Sunday, June 26, 2022

ज्ञानाभय प्रदानेन पाहि सर्वान् महालसे ।।

गोव्यातील समृद्ध अशा राज्यातील मंदिरांच्या गाभाऱ्यात आपण दर्शनार्थ जातो आहे. मागच्यावेळी आपण मंगेशाच्या मंदिरात प्रवेश केला यावेळी म्हार्दोळ येथील महालसा नारायणी मंदिराच्या गाभाऱ्यात जाणार आहोत. महालसा या नावातच मोठा गर्भितार्थ आहे. महालसा मधील ‘म’ म्हणजे ममत्व आणि माया. ‘ह’ म्हणजे हर्ष किंवा आनंद. ल म्हणजे लसत्व अर्थात तेज.

मार्दोल धर्मक्षेत्रस्थ शालिग्राम शिलास्थिते

ज्ञानाभय प्रदानेन पाहि सर्वान् महालसे ।।

महालसा देवी हे श्री विष्णूचे स्त्री रूप म्हणजेच श्री विष्णूचा मोहिनी अवतार आहे. या देवीच्या बाबतीत अनेक दंतकथा प्रचलित आहेत. देव आणि दानव यांच्यात युद्ध झाले तेव्हा दैत्य गुरू शुक्राचार्य यांनी संजीवनी विद्येचा उपयोग करून दानवांना पुनर्जीवित केले. परंतु देवांकडे अशी विद्या नसल्याने देवांचा पराभव झाला तेव्हा सर्व देव श्री विष्णूंना शरण गेले त्यांनी यावर काय उपाय करता येईल असा प्रश्न श्री विष्णूंना विचारला.विष्णूनी त्यांना अमृत प्राप्त करण्याचा उपदेश दिला व त्यासाठी समुद्र मंथन करावे असे सांगितले. 

देव आणि दैत्य यांनी समुद्र मंथन सुरू केले. या मंथनातून एक एक दिव्य अशी रत्ने बाहेर पडू लागले. यातूनच अप्सरा आणि अमृताचा सुंदर कलश आला. हा कलश पहाताच देव आणि दैत्य झटापटी करू लागले. कारण अमृत पिण्यामुळे अमरत्व मिळणार होते. या संकटातून पार होण्यासाठी विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले सर्वजण त्या रूपाकडे मोहित होऊन त्यांच्याकडे पहातच राहिले तेव्हा दैत्यांचे भान हरपून गेले आणि मोहिनीने देवांना अमृत पाजले, आणि दैत्य तसेच राहिले. त्या अवताराचे नाव मोहिनी. ती मोहिनी म्हणजेच साक्षात महालसा नारायणी आहे.

एका आख्यायिकेनुसार, महादेव मोहिनीच्या रूपावर प्रचंड मोहित झाले आणि त्यांनी त्यावेळी मोहिनीकडून वचन घेतलं होतं की जेव्हा ते मार्तंड भैरवाचा जन्म घेतील तेव्हा ती म्हाळसा म्हणून जन्म घेईल आणि तेव्हा ते तिच्याशी विवाह करतील. महादेवाचा मल्हारी मार्तंड हा अवतार भूतलावर आला आणि मणी-मल्ल या दैत्याचा वध केल्यावर तिमा शेट यांच्या घरी म्हाळसा जन्म घेते. पुढे मल्हारी आणि मोहिनीचा अवतार असणारी म्हाळसा यांचा विवाह होतो ही आख्यायिका जय मल्हार मुळे प्रचलित झाली आहे.  

गोव्यातील वेर्णेंच्या टेकडीवर एक तळं आहे, तिथे खालून नैसर्गिक झरा वाहतो आणि या तळ्यात कायम पाणी असतं. हे तळं कधीपासून इथे आहे हे कोणालाही माहीत नाही, आणि तिथेच शेजारी श्री म्हाळसेचे अप्रतिम मंदिर होते. सासष्टीमधील हे प्राचीन मंदिर पोर्तुगीज येईपर्यंत येथेच होते कालांतराने या मंदिराची जुनं मंदिर अशी ओळख झाली आणि आज मुख्य मंदिर म्हार्दोळ येथे बघायला मिळतं आणि वेर्णेंला आता 'जुनं म्हार्दोळ' असे म्हटले जाते. सारस्वत ब्राह्मण गोव्यात येण्याआधीपासूच म्हाळसाची उपासना सुरू होती. म्हार्दोळच्या या देवीचं मंदिर वेर्णें येथे सोळाव्या शतकाच्या मध्यापर्यंत होतं पण नंतर देवी म्हार्दोळ येथे आली. पोर्तुगीजांच्या काळात हे स्थलांतर झाले. हे मंदिर त्या काळी नक्कीच नष्ट केलं गेलं पण या भग्न मंदिराचे पुनर्निर्माण झाले आणि देवीच्या या मूळ ठिकाणी आज एक मंदिर बघायला मिळतं.

जेव्हा इतर मंदिरातील मूर्ती हलवल्या गेल्या तेव्हा बहुदा म्हाळसाची मूर्तीही हलविली गेली. देवीचे सोन्याचे दागिने पण दुसरीकडे नेले आणि पोर्तुगीजांच्या नकळतपणे ही मूर्ती हळूच हलवली आणि ती प्रियोळ येथे आणली. त्या गावच्या देसाई लोकांनी तिचं मनापासून स्वागत केलं आणि तिचे रोजचे विधी, पूजा अर्चा हे सगळं व्यवस्थित व्हावं यासाठी जमेल ती सगळी मदत केली. अडचणीच्या काळातील ही मदत मोलाची होती. पेशव्यांच्या दरबारात एक मंत्री होते, ते उच्च पदावर होते. त्यांचं नाव होतं, रामचंद्र मल्हार सुखटणकर. तो काळ होता १८ व्या शतकाच्या मध्याचा. त्यांनी पेशव्यांकडून या देवीच्या मंदिरासाठी जमीन मिळवली आणि मग तिथे देवीचं मंदिर उभं राहिलं. आज हेच मंदिर बघायला मिळतं. पुढे मंदिराचा जीर्णोद्धार होत गेला आणि आताचे म्हार्दोळचं श्रीम्हाळसा नारायणी देवीचं मंदिर वास्तुकलेचा सर्वोत्तम नमुना म्हणून बघायला मिळतो आहे. 

श्रीम्हाळसा नारायणी या मंदिरात उभ्या स्वरुपात आहे. तिला चार हात आहेत. जमिनीवर पडलेल्या राक्षसाच्या अंगावर ती उभी आहे. देवीच्या उजव्या बाजूला या राक्षसाचं शीर आहे, हा राहू आहे; यानेच अमृत वाटपाच्या वेळी लबाडी केली होती. तिच्या उजव्या पुढच्या हातात तिने अजून एका राक्षसाला त्याच्या केसाला धरून धरलेलं आहे, याचं नाव विरोचन. या राक्षसाने गुडघे टेकलेले आहेत. तिच्या पुढच्या डाव्या हातात देवीने चंद्रासूर राक्षसाचं छाटलेलं शीर धरलेलं आहे. तिने मागच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात अमृत कुंभ धरलेला आहे. छाटलेल्या शिरातून खाली पडणारं रक्त चाटणारा सिंह देवीच्या डाव्या हाताला खाली उभा आहे.  देवीच्या भोवती असणार्‍या प्रभावळीवर देवीचं नाव लिहिलेलं आहे तसेच शंख, चक्र, शेष ही चिन्हे कोरलेली आहेत. या सगळ्या गोष्टी श्रीविष्णू यांच्याशी संबंधित आहेत. देवीच्या गळ्यात जानवं तर आहेच. ही प्रतिमा अतिशय सुंदर आहे. मंदिर परिसरात मुख्य मंदिराच्या उजव्या हाताला श्री शांतादुर्गा देवीचं स्वतंत्र मंदिर आहे. या मंदिरात जे काही विधी, सोहळे होतात, त्यात नेहमी शांतादुर्गा उजव्या हातालाच असते कारण श्री म्हाळसा देवीने तिला वचन दिलं होतं की मंदिरात तिला नेहमी अग्रपूजेचा मान दिला जाईल, त्यामुळे उजव्या बाजूचा मान नेहमी श्री संतेरीचाच असतो. येथे इतर देवतांचीही मंदिरे आहेत. 

इथे बरेच सण आणि उत्सव साजरे केले जातात पण इथलं शारदीय नवरात्र खूप मोठ्या प्रमाणात साजरे  केले जाते. नऊ रात्री इथे मखरोत्सव साजरा होतो. इथला माघातील जत्रोत्सव माघ कृष्ण चतुर्थी ते दशमी या काळात साजरा होतो, यात दोन्ही देवींच्या दररोज वेगवेगळ्या वाहनांमधून मिरवणुका निघतात. दर रविवारी येथे पालखी सोहळा आयोजित केला जातो. गोव्याच्या इतर मंदिरांप्रमाणे या मंदिराच्या प्रांगणातही सुरेख दीपस्तंभ आहे. हे मंदिर त्याच्या विशाल पितळी घंटेसाठी प्रसिद्ध आहे. ही देवी कितीतरी गौड सारस्वत ब्राह्मण, कऱ्हाडे ब्राह्मण, दैवज्ञ ब्राह्मण, भंडारी, शिंपी अशा कुळांची कुलदेवता आहे. अशी या म्हार्दोळच्या आई म्हाळसा नारायणीची कृपा आपल्या सगळ्यांवर सदैव असावी हीच तिच्या चरणी प्रार्थना आहे. 

सर्वेश फडणवीस 

8668541181


Sunday, June 19, 2022

मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश..



गोवा हे राज्य निसर्गसमृद्ध आहे आणि मुख्य म्हणजे अप्रतिम समुद्र किनाऱ्यानी वेढलेले आहे पण गोव्याच्या दक्षिण भागात अतिशय देखणी आणि ऐतिहासिक मंदिरे आहेत. सतत कामाच्या धावपळीतून निवांत क्षण घालवायला गोवा कायम खुणावत असतो आणि याच गोव्यात ही मंदिर पांथस्थांना आधार देतात. आपण मागच्या आठवड्यात श्रीशांतादुर्गेच्या गाभाऱ्यात गेलो आणि आज श्री मंगेशीच्या गाभाऱ्यात जाणार आहोत. श्री मंगेश हे भगवान शंकराचे एक रूप आहे. गोव्याची राजधानी पणजीजवळ उभारलेले हे श्री मंगेशी मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. येथे महादेव शिवलिंगाच्या रूपात स्थापित आहे. 

अशी दंतकथा आहे की, एकदा शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर द्युत खेळत होते. शंकर सतत पराभूत होत असताना शेवटच्या डावात त्यांनी हिमालय सुध्दा पणाला लावले आणि तेही गमावले. खेळातील पराभवामुळे त्यांना हिमालयातील घर सोडावे लागले. त्यांनी दक्षिणेकडे चालण्यास सुरवात केली आणि सह्याद्रीचा डोंगर ओलांडून कुशास्थली म्हणजेच सध्याचं कोर्तालिम गाठले. देवी पार्वतीने हिमालय सोडले आणि भगवान शंकराच्या शोधात भटकंतीला सुरुवात केली. दाट जंगलातून जात असताना अचानक तिच्या समोर एक मोठा वाघ आला, तो वाघ पाहून ती खूप घाबरली. तसेच, नंतर तिने स्वतःचे रक्षण करण्यासाठी शंकराने शिकवलेला रक्षामंत्र म्हणण्यास सुरवात केली. तिने "हे गिरीश माम त्राहि" (हे गिरीश मला वाचवं) असा धावा करण्याऐवजी "त्राहि माम गिरीश" असा म्हणजेच चुकीच्या मंत्राचा जप केला. अर्थात शंकर प्रकटले. असे म्हटले जाते की, तेव्हापासून शंकराचे नाव झाले “मां गिरीश”  म्हणजेच “मांगिरीश” अर्थात “मंगेश”. उत्पत्ती कल्पनेतून लिंग चिन्हांचा उद्भव झाला. त्या कल्पनेतूनच प्रकृतिपुरूष म्हणून अर्धनारी नटेश्वरात शिवपार्वतीरूप आपण पाहतो. श्री मंगेश किंवा मांगिरीश हे देखील लिंग स्वरूपच आहे.

१६ व्या शतकापर्यंत मुरगाव तालुक्यातील  कुशस्थली अर्थात कोर्तालिम या गावात मंदिराचे मूळ स्थान होते. मुरगाव हा भाग तत्काली सासष्टी तालुक्याच्या अंतर्गत यायचा. १५६० सालच्या नोव्हेंबर महिन्यात म्हणजेच ‘इन्क्विझिशन’ काळात मूर्तीभंजक वृत्तीच्या पोर्तुगीज मिशनऱ्यांपासून या मूर्तीचे पावित्र्य- विडंबन टाळण्यासाठी आणि ही मूर्ती वाचविण्यासाठी हाडिये - प्रियोळ येथे या मूर्तीचे स्थलांतरण करण्यात आले. या काळात पोर्तुगीजांनी त्यांच्या ताब्यात असलेले ‘वेल्हास कॉन्क्विस्तास’ म्हणजेच जुन्या काबिजादीतील तिसवाडी, बार्देश आणि सासष्टी हे प्रदेश अनुक्रमे डॉमिनिकन, फ्रान्सिस्कन आणि जेझुइट यांना दिले होते. ख्रिस्ती धर्माची शिकवण गोमंतकीय जनतेपर्यंत पोहोचविणे आणि धर्मांतरण सुनियोजित व्हावे असे हेतू घेऊन पोर्तुगीजांनी ही खेळी खेळली होती. पोर्तुगीज सेनापती आफोंस द आल्बुकर्व यांनी ‘धार्मिक क्षेत्रांत ढवळाढवळ करणार नाही’, असे दिलेले आश्वासन पाळले नाही. पोर्तुगालच्या राणीने हिंदु मंदिरांची नासधूस करावी, धार्मिक कृत्ये घरात किंवा बाहेर करू नयेत आणि ब्राह्मण, हरिदास आणि पुराणिक यांनी या राज्याच्या हद्दीत राहू नये, असा आदेश दिला होता. या वेळी तातडीने निर्णय घेतला पाहिजे, असे ओळखून श्री मंगेशाच्या येथील कौंडिन्य आणि वत्स गोत्राच्या सारस्वत ब्राम्हणांनी देवालयात गुप्त बैठक घेतली आणि देवालाच मार्ग दाखव, अशी प्रार्थना केली. त्याच रात्री त्यांना दृष्टांत झाला की, माझे वास्तव्य सर्वत्र आहे. शिवलिंग श्री मंगेश प्रतिकाचे संरक्षण करण्यासाठी ते उचलून ज्या मार्गाने जावेसे वाटते, त्या मार्गाने जाऊन लिंगास जडपणा येऊन ते पुढे नेणे अशक्य होईल, तेथे ते खाली ठेवून त्याची पुनःप्रतिष्ठापना करा. त्याच रात्री श्री मंगेश शिवलिंग पालखीवजा झोळीत ठेवले आणि अत्यावश्यक परिवार देवतांच्या मूर्ती बरोबर घेऊन रात्रीच्या गडद अंधारात मडकई जवळच्या तीरावर आजच्या मंगेशी या वाड्यावर आणून ठेवले. 

काही जाणकारांच्या मते, मंदिराला पोर्तुगालांच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी शिवलिंगाला मूळ मंदिरातून प्रियोलच्या सध्याच्या ठिकाणावर १५६० मध्ये स्थलांतर करण्यात आले होते. सोंडे येथील राजाने मंदिरासाठी जमीन दान दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांनी सातारा दरबारातील आपले गोमंतकीय मंत्री श्री. रामचंद्र मल्हार सुखठणकर यांच्या विनंतीवरून १७४४ साली त्यांनी भव्य अशा मंदिराची बांधणी केली. कालांतराने मंदिराचा जीर्णोद्धार होतच गेला आणि १९७३ मध्ये मंदिराच्या घुमटावर श्री गौडपादाचार्य स्वामींच्या हस्ते सुवर्णकलशाची स्थापना करण्यात आली जो आजही बघायला मिळतो. 

मंगेशी मंदिर म्हणजे वास्तुकलेचा सर्वोत्तम नमुना आहे. हे मंदिर गोव्यातील शांतादुर्गा मंदिराच्या शैलीतच तयार करण्यात आले आहे. या मंदिराची संरचना सरळ आणि शानदार आहे. मंदिरात अनेक घुमटं, स्तंभ आणि खिडक्या आहेत. येथे एक प्रमुख नंदी आणि मंदिराच्या मध्यात एक भव्य सात मजली दीपस्तंभ आहे. मंदिरात एक पाण्याची टाकी आहे. या टाकीला मंदिरातील सर्वात जुना भाग मानले जाते. येथे एक मोठे सभागृह आहे. या सभागृहात अंदाजे ५०० हुन अधिक लोक उभे राहू शकतात. एकोणिसाव्या शतकातील झुंबर या सभागृहाचे सौंदर्य वाढवते. सभागृहाचा मध्य भाग गर्भगृहाकडे जातो. येथेच भगवान मंगेश प्रतिष्ठित आहे. मंदिराला सुबक अशी तळी आहे, नगारखाना आहे त्याचबरोबर मूळकेश्वराचे एक मंदिरही या आवारात स्थित आहे. श्री मंगेश देवस्थानात इतरही अनेक देवता आहेत आणि या मंदिरात कौलप्रसाद लावून देवाला प्रश्न विचारून आपल्या समस्या सोडवण्याकरिता चौकावरील श्री देवशर्मा या ग्रामपुरुषाच्या मूर्तीला तांबड्या रंगाच्या कळ्या आणि फुलांच्या पाकळ्या पाण्यात बुडवून लावतात. 

श्री मंगेश मंदिरात नित्यनेमाने अभिषेक, लघुरुद्र, वगैरे धार्मिक कृत्ये चालतात. याशिवाय प्रमुख उत्सव म्हणजे रामनवमी, विजयादशमी, दहीकालोत्सव, शिवरात्रोत्सव आणि जन्मोत्सव. मंदिराचा जत्रोत्सव माघ शु. सप्तमीला चालू होतो. रात्री देवाची मूर्ती नौकेत बसवून तलावामध्ये नौकारोहणाचा कार्यक्रम असतो. श्री मुळकेश्वर आणि श्री विरभद्र यांची फार सुंदर छोटी छोटी मंदिरे येथे आहेत. पौर्णिमेला इथं रथोत्सव साजरा केला जातो. तेव्हा संपूर्ण दिपमाळ सजवली जाते. त्या दिपज्योतीच्या प्रकाशानं संपूर्ण परिसर लखलखून निघतो. इतकंच नाही तर तळ्यामध्ये केळीच्या पानातून दिवे सोडले जातात. या ठिकाणी गेल्यावर कवी शांताबाई शेळके यांचे शब्द आणि स्वर्गीय आवाजाच्या धनी असलेल्या आशा भोसले यांनी अजरामर केलेले हे गाणं सतत स्मरणात येतं ते म्हणजे,

मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश

माझ्याकडे देव माझा पाहतो आहे

सर्वेश फडणवीस 



Sunday, June 12, 2022

श्रीशांता विजयपदा विजयते दुर्गा हृदा तां भजे ।

आई जगदंबेचे एक रूप म्हणजे गोवा राज्यातील फोंडा तालुक्यात असलेले कवळे येथील श्री शांतादुर्गादेवी देवस्थान . हे गोव्यातील अत्यंत प्राचीन, जागृत आणि प्रसिद्ध मंदिर आहे. आज आपण याच शांतादुर्गेच्या गाभाऱ्यात दर्शनार्थ जाणार आहोत. अतिशय सुंदर, स्वच्छ आणि प्रसन्नता जाणवणारे जागृत देवस्थान म्हणून श्री शांतादुर्गा देवस्थान कायमच मनाला भुरळ पाडणारे आहे. श्रीशांतादुर्गा देवी कितीतरी गौड सारस्वत ब्राह्मण कुळांची कुलस्वामिनी आहे; तसेच काही कऱ्हाडे ब्राह्मण आणि काही भंडारी लोकांचीही ही देवी आहे. 

श्रीशांता विजयपदा विजयते दुर्गा हृदा तां भजे ।

कुद्धौ शान्तियुतो कृतो हरिहरो कृत्वाऽधिहस्ते यया ।।

शांताये च नमो नमो नहि परं यस्या ममाऽलंबनम ।

शांताया खलु किकरोऽस्मि रमतां तत्पादयोर्मे मना ।।

केळशी येथील श्री शांतादुर्गादेवीचे देवालय हे शेणवी मोने नावाच्या नामांकित व्यापार्‍याने बांधले होते, अशी माहिती ऐतिहासिक दप्तरातून घेतलेली आढळते. त्यानंतर सोळाव्या शतकात पोर्तुगिजांनी सासष्टी भागावर आक्रमण करून तेथील हिंदूंच्या देवतांची देवालये उद्ध्वस्त केली. पोर्तुगीजांच्या जाचामुळे येथील देवीची मूर्ती सध्याच्या ठिकाणी हलवण्यात आली. त्या वेळी देवीच्या काही भक्तांनी देवीची मूर्ती घेऊन फोंडा येथील कैवल्यपूर (कवळे) या गावी स्थलांतर केले. कवळे येथे प्रारंभी हे देवालय नक्की अमुकच वर्षी बांधले गेले, याविषयीचा पुरावा किंवा दाखला त्या देवस्थानच्या दप्तरात आढळत नाही. नंतरच्या काळात म्हणजे वर्ष १७१३ नंतर आणि वर्ष १७३८ च्या अवधीत या देवालयाची नवी वास्तू भक्कम स्थितीत उभी होती अन् तीच अद्याप कायम आहे, ही गोष्ट सिद्ध करणारी कागदपत्रे सापडतात. १८९८ मध्ये देवीची मूळ मूर्ती पठाणांनी चोरून नेली. मूर्तीशिवाय मंदीर कसं राहील म्हणून मग नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना होईपर्यंत मंदिराच्या शेजारीच असलेल्या गौडपादाचार्य मठातील देवीची मूर्ती या मंदिरात आणून तिची स्थापन केली गेली. त्यानंतर १९०१ मध्ये लक्ष्मण कृष्णाजी गायतोंडे यांनी श्री शांतादुर्गादेवीची नवीन मूर्ती घडवली आणि या मूर्तीची फाल्गुन शुद्ध दशमी शके १८२३ म्हणजेच १९ मार्च १९०२ या दिवशी प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिरात याच मूर्तीचे दर्शन घडते. 

हे देवालय बांधण्याची प्रेरणा श्री शांतादुर्गा देवीने नारोराम मंत्री यांना दिली. सरदार नारोराम शेणवी रेगे, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्या नजीक कोचरे या गावातले रहिवासी होते. त्यांना सातारा येथे शाहू छत्रपतींच्या दरबारी वर्ष १७१३ मध्ये मंत्रीपद लाभले. ‘आपणास देवीने एवढे ऐश्‍वर्य दिले, अशी त्यांची दृढ श्रद्धा असल्यामुळे देवीचे देवालय बांधले पाहिजे’, याची जाणीव त्यांना झाली आाणि त्यांनी वर्ष १७३० च्या सुमारास स्वखर्चाने सध्याचे श्री शांतादुर्गादेवीचे भव्य आणि सुंदर मंदिर उभारले.

श्री शांतादुर्गा देवालयाची सुंदर आणि भव्य इमारत पूर्वाभिमुख असून समोर नयन मनोहर असा दीपस्तंभ आहे. मंदिरासमोर तलाव आहे. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करण्याच्या महाद्वारावर चौघडा वाजवण्यासाठी नगारखाना आहे. गर्भगृहाच्या वर घुमट असून त्यावर सोन्याचा कळस आहे. देवालयातील गर्भगृहात श्री शांतादुर्गादेवीची चतुर्भुज मूर्ती आहे. तिच्या एका हातात शिव आणि दुसर्‍या हातात श्रीविष्णु आहे. या मूर्तीशेजारी सहा इंच आकाराचे काळ्या पाषाणाचे शिवलिंग आहे. या देवळाच्या शेजारी डावीकडे श्री नारायणदेवाचे मंदिर आहे. त्या मंदिरात मुख्यासनावर श्री नारायणदेव आणि श्री गणपति यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या डावीकडे पारिजात वृक्षाचा पार आहे. त्यावर बारावीर भगवतीची मूर्ती आणि एका अज्ञात संन्याशाच्या पादुका आहेत. देवालयासमोर श्री क्षेत्रपालाची शिळा आहे. देवालयाच्या मागच्या बाजूला म्हारू देवाची शिला आहे, तसेच देवालयाजवळ एका लहान देवालयात मूळ पुरुष कौशिक गोत्री लोमशर्मा यांची पाषाणी मूर्ती स्थापन केलेली आहे. 

ही देवता मूळ त्रिहोत्रपूर वा तिरहूत येथील असून काही ब्राह्मणांनी ती आपल्याबरोबर गोव्यात आणली, असे म्हटले जाते. मिथिला देशाच्या बारा नावांपैकी ‘तैरभुक्ती’ हे एक असून त्याचा अपभ्रंश त्रिहोत्र असा झाला असावा, असे काही अभ्यासकांचे मत आहे. असेही म्हटले जाते की, पूर्वी कान्यकुब्ज देशातून रामेश्वरच्या यात्रेला गेलेले काही ब्राह्मण परतवाटेवर असताना गोव्यात त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाला आणि ते तेथेच राहिले. देवशर्मा, लोकशर्मा आणि शिवशर्मा हे त्यांतील प्रमुख होते. कवळे येथील शांतादुर्गा मंदिराच्या खालच्या बाजूस शिवशर्मा ह्यांची एक छोटीशी घुमटी आहे.

देवीच्या शांतादुर्गा ह्या नावाचे स्पष्टीकरण तिची जन्मकथा ही प्रसिद्ध आहे. एकदा शिव आणि विष्णू ह्यांच्यात युद्ध सुरू होऊन ते दीर्घकाळ चालू राहिले. त्यात कोणालाही विजय मिळण्याची शक्यता दिसेना. हे युद्ध थांबल्याखेरीज विश्वव्यवस्था सुरळीतपणे चालणार नाही, हे ध्यानी घेऊन ब्रह्मदेवाने आदिशक्ती जगदंबेला युद्धभूमीवर पाठवले. तिने या दोघांना उपदेश करून ते युद्ध थांबवले व शांतता प्रस्थापित केली, म्हणून ती ‘शांतादुर्गा’ ह्या नावाने ओळखली जाऊ लागली. शैव-वैष्णवांमधील वाद मिटावा, ही दृष्टी ह्या कथेमागे दिसून येते. 

देवीच्या या मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे, भक्तांना देवीचे दोन रुपांत दर्शन घेता येते. मंदिरात दुपारपर्यंत देवीची उभी मूर्ती असते, त्यानंतर ती बाजूला सरकवून तिच्या जागी चतुर्भुज आसनस्थ मूर्ती ठेवली जाते. मुक्कामी असल्यास देवीच्या दोन्ही मूर्तींच्या दर्शनाचा लाभ मिळू शकतो. पण नवरात्रात मात्र देवीच्या दोन्ही मूर्तींचे दर्शन एकत्रच घेता येते. या दर्शनासाठी नवरात्रात भक्तांची खूप मोठी गर्दी होते. हिंदूंबरोबर गोव्यातील ख्रिश्चन लोकही मोठ्या प्रमाणात देवीला कौल लावतात. हे ख्रिश्चन बहुतेक करून मूळचे हिंदूच असावेत. यांच्या पूर्वजांना बळजबरीने आणि नाईलाजाने ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला असावा पण यांचे मूळचे हिंदू संस्कार मात्र बर्‍यापैकी पक्के असावेत. शांतादुर्गेचे कवळे येथील मंदिर परिसर भव्य असून मंदिराच्या दोन्ही बाजूंस मोठ्या धर्मशाळा आहेत. तेथील परिसरात परिवार देवता आणि एक उंच दीपमाळ आहे.

शांतादुर्गा देवीचा माघ महिन्यात होणारा जत्रोत्सव विशेष प्रसिद्ध आहे. हा जत्रोत्सव माघ शुद्ध प्रतिपदेला सुरू होऊन माघ शुद्ध षष्ठीस संपतो. या निमित्ताने खूप मोठी जत्रा भरवली जाते. यातील माघ शुद्ध पंचमी हा विशेष महत्त्वाचा आहे. देवी केळोशी येथे असताना हा मुख्य उत्सव पंचमीलाच असायचा त्यामुळे कवळे येथेही हीच प्रथा पाळली जाते. हा उत्सव केळशीच्या लोकांसाठीही अतिशय महत्त्वाचा आहे. माघ शुद्ध षष्ठीच्या दिवशी पहाटे महारथातून श्रीशांतादुर्गा देवीची मिरवणूक निघते आणि हा उत्सव संपन्न होतो. ही मिरवणूक निघण्यापूर्वी रथात आरूढ झालेल्या श्रीदेवीची पूजा करून रथावर देवस्थानाचा नारळ फोडला जातो. नारळ फोडण्याचा पहिला मान श्रीगौडपादाचार्य संस्थानाच्या कैवल्यपूर मठाधिशांचा असतो. या रथात देवी सुवर्ण पालखीत स्थानापन्न होते. ही सोन्याची पालखी या जत्रोत्सवाचं प्रमुख आकर्षण आहे. सारस्वतांची ही आराध्या श्रीशांतादुर्गा कवळे फोंडा गोवा येथे विसावली आहे. एकदा तरी गोव्याला गेलात तर श्रीशांतादुर्गेच्या दर्शनार्थ नक्की जायला हवे. आई शांतादुर्गा तुम्हा आम्हावर सदैव कृपेचा वर्षाव करो हीच तिच्या चरणी प्रार्थना.🙏

!! श्री शांतादुर्गा विजयते !!

सर्वेश फडणवीस 

8668541181