मध्यंतरी फिरणाऱ्या चाकावर मातीला आकार देतांनाचा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याबद्दल अधिक विचारणा होऊ लागली. ज्यावेळी पचधार या गावी गेलो आणि तेथील फिरत्या चाकावरील मातीला आकार देताना बघितलं आणि मन काहीकाळ एका वेगळ्याच विश्वात रमले होते. माणूस हा मुळात संवेदनशील प्राणी आहे. माणसाने नवे काही आनंद देणारे बघितले की मनाला जे स्थैर्य मिळते त्यासाठी तो कायमच त्याच्या शोधात असतो. खरंतर भटके जीवन जगणाऱ्या अश्मयुगीन मानवाला चाकाचा शोध लागला आणि त्यामुळे त्याच्या जीवनाला गती आली. पण जिला बघून ‘फिरत्या चाकावरती देसी, कुटुंबाला आधार’ अशा ओळी सुचाव्यात अशी घटना नुकतीच घडली.
फिरत्या चाकावरून मातीला आकार देऊन तयार केलेली भांडेच आज ज्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आधार ठरली आहेत ते pottery village नावाने प्रसिद्ध असलेले मध्य प्रदेश मधील पचधार हे छोटसं पण समृद्ध गाव आहे. जबलपूर रोड वरील महाराष्ट्र-मध्यप्रदेश बॉर्डरवरील खवासा हे चेकपोस्ट ठिकाण आणि त्याच्या जवळच हे गाव आहे. गाव म्हणजे फक्त १०० घरांचे आहे. या गावातील सगळे रहिवासी मूळचे राजस्थानी आहेत. आधीच्या पिढीतील माणसे या गावी आले आणि इथेच स्थायिक झाले आणि पुढे इथलेच होऊन गेले.आज सगळेजण एकत्र गुण्या-गोविंदाने नांदत आहेत. हे सर्व प्रजापती कुंभार आहेत. गावात प्रवेश केल्यावर गावातील प्रत्येक घरासमोर चिकण मातीची भांडी, त्याचे विविध आकार, काही घरांसमोर छान लहान मोठी भांडी रचून ठेवलेली दिसतात. माती वापरुन भांडी करणे हे अतिशय कौशल्याचे काम आज या गावात शांतपणे सुरू आहे. याच गावातील मातीच्या वस्तू महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक शहरात विक्रीस जातात.
आता उन्हाळ्याची चाहूल लागताच साधारणपणे प्रत्येकांकडे पाणी पिण्यासाठी माठ आलेला असेलच. पण या ठिकाणी वेगवेगळ्या आकाराचे माठ, विशिष्ट आकाराचे मातीचे भांडे, ग्लास अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहेत. हे सगळं बघतांना वाटलं की, आज नाविन्याचा अट्टहास असताना पारंपरिक जुन्या वस्तूं या नव्या रुपात आल्या आहे. काही क्षण वाटले की ज्या मातीतून निर्माण झाले परत त्याच मातीत हे परत करायचे आहे. पर्यावरण संतुलनासाठी आणि प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी नव्याने आलेले हे मातीचे विविध प्रकारातील भांडे वापरण्यासाठी चांगले आहे. कुकर, कढई, तवा, पोळपाट, फुलांची परडी, असे विविध प्रकार इथे बघायला मिळतात.
आज माणसाच्या जीवनशैलीत बराच बदल झालेला आहे. माणूस विज्ञानाच्या आणि आधुनिकीकरणाच्या आहारी गेला आहे असे असताना या गावातील समृद्धी आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील तृप्ती आणि समाधान अनुभवले आणि छान वाटलं. इथे येण्याचं सार्थकी लागलं त्याबद्दल ज्या 'द कॅम्प पेंच' रिसॉर्ट मध्ये मुक्काम होता त्याचे सर्वेसर्वा वरूण दादा आणि अजय काका यांचे विशेष धन्यवाद आहे. श्री प्रकाश शनीचरे यांच्याकडे ते घेऊन गेले. त्यांच्यामुळे हे छानसं गाव आणि येथील विविध वस्तू बघता आल्या आहेत. पेंचच्या जंगलात गेल्यावर जंगलाची शांतता खूप अंतर्मुख करून जाते. पण याच जंगलात जातांना आधी या गावी एकदा नक्की भेट द्यावी. हे सगळं बघून जी मनःशांती आणि आनंदाची अनुभूती मिळते ती शब्दांत व्यक्त करताच येत नाही.
सर्वेश फडणवीस
#pottery #PotteryVillage #pachdhar
No comments:
Post a Comment