध्ये ‘शक’ शब्दाचा अर्थ संवत्सर असा नसून त्या लोकांचे नाव असा आहे. येथे कुठेही हा सातवाहनांचा संवत्सर आहे असे म्हटले नाहीये. इसवी सनाच्या बाराव्या शतकापासून या संवत्सराचा संबंध शालिवाहनांशी जोडला गेलेला दिसतो. तेव्हापासूनच ‘शक’ या शब्दाचा अर्थही संवत्सर असा झालेला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनीही त्यांच्या राज्याभिषेकानंतर ‘राज्याभिषेक शक’ सुरू केला. या नावात ‘शक’ हा शब्द ‘संवत्सर’ या शब्दाशी समानार्थी आहे. हीच परंपरा आजपर्यंत सुरू आहे.
प्राचीन भारतीय लोकपरंपरा मात्र असे सांगते की शालिवाहनानी शकांचा पराभव केल्यावर हा संवत सुरू झाला किंबहुना तो सातवाहनांनीच सुरू केला. पण त्यांनी तो अजिबात वापरला नाही असे दिसते. कारण गौतमीपुत्र सातकर्णीनंतर त्याचा मुलगा जेव्हा गादीवर आला, तेव्हा त्याने स्वत:चा नवीन राज्य संवत्सर सुरू केला. तसेच खुद्द गौतमीपुत्रानेही तो कधी वापरला नाही. वापरायचा नव्हता तर कशाला सुरू केला असा प्रश्न आपल्याला पडणे साहजिक आहे. पण खरा इतिहास पाहिला तर असे दिसते की सातवाहनांनी एका शक राजाला म्हणजे नहपानाला हरवले तेव्हा दुसरा शक राज म्हणजे चष्टन गादीवर आला. त्याने जो संवत्सर सुरू केला, तो पुढे सलग ३०० वर्षे वापरला गेला आणि ‘शक राजांचा संवत’ या नावाने इतर अनेक राजांनी तो वापरला, कारण दरवर्षी नवीन राज्य वर्ष देण्यापेक्षा हे जास्त सोयीचे होते. तो इतका लोकप्रिय झाला की पुढे शक या शब्दाचा अर्थ संवत्सर असा घेतला जाऊ लागला. त्यानंतर तो भारतभर, एवढेच नव्हे तर आग्नेय आशियातही काही देशांमध्ये वापरला जाऊ लागला.
भारतीय लोकांनी मात्र यामध्ये शालिवाहन राजाने शक राजाला हरविल्याची स्मृती कायम ठेवली, पण संवत्सर सुरू करणारा राजा हा कोणीतरी दुसराच होता हे ते विसरून गेले. त्यामुळे शालिवाहन शक असे नाव त्याला मिळाले आणि तेच वापरले जाऊ लागले. या विजयाप्रीत्यर्थ गुढी तोरणे इ. उभारून तो दिवस साजरा केला जाऊ लागला. पण चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच ही घटना घडली का हे सांगणे आज अवघड आहे. या संवत्सराचा वापर दक्षिण भारतात आणि उत्तर भारतातील काही भागात होतो. गुढीपाडव्याच्या दिवशी पंजाबी, सिंधी, कन्नड लोकांचेही नवीन वर्ष सुरू होते. मात्र या सर्वाच्या बाबतीत वेगवेगळ्या कथा आणि परंपरा आहेत. भारतीय सणांमधील शास्त्रीय, सामाजिक, व धार्मिक कारणे समजून घेतले तर जाणीवपूर्वक हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होईल आणि आज त्याची जबाबदारी आपल्यावर आहे.
संदर्भ - सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास - डॉ. वा.वि. मिराशी
सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment