Friday, December 25, 2020

भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ।। 🚩🚩


वेदांच्या अखेरच्या रचनेतील भगवद्गीता हा एक प्राचीन भारतीय ग्रंथ आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला 'योगोपनिषद' किंवा 'गीतोपनिषद' म्हणले जाते आणि तिला उपनिषदांचा दर्जा दिला गेला आहे. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला 'उपनिषदांचे उपनिषद' असेही म्हणले जाते. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे, यांचे मार्गदर्शन करतो. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हटले गेले आहे आणि आजच्या एकादशीला 'मोक्षदा एकादशी' म्हंटले आहे.  महाभारतातल्या भीष्म पर्वा मध्ये गीतेचा उल्लेख आढळतो. गीतेत एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत. हा एक पवित्र धर्मग्रंथ आहे आणि जगात एकमेवाद्वितीय ग्रंथ असावा ज्याची जयंती साजरी केली जाते. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली. विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामधे ती 'गायिली' जाते. लिहिण्याची साधने उपलब्ध नव्हती तेव्हापासून हिंदू धर्मातील बहुतेक सर्व ज्ञान हे मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला देण्याची प्रथा आहे आणि म्हणून संथा रुपात गीता सांगितली जाते. जगातील विविध देशांतले व विविध धर्मातले असंख्य तत्त्ववेत्ते,शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत. आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे. गीतेमधील तत्त्वज्ञान हे कालातीत आहे म्हणून गीता ही शाश्वत आहे. 

श्रीवेदव्यासांनी महाभारतात गीतेचे वर्णन करून झाल्यावर म्हटले आहे -

गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः।
या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद् विनिःसृता ॥

गीता सुगीता करण्याजोगी आहे. म्हणजेच गीता उत्तम प्रकारे वाचून
तिचा अर्थ आणि भाव अंत:करणात साठवणे हे मुख्य कर्तव्य आहे. कारण ती स्वतः पद्मनाभ भगवान् श्रीविष्णूंच्या मुखकमलातून प्रगट झाली आहे.

कोणत्याही वर्णाच्या व आश्रमाच्या प्रत्येक माणसाला गीताशास्त्र
अभ्यासण्याचा अधिकार आहे. मात्र त्याची भगवंतांच्या ठिकाणी भक्ती व श्रद्धा अवश्य असली पाहिजे. कारण स्वतः भगवंतांनी आपल्या भक्तांमध्येच याचा प्रचार-प्रसार करण्याची आज्ञा दिली आहे. बहुदा ह्याच भावनेतून गीता परिवार पुणे ह्यांचा श्रीमदभगवद्गीता संथा वर्ग गेली अनेक महिने सुरू आहे. पहिल्या भागात १२ वा आणि १५ वा अध्याय आणि मग पुढे १६ वा अध्याय अशी गीता संथा वर्ग सुरू आहेत. कोरोनाकाळात सुरू झालेला हा गीता वर्ग अनेकांना गीतेची गोडी लावणारा आहे. लाखो साधक गीता संथा करत आहेत. इतिहासात ह्याची सुवर्णाक्षरांनी नोंद होईल ज्यावेळी संपूर्ण जग कोरोनाग्रस्त होते त्यावेळी भारतात गीतेची संथा साधकांना प्राप्त होत होती. गीतेबद्दल कायमच वेगळेपण जाणवते. सध्या गीता संथा वर्ग सुरू असल्याने ह्या निमित्ताने त्याची गोडी अधिक काकणभर जास्त जाणवते आहे. आणि आज मोक्षदा एकादशी निमित्ताने ह्यावर लिहिताना वेगळ्याच भावना आहे.खरंतर भक्ती योगात भगवंताने वेगळं काय सांगितलं आहे. 

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि...
तत्कुरुष्व मदर्पणम्।।

म्हणजेच तू जे काही काम करशील.  ते तू मला अर्पण करून टाक. म्हणजेच थोडक्यात त्याचं कर्तृत्व सोडून दे... कुणीतरी पाठिशी आहे म्हणून तू पुढे आहेस,हे लक्षात ठेव आणि ह्याच गीता तत्त्वावर प्रत्येकाची वाटचाल दृढ व्हावी हीच गीता जयंती निमित्ताने श्री भगवंताचरणी प्रार्थना आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#गीता_जयंती  #मोक्षदा_एकादशी #गीता_परिवार

Thursday, December 24, 2020

स्मरण एका अक्षर योग्याचे !!


अक्षर योगी नाना लाभे !! हे नाव नागपूरात सर्वदूर परिचित आहेच. आज नानांचा स्मृती दिवस. Sanjeev Labhe  ह्यांच्या फेसबुक
टाईमलाईनवर पोस्ट बघितली आणि क्षणात मन काहीकाळ भूतकाळात रमले. नानांचा आणि आमच्या कुटुंबाचा ऋणानुबंध शब्दांत व्यक्त करणे तसे शक्य नाहीच पण नानांचा परिचय आणि कार्याची ओळख व्हावी ह्या हेतूने हे लेखन आहे. 

कवी ग्रेस पासून ते आजवर जे अनेक विद्यार्थी नानांच्या सहवासातून घडत गेले त्यांच्या मनात नाना लाभे म्हणजे "अक्षर सुधारणारे नाना" हेच आहेत. "अक्षरसुधार" हा एकच ध्यास नानांचा शेवटच्या श्वासापर्यंत होता. विद्यार्थी ते वृद्ध या वयोगटातील कुणीही आणि कुठल्याही पातळीवर अक्षर सुधारू शकतो आणि त्याचे अक्षर सुंदर होऊ शकते हा नानांचा विश्वास होता. अक्षर सुधार प्रकल्प हाती घेऊन त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्यासाठी वेचले. अक्षर सुधार ह्या हेतूने संपूर्ण भारतभ्रमण केले. हजारो नव्हे लाखो विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कार्यशाळा घेतल्या. अक्षरातील उभी रेषा सरळ असावी यावर त्यांचा जेवढा भर होता त्यापेक्षाही जीवनाची उभी रेषा सरळ असली पाहिजे ह्यावर अधिक भर होता. अक्षर सुधारणेसाठी त्यांनी विविध प्रयोग केले. विद्या भारतीच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ उत्तर भारतातील अनेक शाळांना,संस्थांना त्यांनी करून दिला होता. 

नानांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते.  नवयुग विद्यालय महाल येथे ते शिक्षक होते. सुंदर अक्षरांची श्रीमंती त्यांना लाभली होतीच. शिकवणी वर्ग ही घेत असत पण मुळात तो फक्त शिकवणी वर्ग नव्हता तर व्यक्ती निर्माण करण्याचे वर्ग होते. बाबा,काका आणि आत्या हे सर्वजण त्यांच्याकडेच शिकले आणि ह्या साऱ्यांचे अक्षर अक्षर योगी मुळेच सुंदर आहे. नानांच्या अनेक आठवणी गप्पांच्या ओघात आजही सहज निघतात. नानांचा पिंड आध्यात्मिक होता. ते कायम सांगायचे भगवंताचे अधिष्ठानाशिवाय कार्यात यश मिळणार नाही आणि ते स्वतः आन्हिक आटोपल्याशिवाय घरातून बाहेर पडत नसत. एकदा मी त्यांच्याकडे संध्याकाळी गेलो असतांना ते नुकतंच गुरुचरित्र वाचून उठले होते. मला म्हणाले,तीर्थ घे. सप्ताह काळात एकदिवसीय गुरुचरित्र पारायण ते करत असत म्हणजे सात दिवसांत सात पारायणे करत असत. पहाटे ३ वाजेपासून दुपारी ३ पर्यन्त त्यांचे वाचन चालत असे. जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा आश्चर्य वाटलं आणि नतमस्तक झालो त्यावेळी खरंतर हे सारे न कळण्याच्या पलीकडचे असेच होते. नानांना पत्रलेखनाचा छंद होता. मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्याने त्यांचा पत्रव्यवहार सहज चालायचा. अनेकांकडे त्यांची पत्रे आजही सांभाळून ठेवली असतील इतकी सुंदर अक्षरांची पत्रे ते स्वतः लिहीत असत. त्यांचे अनेक पैलूं असावेत पण मी अनुभवलेले नाना असेच आहे. अक्षरांचा  ध्यास घेतलेले नाना नेहमी म्हणत,

रेषा सरळ उंची समान ।अक्षराचा यातच प्राण ।।
रेषा सरळ द्यावे ध्यान । रेषाच मोठी सारे अर्धे लहान ।।
रेषा सरळ देवासमान।करूया सारे तिला प्रणाम ।।

लिखाणाचा वेग सांभाळताना ते एकटाकी येणे हाच नानांचा आग्रह असे. आज नाना देहरुपाने नसले तरी आयुष्यभर अक्षर सुधारणेसाठी झटणारे नानांचे स्मरण होणे हे क्रमप्राप्त आहे.  प्रत्येकाला मार्गदर्शक आणि दिशादर्शनासाठी हे नक्कीच प्रेरक असेल ह्यात शंकाच नाही. 

✍️ सर्वेश फडणवीस

Tuesday, December 22, 2020

‘लॅाकडाउनमधला माझा सोबती’


पुस्तकाचे शीर्षक वाचूनच हे पुस्तक एका बैठकीत वाचुन संपवले. सोशल मीडिया तज्ञ अजित पारसे ह्यांनी फक्त ४२ पानांत लॅाकडाउनमध्ये सोशल मीडियाच्या सकारात्मक वापरावर प्रकाश टाकणारं पुस्तक लिहिले आहे. बहुदा अशाप्रकारचे हे पहिलेच पुस्तक असावे. साधारणपणे २०-२५ मिनिटांत सहज वाचून संपेल असे छोटेसे पण मार्गदर्शक आणि ह्याच माध्यमाची नव्याने ओळख व्हावी ह्या शुध्द हेतूने त्यांनी लिहिले आहे. कोरोना महामारीने संपूर्ण जग हादरून गेलं आहे. या महामारीच्या वेदना असह्य होत्या आणि काही प्रमाणात आजही आहेत. या वेदना कमी करण्यासाठी शक्य त्या परीने अनेकांनी प्रयत्न केलेत. या संकटात लॅाकडाउनमध्ये घरी एकटे पडलेल्या नागरिकांना सोशल मीडियाची मोठी साथ मिळाली. खरंतर सोशल मीडिया हे मानवी मनाला आनंद देणारे प्रभावी माध्यम म्हणून एक अविभाज्य घटक बनले आहे. 

मुळात माणूस हा समाजशील प्राणी आहे, असं आपण जेव्हा म्हणतो. तेव्हा प्रत्येक काळामध्ये किंवा संस्कृतीमध्ये त्याच्या या समाजशीलतेचं प्रतिबिंब उमटलेलं आपल्याला हमखास दिसून येतं. अर्थात काळानुरूप जे काही सामाजिक, आर्थिक बदल होत गेले, त्यानुसार माणसाच्या संस्कृतीही बदलत गेल्या आहेत आणि आज कोरोनामुळे टाळेबंदीच्या काळात सोशल मीडिया मुळे जगाच्या या टोकावरील व्यक्ती दुसर्‍या टोकावरील व्यक्तीशी क्षणात सवांद साधू शकत होती. सर्वात वेगवान प्रसिद्धीसाठी अथवा अभीव्यक्तीसाठी इतकं अप्रतिम व्यासपीठ यापूर्वी कधीच उपलब्ध नव्हतं आणि आम्ही ह्या माध्यमाची सकारात्मकता ही टाळेबंदीच्या काळात टिकवून ठेवली होती त्यामुळे जेव्हा जेव्हा कोरोनाची चर्चा होईल तेव्हा सोशल मीडिया ची सकारात्मकता ही चर्चेत येईलच.  

सध्याच्या काळात संवाद आणि भावनांचं आदान प्रदान करण्याचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे मोठ्या आशेनं बघितलं जातं. त्याचा आपण जसा वापर करू, तशाचप्रकारे त्याची फळे आपल्याला मिळणार आहे. जगभरात कोरोनाची महामारी आणि लॉकडाउनचा काळ, सर्वांसाठीच असह्य होता. त्यामुळेच लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियाचा सकारात्मक वापर कसा झाला? त्याचा समाजाला कसा फायदा झाला आणि भविष्यात अशा मोठ्या संकटांना सामोरे जाताना, या सोशल मीडियाचा वैयक्तिक आणि सरकारी पातळीवर धोरण म्हणून कसा वापर करता येईल ? याचा विचार होणे गरजेचे होते. जगाने अनुभवलेल्या या महामारीत सोशल मीडियाची सकारात्मक बाजू वाचकांसमोर मांडण्याचा उत्तम प्रयत्न लेखकाने केला आहे. ह्या पुस्तकाची अनुक्रमणिका वाचूनच पुस्तक कसे प्रभावी आहे ह्याची कल्पना येते. प्रत्येक मुद्द्याला स्पर्श करत एका बैठकीत वाचून संपेल अशीच पुस्तकाची मांडणी लेखकाने केलेली जाणवते आहे. 

आज हे पुस्तक निःशुल्क उपलब्ध झाले आहे. संवादक्षेत्रात क्रांती करणाऱ्या समाज माध्यमाची सकारात्मक बाजू लोकांपर्यंत पोहोचावी आणि पर्यायी त्याचा फायदा समाजाला आणि लोकांना व्हावा ह्या शुद्ध हेतूने लेखकाने हे पुस्तक निःशुल्क उपलब्ध केले आहे. आपल्याला हे पुस्तक हवे असल्यास आपण कमेंट बॉक्स मध्ये मेल आयडी द्यावा. लेखक स्वतः ई बुक आपल्या मेल आयडीवर पाठवतील.

✍️ सर्वेश फडणवीस 




Monday, December 14, 2020

लायब्ररी ऑन व्हील्स !! 🚗📚📖


शीर्षक वाचून जरा वेगळं वाटेल. पण खरंच हे वेगळं कार्य नागपूरात  सुरू आहे. मध्यंतरी Ankita Deshkar ह्यांच्या टाईमलाईनवर ह्या संदर्भातील कव्हर स्टोरी वाचनात आली. त्यानंतर अधिक जाणून घेतल्यावर आनंद झाला की नागपूरची तरुणाई आज वेगळ्या वाटेवरून जात चांगले कार्य करत आहेत. लिखित अग्रवाल आणि त्यांची मैत्रीण अलिशा नथानी हे दोघेही जण वाचकांना नवनवीन पुस्तकं उपलब्ध करत वाचण्याचा आनंद देत आहेत. 

खरंतर पुस्तकांचे विश्व मोठे अजब असते. मन मोहून टाकणारे, जीवन बदलवून टाकणारे. आपल्या आयुष्यावर जवळच्या आप्तमित्रांचा जसा प्रभाव पडतो, तसा पुस्तकांचाही पडतो. प्रत्येक घरात देवघर असते, त्याप्रमाणे एक कोपरा तरी ग्रंथाने - पुस्तकाने भरला तर अनेक मने विचारांनी - ज्ञानांनी भरली जातील. सध्या पुस्तकेच येणारा प्रत्येक दिवस आनंद आणि उत्साह प्रदान करत आहे. सध्याच्या परिस्थितीत निवांत क्षणी माणसाचा एकटेपणा घालवण्याचा सगळ्यात चांगला सोबती म्हणजे अशी ही पुस्तके आहेत. 

असाच पुस्तक वाचनाचा आनंद देण्यासाठी नवी सुरुवात नागपूरात झाली आहे. ह्यात तुम्हाला घर बसल्याच पुस्तक वाचनाचा आनंद मिळणार आहे आणि त्यांनी ह्या उपक्रमाचे नाव ही "लायब्ररी ऑन व्हील्स" असेच ठेवले आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात जात वाचकांना ते पुस्तक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी "लायब्ररी ऑन व्हील्स" च्या माध्यमातून होते आहे. कोविड मुळे ग्रंथालय बरीच महिने बंद होते आणि घरी जी पुस्तके होती ती अनेकांची वाचून झाली होती. नवीन पुस्तक वाचण्याची इच्छा असून सुद्धा पुस्तकं उपलब्ध होत नव्हती. मग ती उपलब्ध करून देण्यासाठी आपणच पुढाकार घ्यावा आणि वाचकांना ती पुस्तके आपणच उपलब्ध करून द्यावी ह्या भावनेतून त्यांनी लायब्ररी सुरू केली आहे. जवळची काही पुस्तकं आणि मित्रमंडळीकडून काही पुस्तकं एकत्र करत लायब्ररी सुरू झाली आहे. सुरुवातीला १४० पुस्तकांच्या मदतीने लायब्ररी सुरू झाली आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस नागपूर शहराच्या विविध भागातील वाचकांपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला गाडीच्या डिक्कीतील पुस्तकं अनेकांना दाखवण्यात येतात आणि आपल्या आवडीचे पुस्तकं घेऊन जाण्याची मुभा असते पण ज्यावेळी पुस्तकं देण्याची वेळ आली त्यावेळी त्यांना भीती होती की वाचक पुस्तकं वापस करणार की नाही पण हळूहळू भीती दूर होवून आज वाचक स्वतःहून त्यांच्याकडे पुस्तक बदलण्यासाठी येत आहेत. पुस्तक वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी नव्या दमाच्या तरुणांनी नवी संकल्पना शहरात राबवली आहे आणि अनेक वाचकांची त्याला पसंती मिळते आहे ही आनंददायक आणि उत्साहवर्धक बातमी आहे. 

पु. ल. देशपांडे एके ठिकाणी छान सांगून जातात, " पुस्तकं माणसाला प्रगल्भ करण्याचे काम करत असते." आणि आज तीच पुस्तकं सहज उपलब्ध करण्याचे काम "लायब्ररी ऑन व्हील्स" करत आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#libraryonwheels

बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ॥


आज कार्तिकी वद्य त्रयोदशी, सकल संतश्रेष्ठ माउली ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याची परममंगल अशी तिथी. त्यानिमित्ताने

पंढरीची कार्तिकी एकादशी आटोपून आळंदीस येऊ लागण्यापूर्वीच श्री ज्ञानदेवांनी संजीवन समाधीचा निश्चय केला होता, हे श्री नामदेवांच्या ‘कलियुगी जन आत्याती करिती। साहवेना की यासी कांही केल्या॥’ या कथनात स्पष्टपणे उमटले आहे. पुढे यात्रेनंतर काळाची चाहूल लागून माउलींचा जीव गलबलला व त्यांनी श्री विठ्ठलापाशी समाधीची आळ म्हणजे हट्ट धरला. त्यांनी ती पुरविण्याचे मान्य केले. हे मूर्तिमंत लडिवाळ कैवल्य सम्राट चक्रवर्ती सर्वांस अंतरणार हा विचार सहन न होऊन रुक्मिणीच्या अश्रूंचा बांध फुटला. पांडुरंगांनी तिला समजावीत म्हटले, “रुक्मिणी, या ज्ञानोबासारखा भक्त, योगिश्रेष्ठ, परोपकारी अखिल ब्रह्मांड फिरलो तरी सापडणार नाही. भारतवर्षात नारद, सनतकुमार, अंबरीश, पराशर, भगीरथ, व्यासादी भक्त होऊन गेले. मात्र, अवघ्या जनसागराला आत्मोद्धाराचा मार्ग त्रैलोक्याची ज्ञानसंजीवनी असलेल्या ज्ञानोबाने दाखविला. या महात्म्याचा केवळ स्पर्श अथवा नुसते दर्शन अथवा नामस्मरण जन्ममृत्यूही टाळते, याच्या चरणांचे वंदन मलाही पावन करते, जो सकल तीर्थांना तीर्थरूप आहे, अशा या भक्तश्रेष्ठाच्या नामाचा प्रेमपूर्वक उच्चार सकल पापे भस्म करणारा आहे, हे निश्चित आहे असे तू जाण! देवी, या विभूतीमत्त्वाला समाधिस्थ करण्याचे धैर्य खरे तर मजपाशीही नाही. परंतु, याला काही उपायसुद्धा नाही.”
 
प्रत्यक्ष पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याने आपल्या आत्मवत अशा भक्तश्रेष्ठाला स्वहस्ते दिलेल्या या संजीवन समाधी सोहळ्याच्या प्रेममय श्रीमंतीचे वर्णन संत नामदेव, संत निळोबाराय, संत एकनाथ यांनी यथायोग्य आणि विस्ताराने करून ठेवले आहे. ‘अमृतानुभव’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘चांगदेव पासष्टी’, ‘अभंग’, ‘हरिपाठ’ अशा ग्रंथनिर्मितीने कैवल्यरसात चिंब न्हाऊन निघणार्‍या अमृताला जिंकण्याचे सामर्थ्य ठेवून असलेल्या माउलींच्या रसाळ वाणीवर आतापर्यंत महाराष्ट्रीय आध्यात्मिक गाथा वर्धिष्णू होते आहे. या ग्रंथांच्या अभ्यासाने कित्येक लोक कृतार्थ झाले आहेत, दुर्जन सन्मार्गाला लागले आहेत, कित्येकांचा उद्धार झाला आहे.
 
एकविसाव्या वर्षी आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथांना त्यांनी समाधीची अनुमती मागितली होती. कार्तिकी वारीनंतर पंढरीपासून ते अर्धबाह्य स्थितीत राहू लागले होते. आळंदी हे अनेक सिद्धांनी समाधी घेतलेले स्थळ. म्हणून त्याचे नाव ‘सिद्धबेट.’
 
इंद्रायणी, मणिकर्णिका, भागीरथी इ. नद्यांनी बनलेले हे बेट होते. श्री नाथ म्हणतात, ‘चौर्‍यांशी सिद्धांचा सिद्धबेटी मेळा’ म्हणजे नाथपरंपरेच्या स्थळीच जीवंत समाधीचा निर्धार श्रीज्ञानदेवांनी केला. संतमंडळी या त्यांच्या निर्धाराने ओसंडून जावे इतका शोक करू लागली. पण, ‘ज्ञानेश्वरापाशी आनंदी आनंद’ असे होते. श्री विठ्ठलाने भावंडांना एकीकडे नेऊन व गुह्यार्थ सांगून सांत्वन केले. समाधीची सर्व सामग्री तयार झाल्यावर श्रीज्ञानदेवांनी सिद्धेश्वराचे स्थळ परमेश्वरास मागितले.
 
 क्षेत्र प्रदक्षिणा होऊन एकादशीस हरिजागरण झाले व द्वादशीस पारणे झाले. द्वादशीच्या रात्री कान्होपात्रा यांचे कीर्तन झाले. विश्वकर्म्याने अतिशय सुंदर कलाकुसर केलेला मंडप तेथे उभारला. समाधीच्या समोर अजानवृक्षाचा दंड स्थापन करण्यात आला. (सन्मुखपुढे अजानवृक्ष-श्रीनाथ) या कोरड्या काष्ठाला पालवी फुटल्यावर श्रीज्ञानदेवांनी सर्वांच्या पायी नमस्कार केला. अखेर त्रयोदशीचा दिवस उजाडला. सर्वांनी इंद्रायणीत स्नान करून ज्ञानेश्वरांची आदरपूर्वक पूजा केली. यानंतर प्रेमाने ज्ञानेश्वरांना सिंहासनावर बसवून विठ्ठल आणि रुक्मिणीने त्यांची षोड्शोपचारे पूजा केली, कपाळावर गंध लावला, गळ्यात दिव्य सुगंधी माळा घातल्या. विठ्ठल ज्ञानेश्वरांकडे वळले, त्यांना घट्ट मिठी मारली. त्यांच्या मस्तकावर अश्रूंचा अभिषेक केला. शंकर प्रभृती देव, कश्यप आदी ऋषींनी ज्ञानेश्वरांना आलिंगन दिले. याज्ञवल्क्य मुनी, आदिगुरू अवधूत दत्तात्रेयांसह मत्स्येंद्रादी नाथ परंपरा इ. सर्व ब्रह्मनिष्ठ; समाधीचे वृत्त ऐकताच त्वरेने आळंदीस आले. ज्ञानेश्वरांनी सर्वांना आदरपूर्वक नमस्कार केला, सर्वांचे पूजन केले. सर्व सोहळे पार पडल्यानंतर माउली सावकाश उभे राहिले आणि सभोवार उभ्या असलेल्या भक्तांच्या अश्रूंचे बांध फुटले. सारा आसमंत हुंदक्यांनी भरून गेला.
 
 सर्वांना वंदन करून माउली अखेरची निरवानिरव करू लागले, “माझ्याकडून आजवर कुणास काही अधिक उत्तर गेले असेल तर मला क्षमा करा, कधी मर्यादा ओलांडली असेल, तर संतमहात्म्यांनी मला करुणापूर्वक पदरात घ्यावे, आपण माझे मायबाप आहात. मी, तुमचे अजाण लेकरू आहे, माझ्यावर कृपा असू द्यावी.”
 
ज्ञानोबाच्या या निर्वाणीच्या बोलांनी सर्वांच्या हृदयाचा ठाव घेतला. दु:ख सहन न होऊन कित्येक लोक मूर्च्छित होऊन धरणीवर पडले. मोठ्यामोठ्याने आक्रोश करून भक्त ऊर बडवू लागले. निवृत्तीनाथादी भावंडांनी हंबरडा फोडला. त्यांचे निष्पाप प्रेम पाहून उपस्थितांचे काळीज हेलावले. गळ्याशी आलेला आवंढा गिळत लोक उसासे सोडू लागले. माउलींनी समाधीस्थळाला प्रदक्षिणा घातली आणि श्री विठ्ठलाने व श्री निवृत्तीनाथांनी त्यांचे हात धरल्यावर समाधीस बसण्यास आत प्रवेश केला, दाही दिशा धुंद झाल्या, गगन कालवले गेले.
 
 श्री नामदेवांनी गळ्यात हार घातलेले श्री ज्ञानदेव तुळसी, बेल, दुर्वा, दर्भ, फुले इ. अंथरलेल्या धुवट वस्त्राच्या घडीवर बसले. श्री ज्ञानदेवी पुढे ठेवली होती. “मला तुम्ही सुखी केले, आता पादपद्मी मला निरंतर ठेवा” अशी श्री विठ्ठलास प्रार्थना करून तीन वेळा नमस्कार केला आणि भीममुद्रेने डोळे झाकले. श्री नामदेव स्फुदत म्हणतात, ‘नामा म्हणे आता लोपला दिनकर। बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ॥’ श्री तुकारामांनी संतशिरोमणींबद्दल गौरव केलाच आहे की, ते ‘अभंग प्रसंगी धैर्यवंत.’ श्री ज्ञानदेव मात्र ध्येयधुंदीने अविचल व निर्मोह होते. संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय असले उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. श्री निवृत्तीनाथांनी पहिल्या पायरीवर उभे असलेल्या श्री विठ्ठलाला भुयारातून बाहेर आणले आणि शिळा लावून ते बंद केले. आकाशीच्या देवांनी अपार पुष्पवर्षाव सुरू केला. आसमंत दिव्य सुगंधाने घनदाट भरून गेला. दुदुंभीचा नाद करून, देव उच्चरवाने ‘ज्ञानदेव जयति’ असा जयघोष करू लागले. हा अनुपम्य सोहळा पाहण्यासाठी आकाशात विमानांची दाटी झाली. सर्वत्र हाहा:कार, सर्वांनी फुले वाहिली. पुढे इंद्रायणीत सर्वांनी आचमन केले व पाच वाटांनी संत बाहेर निघाले. श्री ज्ञानदेव अजूनही तिथेच आहेत, संजीवन समाधीत आहेत! प्रत्येक भक्ताला ते जवळ घेण्यासाठी, आलिंगन देण्यासाठी ते तिथेच विराजमान आहेत. संत मुक्ताई यांच्या ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेतच. त्या म्हणतात,
 
 योगी पावन मनाचा।
साही अपराध जनाचा॥
विश्व रागें झाले वन्ही।
संती सुखें व्हावें पाणी॥
शब्द शस्त्रें झालें क्लेश।
संती मानावा उपदेश॥
विश्वपट ब्रह्म दोरा।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा॥
 
 खरंतर या पावन मनाच्या योग्याचे दर्शन घेण्यासाठी एकदा तरी इंद्रायणीच्या तीरावरील आळंदी येथे जायला हवेच. आयुष्य कृतकृत्य झाल्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीच.
 
- सर्वेश फडणवीस

महा MTB #मुंबई_तरुणभारत

Monday, December 7, 2020

सशस्त्र सेना झेंडा दिवस..🇮🇳


लहानपणी शाळेत असताना दर वर्षी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला हे स्टिकर शाळेत यायचे. याची किंमत १ रुपया असायची आणि हे स्टिकर घेणं बंधनकारक असायचं आणि आम्हाला असं सांगितलं जायचं की यातून जमा होणारी रक्कम आपल्या आर्मी ला आणखीन सशक्त करण्यासाठी जाणार आहे तेव्हा मग आम्ही ४-५ स्टिकर घ्यायचो. ते स्टिकर मग स्टीलच्या कंपासपेटीला आणि exam board ला लावून ठेवायचो आणि मग काहीकाळ एकदम देशभक्त झाल्याचा फील यायचा. खरंतर जास्त काही त्यावेळी कळत नव्हतं पण भारी वाटायचं. 

शाळा सुटली नंतर बऱ्याच गोष्टी मागे पडल्या. आजकाल अशी स्टिकर्स शाळेत येतात का ते माहिती नाही पण आज my Gov पोर्टलवर गेल्यावर पुन्हा सगळं आठवलं. आज पुन्हा ह्यासाठी contribute करतांना अभिमान वाटला. " मेरा देश, मेरी पहचान " ह्या अनुराधा प्रभुदेसाई ह्यांच्या कार्यक्रमातून ऑगस्टमध्ये कारगिल ला जायचे होते पण कोरोना आणि लॉकडाऊन मुळे ते खरंतर राहून गेले. पण आज पुन्हा सैनिकांकरता काही करता आले ह्याबद्दल अधिक आनंद वाटतो. सैन्यदलाबद्दल नितांत आदर, अभिमान, श्रद्धा, विश्वास हा प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात उजागर व्हायला हवा, ही ज्योत सतत पेटती राहायला हवी. ही सैन्यदलांची गरज नाही, आपलं कर्तव्य आहे आणि या कर्तव्याप्रति प्रत्येकाने अधिक सजग आणि जागरूक होऊन देशभक्तीची ज्योत प्रत्येकाच्या मनात जागवण्यासाठी मी तत्पर राहील हाच संकल्प घेण्याची आवश्यकता आहे. चला आपणही ह्या माध्यमातून काहीतरी सैनिकांसाठी देण्याचा प्रयत्न करूया. कारण आपल्या उद्यासाठी त्यांनी आपला आज दिला आहे. आज हे स्टिकर मिळण्याचा पुन्हा योग आला आणि आता नक्कीच जपून ठेवणार आहे. 

Saluting all those Brave Hearts who Sacrificed their lives to protect us . 🇮🇳 

ध्वज दिनाच्या सर्वाना शुभेच्छा
जय हिंद जय भारत

#ArmedForcesFlagDay

#ArmedForcesFlagDay2020

खाली लिंक देतोय नक्की जमलं तर contribute करा.. 

https://www.mygov.in/armed-forces-flag-day

Friday, December 4, 2020

योगी श्रीअरविंद !!


 ५ डिसेंबर. योगी श्रीअरविंदांचा महानिर्वाण दिन.आजच्या दिवसाचे औचित्य साधत श्री अरविंदांचे जीवन  व त्यांचे कार्य यांचा थोडक्यात आढावा घेणे उचित ठरेल . 

डॉ.कृष्णधन घोष आणि स्वर्णलता देवी यांच्या पोटी जन्माला आलेले तिसरे अपत्य म्हणजे योगी श्रीअरविंद . त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी पहाटे ४ वाजून ५२ मिनिटे या ब्राह्म मुहूर्तावर कलकत्ता येथे झाला . त्यांना तीन भाऊ- विनयभूषण,मनमोहन,व बारींद्र आणि एक बहीण - सरोजिनी असे हे सारे कुटुंब होते . 

श्रीअरविंदांना वयाच्या ५ व्या वर्षी दार्जिलिंग येथील लॉरेटो कॉन्व्हेंट स्कूल मध्ये दाखल करण्यात आले. वयाच्या ७ व्या वर्षी ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले. श्रीअरविंद कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले असे होते . 

१४ वर्ष इंग्लंड मध्ये वास्तव्य करून ६ फेब्रुवारी १८९२ रोजी श्रीअरविंदांनी भारतीय भूमीवर,मुंबईच्या अपोलो बंदरावर पाऊल टाकताक्षणी एका प्रगाढ शांतीने त्यांच्या अंतरंगात प्रवेश केला.हा अनुभव त्यांच्या जीवन कार्याला कलाटणी देणारा ठरला. श्रीअरविंदांचे तत्वज्ञान समन्वयवादी आहे . ते जगाला मिथ्या , असार मानत नाहीत त्यामुळे त्यातील भौतिकता,विज्ञानाची प्रगती ते नाकारत नाहीत. मुक्तीची अवस्था प्राप्त केल्यानंतर मग योगी दिव्य कर्म करीत राहून प्रकृतीला साहाय्य करू शकतो असे ते म्हणतात . या साठी त्यांनी जो मार्ग सांगितला त्याला "पूर्णयोग"असे नाव आहे. ज्ञान,कर्म, भक्ती यांचा समन्वय त्यात अभिप्रेत आहे . ईश्वराला संपूर्ण समर्पित होणे आणि आपण स्वतः त्या ईश्वराचे परिपूर्ण माध्यम होणे यावर त्यांचा भर आहे . 

श्रीअरविंदांचे "सावित्री "हे महाकाव्य अजरामर आणि वाचनीय असे आहे . लोकशाही, स्वातंत्र्य आणि अध्यात्माचा विकास यांचे रक्षण करण्यासाठी श्रीअरविंदांनी इंग्लंड,अमेरिका,फ़्रान्स या दोस्त राष्ट्रांच्या प्रयत्नांना यौगिक सक्रिय पाठिंबा दिला . 

५ डिसेंबर १९५० रोजी श्रीअरविंदानी आपल्या पार्थिव देहाचा त्याग केला . मृत्यूचे कोणतेही चिन्ह नसलेला त्यांचा पार्थिव देह पाच दिवस जसाच्या तसा चैतन्यपूर्ण राहिला होता . अखेर ९ डिसेंबर १९५० रोजी आश्रमातील सेवा वृक्षाखाली या महायोग्याला चिरसमाधी देण्यात आली .

सर्वेश फडणवीस

#shriarbindo  #योगी_श्रीअरविंद