गोवा हे राज्य निसर्गसमृद्ध आहे आणि मुख्य म्हणजे अप्रतिम समुद्र किनाऱ्यानी वेढलेले आहे पण गोव्याच्या दक्षिण भागात अतिशय देखणी आणि ऐतिहासिक मंदिरे आहेत. सतत कामाच्या धावपळीतून निवांत क्षण घालवायला गोवा कायम खुणावत असतो आणि याच गोव्यात ही मंदिर पांथस्थांना आधार देतात. आपण मागच्या आठवड्यात श्रीशांतादुर्गेच्या गाभाऱ्यात गेलो आणि आज श्री मंगेशीच्या गाभाऱ्यात जाणार आहोत. श्री मंगेश हे भगवान शंकराचे एक रूप आहे. गोव्याची राजधानी पणजीजवळ उभारलेले हे श्री मंगेशी मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. येथे महादेव शिवलिंगाच्या रूपात स्थापित आहे.
अशी दंतकथा आहे की, एकदा शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर द्युत खेळत होते. शंकर सतत पराभूत होत असताना शेवटच्या डावात त्यांनी हिमालय सुध्दा पणाला लावले आणि तेही गमावले. खेळातील पराभवामुळे त्यांना हिमालयातील घर सोडावे लागले. त्यांनी दक्षिणेकडे चालण्यास सुरवात केली आणि सह्याद्रीचा डोंगर ओलांडून कुशास्थली म्हणजेच सध्याचं कोर्तालिम गाठले. देवी पार्वतीने हिमालय सोडले आणि भगवान शंकराच्या शोधात भटकंतीला सुरुवात केली. दाट जंगलातून जात असताना अचानक तिच्या समोर एक मोठा वाघ आला, तो वाघ पाहून ती खूप घाबरली. तसेच, नंतर तिने स्वतःचे रक्षण करण्यासाठी शंकराने शिकवलेला रक्षामंत्र म्हणण्यास सुरवात केली. तिने "हे गिरीश माम त्राहि" (हे गिरीश मला वाचवं) असा धावा करण्याऐवजी "त्राहि माम गिरीश" असा म्हणजेच चुकीच्या मंत्राचा जप केला. अर्थात शंकर प्रकटले. असे म्हटले जाते की, तेव्हापासून शंकराचे नाव झाले “मां गिरीश” म्हणजेच “मांगिरीश” अर्थात “मंगेश”. उत्पत्ती कल्पनेतून लिंग चिन्हांचा उद्भव झाला. त्या कल्पनेतूनच प्रकृतिपुरूष म्हणून अर्धनारी नटेश्वरात शिवपार्वतीरूप आपण पाहतो. श्री मंगेश किंवा मांगिरीश हे देखील लिंग स्वरूपच आहे.
१६ व्या शतकापर्यंत मुरगाव तालुक्यातील कुशस्थली अर्थात कोर्तालिम या गावात मंदिराचे मूळ स्थान होते. मुरगाव हा भाग तत्काली सासष्टी तालुक्याच्या अंतर्गत यायचा. १५६० सालच्या नोव्हेंबर महिन्यात म्हणजेच ‘इन्क्विझिशन’ काळात मूर्तीभंजक वृत्तीच्या पोर्तुगीज मिशनऱ्यांपासून या मूर्तीचे पावित्र्य- विडंबन टाळण्यासाठी आणि ही मूर्ती वाचविण्यासाठी हाडिये - प्रियोळ येथे या मूर्तीचे स्थलांतरण करण्यात आले. या काळात पोर्तुगीजांनी त्यांच्या ताब्यात असलेले ‘वेल्हास कॉन्क्विस्तास’ म्हणजेच जुन्या काबिजादीतील तिसवाडी, बार्देश आणि सासष्टी हे प्रदेश अनुक्रमे डॉमिनिकन, फ्रान्सिस्कन आणि जेझुइट यांना दिले होते. ख्रिस्ती धर्माची शिकवण गोमंतकीय जनतेपर्यंत पोहोचविणे आणि धर्मांतरण सुनियोजित व्हावे असे हेतू घेऊन पोर्तुगीजांनी ही खेळी खेळली होती. पोर्तुगीज सेनापती आफोंस द आल्बुकर्व यांनी ‘धार्मिक क्षेत्रांत ढवळाढवळ करणार नाही’, असे दिलेले आश्वासन पाळले नाही. पोर्तुगालच्या राणीने हिंदु मंदिरांची नासधूस करावी, धार्मिक कृत्ये घरात किंवा बाहेर करू नयेत आणि ब्राह्मण, हरिदास आणि पुराणिक यांनी या राज्याच्या हद्दीत राहू नये, असा आदेश दिला होता. या वेळी तातडीने निर्णय घेतला पाहिजे, असे ओळखून श्री मंगेशाच्या येथील कौंडिन्य आणि वत्स गोत्राच्या सारस्वत ब्राम्हणांनी देवालयात गुप्त बैठक घेतली आणि देवालाच मार्ग दाखव, अशी प्रार्थना केली. त्याच रात्री त्यांना दृष्टांत झाला की, माझे वास्तव्य सर्वत्र आहे. शिवलिंग श्री मंगेश प्रतिकाचे संरक्षण करण्यासाठी ते उचलून ज्या मार्गाने जावेसे वाटते, त्या मार्गाने जाऊन लिंगास जडपणा येऊन ते पुढे नेणे अशक्य होईल, तेथे ते खाली ठेवून त्याची पुनःप्रतिष्ठापना करा. त्याच रात्री श्री मंगेश शिवलिंग पालखीवजा झोळीत ठेवले आणि अत्यावश्यक परिवार देवतांच्या मूर्ती बरोबर घेऊन रात्रीच्या गडद अंधारात मडकई जवळच्या तीरावर आजच्या मंगेशी या वाड्यावर आणून ठेवले.
काही जाणकारांच्या मते, मंदिराला पोर्तुगालांच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी शिवलिंगाला मूळ मंदिरातून प्रियोलच्या सध्याच्या ठिकाणावर १५६० मध्ये स्थलांतर करण्यात आले होते. सोंडे येथील राजाने मंदिरासाठी जमीन दान दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांनी सातारा दरबारातील आपले गोमंतकीय मंत्री श्री. रामचंद्र मल्हार सुखठणकर यांच्या विनंतीवरून १७४४ साली त्यांनी भव्य अशा मंदिराची बांधणी केली. कालांतराने मंदिराचा जीर्णोद्धार होतच गेला आणि १९७३ मध्ये मंदिराच्या घुमटावर श्री गौडपादाचार्य स्वामींच्या हस्ते सुवर्णकलशाची स्थापना करण्यात आली जो आजही बघायला मिळतो.
मंगेशी मंदिर म्हणजे वास्तुकलेचा सर्वोत्तम नमुना आहे. हे मंदिर गोव्यातील शांतादुर्गा मंदिराच्या शैलीतच तयार करण्यात आले आहे. या मंदिराची संरचना सरळ आणि शानदार आहे. मंदिरात अनेक घुमटं, स्तंभ आणि खिडक्या आहेत. येथे एक प्रमुख नंदी आणि मंदिराच्या मध्यात एक भव्य सात मजली दीपस्तंभ आहे. मंदिरात एक पाण्याची टाकी आहे. या टाकीला मंदिरातील सर्वात जुना भाग मानले जाते. येथे एक मोठे सभागृह आहे. या सभागृहात अंदाजे ५०० हुन अधिक लोक उभे राहू शकतात. एकोणिसाव्या शतकातील झुंबर या सभागृहाचे सौंदर्य वाढवते. सभागृहाचा मध्य भाग गर्भगृहाकडे जातो. येथेच भगवान मंगेश प्रतिष्ठित आहे. मंदिराला सुबक अशी तळी आहे, नगारखाना आहे त्याचबरोबर मूळकेश्वराचे एक मंदिरही या आवारात स्थित आहे. श्री मंगेश देवस्थानात इतरही अनेक देवता आहेत आणि या मंदिरात कौलप्रसाद लावून देवाला प्रश्न विचारून आपल्या समस्या सोडवण्याकरिता चौकावरील श्री देवशर्मा या ग्रामपुरुषाच्या मूर्तीला तांबड्या रंगाच्या कळ्या आणि फुलांच्या पाकळ्या पाण्यात बुडवून लावतात.
श्री मंगेश मंदिरात नित्यनेमाने अभिषेक, लघुरुद्र, वगैरे धार्मिक कृत्ये चालतात. याशिवाय प्रमुख उत्सव म्हणजे रामनवमी, विजयादशमी, दहीकालोत्सव, शिवरात्रोत्सव आणि जन्मोत्सव. मंदिराचा जत्रोत्सव माघ शु. सप्तमीला चालू होतो. रात्री देवाची मूर्ती नौकेत बसवून तलावामध्ये नौकारोहणाचा कार्यक्रम असतो. श्री मुळकेश्वर आणि श्री विरभद्र यांची फार सुंदर छोटी छोटी मंदिरे येथे आहेत. पौर्णिमेला इथं रथोत्सव साजरा केला जातो. तेव्हा संपूर्ण दिपमाळ सजवली जाते. त्या दिपज्योतीच्या प्रकाशानं संपूर्ण परिसर लखलखून निघतो. इतकंच नाही तर तळ्यामध्ये केळीच्या पानातून दिवे सोडले जातात. या ठिकाणी गेल्यावर कवी शांताबाई शेळके यांचे शब्द आणि स्वर्गीय आवाजाच्या धनी असलेल्या आशा भोसले यांनी अजरामर केलेले हे गाणं सतत स्मरणात येतं ते म्हणजे,
मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे
सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment