श्रीशांता विजयपदा विजयते दुर्गा हृदा तां भजे ।
कुद्धौ शान्तियुतो कृतो हरिहरो कृत्वाऽधिहस्ते यया ।।
शांताये च नमो नमो नहि परं यस्या ममाऽलंबनम ।
शांताया खलु किकरोऽस्मि रमतां तत्पादयोर्मे मना ।।
केळशी येथील श्री शांतादुर्गादेवीचे देवालय हे शेणवी मोने नावाच्या नामांकित व्यापार्याने बांधले होते, अशी माहिती ऐतिहासिक दप्तरातून घेतलेली आढळते. त्यानंतर सोळाव्या शतकात पोर्तुगिजांनी सासष्टी भागावर आक्रमण करून तेथील हिंदूंच्या देवतांची देवालये उद्ध्वस्त केली. पोर्तुगीजांच्या जाचामुळे येथील देवीची मूर्ती सध्याच्या ठिकाणी हलवण्यात आली. त्या वेळी देवीच्या काही भक्तांनी देवीची मूर्ती घेऊन फोंडा येथील कैवल्यपूर (कवळे) या गावी स्थलांतर केले. कवळे येथे प्रारंभी हे देवालय नक्की अमुकच वर्षी बांधले गेले, याविषयीचा पुरावा किंवा दाखला त्या देवस्थानच्या दप्तरात आढळत नाही. नंतरच्या काळात म्हणजे वर्ष १७१३ नंतर आणि वर्ष १७३८ च्या अवधीत या देवालयाची नवी वास्तू भक्कम स्थितीत उभी होती अन् तीच अद्याप कायम आहे, ही गोष्ट सिद्ध करणारी कागदपत्रे सापडतात. १८९८ मध्ये देवीची मूळ मूर्ती पठाणांनी चोरून नेली. मूर्तीशिवाय मंदीर कसं राहील म्हणून मग नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना होईपर्यंत मंदिराच्या शेजारीच असलेल्या गौडपादाचार्य मठातील देवीची मूर्ती या मंदिरात आणून तिची स्थापन केली गेली. त्यानंतर १९०१ मध्ये लक्ष्मण कृष्णाजी गायतोंडे यांनी श्री शांतादुर्गादेवीची नवीन मूर्ती घडवली आणि या मूर्तीची फाल्गुन शुद्ध दशमी शके १८२३ म्हणजेच १९ मार्च १९०२ या दिवशी प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिरात याच मूर्तीचे दर्शन घडते.
हे देवालय बांधण्याची प्रेरणा श्री शांतादुर्गा देवीने नारोराम मंत्री यांना दिली. सरदार नारोराम शेणवी रेगे, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्या नजीक कोचरे या गावातले रहिवासी होते. त्यांना सातारा येथे शाहू छत्रपतींच्या दरबारी वर्ष १७१३ मध्ये मंत्रीपद लाभले. ‘आपणास देवीने एवढे ऐश्वर्य दिले, अशी त्यांची दृढ श्रद्धा असल्यामुळे देवीचे देवालय बांधले पाहिजे’, याची जाणीव त्यांना झाली आाणि त्यांनी वर्ष १७३० च्या सुमारास स्वखर्चाने सध्याचे श्री शांतादुर्गादेवीचे भव्य आणि सुंदर मंदिर उभारले.
श्री शांतादुर्गा देवालयाची सुंदर आणि भव्य इमारत पूर्वाभिमुख असून समोर नयन मनोहर असा दीपस्तंभ आहे. मंदिरासमोर तलाव आहे. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करण्याच्या महाद्वारावर चौघडा वाजवण्यासाठी नगारखाना आहे. गर्भगृहाच्या वर घुमट असून त्यावर सोन्याचा कळस आहे. देवालयातील गर्भगृहात श्री शांतादुर्गादेवीची चतुर्भुज मूर्ती आहे. तिच्या एका हातात शिव आणि दुसर्या हातात श्रीविष्णु आहे. या मूर्तीशेजारी सहा इंच आकाराचे काळ्या पाषाणाचे शिवलिंग आहे. या देवळाच्या शेजारी डावीकडे श्री नारायणदेवाचे मंदिर आहे. त्या मंदिरात मुख्यासनावर श्री नारायणदेव आणि श्री गणपति यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या डावीकडे पारिजात वृक्षाचा पार आहे. त्यावर बारावीर भगवतीची मूर्ती आणि एका अज्ञात संन्याशाच्या पादुका आहेत. देवालयासमोर श्री क्षेत्रपालाची शिळा आहे. देवालयाच्या मागच्या बाजूला म्हारू देवाची शिला आहे, तसेच देवालयाजवळ एका लहान देवालयात मूळ पुरुष कौशिक गोत्री लोमशर्मा यांची पाषाणी मूर्ती स्थापन केलेली आहे.
ही देवता मूळ त्रिहोत्रपूर वा तिरहूत येथील असून काही ब्राह्मणांनी ती आपल्याबरोबर गोव्यात आणली, असे म्हटले जाते. मिथिला देशाच्या बारा नावांपैकी ‘तैरभुक्ती’ हे एक असून त्याचा अपभ्रंश त्रिहोत्र असा झाला असावा, असे काही अभ्यासकांचे मत आहे. असेही म्हटले जाते की, पूर्वी कान्यकुब्ज देशातून रामेश्वरच्या यात्रेला गेलेले काही ब्राह्मण परतवाटेवर असताना गोव्यात त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाला आणि ते तेथेच राहिले. देवशर्मा, लोकशर्मा आणि शिवशर्मा हे त्यांतील प्रमुख होते. कवळे येथील शांतादुर्गा मंदिराच्या खालच्या बाजूस शिवशर्मा ह्यांची एक छोटीशी घुमटी आहे.
देवीच्या शांतादुर्गा ह्या नावाचे स्पष्टीकरण तिची जन्मकथा ही प्रसिद्ध आहे. एकदा शिव आणि विष्णू ह्यांच्यात युद्ध सुरू होऊन ते दीर्घकाळ चालू राहिले. त्यात कोणालाही विजय मिळण्याची शक्यता दिसेना. हे युद्ध थांबल्याखेरीज विश्वव्यवस्था सुरळीतपणे चालणार नाही, हे ध्यानी घेऊन ब्रह्मदेवाने आदिशक्ती जगदंबेला युद्धभूमीवर पाठवले. तिने या दोघांना उपदेश करून ते युद्ध थांबवले व शांतता प्रस्थापित केली, म्हणून ती ‘शांतादुर्गा’ ह्या नावाने ओळखली जाऊ लागली. शैव-वैष्णवांमधील वाद मिटावा, ही दृष्टी ह्या कथेमागे दिसून येते.
देवीच्या या मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे, भक्तांना देवीचे दोन रुपांत दर्शन घेता येते. मंदिरात दुपारपर्यंत देवीची उभी मूर्ती असते, त्यानंतर ती बाजूला सरकवून तिच्या जागी चतुर्भुज आसनस्थ मूर्ती ठेवली जाते. मुक्कामी असल्यास देवीच्या दोन्ही मूर्तींच्या दर्शनाचा लाभ मिळू शकतो. पण नवरात्रात मात्र देवीच्या दोन्ही मूर्तींचे दर्शन एकत्रच घेता येते. या दर्शनासाठी नवरात्रात भक्तांची खूप मोठी गर्दी होते. हिंदूंबरोबर गोव्यातील ख्रिश्चन लोकही मोठ्या प्रमाणात देवीला कौल लावतात. हे ख्रिश्चन बहुतेक करून मूळचे हिंदूच असावेत. यांच्या पूर्वजांना बळजबरीने आणि नाईलाजाने ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला असावा पण यांचे मूळचे हिंदू संस्कार मात्र बर्यापैकी पक्के असावेत. शांतादुर्गेचे कवळे येथील मंदिर परिसर भव्य असून मंदिराच्या दोन्ही बाजूंस मोठ्या धर्मशाळा आहेत. तेथील परिसरात परिवार देवता आणि एक उंच दीपमाळ आहे.
शांतादुर्गा देवीचा माघ महिन्यात होणारा जत्रोत्सव विशेष प्रसिद्ध आहे. हा जत्रोत्सव माघ शुद्ध प्रतिपदेला सुरू होऊन माघ शुद्ध षष्ठीस संपतो. या निमित्ताने खूप मोठी जत्रा भरवली जाते. यातील माघ शुद्ध पंचमी हा विशेष महत्त्वाचा आहे. देवी केळोशी येथे असताना हा मुख्य उत्सव पंचमीलाच असायचा त्यामुळे कवळे येथेही हीच प्रथा पाळली जाते. हा उत्सव केळशीच्या लोकांसाठीही अतिशय महत्त्वाचा आहे. माघ शुद्ध षष्ठीच्या दिवशी पहाटे महारथातून श्रीशांतादुर्गा देवीची मिरवणूक निघते आणि हा उत्सव संपन्न होतो. ही मिरवणूक निघण्यापूर्वी रथात आरूढ झालेल्या श्रीदेवीची पूजा करून रथावर देवस्थानाचा नारळ फोडला जातो. नारळ फोडण्याचा पहिला मान श्रीगौडपादाचार्य संस्थानाच्या कैवल्यपूर मठाधिशांचा असतो. या रथात देवी सुवर्ण पालखीत स्थानापन्न होते. ही सोन्याची पालखी या जत्रोत्सवाचं प्रमुख आकर्षण आहे. सारस्वतांची ही आराध्या श्रीशांतादुर्गा कवळे फोंडा गोवा येथे विसावली आहे. एकदा तरी गोव्याला गेलात तर श्रीशांतादुर्गेच्या दर्शनार्थ नक्की जायला हवे. आई शांतादुर्गा तुम्हा आम्हावर सदैव कृपेचा वर्षाव करो हीच तिच्या चरणी प्रार्थना.🙏
!! श्री शांतादुर्गा विजयते !!
सर्वेश फडणवीस
8668541181
No comments:
Post a Comment