अक्षर योगी नाना लाभे !! हे नाव नागपूरात सर्वदूर परिचित आहेच. आज नानांचा स्मृती दिवस. Sanjeev Labhe ह्यांच्या फेसबुक
टाईमलाईनवर पोस्ट बघितली आणि क्षणात मन काहीकाळ भूतकाळात रमले. नानांचा आणि आमच्या कुटुंबाचा ऋणानुबंध शब्दांत व्यक्त करणे तसे शक्य नाहीच पण नानांचा परिचय आणि कार्याची ओळख व्हावी ह्या हेतूने हे लेखन आहे.
टाईमलाईनवर पोस्ट बघितली आणि क्षणात मन काहीकाळ भूतकाळात रमले. नानांचा आणि आमच्या कुटुंबाचा ऋणानुबंध शब्दांत व्यक्त करणे तसे शक्य नाहीच पण नानांचा परिचय आणि कार्याची ओळख व्हावी ह्या हेतूने हे लेखन आहे.
कवी ग्रेस पासून ते आजवर जे अनेक विद्यार्थी नानांच्या सहवासातून घडत गेले त्यांच्या मनात नाना लाभे म्हणजे "अक्षर सुधारणारे नाना" हेच आहेत. "अक्षरसुधार" हा एकच ध्यास नानांचा शेवटच्या श्वासापर्यंत होता. विद्यार्थी ते वृद्ध या वयोगटातील कुणीही आणि कुठल्याही पातळीवर अक्षर सुधारू शकतो आणि त्याचे अक्षर सुंदर होऊ शकते हा नानांचा विश्वास होता. अक्षर सुधार प्रकल्प हाती घेऊन त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्यासाठी वेचले. अक्षर सुधार ह्या हेतूने संपूर्ण भारतभ्रमण केले. हजारो नव्हे लाखो विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कार्यशाळा घेतल्या. अक्षरातील उभी रेषा सरळ असावी यावर त्यांचा जेवढा भर होता त्यापेक्षाही जीवनाची उभी रेषा सरळ असली पाहिजे ह्यावर अधिक भर होता. अक्षर सुधारणेसाठी त्यांनी विविध प्रयोग केले. विद्या भारतीच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ उत्तर भारतातील अनेक शाळांना,संस्थांना त्यांनी करून दिला होता.
नानांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. नवयुग विद्यालय महाल येथे ते शिक्षक होते. सुंदर अक्षरांची श्रीमंती त्यांना लाभली होतीच. शिकवणी वर्ग ही घेत असत पण मुळात तो फक्त शिकवणी वर्ग नव्हता तर व्यक्ती निर्माण करण्याचे वर्ग होते. बाबा,काका आणि आत्या हे सर्वजण त्यांच्याकडेच शिकले आणि ह्या साऱ्यांचे अक्षर अक्षर योगी मुळेच सुंदर आहे. नानांच्या अनेक आठवणी गप्पांच्या ओघात आजही सहज निघतात. नानांचा पिंड आध्यात्मिक होता. ते कायम सांगायचे भगवंताचे अधिष्ठानाशिवाय कार्यात यश मिळणार नाही आणि ते स्वतः आन्हिक आटोपल्याशिवाय घरातून बाहेर पडत नसत. एकदा मी त्यांच्याकडे संध्याकाळी गेलो असतांना ते नुकतंच गुरुचरित्र वाचून उठले होते. मला म्हणाले,तीर्थ घे. सप्ताह काळात एकदिवसीय गुरुचरित्र पारायण ते करत असत म्हणजे सात दिवसांत सात पारायणे करत असत. पहाटे ३ वाजेपासून दुपारी ३ पर्यन्त त्यांचे वाचन चालत असे. जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा आश्चर्य वाटलं आणि नतमस्तक झालो त्यावेळी खरंतर हे सारे न कळण्याच्या पलीकडचे असेच होते. नानांना पत्रलेखनाचा छंद होता. मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्याने त्यांचा पत्रव्यवहार सहज चालायचा. अनेकांकडे त्यांची पत्रे आजही सांभाळून ठेवली असतील इतकी सुंदर अक्षरांची पत्रे ते स्वतः लिहीत असत. त्यांचे अनेक पैलूं असावेत पण मी अनुभवलेले नाना असेच आहे. अक्षरांचा ध्यास घेतलेले नाना नेहमी म्हणत,
रेषा सरळ उंची समान ।अक्षराचा यातच प्राण ।।
रेषा सरळ द्यावे ध्यान । रेषाच मोठी सारे अर्धे लहान ।।
रेषा सरळ देवासमान।करूया सारे तिला प्रणाम ।।
लिखाणाचा वेग सांभाळताना ते एकटाकी येणे हाच नानांचा आग्रह असे. आज नाना देहरुपाने नसले तरी आयुष्यभर अक्षर सुधारणेसाठी झटणारे नानांचे स्मरण होणे हे क्रमप्राप्त आहे. प्रत्येकाला मार्गदर्शक आणि दिशादर्शनासाठी हे नक्कीच प्रेरक असेल ह्यात शंकाच नाही.
✍️ सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment