Sunday, May 31, 2020

" मन में है विश्वास " सांगणारे- विश्वास नांगरे पाटील

काही माणसं त्यांच्या कामांमधून कायमच लक्षात राहतात. मनाच्या कोपऱ्यात त्यांच्यासाठी एक कप्पा असतोच. असेच एक हरहुन्नरी,कार्यकुशल, तडफदार आय.पी.एस. अधिकारी विश्वास नांगरे पाटील. आज विश्वास नांगरे पाटील खरंतर एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे बरेच व्हिडिओ कॉलेजपासून बघत आलो आहे. सहज,सोपे आणि आपले वाटणारे शब्द मनाला स्पर्शून जाणारे वाटतात. सध्या नाशिक शहराचे पोलीस कमिशनर या पदावर ते कार्यरत आहेत. महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना स्पर्धा-परीक्षेसाठी सतत मार्गदर्शन करणारे हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांच्या व्याख्यानात ते व्यक्तिमत्त्व विकासावर कायमच भर देत असतात. त्यांची अनेक व्याख्याने यू ट्यूबवर बघायला मिळतात आणि ही आज आपल्यासाठी अतिशय प्रेरणादायी गोष्ट आहे. 

मध्यंतरी त्यांचे पुस्तक वाचनात आले. विश्वास नांगरे पाटील लिखित राजहंस प्रकाशित " मन में है विश्वास ". ह्या लॉकडाऊन च्या काळात बरीच पुस्तकं पुन्हा वाचतांना नव्याने कळायला लागली आहेत. आत्मकथनपर पुस्तकं वाचताना वेगळाच माहोल बनत असतो. खरंतर आत्मकथनात लेखक प्रत्यक्ष संवाद साधत असतो इतकं ते लेखन मनाला स्पर्शून जात असतं. 

दहावी, बारावी.नंतर काय? असा प्रश्न तरुण पिढीसमोर कायमच असतो. त्याचं उत्तम उत्तर म्हणजे- ‘मन में ​है विश्वास’ हे पुस्तक असंच म्हणता येईल. सांगली जिल्ह्यातील कोकरूड या छोट्याशा खेडेगावातील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगतो (IPS) अधिकारी होतो स्वकार्य, कर्तृत्वाने राष्ट्रपती शौर्य पुरस्काराचा मानकरी ठरतो, तसेच तरुणाईच्या मनातील मानबिंदू होतो, ही सहजसोपी गोष्ट नाही. हा प्रवास ही सोपा नाही. अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा प्रवास कायमच प्रेरणादायी असतो. 

स्वतःच्या भूतकाळात खोल उतरून यू.पी.एस.सी. त यशाच्या मार्गक्रमणेचा अर्थ लावू पाहणारा भावड्या प्रत्येक अनुभव इतक्या पोटतिडकीने मांडतो की आपली संवेदनशीलता क्षणभर थरारून उठते. भावड्याला बोलायचंय ते आपल्या गावाविषयी, आईवडिलांविषयी, नातेवाईक, मित्र, गुरूजनवर्ग स्वतःच्या अपार संघर्षाविषयी, यातनांविषयी, त्याच्या मनोविश्वाला व्यापून असणाऱ्या प्रत्येक  घटनेविषयी, त्याला पराभूत करू पाहणाऱ्या वृत्ती-प्रवृत्तीविषयी, आशा-निराशा, यश अपयश, स्वप्न आणि भ्रमनिरास या साऱ्याविषयी. अशी अनेक वलयांच्या भोवती आशयसूत्रे असलेला एक कॅलिडोस्कोप म्हणजे ‘मन में है विश्वास’ हे आत्मकथन म्हणता येईल. अतिशय सहज सुंदर ओघवत्या भाषेत अगदी प्रांजळपणे स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून आपल्या हातून घडलेल्या चुका, अविचार सर्व काही हातचं राखून न ठेवता अतिशय मोकळेपणाने लेखकाने आपली कथा यात सांगितली आहे.

खरंतर यश हे त्यागाशिवाय व भोगाशिवाय प्राप्त होत नाही. अपयश येऊनही न डगमगता खंबीरपणे त्या परिस्थितीला सामोरा जातो तोच खरा यशस्वी होतो. हाच विचार या आत्मकथनात नांगरे- पाटील सर आपल्याला सांगतात.  प्रत्येक व्यक्तीच्या यशाचे कारण कुणीतरी असते. विश्वास नांगरे पाटील यांनाही जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कुणी भेटत गेले व मार्ग दाखवत गेले आणि ते घडत गेले नव्हे आजही ते कार्यरत आहेत.

आत्मकथन मुख्यतः आमच्या सारख्या तरुणांसाठी असले तरी प्रत्यकाने वाचण्यासारखं हे पुस्तक आहे. सतत यश-अपयश, नैराश्याच्या गर्तेत उसळणारी मनस्थिती, तरी परत फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी मारण्याची जिद्द, त्यांच्या भावनिक घुसमटीचा हा २३ वर्षांचा जीवनपट ताकदीनं उभा राहिला आहे. प्रसंगाचे फार तपशील न देता संवादावर भर, उत्तमोत्तम कविता, सुंदर बोधप्रद वाक्यरचना, उत्तम भाषा यामुळे आत्मकथनाला कलात्मक सौंदर्यदेखील प्राप्त झालं आहे आणि तेच कुठंतरी आपल्याला प्रेरणा देणारे ठरते. आज लॉकडाऊन च्या दिवसात मनाला मरगळ येत असतानाच ही अशी पुस्तकं ऊर्जा आणि  उभारी देतात. एके ठिकाणी ते आपल्या पुस्तकात म्हणतात की, विद्यार्थीदशेतले वय,घाम,गाळायचे आहे. रोज काहीतरी नवीन शिकायचे आहे. परिस्थिती बदल यासाठी फक्त इच्छा शक्ती पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न,आत्मविश्वास व कष्टाच्या जोरावर चटके-फटके सहन करत आयुष्याची शर्यत जिंकता येते आणि आज हेच कुठेतरी योग्य वाटतं आहे. ह्या आलेल्या परिस्थितीत आपल्याला एक सकारात्मकता आणि प्रेरणा देणारे हे पुस्तक संग्रही असावे असेच आहे. विश्वास नागरे पाटील सरांची कारकीर्द अशीच उत्तरोत्तर बहरत जावी हीच सदिच्छा. वाचतांना त्यांच्या माझा कट्टाची आठवण ही सहज होते. कारण यातील बरेच अनुभव त्यांनी त्यावेळी सुद्धा मांडले होते. मन में है विश्वास हा मंत्र देण्याचे सामर्थ्य त्यांच्या पुस्तकात जाणवतो. तेव्हा नक्की वाचा..मन में है विश्वास...

✍️ सर्वेश फडणवीस 

#vishwasnangarepatil  #विश्वासनांगरेपाटील

Friday, May 29, 2020

स्वप्न बांधणीचे शिल्पकार "अभ्युदयाचे" चे अभियंते - श्री.सचिन देशपांडे - सौ.भाग्यश्री देशपांडे


श्री सचिन देशपांडे व सौ.भाग्यश्री देशपांडे !! व्यवसायाच्या वेगळ्या वाटा शोधत चाकोरी बाहेर जाऊन समाजात प्रतिष्ठा प्राप्त केलेल्या व्यक्तिमत्वाची स्पंदनं ही कशी असतील तर त्यासाठी आपण एकदा अभ्युदय ग्लोबल व्हिलेज स्कूल येथे भेट देऊन ह्या दाम्पत्याची नक्की भेट घ्यावी. आज खरंतर सर्व क्षेत्रात वेगळ्या वाटेवर असणारी ही शाळा भविष्यात आदर्श शाळेचे मॉडेल होईल ह्यात शंकाच नाही. 

अभ्युदय !! नावात च एक वेगळं आकर्षण आहे. अभ्युदय म्हणजे उत्कर्ष व भरभराट आणि ही शाळा बघितल्यावर जाणवतं की याचा उत्कर्ष होतोच आहे. शाळा बघताना खेड्यातील गरीब मुलांसाठी शाळा काढून ज्ञान दानाचे काम करत आहेत आणि कुठेही प्रसिध्दीच्या मागे न लागता आदर्श शाळा कशी असू शकते ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही शाळा आहे. ह्यांचे कार्य किती वेगळे आहे याचा अंदाज इथे गेल्यावरच समजेल .

नागपूरच्या जवळ खापरखेडा येथून पुढे खापा गाव तेथून बावणगाव येथे सचित्तानंद धाम येथे अभ्युदय ग्लोबल व्हिलेज स्कूल २०१० पासून सुरू आहे. समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून २०१० साली शेतातच ही शाळा सुरू झाली. डॉ.प्रकाश गांधी यांनी शाळा सुरू केली आणि पुढे त्यांची कन्या सौ.भाग्यश्री देशपांडे व श्री सचिन देशपांडे यां अभियंता असलेल्याला दाम्पत्याने २०१३ साली या शाळेला वेगळे आणि नवे रूप दिले. नवनवीन प्रयोग हे या शाळेचे वेगळेपण आजही टिकून आहे. आज शाळा वेगळ्या उंचीवर आहे. ही शाळा आणि या शाळेच्या माध्यमातून चालणारे अभिनव प्रकल्प बघण्यासारखे आहेत. शाळा म्हंटलं की वर्ग आला,ब्लॅक बोर्ड, डेस्क बेंच आले,पण इथे याच्या जोडीला ४० गायी आणि बैल आहेतच पण त्यांचा मोठा गोठा आहे,नैसर्गिक शेती आहे जी स्वतः विद्यार्थी करतात म्हणजे शालेय शिक्षणाबरोबरच माणूस आणि त्याच्या गरजा लक्षात घेऊन ते घडवण्याचे महत्कार्य हे दाम्पत्य मागील ८ वर्षांपासून करतात आहे. २८ विद्यार्थी यांना घेऊन २०१० साली सुरू झालेले कार्य आज ३५०  हुन अधिक विद्यार्थी पर्यंत येऊन पोहोचले आहे. आज शाळेचा आलेख सतत वर्धिष्णू होतो आहे.

पुस्तकी शिक्षणाबरोबरच नैसर्गिक शेती व आपल्या मातीची ओळख होण्यासाठी विद्यार्थ्यांना घडणाऱ्या ह्या शाळेची वेगळी बाजू नक्कीच कौतुक करावी अशीच आहे. विद्यार्थी स्वतः पालक,मेथी,मिरची,वांगे,टमाटे याची लागवड करून त्याचे संवर्धन करताना आणि ते संवर्धन करताना त्याची काळजी घेण्यासाठी कुठली  उपाययोजना करावी ह्याचे वर्णन विद्यार्थ्यांच्या कडून ऐकताना आणि ते बघताना अतिशय आनंद होतो. मी स्वतः २०१८ मध्ये या शाळेत जाऊन आलो आहे. डिसेंबर महिन्यात शनिवारी सकाळी इथं गेल्यावर शाळा बघता आलीच पण तेथील विद्यार्थी, त्यांचा वर्ग शिकवण्याची पद्धत सारे जवळून बघता आले. त्यानंतर तिथेच लागवड केलेल्या नैसर्गिक भाज्यांचा वापर करत जेवण म्हणजे तर शब्दच नाही आहेत.  

आज जवळपास आजूबाजूच्या १८ गावांमधून विद्यार्थी इथे येतात आहे.  ३ किमी ते २० किमी अंतरावरुन इथे विद्यार्थी रोज येतात. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात 'आनंद जत्रा' म्हणून शाळेचा वार्षिकोत्सव होतो ज्यात विद्यार्थ्यांनी केलेलं कार्य त्यांच्या कल्पनेची मांडणी बघायला मिळते. नागपूरहुन अनेक कुटुंब ह्या आनंदजत्रेत सहभागी होतात. आनंद जत्रेचा उद्देशच असा आहे की विद्यार्थ्यांच्या कल्पनेला चालना मिळावी आणि जाणकारांनी त्यांना अधिक माहिती देत एक चांगला नागरिक घडावा. श्रमदान, आरोग्य,सेवा या क्षेत्रातील अनेक मान्यवर शाळेत येऊन विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी तत्पर आहेतच. 

मी जे काही काम करणार आहे ते प्रेमाने करेल आणि निःस्वार्थ भावनेतून करेल आणि याच भावनेतून ह्यांचे कार्य सुरू आहे. आज स्वप्न बांधणीचे शिल्पकार या ज्ञानदानाच्या माध्यमातून माणूस घडविणाऱ्या श्री सचिन देशपांडे आणि सौ भाग्यश्री देशपांडे ह्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#आयुष्य_जगणारी_माणसं 

Thursday, May 28, 2020

सावरकरांच्या समर्पित जीवनाचा कालक्रम !!

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांना " तेजोमय भास्कर " हा शब्द शुभाताईंनी एके ठिकाणी लिहिला आणि दिवसभर सारखा मनात रुंजी घालत होता, सावरकरांना "तेजोमय भास्कर " ह्या बिरुदावलीत आपण खरंच बसवावे इतके त्यांचं राष्ट्रार्पण जीवन आहे. स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडातील हे अग्निहोत्र २८ मे १८८३ ते २६ फेब्रुवारी १९६६ सलग ८३ वर्षे सतत धगधगत होते.  

आज जयंतीनिमित्त या माध्यमातून विचार,लेख प्रकाशित होत असतांना मनात वेगळीच भावना होती. राष्ट्रीय सणाचे औचित्य असल्यासारखा इथे प्रत्येकाचा भाव होता. अनेक नामवंत व्याख्यात्यांचे व्याख्यान आणि भाषणे ही एक जोडबाजू सुद्धा शब्दांच्या पलीकडची होती. पण सावरकर समर्पित जीवनाचा कालक्रम समजून घेतांना एक दिवसासाठी साठी नाही तर रोजच्या दैनंदिन आयुष्यात सावरकर आचरणात आणावे लागतील आणि आज त्याचीच जास्त आवश्यकता आहे असं प्रामाणिकपणे वाटतं. त्यांच्या समर्पित जीवनाचा कालक्रम बघतांना ते लक्षात येईल. 

◆ १८८३ मे २८ - भगूर येथे जन्म 
◆ १८९८ - अष्टभुजा देवीपुढे शपथ ग्रहण 
◆ १९०० जानेवारी १ - मित्रमेळा या संस्थेची स्थापना पुढे याचेच नाव अभिनव भारत असे बदलले गेले 
◆ १९०५ ऑक्टोबर - पुणे येथे लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत परदेशी कपड्यांची होळी 
◆ १९०६ मार्च ९ - शिष्यवृत्तीसाठी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याकडे अर्ज
◆ १९०६ जून - लंडनला रवाना 
◆ १९०७ - अणुबॉम्ब निर्मितीचे सूत्र गवसले 
◆ १९०९ ऑगस्ट  - 'भारताचे स्वातंत्र्य-समर' या पुस्तकाचे प्रकाशन 
◆ १९१० मार्च १३ - व्हाइसरॉय विरोधात युद्ध पुकारल्याच्या आरोपावरून लंडन मध्ये अटक 
◆१९१० जुलै ८ - फ्रान्समधील 'मर्सिलेस' बंदराजवळ  मारिया बोटीतून समुद्रात साहसी उडी 
◆ १९१० डिसेंबर २४ - आयुष्यात प्रथमच जन्मठेपेची शिक्षा
◆ १९११ जानेवारी ११ - दुसऱ्यांदा जन्मठेपेची शिक्षा 
◆ १९२१ मे - दोन्ही बंधूंची अंदमानहून बंगालमधील अलीपुर येथे बदली . काही कालावधीनंतर विनायक सावरकरांची रत्नागिरी येथे रवानगी पण तुरुंगवास कायम.
◆ १९२४ जानेवारी ६ - १४ वर्षांच्या प्रदीर्घ कारावासानंतर काही अटींवर तुरुंगातून मुक्तता. रत्नागिरीत स्थानबद्धता 
◆ १९३० नोव्हेंबर - जातिनिर्मूलन व्हावे यासाठी सहभोजन 
◆ १९३१ फेब्रुवारी २२ - सर्व जातीधर्मासाठी पतितपावन मंदिरात मूर्तीची स्थापना
◆ १९३७ मे- सर्व बंधने उठवली 
◆ १९३९-४०- दुसऱ्या महायुद्धात लढाईचे शिक्षण मिळेल या हेतूने सैन्यात भरती व्हावे ह्या हेतून व्याख्यानासाठी देशभर भ्रमण 
◆ १९४० जून २२ - नेताजीं सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धात सामील होऊन त्याचा लाभ उठवावा अशी सूचना. 
◆ १९४४ जून २५ - सिंगापूर रेडीओ केंद्रावरून नेताजी आणि रासबिहारी बोस यांचा सावरकर ह्यांना खास आभार मानणारा संदेश 
◆ १९४७ ऑगस्ट १५ - भारताला स्वातंत्र्य 
◆ १९४९ फेब्रुवारी ५ - गांधीवधामध्ये फसवण्याचा निंद्य प्रयत्न 
◆ १९४९ फेब्रुवारी १० - चारित्र्य निष्कलंक असल्याचा निर्वाळा 
◆ १९५४ जानेवारी २६ - संभाव्य चिनी आक्रमणाचा देशाला व सरकारला जाहीर इशारा 
◆ १९६२ ऑक्टोबर २० - चिनी सैन्याचे उघडउघड भारतावर आक्रमण 
◆ १९६६ फेब्रुवारी ३ - आत्मसमर्पणाच्या हेतूने अन्न-त्याग निश्चय 
◆ १९६६ फेब्रुवारी २६ - देहावसान 

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राष्ट्र समर्पित कालानुक्रम बघितला की सहज जाणवेल की त्यांचा श्वास आणि ध्यास हे फक्त स्वातंत्र्यासाठी आणि ह्या भारतमातेसाठी होते. आज म्हणावेसे वाटते की,स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या व्यक्तिमत्वाचा निखारा होऊ न देता हे स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडातील अग्निहोत्र सतत पेटत ठेवण्याचे दायित्व आपल्याकडे आहे. कवी भा. रा.तांबे म्हणतात ,"मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज जोडुनि दोन्ही करा !". सावरकर जन्मजयंतीच्या या मावळत्या दिनकराला दोन्ही हाताने अर्घ्य देत संकल्प करूया.. जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर आणि मानस आपल्याकडे येत नाही, जोपर्यंत सिंधू भारतात येत नाही तोपर्यंत हे अग्निहोत्र सतत पेटत ठेवण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. 

वंदे मातरम !! 

✍️ सर्वेश फडणवीस 

#SwatantryaVeerSavarkar

Wednesday, May 27, 2020

वैदिक परंपरेचे रक्षणकर्ते - वे.शा.सं विनायकशास्त्री व सौ.ललितशास्त्री आर्वीकर

वे.शा.सं श्री.विनायकशास्त्री आर्वीकर आणि वे.शा.सं सौ.ललितशास्त्री आर्वीकर !! आज ही नावे  नागपूरला आणि नागपूरकरांना सुपरिचित आहे. वेद रक्षणाचे महत्कार्य करणारे हे दाम्पत्य आहेत. प्रसिद्धी पराङ्गमुख राहत त्यांचे वेदाध्ययनाचे महत्कार्य आजही सुरू आहे. त्यांच्या कार्यावर ही छोटीशी शब्दफुलांची ओंजळ वैशाखात मोगऱ्याचा सुगंध देणारी ठरावी हीच सदिच्छा आहे कारण हे कार्य सदैव सुंगध देणारेच आहे. 

आपल्या संस्कृतीचे आधारभूत अत्यंत प्राचीन वाङ्मय म्हणजे आपले वेद आहेत. वेद जगातील सर्वात प्राचीन वाङ्मय आहे. वेद केव्हा निर्माण झाले हे कुणीच सांगू शकत नाही. खरंतर वेद म्हणजे ज्ञान. वेद म्हणजे शब्दबद्ध ज्ञान. शब्दांचे ज्ञान म्हणजे ते कुणीतरी उच्चारले असणारच. ज्याने उच्चारले ते म्हणजे ऋषी पण ते ही ज्ञानाचा कर्ता नाही तर तो फक्त द्रष्टा आहे. म्हणून वेदांना 'अपौरुषेय' म्हंटले आहे. आणि आज याच वेदांचे चिंतन करत त्यांच्या रक्षणार्थ यशस्वी वाटचाल करणारे दाम्पत्य वे.शा.सं विनायकशास्त्री व वे.शा.सं सौ.ललितशास्त्री आर्वीकर दाम्पत्य आहे. 

पितृचरणाजवळ राहून विनायकशास्त्रींनी वेदांचे अध्ययन केले. आजही सांप्रत वेदाध्ययनाचे कार्य त्यांच्या स्वस्थानी सुरू आहे. अनेक महायागाचे प्रधानाचार्य भुषवलेले श्री विनायकशास्त्री विनयशील आहेत. आलेल्या प्रत्येक शंकांच निरसन ते सहजपणे करतात. दरवर्षी श्रावणी अर्थात नारळी पौर्णिमेला यज्ञोपवीत म्हणजे(जानवे) बदलविण्याचा विधी जो असतो तो सामूहिक करण्यात विनायकशास्त्री स्वतः पुढाकार घेत आयोजित करतात. ३-४ वर्ष झाली मला ही तिथं जाण्याचा योग येतो आहे. श्रावणीत प्रत्येक विधी अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगताना आत्मिक समाधान मिळत असते. वयाच्या या टप्प्यावर असतांना सुद्धा त्यांची वेदाध्ययनाची धडपड बघून आश्चर्य वाटतं. अनेक पुरस्कार व सत्कारांची श्रीमंती पाठीशी असतांना ते त्याचा मोठेपणा कधीही मिरवत नाही. श्रीमद भागवत,प्रवचन,मासिक पारायण,सप्ताह कार्यातून त्यांचा प्रवास सतत सुरू असतो. भोसला संस्कृत महाविद्यालय आणि सरस्वती संस्कृत महाविद्यालयात त्यांनी अनेक वर्षे संस्कृत अध्यापनाचे कार्य केले आहे. 

प्राचीन काळात गार्गी आणि मैत्रेयी यांसारख्या अध्यात्मिक क्षेत्रातील तत्वजिज्ञासूं स्त्रिया होऊन गेल्या. "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः" मनुस्मृतितील ह्या श्लोकात मनूने म्हंटले आहे,जेथे स्त्रियांना गौरवाचे स्थान दिले जाते,तेथे देवतांचे वास्तव्य असते आणि हीच उक्ती वे.शा.सं.ललितशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर ह्यांना लागू होईल. राधाकृष्णाच्या कृपाप्रसादाने प्रतिथयश वैदिक कुळातील रोडींच्या घरी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील वेदशास्त्रसंपन्न होते व वैदिक परंपरेतील अग्रगण्य होते. पुढे वडिलांनी भोसला संस्कृत महाविद्यालयात जाऊन संस्कृत अध्ययन सुरू केले आणि वे.शा.सं
ललितशास्त्रींनी आपले शैक्षणिक पाऊल ही याच महाविद्यालयात ठेवुन अनेक वर्षे अध्यापनाचे कार्य त्यांनी केले. जगद्गुरू कांचीकामकोटी पीठाधीश्वर शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांच्या अट्टतिरी विरचित "नारायणीय" ह्या संस्कृत महाकाव्याचा महाराष्ट्रात प्रचार-प्रसार व्हावा ह्या प्रामाणिक हेतूने ह्या महाकाव्याचा मराठी भाषेत अनुवाद करण्याचे कार्य यांच्या हातून घडले. ह्या ग्रंथाचे प्रकाशन ही प.पू. श्री शंकराचार्य जयेंद्र सरस्वती ह्यांच्या हस्ते झाले होते. खरंतर "नारायणीय" हे महाकाव्य श्रीमद भागवताचे संक्षिप्त वर्णन आहे. 

आज वेदांच्या रक्षणाचे कार्य करणारे आर्वीकर घराणे हे नागपूरला लाभलेली दैवी देणगी आहे. स्त्री-पुरुष यांच्यातील परस्पर संबंध हा विषय व्यक्ती व समाज ह्या दोन्ही दृष्टींनी अतिशय महत्वाचा आहे. दोघांच्या संबंधातील परस्परावलंबित्व आणि परस्परपूरकत्व यांचा विचार आपल्या संस्कृतीमध्ये जेवढ्या समतोलपणे केला आहे तो अन्यत्र क्वचितच आढळणार आहे. २००४ साली कांचीकामकोटी पीठाधीश्वर शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती ह्यांच्या हस्ते पिठारोहण सुवर्णजयंती निमित्ताने ह्या दाम्पत्यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता. असे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व व वैदिक परंपरा अखंड टिकून राहावी ह्यासाठी कार्यतत्पर वे.शा.सं विनायकशास्त्री व सौ.ललितशास्त्री आर्वीकर ह्यांना कोटी अभिवादन. श्री भगवंताने आपल्याला निरामय आरोग्य प्रदान करावे हीच प्रार्थना. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#आयुष्य_जगणारी_माणसं

Monday, May 25, 2020

मनोरुग्णांचे आश्रयदाते - श्री.प्रमोद राऊत- डॉ.सौ.प्रज्ञा राऊत !!

श्री. प्रमोद राऊत आणि डॉ.सौ प्रज्ञा राऊत !! आज हे दाम्पत्य मनोरुग्ण असलेल्या मुला-मुलींचे आश्रयदाते आहेतच पण  आईवडीलही झाले आहेत. "श्रीकृष्ण शांतिनिकेतन"च्या माध्यमातून नागपूरातच आडवाटेवर असलेल्या बेलतरोडी भागात त्यांचे कार्य सुरू आहे. आजही शांतपणे कुठेही प्रसिद्धीच्या झोतात न येता हे कुटुंब कारण आज प्रज्ञाताई यांची मुलगी पण मेडिकल कॉलेज ला शिकत असून ती सुद्धा यांना पूर्ण मदत करते आहे. 

" कर्मण्येवाधिकरस्ते मा फलेषु कदाचन " या गीतेतील तत्वावर एक सेवाकार्य निस्वार्थी पणे चालू शकतं यावर विश्वास बसणार नाही. पण श्री.प्रमोद राऊत व डॉ.सौ.प्रज्ञा राऊत यांनी श्रीरामकृष्णहरी सेवाभावी प्रतिष्ठान संचालित  “श्रीकृष्ण शांतिनिकेतन" च्या माध्यमातून गतिमंद,मनोरुग्ण,अंध,अपंग,मरणासन्न अशा समाजातील सर्व जाती बांधवांसाठी निशुल्क घरकुल सुरू केलं. 

आज रस्त्यावर अर्थहीन भटकणाऱ्या मनोरुग्णाला प्रज्ञा ताईने घरी आणले आणि तेच तिच्या आयुष्याचे ध्येय झाले. नवऱ्याचा पगार आणि शेतीचं उत्पन्न यांच्या जिवावर तिने आज अनेक मनोरुग्णांना आपल्या घरात आश्रय दिला; परंतु त्यांचा त्रास होणाऱ्या शेजाऱ्यापाजाऱ्यांनी तिलाच वेडं ठरवायचा प्रयत्न केला. असंख्य अडचणींना मात देत, स्वत:चे आईपण सांभाळत या रुग्णांवर भरभरून माया करणारी मातृवत प्रज्ञा ताई आणि पितृवत सगळे लाड पुरवणारे तिचे यजमान श्री प्रमोद राऊत.

आज प्रज्ञा ताई हसतमुखाने आणि आनंदाने सगळे करते आहे. रोजचे त्यांचे सगळे करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे.पण ताई कुठंही जाणवू देत नाही. माझा नियमित दरवर्षी इथं जाण्याचा योग असतोच. एकवर्षी दिवाळीचा फराळ सुद्धा यांच्यासोबत केला आहे. पण पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण म्हणून किंवा मग त्यांच्या आशीर्वादाने  आपणही या समाजाचे देणं लागतो या भावनेतून आपण सुखासीन आनंदाने जगत असतांना यांच्याबद्दल काही देणे हे आपले कर्तव्य आहे आणि याच देण्याच्या भावनेनं जी अनुभूती मिळते त्यातला आनंद हा प्रत्येकजण या ठिकाणी भेटूनच अनुभवु शकतो.  कारण त्यांना भेटल्यावर शब्दांपेक्षा भावनिक नातं लवकर जुळतं आणि खरंतर यांना भेटल्यावर कसे व्यक्त व्हावे हे नंतर कळतच नाही. 

खरंतर मानसिक रुग्णांना सांभाळणे हे फार जिकिरीचे काम असते. एखादा माणूस मानसिक रुग्ण झाला किंवा असला,की त्याच्याकडे बघायची समाजाचीच काय,पण अनेकदा रक्ताच्या नात्यातील माणसं सुद्धा विचित्र नजरेने बघतात. जन्मत:च मानसिकदृष्टय़ा अविकसित मुलांना ते लहान असतात तोवर आईवडील सांभाळून घेतात; परंतु काही विशिष्ट वयानंतर त्या आईवडिलांनाही त्यांना सांभाळणे अनेकदा अशक्य होते. अशा वेळी त्यांना सांभाळणारे कोणी नसेल तर त्यांना थेट मनोरुग्णालयाचा रस्ता दाखवला जातो किंवा मग रस्त्यावर सोडले जाते. मनोरुग्णांना काही दिवस नातेवाईक बघायला येतातही; पण नंतर नंतर तेही कमी होत जाते आणि नंतर तर ते येणे पूर्णपणे बंद होते. रस्त्यावर सोडल्या जाणाऱ्यांना तर उपाशीतापाशी भटकण्याशिवाय पर्याय नसतो. अशा स्थितीत त्यांचे पुनर्वसन हे एक आव्हान ठरते आणि या कठीण आव्हानात्मक कार्याला प्रज्ञाताई धैर्याने सांभाळत आहे.

जग काय म्हणेल याचा विचार न करता प्रज्ञा ताईने सुरू केलेले अथक प्रयत्नच तिला आपल्या कामाचे समाधान देत आहेत. आजही आनंदाने ती सगळे करते आहे. तिला मदतीचा हात देऊन तिच्या सोबतीने चालण्याचे उत्तरदायित्व आपल्याकडे आहे. आपण ही समाजाचे देणं लागतो ह्या भावनेतून तिला केलेली मदत ही लाखमोलाचा आनंद देणारी ठरणार आहे. फोन करूनही तिला विचारून आपण मदत करू शकतो. म्हणून तिचा नंबर देण्याचे प्रयोजन आहे. तिच्या परवानगीने संपर्क क्रमांक दिलेला आहे.
फोन करून तिला विचारून आपण सत्पात्री दान करावे हीच सदिच्छा आहे. एकदा या घरकुल सेवा प्रकल्पाला भेट देऊन त्यांच्या सोबत थोडा क्षण व्यतीत करुन बघा. मला खात्री आहे की यांना भेटून आपल्याला आत्मिक समाधान भेटेल.

डॉ.सौ. प्रज्ञा प्रमोद राऊत
संपर्क- ०९९७०४२५९४५
श्रीकृष्ण शांतिनिकेतन,
पत्ता:- राकेश हाऊसिंग सोसायटी ,ले आऊट,क्र.०३,प्लॉट न.८८ व ८९ ,शौर्या इस्टेट जवळ,बेलतरोड़ी,नागपूर.

सर्वेश फडणवीस 

#आयुष्य_जगणारी_माणसं

Friday, May 22, 2020

पुरातत्व वैभवाचे अभ्यासक - श्री. श्रीपाद चितळे


श्री.श्रीपाद चितळे !! प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्व वैभवाचे अभ्यासक म्हणून त्यांची ही ओळख आहेच पण श्री. श्रीपाद चितळे हे एका सळसळत्या चैतन्याचे नाव हीच ओळख सार्थ ठरेल कारण त्यांना थकू नये हे वरदान आहे आज त्यांच्या वयाकडे आणि शरीराकडे न पाहता त्यांच्या उत्साहाकडे बघायला हवे कारण ते आजही तरुणांना लाजवतील इतके उत्साही आहेत. 

वेड लागल्याशिवाय इतिहास घडू शकत नाही,आणि वेड लागलेली माणसचं इतिहास घडवतात. हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वाक्य शब्दशः खरे आहेत याचा अनुभव भारतातील थोर प्राचीन इतिहास व संस्कृती संशोधक श्री श्रीपाद चितळे यांना भेटल्यावर म्हणता येईल. पुरातत्व संशोधन हा काकांचा आवडता विषय आहे. त्यांचे ज्ञान आणि माहिती संग्रह बघितले की अचाट व्हायला होतं.

मध्यंतरी कपूर बावडी येथे गेलो असताना ती पुरातन वास्तू बघितली. त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी श्रीपाद काकांना भेटायला गेलो. त्यांचे कार्य बघून अतिशय भारावून गेलो. कपूर बावडी बद्दल ऐकतांना आश्चर्य वाटलं काका बोलत गेले आणि मी रेकॉर्ड करत गेलो. त्यांच्या अफाट माहितीने ऐकतांना आपण ही भारावून जातो एवढा खजिना आपल्यासमोर ते सहज रिकामा करतात.

विदर्भातील ज्या ठिकाणी पुरातत्व अवशेष आहेत त्या ठिकाणी श्रीपाद चितळे गेले आहेत. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन संशोधन केले आहे आणि जवळपास ३८ पुस्तकं त्यांच्या नावाने आहेत. त्यांनी लिहिलेल्या लेखाची संख्या तर सांगता येणार नाही इतके आहे. अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार आणि अनेक पुरस्कार सन्मानित असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीपाद चितळे. पुरस्कारांची श्रीमंती असून सुद्धा प्रसिद्धीच्या मागे नसणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीपाद चितळे आहे. 

आपले कार्य आज वयाच्या या टप्प्यावर असतांना ही अतिशय निष्ठेने आणि परिश्रमपूर्वक विद्यार्थी दशेत असल्यासारखे कार्यरत आहेत. आपल्या आजूबाजूला  असलेल्या असंख्य सुंदर पुरातत्व अवशेष असतात पण आपण दुर्लक्ष करतो पण जेव्हा काका बोलण्याच्या ओघात सांगायला सुरुवात करतात तेव्हा आपण भारावून जातो. सतत भटकंती,इतिहास आणि पुरातत्वाविषयी माहिती देणे,व्याख्याने देणे हे त्यांचे छंद आहेत.

सहज बोलताना त्यांनी त्यांच्या उपक्रमा बद्दल सांगितलं “Heritage Walk”. ते म्हणतात, एक तास द्या मी तुम्हाला नागपुरातील अनेक ऐतिहासिक गोष्टी दाखवत,त्याचा इतिहास ही सांगतो. आपण इतके वर्ष राहून सुद्धा पोहोचलो नाहीत तिथे यांच्यासोबत जात जाणून घेतांना वेगळाच उत्साह असतो. त्यांची इच्छा आहे की येणाऱ्या पिढीने हा इतिहास समजून घ्यावा. एक व्यक्ती जरी असेल तरी सुद्धा ते येतात. जोशपूर्ण वाणीने इतिहासात घेऊन जातात. नागपूर मध्ये श्रीपाद चितळे यांच्या सारखे इतिहास संशोधक अभ्यासक आपल्या सोबत आहे हे आपले भाग्य आहे असेच म्हणता येईल.

इतिहास कोळून प्यालेले व त्यासाठी झपाटलेले व्यक्तिमत्व म्हणजे श्रीपाद चितळे आहेत. कट्टर स्वयंसेवक असलेले श्रीपादजी स्वतःला हेडगेवार कुळातील मानतात. डॉक्टर हेडगेवार यांच्या घराबद्दल व त्यांचा इतिहास हा श्रीपाद काका यांच्याकडून ऐकणे म्हणजे पर्वणी असते. मी स्वतः वयक्तिक अनुभव घेतला आहे. खरंतर सातत्याने एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा कसा करायचा ते श्रीपाद चितळे यांच्याकडूनच शिकायला हवे. चरैवेति चरैवेति असं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांना निरामय आरोग्य प्रदान करावे हीच भगवंताचरणी प्रार्थना आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस

#आयुष्य_जगणारी_माणसं 


Wednesday, May 20, 2020

अन्नपूर्णेचे उपासक बल्लवाचार्य विष्णू मनोहर !!

शेफ विष्णू मनोहर !! आज नागपूर पुढे महाराष्ट्र आणि साता-समुद्रपार अमेरिकेत "विष्णूजी की रसोई" च्या माध्यमातून शेफ विष्णू मनोहर या मराठी बल्लवाचार्याचे पाऊल पुढेच पडते आहे. असं म्हणतात,एखाद्याच्या मनात घर करायचं असेल तर त्याचा मार्ग पोटातून जातो आणि खरंच आहे ज्यांनी वेगवेगळे हटके पदार्थ आणि सूत्रसंचालनाच्या ‘मेजवानी’ ने सगळ्या खवय्यांच्या मनात घर केलंय असे अस्सल नागपूरकर शेफ विष्णू मनोहर. सांगायला कायमच अभिमान आणि आनंद वाटतो की स्वयंपाक कलेविषयी जबरदस्त पॅशन असणारे वल्ली अर्थात विष्णू मनोहर हे आज सर्वत्र परिचित आहेत. 

मुळात मानवाचा जन्म हा खाण्यासाठी च झाला आहे. आज खाणे हा मानवाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. त्यात सध्या कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे तर खाणे हे थोडं जास्तच होत आहे आणि खवय्येगिरी करणारा तर खाण्यासाठी कायम तयार असतो. त्यात विष्णूजीं सारखे बल्लवाचार्य असतील तर मग काय म्हणावे. जगातील प्रसिद्ध शेफ पैकी अस्सल नागपूरकर शेफ श्री विष्णू मनोहर. लेखक,कवी,अभिनेता आणि एक यशस्वी उद्योजक ह्यांसारख्या अनेक वलयांच्या भोवती असतांना सुद्धा एक सच्चा,हरहुन्नरी,निर्मळ आणि तितकाच प्रेमळ बाप-माणूस म्हणजे विष्णू दादा आहेत.

आज स्वतःच्या मेहनतीने आपले स्वतंत्र साम्राज्य निर्माण करणारे यशस्वी उद्योजक म्हणजे शेफ विष्णू दिगंबर मनोहर आहे.  ह्यांच्या शून्यातून इथवरचा प्रवासाचे साक्षीदार माझे बाबा आहेत.श्री. दिगंबर मनोहर आणि बाबा ह्यांचा चित्रकारितेचा प्रवास सोबत झाला आहे. बर्डीवरील मोदी नं.२ मधील जुनाट घर ते आजच्या नागपूरातील अनोख्या वास्तू इथवरचा हा प्रवास केवळ नशीबाचा भाग नव्हता तर त्यामागे विष्णू दादांची कठोर मेहनतीत प्रवीण दादा आणि प्रफुल्ल दादा व सुचिता ताई ह्यांनी दिलेली तेवढीच मोलाची साथ असल्याने आज विष्णू दादा विश्वविक्रमी वाटचाल करतात आहे. इ-टीव्ही मराठीवरील गाजलेल्या "मेजवानी परिपूर्ण किचन" ह्यातून  विष्णूदादा घरोघरी पोहचले आहेत. पण इथेच न थांबता ते आपले सामाजिक दायित्व देखील तेवढ्याच तत्परतेने पार पाडतआहे. मैत्री परिवार ह्या सामाजिक संस्थेशी सुद्धा विष्णू दादा जुळल्या गेले आहेत आणि सामाजिक जाणीव जपण्याचे हे कार्य ही प्रत्येकाला गौरव वाटावा असेच आहे.

नागपूरच्या या अन्नपूर्णसाधकाने २०१७ ला आपल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या निमित्ताने नागपूर चे नाव वेगळ्या क्षितिजावर नेले. सलग ५३ तास कूकिंग करत जवळपास ७५० हुन अधिक पदार्थांचे विक्रम करत ऐतिहासिक विश्वविक्रम आपल्या नावावर केला. विष्णू दादा पदार्थ बनवत होते आणि तिथे उपस्थित असलेले लोक ते चाखत होते. ती चव अजूनही जिभेवर आहे. मुळात काही गोष्टी या शब्दात मांडता येत नाही आणि खरंच ज्यांनी त्या वेळी ते पदार्थ चाखले तो नक्की त्या बद्दल सांगू शकेल.

मी माझ्या सारख्या असंख्य मित्र - मैत्रिणींचे role-model म्हणून आम्ही विष्णूजीं कडे बघतो. कामानिमित्त बाहेर असताना आपली महाराष्ट्रीयन पद्धत अतिशय सोप्या शब्दात " Masteer Recipes" ह्या स्वतंत्र You Tube चॅनेल च्या माध्यमातून आमच्या पर्यन्त नवनवीन खाण्याचे पदार्थ ते पोहोचवत आहेत. मुळात कूकिंग ची आवड प्रत्येकाला असतेच पण घरी प्रत्येकाला करता येईलच अस नाही. पण जेव्हा शिक्षणाच्या आणि कामाच्या संदर्भात माझी पिढी  बाहेर पडली तेव्हा विष्णूजींच्या चॅनेलच्या माध्यमातून अनेक पदार्थ करून खाता आले आणि करण्याचा उत्साह पण आला. अतिशय सोपे झटपट पदार्थ करण्याचा विष्णू दादांचा अनुभव लाजवाब आहे.

विष्णू दादा खरंच अन्नपूर्णेचे खरे उपासक आहेत. अस्सल महाराष्ट्रीयन आणि वऱ्हाडी पदार्थाची चव आणि काही वेळा काही पदार्थ हे 'विष्णूजी की रसोई' मधीलच खावे. एक ठिकाणी वाचलेलं आठवतं; ' विष्णू मनोहर! नाव जरी घेतलं तरी पोट आणि मन प्रसन्नतेने भरून जातं.' मध्यंतरी १००० किलो ऑरगॅनिक भाजी बनवण्याचा विक्रम केला त्या भाजीची चव पण अफलातून. पुढे खिचडी बनवण्याचा विश्वविक्रम विष्णूदादाच्या नावावर आहे. नुकतीच साबुदाणा खिचडी,जळगाव ला वांग्याचे भरीत बनवण्याचा विक्रम ही त्यांच्या नावावर आहे. विक्रम आणि विष्णू खरंतर आज एका नाणाच्या दोन बाजू आहेत की काय इतके वेगवेगळे अभिनव प्रयोग विष्णू दादा करत असतात. 

वैविध्यपूर्ण पदार्थांची चव पुरवून त्यांना तृप्त करणारे व स्वतःच्या जीभेतून (वाणीतून) लोकांना जिंकून त्यांच्या ह्रदयात कायम स्थान प्राप्त करणारे असे विष्णू दादा आहेत. त्यांच्याबद्दल हेच म्हणावेसे वाटते की, खाण्याच्या माध्यमातून अनेक मानवी मने जोडणाऱ्या आपल्या सारख्या अन्नपूर्णेच्या उपासकाला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभकामना.

✍️ सर्वेश फडणवीस

#आयुष्य_जगणारी_माणसं

Tuesday, May 19, 2020

ATM चे आत्मकथन !!


नमस्कार मंडळी, कसे आहात.. सध्या लॉकडाऊन मुळे घरीच असाल ही खात्री आहे मला. खरंतर आज सहज मी आपल्याशी गप्पा मारायला आले आहे. खूप दिवसांपासून मनात होतं पण मग आज ठरवलं.. आज मी माझ्याबद्दलच तुमच्याशी हितगुज करणार,मनातलं बोलणार आहे.. 

मी ATM.. अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीन कुणी मला All Time Money तर कुणी Any Time Money म्हणून हाका मारत असता. मला आवडतं खरंतर तुम्ही कुठल्याही नावाने हाका मारत मला भेटायला येऊ शकले यातच माझा आनंद आहे.  आता माझ्या जन्माबद्दल आणि माझ्या कुटुंबीयांबद्दल थोडंस.. 

इ.स. १९३९ मध्ये न्यूयॉर्क शहरात सिटी बॅंक ऑफ न्यूयॉर्क मध्ये माझा जन्म झाला. ल्यूथर जॉर्ज सिम्जियन ह्याच्यामुळे मी पृथ्वीवर येऊ शकली .परंतु, व्यवस्थित पालनपोषण न झाल्यामुळे मला परत जावं लागलं..त्यानंतर पुढील २५ वर्षे मला येताच आलं नाही. थेट २७ जून १९६७ रोजी बर्क्लेज बॅंकेने एन्फील्ड गांवी एक मला पुन्हा पृथ्वीच्या दुसऱ्या भागावर आणलं गेलं. दलारू यांच्यामुळे मला पुन्हा हे जग बघता आले आणि जॉन शेफर्ड बंरन यांची इच्छा होती की पुन्हा जन्म घ्यावा. पुढे मी वाढत गेले खरे आणि माझे कुटुंब ही विस्तरल्या गेले. आज माझे नातेवाईक साऱ्या जगात आहेत… कुठे ही जा,मला हाक मारा मी तुमच्या आजूबाजूला आहेच.. 

कालांतराने मी भारतात आले,भारतात येण्याचा आनंद होताच मग मी पण नवं रूप घेतलं आणि १९९६ ला लांबचा प्रवास करून भारतात आले आणि स्थिरावले. भारतीय बॅंक महासंघाने “स्वधन” ह्या नावाने नवी ओळख दिली आणि हळहळू स्वतःत बदल करत आज माझे कुटुंब भारतभर विस्तारले आहे. सध्या दोन लाख हुन अधिक संख्या आमची झाली आहे. तुमच्यापैकी अनेकजण मला भेटायला येता कुणी रोज येतं,तर कुणी आठवड्यातून एकदा येता पण सगळेजण भेटून जाता याचा आनंद आहे. 

चार भिंतींत राहून, प्रत्येकाला भेटावे म्हणून मी कायमच उभी असते. मला गर्मी होऊ नये किंवा मी सतत उभी असते म्हणून माझ्यासाठी एसी सुरू असतो. मला सुरक्षित वाटावे म्हणून दार असतं आणि ते ही कायम जाता येता बंद असावे म्हणूनच आहे. खरंतर मी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला अडीअडचणी च्या काळात तुमच्या सुखदुःखात भेटायला पहिले मी येते. तुमच्यापैकी अनेकजण माझ्याकडे येता,येतांना इतके रागाने येता की सगळा राग माझ्यावर काढता, मला जोरजोराने मारता,तुमच्या मनासारखे नाही झालं तर अजून जोराने मारता,दार आपटत निघूनही जाता,तुम्ही माझ्याजवळ ठेवलेली प्रत्येक छोटी गोष्ट मी तुम्हाला दाखवते आणि ती तुम्ही तिथेच टाकून चालले जाता. तुम्ही जाता खरे,पण दुसरा कुणी आला की तो ही तसाच करतो माझ्यावरती राग काढतो प्रसंगी तोडफोड ही करतो .. मी किती सहन करणार...मग मी पण काहीदिवस रागावून तुमच्याशी कट्टी करते आणि रुसून बसते. नंतर अनेकजण येतात मला भेटून जातात पण त्यांना माहिती होतं की अजूनही राग गेलेला दिसत नाही. मग काही काळाने राग निवळतो आणि पुन्हा तुम्हाला भेटायला उत्सुकतेने येते.

पण आज मनातलं सांगायला आले आहे ,अडचणीत असतांना मी तुमच्या मदतीला कायमच असते. पण तुम्ही मला खूप त्रास देता ते ही निमूटपणे सहन करते. तुम्हाला माझी गरज तशी मला तुमची गरज आहे. दार उघडून छान हसतखेळत आनंदाने आत या. माझ्याशी बोला मग मी ही तुमच्याशी बोलतेच ना..काम संपलं की पुन्हा दार बंद करून जा.. जातांना राग आला तरी बाजूला ठेवलेल्या कुंडीतच टाका म्हणजे पुन्हा नंतर कुणी आलं तर तो ही त्या कुंडीतच टाकेल. 

बघा प्रयत्न करून..माझ्या मनीचे हितगुज करण्यासाठी आज आले होते. अनेक दिवसांपासून मनात साचून ठेवलं होतं..आज व्यक्त झाले तर बरं वाटतं आहे..स्वतःत बदल करा कारण तो सहज शक्य आहे..या भेटायला मी वाट बघते आहे… येताय ना…

- सर्वेश फडणवीस




Monday, May 18, 2020

साहित्यव्रती - आशा बगे !!


आशा बगे !! आज हे नाव मराठी साहित्य विश्वात अनोख्या शैलीतून लिखाण करत मराठी मनावर अधिराज्य करणाऱ्या लेखिका म्हणून अलंकृत झाले आहे . २००६ ला प्रतिष्ठित साहित्य अकादमी सारख्या पुरस्काराची श्रीमंती पाठीशी असतांना सुद्धा आशाताई आजही साध्या,सरळ आणि ममत्व जपणाऱ्या आहेत. 

स्त्रियांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचा वेगवेगळ्या अंगांनी विचार ही आशाताईंच्या लेखनाची ताकद आहे. त्यांच्या कथा व कादंबऱ्यांतील अनुभवविश्व मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरणारे असले तरी त्याची मांडणी वेधक व विचार करायला भाग पाडणारी असते. मराठी साहित्यात कथा-वाङ्मयात आशा बगे यांचे नाव एका वेगळ्या परिमाणाच्या कथा लिहिणार्‍या लेखिका म्हणून स्थिर झाले आहे. 

मराठी साहित्य व संगीताचे शिक्षण घेणाऱ्या आशाताईंनी कधीही नोकरीचा विचार केला नाही. घरसंसार सांभाळून लेखनाचा छंद जोपासणाऱ्या आशाताईंची सुरुवात ‘ सत्यकथे ’पासून झाली. 
आजवर एवढे मानसन्मान मिळूनसुद्धा त्यांचा साहित्य वर्तुळातील वावर कमीच राहिला. या वर्तुळात चालणाऱ्या राजकारणापासून त्यांनी स्वत:ला कटाक्षाने दूर ठेवले. लेखन करत राहायचे आणि वाचकांना नवनवीन साहित्य देत राहायचे हीच आजही त्यांची इच्छा आहे. सहज भेटीत त्यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाबाबत विचारले असतांना त्या म्हणाल्या ," लेखन व संगीत हीच माझी साधना आहे, त्यात रमायला आवडतं." म्हणून त्याबाबतीत कधीच विचार केला नाही. 

आशाताईंचे कथासंग्रह,कादंबऱ्या आणि ललितलेखन हे वेगळ्याच धाटणीचे आहेत. मला व्यक्तीक आवडलेली कादंबरी "चक्रवर्ती". आपले सद्गुरू प.पू.श्री मामासाहेब देशपांडे ह्यांच्यावरती त्यांचे जे लिखाण आहे ते शब्दातीत आहे.शक्य असल्यास स्वतंत्रपणे आवर्जून वाचावी.त्यात त्यांनी प्रत्येक पात्राला जो न्याय दिला आणि चरित्र नायकाचे जे वर्णन केले आहे त्यावरून त्यांची साहित्यसंपदेची जाण होते आणि वाचतांना नकळत हात जोडले जातात. या कादंबरी निमित्ताने त्यांची पहिली भेट झाली आणि कादंबरीबद्दल अधिक जाणून घेता आले. त्यानंतर आशाताई आणि बगे कुटुंबीयांशी वेगळेच ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. 

आशाताईंची राहणी अतिशय साधी आहे. वयाच्या या टप्प्यावर असतांना सुद्धा कुणी भेटायला आले तर त्यांच्या हातचे खाल्ल्याशिवाय जाऊच शकत नाही. त्यांचा वावर अतिशय सहज असतो. कुठेही पुरस्कारांची श्रीमंती त्या मिरवत नाही. त्यांना जवळून भेटल्यावरच त्या अधिक समजतील असा माझा अनुभव आहे. 

कायम आनंदी,जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघणाऱ्या आशाताईंना संगीताची खूप आवड आहे. संगीतावर त्यांनी अनेक लेखनही केलं आहे. त्यांच्या लेखनातसुद्धा संगीताचा संदर्भ हमखास येतोच. त्यांचे आयुष्य मोठय़ा व एकत्रित कुटुंबात गेले. त्यामुळे असेल, पण अशा कुटुंबांत होणारी स्त्रियांची घुसमट अनेक कथांमधून त्यांनी समर्थपणे मांडली आहे. आशय,अभिव्यक्ती आणि संगीताचे माध्यम या तिन्ही गोष्टींच्या एकत्रित रसायनाने आशाताई  यांचे अनुभवविश्व म्हणजे भारतीय परंपरेला समर्पित झालेल्या स्त्रीचे समृद्ध अनुभवविश्व आहे. भारतीय जीवनातले कर्मकांड, व्रतवैकल्ये, सण, उत्सव, कीर्तनादी गोष्टींचे भरपूर ज्ञान सद्गुरूपरंपरेने त्यांना लाभले आहे आणि त्यामुळेच त्यांची शब्दश्रीमंती नित्यनूतन आणि वर्धिष्णू अशीच आहे. 

आशताईंचे लिखाण हृदयाचे ठाव घेणार आहे. खरंतर त्यांचे लिखाण म्हणजे वाचकांच्या मनातला एक कप्पाच असतो.श्री.राम शेवाळकर यांच्या नावाने सुरू झालेला पहिलाच ‘साहित्यव्रती’ पुरस्कार मिळणे हा सुद्धा त्यांच्या दीर्घ लेखन कारकीर्दीचा यथोचित गौरवच आहे असं मला वाटतं. "साहित्यव्रती" हे नामाभिधान हीच त्यांची यथोचित ओळख होईल. वाचकांना समृद्ध करत असलेल्या आशाताईंना निरामय आरोग्य प्रदान करावे हीच श्री सद्गुरुंच्या चरणी प्रार्थना आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#आयुष्य_जगणारी_माणसं

Friday, May 15, 2020

शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ - डॉ.बाबा नंदनपवार

डॉ.बाबा नंदनपवार !! आज हे नाव शैक्षणिक क्षेत्रात आदराने घेतले जाते. ज्याप्रमाणे दीपस्तंभ सगळे वातावरण प्रकाशमय करीत असतं तसेच आ.सरांचे कार्य आहे. शिक्षण क्षेत्रात ४५ वर्षांहुन अधिक काळ लोटला आहे पण आजही सरांचे कार्य नित्यनेमाने सुरू आहे. या वयातील त्यांचा उत्साह बघता सहज हात जोडले जातात आणि आपण त्यांच्यासमोर नतमस्तक होतो.  

डॉ. बाबा नंदनपवार अतिशय नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे चालतेबोलते व्यासपीठच म्हणता येईल. नवयुग विद्यालयात सलग ४० वर्ष त्यांनी ज्ञानदानाचे कार्य करत अनेक विद्यार्थी घडवले. खरंतर माझ्या बाबांना सुद्धा सरांनी शिकवलं आहे त्यामुळे कौटुंबिक संबंध सरांशी आजही आहेत आणि सांगायला अभिमान वाटतो की बाबांचे रिटायरमेंट झाल्यावर सर स्वतः घरी आले आणि स्वतः लिहिलेले "उत्तरायण" पुस्तक भेट म्हणून दिले. उतरत्या वयातील करण्याचे कार्य आणि नवीन पिढीशी जुळवुन घेण्याचा मंत्र सरांनी अतिशय सहज सोप्या शब्दांत या छोटेखानी पुस्तकात मांडला आहे. 'संस्कार कवच','सुंदर माझं घर' अशी अनेक पुस्तकांचे लेखन सरांनी केले आहे. स्वागत मूल्य असलेल्या या पुस्तकातून आलेली रक्कम ते सेवाभावी संस्थेला देतात. प्रसिद्धीच्या मागे न लागता आपले कार्य करत राहावे हेच सरांचे सांगणे असते. संघ संस्कारांची शिदोरी सरांजवळ असल्याने सरांचे चिंतन,वैचारिक मांडणी अतिशय वेगळ्या धाटणीची आहे.

आज पत्रलेखन हे दुर्मिळ होत असतांना नव्हे संपले की काय ही भीती असतांना सरांनी पत्रलेखनाचा छंद जोपासला आहे. शाळेत शिक्षक असतांना पासून त्यांचा ना.सी.फडके,कुसुमाग्रज यांच्याशी पत्रव्यवहार असायचा. पत्रलेखन ही माणसं जोडण्याची कला आहे. मनातील भाव पत्रातून सहज व्यक्त होतात. पण आज व्हाट्स अँप आणि फेसबुकमुळे ती कला संपत चाललेली आहे ही खंत कायम व्यक्त करतात. आज याच पत्रलेखणीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील एका कुटुंबाशी त्यांचे आत्मीय व जिव्हाळ्याचे संबंध आजही टिकून आहेत आणि यातूनच हजारो माणसं त्यांना भेटत गेली आणि नाते संबंध दृढ होत गेले. सर सांगतात की, 'माणसाची श्रीमंती आणि जगण्याचा आनंद हा आत्मकेंद्रित राहण्यापेक्षा या मिळालेल्या प्रेमाच्या माणसांच्या सहवासात घालवावा असं वाटतं आणि त्या प्रेमातूनच नवी ऊर्जा आपल्याला मिळत असते.' ते कायम त्यांच्या व्याख्यानातून सांगतात, समाजाने मला काय दिले यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो,त्याचे ऋण कसे फेडू शकतो या भावनेने त्यांचे कार्य,त्यानिमित्ताने प्रवास आजही सुरू आहे. जसे विवेकानंद म्हणतात,"माणूस निर्माण करणारे आणि चारित्र्य घडवणारे शिक्षण हवे." हाच अट्टहास सरांचा आहे आणि ह्याच कार्यासाठी सरांनी अभिनव संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहेत. 

आज सरांसारख्या शिक्षकाने अनेकांना सोबत घेऊन शिक्षकांची शाळा,आई-बाबांची शाळा,पालकांची शाळा,मुख्याध्यापकांची शाळा असे अनेक आगळेवेगळे प्रयोग केले आहेत. मुकी होत चाललेली घरे,मुलांना घर द्या घर, ह्या विषयातूनही समाज प्रबोधन सुरू आहे. नव्या शतकातील शैक्षणिक आव्हान बघता अत्यंत दूरदृष्टीने केलेले सरांचे कार्य बघून आश्चर्य वाटतं. आता संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या कार्याचे जाळे पसरलेले आहे. असंख्य पुरस्कार पाठीशी असतांना सुद्धा प्रसिद्धीच्या मागे न लागता शांतपणे त्यांचे कार्य सुरू आहे. 

कै. म.ल.मानकर स्मृती प्रतिष्ठाच्या माध्यमातून सुरू असलेल्या गुरुकुल आनंद शाळेचे ते सध्या कुलगुरू आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुकुल शाळेत मला जाण्याचा योग आला. शाळेतील संस्कारमय वातावरण बघून आश्चर्य वाटतं. शिक्षणक्षेत्रात रमलेल्या,शैक्षणिक विकासाचा अट्टहास असलेल्या सरांना कुटूंबाची सुद्धा साथ मिळाली म्हणून इथवरचा प्रवास झाला आणि आजही सुरु आहे. सरांच्या घराचे नाव ही पसायदान आहे. आपण गेल्यावर कृतार्थतेचा प्रसाद घेवूनच बाहेर पडतो हा माझा अनुभव आहे. नुकताच शिक्षण शाखेने त्यांचा जीवनव्रती पुरस्काराने गौरव केला आहे. जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत कार्यरत राहायला पाहिजे हा सरांचा मूलमंत्र आहे. आयुष्य जगत असतांना अखेरच्या क्षणापर्यंत सक्रिय कसे राहील हा विचार कायम असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत आपण आनंदाने जगत असतो. जीवनात नैराश्य न येण्यासाठी कायम सक्रियपणे कार्यरत राहावे हेच ते नेहमी सांगतात. सरांच्या कार्याबद्दल प्रत्येकाने कृतज्ञ राहायला हवे इतके मोठे कार्य सरांचे आहे. ते कायमच साने गुरुजींच्या ओळी गुणगुणत असतात,"खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे" ह्या कार्यासाठी सरांना निरामय आरोग्य प्रदान करावे हीच भगवंताचरणी प्रार्थना आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस

#आयुष्य_जगणारी_माणसं

Wednesday, May 13, 2020

ग्रामविकास,आरोग्य व ग्रामोत्थानासाठी झटणाऱ्या - डाँ.उर्मिला क्षीरसागर


डाँ. उर्मिला क्षीरसागर !! हे नाव फक्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या म्हणून नाही तर ग्रामोत्थानासाठी झटणाऱ्या आणि ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने निरामय बहूउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून कार्य करत असलेले प्रसिद्धी पराङ्गमुख असे व्यक्तिमत्त्व आहे खरंतर त्यांना भेटल्यावरच त्यांच्याविषयी जाणून घेता येते. त्यांच्या कार्याचा अवाका बघितला की आपणही थक्क होऊन जातो. 

देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण काहीतरी देणं लागतो या सावरकरांच्या विचारांना प्रत्यक्षपणे जगवणाऱ्या डाँ. उर्मिला क्षीरसागर आहेत. शिक्षण,संस्कार,रोजगार या त्रीस्थयी वर गावात काम करणारी त्यांची संस्था म्हणजे निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था आहे. याच्या नावातच निरामय म्हणजे निरोगी, बहुउद्देशीय म्हणजे आज शिक्षण,संस्कार आणि रोजगार या तिन्ही माध्यमात सेवा भावनेने काम करणारी ही संस्था आहे. 

सुदूर वसलेल्या गावांमधील कुपोषण आणि आरोग्याच्या प्रश्नांकडे अनेकांचे लक्ष नसते. मात्र, नागपूरसारख्या शहरांना लागून असलेल्या गावांमधील जनतेला हा प्रश्न भेडसावत असतो. जिल्ह्यातील लहान-मोठ्या ३५ गावांमध्ये बालक आणि स्त्री आरोग्याशी थेट भिडण्याचा प्रयत्न नागपूरच्या निरामय संस्थेने केला आहे. स्थानिक महिलांचेच सक्षमीकरण करून आरोग्याचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.

बालकांचे आरोग्य आणि कुपोषण हा दुर्गम भागातीलच प्रश्न नाही, तर शहरे आणि शहरांना लागून असलेल्या वस्ती आणि गावांमध्येही अस्तित्वात आहे. या संस्थेच्यावतीने गेली तीस वर्षे हा प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. नागपूरला लागून असलेल्या अनेक गावांमध्ये मातांचे आरोग्य आणि पर्यायाने बालकांचे आरोग्य याकडे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात आले आणि डाँ.उर्मिला क्षीरसागर यांनी आपले कार्य सुरू केले. अगदी नव्वदच्या दशकातही दवाखान्यात बाळंतपणे करण्याबाबत संकोच केला जात होता. १९९६ मध्ये जेव्हा उर्मिला ताई काही गावांमध्ये गेल्या तेव्हा महिला ‘मला मरण्याचे औषध द्या’, म्हणून विनंती करीत असत. नागपूरच्या इतक्या जवळ असलेल्या खेड्यांमध्ये ही परिस्थिती होती. ती बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले या प्रयत्नांचाच भाग म्हणून मग स्थानिक महिलांना आरोग्यसेवेत प्रशिक्षित करण्याचा अभिनव प्रयोग त्यांनी राबविला. आज सुमारे ५० गावांमध्ये अशा प्रशिक्षित महिलांमार्फत महिला आणि बालकांपर्यंत आम्ही आरोग्य सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत’. असे डाँ. उर्मिला क्षीरसागर आवर्जून सांगतात.

गावातील सातवी-आठवी शिकलेल्या महिलांना प्राथमिक आरोग्याचे शिक्षण,आजारांची आणि औषधांची माहिती,उपचारांच्या पद्धती शिकवल्या जातात. कमी शिकलेल्या या महिलांमधून निरामयने आरोग्य कार्यकर्त्या घडविल्या. या कार्यकर्तींना औषधोपचारांच्या पेट्या दिल्या गेल्या. गावातील बहुतांश महिला या शारीरिकदृष्ट्या अशक्तच होत्या. खाण्या-पिण्याकडे,आरोग्याकडे पुरेसे लक्ष नसणे हे सगळ्या घरांचे चित्र होते. त्याचा परिणाम बाळांच्या आरोग्यावर होत असे. त्यामुळे,अनेक बालके कमी वजनाची जन्माला येत होती. ही परिस्थिती हाताळणे हे आव्हानच होते. सुरुवातीच्या काळात महिलांचे प्रबोधन करण्यापासून ते औषधोपचारांसाठी मानसिकता तयार करण्यापर्यंत त्यांना बरेच काम करावे लागले. आज परिस्थितीत बदल झालेला आहे. दवाखान्यात जायचेच नाही, या धारणेपासून ते स्वतःहून आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या खाण्यापर्यंत गावातील महिलांची मानसिकता आता बदलली आहे. निरामयच्या कार्यकर्त्या ज्या गावांमध्ये काम करीत आहेत तेथे कुपोषित बालके जन्माला येण्याचे प्रमाण जवळपास नगण्य झाले आहे. बहुतांश ठिकाणी आता दवाखान्यांमध्येच बाळंतपणे होऊ लागली आहेत. मात्र, या यशामागे निरामय संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जवळपास दोन दशकांची मेहनत आहे आणि त्यांना मार्गदर्शक म्हणून डाँ.उर्मिला क्षीरसागर या आहेत. 

आकाशवाणीत त्यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांच्या भेटीचा योग आला तेव्हा त्यांच्या कार्याविषयी जास्त माहिती नव्हती. पण मुलाखत ऐकतांना जाणवलं की आयुष्य जगणारी माणसं ही अशीच असू शकतील. आपल्यातीलच वाटत असणारी पण आपल्या कार्यातून वेगळेपण जपणारी आदरणीय माणसं. सामाजिक परिवर्तन व ग्रामोत्थान  हे सेवा भावनेने करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डाँ.उर्मिला क्षीरसागर या करत आहेत. “बस एक कदम और" या ब्रीदवाक्याला धरत यांचे कार्य अविरत सुरू आहे. एक पाऊल पुढे पडलं तर परिवर्तन हे नक्कीच विद्यमान पंतप्रधानांनी घोषित केलेल्या  आत्मनिर्भर भारताच्या यशस्वी वाटचालीकडे जात ग्रामीण क्षेत्र हे अधिक सुजलाम,सुफलाम होईल हाच विश्वास वाटतो. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#आयुष्य_जगणारी_माणसं 

Niramay Bahuddeshiya Sewa Sanstha

Tuesday, May 12, 2020

आत्मनिर्भर!! 🇮🇳 🚩


आत्मनिर्भर अर्थात आत्मनिर्भरता याचा इंग्रजी प्रतिशब्द आहे Self reliance. 

कालच्या मा.पंतप्रधानांच्या संबोधनात आत्मनिर्भर हा शब्द होता. शब्दाचे वजन आणि व्याप्ती बघता त्याबद्दल किती जणांना जाण असेल याबाबत शंका आहेच. त्यांनी घोषणा तर केली..आत्मनिर्भर भारताची !! पण आपली जबाबदारी आता वाढली आहे. 

खरंतर हे आपले उत्तरदायित्व आहे की आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे आहे की नाही हे आपल्याला ठरवायचे आहे. कारण आत्मनिर्भर असण्यासाठी खूप हिंमत लागते. कोणाचीही साथ नसते किंवा प्रत्येक गोष्टीकरिता तुम्हाला स्वतःवरच अवलंबून राहणे पसंत असते तेव्हा तुमच्याकडे भरपूर हिंमत असावी लागते आणि म्हणून आत्मनिर्भर शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. 

मनुस्मृती मधील ४ अध्यायातील श्लोक क्र.६१ ज्याच्या उल्लेख ही कालच्या संबोधनात झाला..

सर्व परवशं दुःखं सर्वमात्मवशं सुखम् ।
एतद विद्यात्समासेन लक्षणं सुखदुःखयोः ॥

दु: ख दुसर्‍यावर आधारले पाहिजे, तो आनंद स्वतःच्या अधीन असावा; हे आनंद आणि दु: खाचे संक्षिप्त लक्षण आहे. मुळात शरण जाणं थोडं सोपं असते. जी व्यक्ती शरण जाऊ शकत नाही ती आत्मनिर्भरसुद्धा होऊ शकत नाही.जर तुमच्याकडे शरण जाण्याची हिंमत नसेल तर मग आत्मनिर्भर होणे शक्य नाही. तुम्ही केवळ स्वतःचे समाधान करीत आहात. आत्मनिर्भरतेमध्ये शरण असणे हे समाविष्ठ असते. बहुधा लोक विचार करतात की शरण जाणे हे त्यांच्या कर्तव्यांपासून पळ काढण्याचा एक मार्ग आहे.वास्तविकपणे सगळ्याची संपूर्ण जबाबदारी घेणे म्हणजेच खरे शरण जाणे होय. शरणागत होण्याने अखेरीस आम्ही आत्मनिर्भर होतो. 

यावेळी दत्तोपंत ठेंगडी यांचे विचार प्रासंगिक वाटतात. त्यांच्या "Third Way" पुस्तकातून याबद्दल अधिक जाणून घेता येईल. हे वर्ष दत्तोपंत यांचे जन्मशताब्दी वर्ष सुद्धा आहे. आत्मनिर्भर भारताची संकल्पना जी महात्मा गांधींनी सुद्धा थोड्या वेगळ्या शब्दात मांडली ती सुद्धा याच्याशी मिळतीजुळती आहे. श्रीगुरुजी व दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचा प्रतिध्वनी,विस्तार व विशदीकरण हे दत्तोपंत ठेगडी यांच्या विचारात दिसते पण नव्या परिस्थितीला उदा. जागतिकीकरण,शिथिलीकरण इ. ना आवश्यक असे नवमार्गदर्शनही त्यांनी केले. दत्तोपंतांनी आपल्या प्रतिभेने राष्ट्राचे नवनिर्माण नव्हे तर पुनर्निर्माण,संपूर्ण क्रांति नव्हे तर युगानुकूल परिवर्तन हे विचार मांडले. कालच्या संबोधनातली आर्थिक परिस्थितीची मांडणी ही दत्तोपंतांच्या चरित्रातील त्यांनी जे आर्थिक चिंतन मांडले आहे त्याच्याशी बरीच साम्य वाटली. दत्तोपंत ठेंगडी हे समग्र विचारक व समाजशिल्पी होते. सनातन धर्माच्या मूळ तत्त्वांवर आधारित त्याचे युगानुकूल रूप ‘एकात्म मानव दर्शन’ हेच राष्ट्रजीवनाचे आधारभूत तत्त्वज्ञान असले पाहिजे व त्या प्रकाशातच प्रत्येक क्षेत्रात आपली धोरणे असावीत, असे त्यांचे प्रतिपादन होते.

दत्तोपंतांनी स्वदेशी म्हणजे देशभक्तीची साकार अभिव्यक्ती ही सुटसुटीत व सर्वांना भावणारी व्याख्या त्यांनी दिली आहे. त्याचवेळी त्यांनी हेही स्पष्ट केले की, देशभक्ती याचा अर्थ इतर देशांकडे पाठ फिरवणे,असा नसून एकात्म मानव दर्शनाच्या तत्त्वाप्रमाणे मानव चेतनेच्या आधारावर समता व सन्मान राखून आंतरराष्ट्रीय सहकार्यास आम्ही नेहमीच तयार आहोत. स्वदेशीची संकल्पना केवळ वस्तूंपुरती मर्यादित नसून ती राष्ट्रजीवनाच्या सर्व क्षेत्रांना व्यापुन पुढे राष्ट्राचे संरक्षण,राष्ट्राचा स्वाभिमान,राष्ट्रीय स्वावलंबन इ.तून प्रकट होते. 

आत्मनिर्भर भारताची संकल्पना राबवत असतांना दत्तोपंतांचे विचार हे प्रासंगिक वाटतात. आज पश्चिमी विचारव्यूहांच्या दयनीय अपयशानंतर अंधारात चाचपडणाऱ्या या जगाला नवे नेतृत्व देण्यासाठी नियतीने भारताला आवाहन केले आहे. नवा भारत घडवताना तो आत्मनिर्भर ही असावा हीच काळाची गरज आहे. जगद्गुरू पदाची वाटचाल ही आत्मनिर्भर ही असावी कारण स्वामी विवेकानंद म्हणतात तसं..“उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत ।” उठा,जागे व्हा,ध्येयप्राप्ती विना थांबू नका हा संदेश देत प्रत्येकाच्या मनात नवचेतना जागृत करणारे ते शब्द आहेत. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आपली होणारी वाटचाल अधिक संयत असावी हीच अपेक्षा आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#आत्मनिर्भर_भारत #AatmaNirbharBharat

Monday, May 11, 2020

दूरदृष्टी,कल्पकता आणि अंत्योदय साकारणारे - 🌉🛣️ श्री.नितीन जयराम गडकरी

श्री.नितीन जयराम गडकरी !! हे नाव आज जगाला परिचित आहे. देशात "रस्ते विकासाचा महामेरू" म्हणूनच गौरव होईल इतके कार्य आज युद्धपातळीवर सुरू आहे. पण जेव्हा हे नाव २०१४ च्या निवडणूकीनंतर विजयी होत दिल्लीला राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात शपथविधीच्या वेळी ऐकले तेव्हा मी आणि माझ्यासकट प्रत्येक नागपूरकर हा आनंदात होता आणि त्याचा आनंद गगनात ही मावणार नाही अशी विलक्षण अनुभूती त्यावेळी प्रत्येकाची होती.  कारण नितीनजी प्रत्येकाला आपलेच वाटतात.  

मुळात नितीनजींचे कार्य आणि कर्तृत्व ह्यावर अनेकांनी भरपूर लेखन केले आहे. आज राजकारणात प्रत्येक राजकीय पक्षाशी त्यांची जी जवळीक आहे ती सुद्धा शब्दांच्या पलीकडची आहे. पण राजकरणापलीकडचे नितीनजी ह्यावर सुद्धा पुस्तक होईल इतकं त्यांचे कार्य विपुल आहे. मैत्रीतले नितीनजी,नात्यातले नितीनजी,सामाजिक बांधिलकी जपणारे नितीनजी, इतर राजकीय पक्ष आणि स्वतःच्या पार्टीतले नितीनजी आज अनेक वलयांच्या अवतीभवती असतांना सुद्धा ज्या पद्धतीने त्यांची वाटचाल सुरू आहे त्याने मला तरी अचंबित व्हायला होतं. माणूस म्हणून स्वतः भोवती एवढे परिघ असतांना प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देण्याची नितीनजींची शैली अफाट आहे. नितीनजींच्या खवय्येगिरीची चर्चा सुद्धा प्रत्येक माध्यमातून होत असतेच. एक माणूस इतक्या वेगवेगळ्या भूमिकेतून बघतांना आपण अवाक होऊ इतकं काम त्यांचं प्रत्येक क्षेत्रांत आजही आहे आणि उद्याही राहील. 

श्री.नितीन गडकरी नावातच एक विलक्षण दूर दृष्टी ही बघायवयास मिळते.राजकारणी नेता समाजाभिमुख,तळागाळातील कार्यकर्त्यांशी ही तितक्याच आपुलकीने कार्य करणारा असावा असे वाटते आणि नितीनजी आज त्यात अग्रेसर आहेत. सर्वांशी एक होत आपले वेगळे अस्तित्व नाही याची जाणीव करून देण्याची इच्छा आणि आकांक्षा असलेले व संघ संस्कार नकळतपणे लहानपणापासून भिनलेले पुढे विद्यार्थी परिषदेपासून राजकारणात असलेले प्रतिभावंत,मुदसद्दी राजकारणी अर्थात नागपूरचे खासदार श्री नितीन गडकरी.

आपल्या कामासाठी आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी नितीनजी हे सुप्रसिद्ध आहेतच. गडकरींच्या रस्ते बांधकाम विषयाची आवड पाहता त्यांना ‛रोडकरी’ हे टोपणनाव पडले. हे नाव त्यांना शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनीच दिलेले आहे आणि हे नाव आज ते भारतभर कोरत आहेत यात शंकाच नाही. नितीनजींची रस्त्यांची आवड ही त्यांच्या दमदार कामगिरीतुन आज दिसून येते आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बांधून आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. वरळी सी लिंक हुन जातांना नितीनजींचे नाव आपसूक अनेकांच्या ओठांतून बाहेर पडतेच. माझे परिचित प्रत्येकजण मुंबईत गडकरी यांचे कौतुकच करतात. २०१४ साली रस्ते,वाहतूक आणि महामार्ग खाते मिळाल्यापासून देशात गडकरींनी जणू रस्त्यांचे जाळेच विणायला सुरुवात केली अर्थात, याचे पूर्ण श्रेय ध्येय असणाऱ्या आणि ते ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम घेणाऱ्या नितीनजींना जाते. पत्रकारांशी बोलताना असो किंवा सामान्य जनतेशी गप्पा मारताना असो नितीनजी दिलखुलास आणि मनमोकळे बोलतात. आपले यश-अपयश सांगायला ते कुठेही स्वतःला कमी लेखत नाहीत आज नितीनजी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील प्रसिद्ध आहेत. 

गडकरींच्या कामांची यादी संपणारी नाही. त्यांच्या प्रत्येक क्षेत्रातील अनुभव हा शब्दातीत आहे. मग जनता दरबार असो किंवा रुग्णांना मदत करणे असो,सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड असो,क्रीडा क्षेत्रातील कार्य असो, नितीनजींच्या कामांचा लेखाजोखा न संपणारा असाच आहे, याची पूर्तता करणे अशक्यप्राय गोष्ट आहे. कारण, कामच इतक्या प्रचंड प्रमाणात झाले आहे की त्याला तोड नाहीच. इतकं असूनसुद्धा कौटुंबिक वातावरणात ही नितीनजी आपुलकी आणि ममत्व जपणारे आहेत. याचा अनुभव नुकताच अतिरुद्र निमित्ताने आला. पूर्णाहुतीच्या दिवशी दर्शनार्थ जाण्याचा योग आला. प्रसादाची व्यवस्था खाली पार्किंग मध्ये होती. आम्ही ३-४ जण आणि नितीनजी एकाच लिफ्टमधून खाली येत होतो. लिफ्ट मध्ये असतांना ज्या आपुलकीने त्यांनी आमची विचारपूस केली त्यावेळी आम्ही तरी काहीवेळ वेगळ्याच विश्वात होतो. पुढे प्रसाद घेतांना सुद्धा सावकाश होऊ द्या म्हणून पंक्तीभर फिरणारे नितीनजी अनेकांनी बघितले. आज या पदावर असतांना सुद्धा त्यांनी प्रत्येक क्षेत्रांत जे स्थान निर्माण केले आहे ते शब्दांच्या पलीकडचे आहे. 

आपण करत असलेले कार्य विलक्षण आदरयुक्त व प्रत्येकाला अभिमान वाटावा असेच आहे आणि आम्हा नागपूरकरांचे आपण भूषण आहात. आपल्या सारखे नेते आणि राजकारणी आज देशाला वेगळ्या उंचीवर नेतील यात शंका नाहीच. आई रेणुका आपल्याला निरामय आरोग्य प्रदान करो हीच तिच्या चरणी प्रार्थना. आपली पुढील वाटचाल अशीच भरारी घेत राहावी हीच सदिच्छा आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#आयुष्य_जगणारी_माणसं

Sunday, May 10, 2020

गौरव मातृत्वाचा !! 😍🙏🙌


आज मातृदिन. मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. खरं तर आई म्हणजे आनंदाचा ईश्वरी आविष्कार असंच म्हणावंसं वाटतं. आई आणि तिच्या संपूर्ण कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस अशीच संकल्पना जगमान्य असावी ह्यासाठी ह्या दिवसाचे औचित्य असेल.

जन्मानंतर सर्वजण बाळाची काळजी घेतात  पण जन्माच्या आधी नऊ महिने आई हीच बाळाची पूर्ण काळजी घेत असते. नऊ महिने आपल्या उदरात त्याला बाळगून त्याला जन्म देणं ही साधी गोष्ट नाही. परमेश्वराचे अनंत उपकार आहेत आणि त्याचा प्रगाढ विश्वास आहे की स्त्री हे मातृत्व उत्तम सांभाळू शकते. सर्व संतांनी,साहित्यिकांनी तिचा यथार्थपणे गौरव केला आहे. तिचा गौरव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दांत तिच्या बद्दलच्या काही भावना मांडणे तसे कठीणच आहे. 

जननी,माता,आई,माउली,माय अशा अनेक शब्दांच्या वलयाभवती ती कायमच असते. पण तरीही जी जन्म देते ती माता. जी स्वतःच्या मुलांना संस्कारित करते ती आई. आणि जी स्वतःसोबत दुसऱ्या मुलांना ही संस्कारित करते ती ठरते माउली. आज ही हजारो अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना माई म्हणून संबोधले जाते. आणि ही माई सगळ्यांची काळजी घेत त्यांना प्रेमाने वाढवते आहे.

खरच आई ही आपल्या जीवनात प्रत्येक भूमिका पार पाडत असते. प्रत्येक यशस्वी व्यक्ती आपल्या प्रगतीचे श्रेय आपल्या आईला देत असतात. आपल्याजवळ पैसा,ऐश्वर्य आहे. संस्कार देणारी,मार्गदर्शन करणारी, प्रेम करणारी, माया करणारी, तत्वज्ञान सांगणारी, खडसावणारी, चुका शोधून योग्य दिशा देणारी, मदत करणारी, लक्ष ठेवणारी, काळजी करणारी, जपणारी ती आई अशा कित्येक भूमिका पार पाडते. आईची जागा तिच्याशिवाय कोणीच घेवू शकत नाही. असे म्हणतात की 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'. 

आपल्या जीवनात आईच्या सहवासात राहताना आपण कधी तिचं वेगळेपण जाणलेच नाही. कायमच दुसऱ्याच्या विचारांसाठी सदैव सिद्ध असणारी ती आईच असते. तिच्या हास्यात ती आनंदाची अनुभूती अनुभवता येईल. शेवटच्या श्वासापर्यंत काळजी घेण्याचे दायित्व तिच्याकडे आहे. मुलाला कुठे काही लागलं तरी त्याची काळजी घेणे हे क्रमप्राप्त आहेच. मुलगा हा आईसाठी वैरी होऊ शकतो. पण आई मुलासाठी वैरीण कधीच होणार नाही. कारण परमेश्वराचा तिच्यावर प्रगाढ विश्वास आहे. म्हणूनच आईसारखे दैवत जगामध्ये कुठेही नाही. 

आईकडे जिव्हाळा आहे. प्रसंगी ज्ञान ही आहे. पण ज्ञान आणि जिव्हाळा एकत्र नांदतो तेव्हा ती माउली म्हणून संबोधिल्या जाते. माउली ही प्रेमाचे,ज्ञानाचे,जिव्हाळ्याचे प्रतीकच आहे. आज ज्या स्त्रीशक्तीच्या जागरात अर्थात नवरात्रात आपण आदिशक्तीचे जागरण करतो आज तिथेच स्त्री भ्रूणहत्या ही होत आहे. विद्यमान पिढीची शोकांतिकाच आहे असे म्हणता येईल. आज एक स्त्री आपल्याच गर्भातील भ्रूण हत्या करते आहे. तिच्यावर दबाव ही असू शकतो. पण ती कणखरपणे याच्यासाठी लढली तर ती रणरागिणी ही ठरू शकते. काळ अनंत आहे. आज मातृत्वाचा गौरव करताना आपण हे ही ध्यानात घेतले पाहिजे. सारी सृष्टी यशाचा मंत्रच देत असते. सद्गुणाचा संचय करत मातृत्वाचा गौरव करण्यासाठी आपण फक्त सदैव तत्पर राहण्यासाठी तयार असायला हवे. आणि ज्या संस्कृतीचे आपण पाईक आहोत त्या संस्कृतीत त्या मातृत्वाचे स्थान स्वर्गापेक्षा ही मोठे आहे. या मातृत्वाचा गौरव करताना एका दिवसाचे औचित्य आहेच पण ती निरंतर आनंदाचा आविष्कार आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस

#Mothersday

Friday, May 8, 2020

तत्वनिष्ठ संशोधक मधुकर जोशी !! 🖋️📄📚


डाँ. मधुकर जोशी !! संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, संशोधक,सखोल ज्ञानपरंपरेचे गौरव असा ज्यांचा उल्लेख करता येईल असे डाँ. म.रा.जोशी सर. "मूर्ती लहान कीर्ती महान" ही म्हण यथार्थपणे त्यांनाच लागू होईल असे जोशी सर वयाच्या या टप्प्यावर असतांना सुद्धा त्यांची संशोधक वृत्ती अचंबित करणारी आहे.

डाँ. म.रा. जोशी हे संत साहित्यामधील ज्येष्ठ लेखक आहेत. प्राचीन मराठी संत वाड.मय आणि साहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांना संत साहित्याच्या विषयावर अतिथी प्राध्यापक म्हणून निमंत्रित करण्यात येते. सरांचे २०० हून अधिक लेख एनसायक्लोपीडिया ऑफ हिंदुइजम कडून प्रकाशित करण्यात आले आहेत.

दत्त संप्रदाय,नाथ संप्रदाय,वारकरी संप्रदाय,प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज साहित्य यावर जोशी सरांचे अनेक लेख,पुस्तकं, संशोधनपर माहिती प्रसिद्ध आहे. सध्या तंजावर येथील साडेतीन हजार मराठी हस्तलिखितांचे संशोधन ते करत आहे आणि त्यानिमित्ताने त्यांचा प्रवास ही सुरू आहे. संतवाङ्मयातील अद्वैत तत्त्वज्ञान हेच त्यातील शाश्वत मूल्य आणि त्याची जोपासना हेच संशोधकाचे मुख्य कार्य होय असे ते सांगतात. प्रसिद्धी पराङ्गमुख ही त्यांची ओळख सार्थ ठरेल.

सात्त्विक,मितभाषी,आपुलकीने प्रत्येक गोष्टींचे निरसन करणे ही सरांची ओळख आहे. संतांचे ग्रंथ हेच उपयुक्त साधन आहे. नानाविध हस्तलिखित स्वरूपातील साहित्य शोधून, खरा पाठ, मूळ संहिता इत्यादी बारकावे तपासणे हेच संशोधनाचे पायाभूत कार्य आहे.सामाजिक जीवन आणि भाषा-व्याकरण यांचा तोल सांभाळीत,अभ्यासाच्या ओघाओघाने घडत गेलो असे ते नेहमी सांगतात.

लॉकडाऊन च्या आधी सरांचा फोन आला. प्रज्ञालोक चे लेख वाचून त्यांनी फोन केला होता. "नमस्कार फडणवीस साहेब,मी म.रा.जोशी बोलतोय असे म्हंटल्यावर मला आश्चर्य वाटले आणि भेटायला या,तुमच्या सोयीनुसार या आणि येतांना फोनकरून या म्हणाले" भेटायला गेल्यावर मला आश्चर्य वाटलं इतके पुरस्कार पाठीशी असतांना सर अतिशय आपुलकीने बोलत होते. विषयांवर बोलणे झाल्यावर निघतांना त्यांना म्हणालो की साहेब वगरे नका म्हणू तर म्हणाले,आदरयुक्त बोलल्या गेलेच पाहिजे आदर आणि मान प्रत्येकाचा ठेवावा.असं म्हंटल्यावर मी तरी निरुत्तर झालो. नमस्कार केला आणि निघालो. दोन भेटीत सरांकडून खूप शिकता आले. त्यांची विषयाची पकड आणि व्यासंग बघून तर आश्चर्य वाटतं. मराठी साहित्य क्षेत्रातील संशोधनासंदर्भात त्यांचा कुणी हात धरू शकणार नाही असं मला वाटतं. ‘रामदासी संप्रदायाचा समग्र कोश’ प्रकाशनाच्या वाटेवर आहे आणि तो लवकरच समर्थचरणी ते समर्पित करण्यासाठी उत्सुक आहेत. 'ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व' हेच संबोधन सरांना लागू होईल.

प्रज्ञालोकचे विद्यमान प्रधान संपादक ते आहेत. अप्रबुद्धांची आणि सरांची भेट होत असे. सरांचे वडील अकोल्याला राहत असल्याने अप्रबुद्ध जोशी यांच्याकडे उतरत असत. अप्रबुद्धांमुळे सरांवर श्री अण्णासाहेब पटवर्धन ह्यांच्या विचारांचा पगडा पडला आणि पुढे त्यांनी श्रीगुरुचरित्र व स्वात्मसौख्य ह्याचा अभ्यास केला.श्रीगुरुचरित्र ग्रंथावर ते फार सुंदर व सोपे विवेचन करतात. 'जे घडते ते श्री कृपेने घडते' ह्या विचारांचा त्यांच्यावर फार खोल परिणाम झाला आहे. ह्या वयातही त्यांची कुशाग्र बुद्धी,तौलनिक अभ्यास करण्याची कला,संशोधनाची आवड व सर्वांना सोबत घेऊन चालण्याची कला ह्याने आपण अचंबित होतो. नुकताच राज्य शासनाचा प्रतिष्ठित ज्ञानोबा-तुकोबा पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. सरकारने एका ऋषितुल्य व तत्वनिष्ठ उपासकाचा केलेला हा यथार्थ गौरव आहे. सरांना साष्टांग नमस्कार व भगवंताने त्यांना निरामय आरोग्य प्रदान करावे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.

✍️ सर्वेश फडणवीस

#आयुष्य_जगणारी_माणसं

Wednesday, May 6, 2020

योगतपस्वी राम खांडवे गुरुजी !! 🙏

आ.राम खांडवे गुरुजी !! निरामय जीवनासाठी योगाचा अट्टहास करणारे योग तपस्वी म्हणून त्यांची ओळख सार्थ ठरेल. आज जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह नात्याने अतिशय उत्तम आणि योग्य पद्धतीने सांभाळत आहेत. 

समाधानाय सौख्याय नीरोगत्वाय जीवने ।
योगमेवाभ्यसेत्त् प्राज्ञ: यथाशक्ति निरन्तरम् ।।

प. पू. जनार्दनस्वामी यांनी सांगितलेल्या योग मंत्राचा हजारो योग साधक नित्य योगासनांच्या माध्यमातून निरामय वाटचाल करत आहेत. सांघिक योगासने ही संकल्पनाच सर्वप्रथम जर्नादन स्वामींनी विश्वाला दिली आहे. त्याआधी योग आणि प्राणायाम हा योगी,संन्यासी यांच्यापुरता मर्यादित होता. आ.खांडवे गुरुजींच्या मार्गदर्शनात अनेक साधक नियमितपणे योगाभ्यासी मंडळात येऊन गेली सहा दशके स्वामीजींच्या कृपेने आणि प्रेरणेने योगाभ्यासाच्या माध्यमातून सुख,समाधान आणि निरोगत्व भरभरून वाटत आहेत. 'मानव जन्मामध्ये नराचा होण्या नारायण, करा हो नियमित योगासन’ हे ब्रीद अंगी बाणवलेले योगसाधक स्वत:च्या आणि समाजाच्या उत्कर्षासाठी अविरत कार्यरत आहेत. 

सकाळी ५ वाजून ५९ मिनिटांनी या पवित्र वास्तूत शंखनाद ऐकल्यावर खांडवे गुरुजींच्या उपस्थितीत धीरगंभीर आवाजातली प्रार्थना आणि ओंकाराचा पवित्र ध्वनी याने भारलेल्या वातावरणात योगासनांच्या वर्गाची सुरूवात होते. कुठलाही दिवस आणि कुठलाही ऋतू याला अपवाद नाही. निःशुल्क व निःस्वार्थ भावनेने गुरुजींचे कार्य आजही सुरू आहे.

सूर्यनमस्कार आणि काही आसनक्रिया अल्पकाळात लाभ देणारी ठरू शकते हे सांगणारे कुणी समाजात नसतांना योगगुरू जनार्दन स्वामी नागपूरात आले आणि त्यांनी योगविद्येचा प्रचार-प्रसार सुरू केला. सुरुवातीला त्यांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले पण आज योगविद्येचे महत्कार्य आ.खांडवे गुरुजींच्या मार्गदर्शनात अविरतपणे सुरू आहे. आज नागपूर आणि विदर्भात आ.गुरुजींमुळे योगक्षेत्रात नवे चैतन्य निर्माण झाले आहे. १९८४ पासून ते आजपर्यंत जनार्दन योगाभ्यासी मंडळ या नोंदणीकृत संस्थेचे कार्यवाह म्हणून गुरुजी कार्यरत आहे. शिस्त आणि फक्त शिस्त या एकाच गुणाने मंडळाची वाटचाल सुरू आहे. या संपूर्ण वाटचालीत आ.गुरुजींनी अनेक उपक्रम राबवले आणि अजूनही राबवतात आहे. ऊर्जेचा महस्रोत म्हणजे आ.खांडवे गुरुजी. कारण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत ते स्वतः जातीने लक्ष घालतात आणि गुरुजींची निष्ठा व परिश्रम हे प्रत्येकवेळी जाणवत असते.  

आजही या टप्प्यावर गुरुजींचा काम करण्याचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे. गुरुजींच्या संपर्कात आल्यावर ते प्रत्येक जण अनुभवतो. योग हा योग्य पद्धतीने व्हायला हवा हाच त्यांचा आग्रह आहे. स्वामीजींनी सांगितलेल्या मंत्राबद्दल गुरुजी सांगतात,जीवनामध्ये समाधान,सुख,आणि आरोग्य हे तीन लाभ घ्यायचे असतील तर शहाण्या माणसाने योगाचाच अभ्यास करायला हवा. तो प्रत्येकाने आपल्याला सहज सहन होईल इतक्याच प्रमाणात परंतु सतत करायला हवा आणि आ.गुरुजींना भेटल्यावर हा मंत्र ते सतत देत असतात. निरामय जीवनाचा आधारस्तंभ म्हणूनच गुरुजी सगळयांचे प्रेरणास्थान व आधारवड आहेत.

मध्यंतरी गुरुजींना एका कामाच्या निमित्ताने भेटण्याचा योग आला."मंडळात विद्यार्थ्यांना योगसाधना शिकविण्यावर विशेष भर आहे. ध्येयनिष्ठ,सात्विक,संयमी,धैर्यपूर्ण,तेजस्वी,समाजाभिमुख पिढी तयार व्हावी, असा मंडळाचा प्रयत्न आहे. अंधार म्हणजे केवळ प्रकाशाचा अभाव आहे. प्रत्येक योगसाधकाने एकेक पणती प्रज्वलीत केली तर समाजातला हा अनैतिकतेचा,असंयमाचा अंधार नाहीसा झाल्याशिवाय राहणार नाही." हा संदेश त्यांनी दिला. मंडळाच्या सामूहिक प्रार्थनेत म्हणतात तसं,

प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे । तसे नित्य मांगल्य नेत्रां दिसावे ।।
कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो । शतायुष्य ऎश्वर्य विद्यान लाहो ।।

आ.गुरुजींच्या मार्गदर्शनात आज मंडळाची जी यशस्वी वाटचाल सुरू आहे ती एकमेवाद्वितीय अशीच आहे. नवी वास्तू अत्यंत देखण्या रुपात उभी आहे. प.पू. स्वामीजींच्या कार्याची ध्वजा आ.गुरुजींच्या मार्गदर्शनात अशीच फडकत राहणार आहेच. निरोगी जीवनाचा आधारस्तंभ आ.गुरुजींचे कार्य उत्तरोत्तर बहरत जावो हीच सदिच्छा आणि परमेश्वरचरणी प्रार्थना आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

आयुष्य_जगणारी_माणसं

Monday, May 4, 2020

मातृहृदयी प्रमिल मावशी !! ⛳🌹🙏


वं. प्रमिलमावशी मेढे..राष्ट्र सेविका समितीच्या पूर्व प्रमुख संचालिका ही जगन्मान्य ओळख आहेच पण त्याही पलीकडच्या प्रत्येकाला आपल्या घरातील एक ज्येष्ठ सदस्य असल्याची अनेकांची भावना आजही त्यांच्याप्रती आहे आणि ही ओळख सुद्धा तितकीच सार्थ ठरते आहे. 

मावशी म्हणजे आईची बहीण. एक मायेचा झरा.एक आधार. आईसारखेच प्रेम व माया करणारी हक्काचे आश्रयस्थान.आज अहिल्या मंदिरात अर्थात मातृतीर्थावर ज्यांचा सहवास,भेट प्रत्येकाला समृद्ध करते आणि पुन्हा ओढीने भेटण्याचा कायमच आग्रह धरतात अशा वं.प्रमिलमावशी मेढे. माया,ममता,आपुलकी,प्रेम आणि निरागस व्यक्तिमत्त्व म्हणजे वं. मावशी यांना भेटल्यावर प्रत्येक जण "अद्भुत व्यक्तिमत्त्व" हेच संबोधित करेल.आज वयाच्या या टप्प्यावर असून सुद्धा नवं शिकण्याची त्यांची इच्छा अचंबित करणारी आहे. राष्ट्र सेविका समितीच्या पूर्व संचालिका असताना संपूर्ण भारत भ्रमण,अनेक संस्कृती स्वतः बघितलेल्या असतांना त्यावर अभ्यासपूर्ण माहिती असणारे असे हे चालतेबोलते शब्दकोशच आहे. स्वेच्छा निवृत्ती स्वीकारून आज पूर्णवेळ राष्ट्र सेविका समितीत मावशी जीवन व्यतीत करत आहेत. प्रदीर्घ काळ संघटनेचा असलेला अनुभव याही वयात आश्चर्यकारक वाटतो. त्यांना भेटल्यावर प्रत्येकवेळी नवनवीन माहिती मिळत असते.मनाने चिरतरुण आणि सतत क्रियाशील असणाऱ्या मावशी नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत. कोणतेही काम करताना एक ध्येय,एक साध्य,एक आदर्श,एक दैवत असावे हे प्रमिल मावशी आवर्जून सांगतात. राष्ट्राची उपासना करताना उपास्य दैवत हे भारतमाताच असावे हेच त्या नेहमी सांगतात. स्त्री ही नैसर्गिकदृष्ट्या अष्टावधानी असतेच. स्त्रीने काळानुसार स्वतःत बदल करावे. नव्या गोष्टी आत्मसात करण्याची तयारी असावी हाच त्यांचा आग्रह आहे. 

आज दायित्वमुक्त असतांना सुद्धा अहिल्या मंदिरात गेल्यावर सगळ्यात पहिले भेट होते ती वं. प्रमिल मावशी यांचीच. कुठे पुस्तक किंवा प्रार्थना म्हणतांना किंवा वर्तमानपत्र वाचत असतांना त्या दिसतात. मग आनंदाने स्वागत करतात, कुटुंबातील प्रत्येकाची आस्थेने चौकशी करणे,घरातील वृद्ध असणाऱ्यांची विशेष माहिती घेणे हे प्रत्येकाला आपलं कुणीतरी नात्यातच आहे असे वाटणारी त्यांची देहबोलीतून कायम व्यक्त होत असते. अत्यंत शांत,संयमी, याही वयात स्वतःचे काम स्वतः करत आहेत. आज स्त्रियांच्या सगळ्यात मोठ्या संघटनेच्या प्रमुख राहून सुद्धा अतिशय सहजतेने त्यांचा वावर असतो. कुठेही मीपणा व मोठेपणा नाही. खरंतर राष्ट्र सेविका समितीचे कार्य बघताना प्रमुख संचालिका हे सर्वोच्च दायित्व आहे. बरेचदा आपण एखाद्या मोठ्या दायित्व असणाऱ्या व्यक्तीला भेटलो तर आपल्यात आणि त्यात एक वेगळं दुरत्व जाणवतं पण वं.प्रमिल मावशींना भेटल्यावर असे जाणवणारच नाही. त्यांच्याशी भेटून,बोलून कुठेही मोठेपणा जाणवतच नाही. मातृहृदयी प्रेमाने बहरलेले व्यक्तित्व म्हणजे प्रमिल मावशी. आजही वं.प्रमिल मावशी यांचा सततचा सहवास आणि मार्गदर्शन हे कायमच विचार देत असतात. कुठल्याही घटनेवर त्यांची दृष्टी सकारात्मकता प्रदान करत असते. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर गीतेतील हाच श्लोक आठवतो…

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।
निर्ममो निरहङकारः समदुःखसुखः क्षमी ॥

आज सर्वत्र स्त्री शक्तीचा जागर होत असताना स्व कर्तृत्वाने, आणि राष्ट्र कार्यात मौलिक योगदान दिल्याने आणि सद्गुणी व्यक्तिमत्त्व म्हणून वं मावशी आदरणीय,पूजनीय आहेत. नुकताच जीवनकार्याच्या गौरवार्थ वं.प्रमिल मावशी यांना श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने डी.लिट देऊन त्यांचा गौरव केला आहे. डी.लिट मिळाल्यावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वं.मावशी यांचे अहिल्या मंदिरात जाऊन अभिनंदन ही केले. त्यावेळी एक हृद्य सोहळा उपस्थित प्रत्येकाने अनुभवला आहे. 

खरंतर मी स्वतःला भाग्यवान समजतो की आठ-पंधरा दिवसांतुन एकदा फोन करत नवीन लेखन,नवे विषय,नवी माहिती घेण्याचे आमचे आदान-प्रदान सुरू असते. मग भेटल्यावर स्मार्टफोन विषयी वं मावशींची माहिती जाणून घेण्याची इच्छा आजही अचंबित करते. त्या मला कायम म्हणतात की,'माणसाने काळानुसार update असावे.' त्यांना भेटायला गेल्यावर त्यांचे अनुभव कथन म्हणजे माझ्यासाठी नेहमीच पर्वणी असते. आणि आज माझे जे बाहेरून मित्र येतात त्यांना मावशींच्या भेटीला आवर्जून घेऊन जातो. प्रत्येकाचे अनुभव शब्दांच्या पलीकडचे असतात. वं.मावशींचे कार्य आणि कर्तृत्व सदैव प्रेरणादायी ठरावी हीच सदिच्छा आहेच. परमेश्वराने उदंड आयुष्य व निरामय आरोग्य प्रदान करो हीच त्याच्या चरणी प्रार्थना. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#आयुष्य_जगणारी_माणसं

Sunday, May 3, 2020

धीरोदात्त शब्दाला अर्थ देणारा पराक्रम.. ✈️ 🇮🇳


नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ॥

श्रीमद्भगवद्गीतेतील ११ व्या अध्यातील हा २४ वा श्लोक आहे. याचा अर्थ आकाशाला जाऊन भिडलेल्या,तेजस्वी, अनेक रंगानी युक्त पसरलेली तोंडे व तेजस्वी विशाल डोळे यांनी युक्त अशा आपल्याला पाहून भयभीत अंतःकरण झालेल्या माझे धैर्य व शांती नाहीशी झाली आहे. 

“नभःस्पृशं दीप्तम” या ब्रीदवाक्याने भारतीय वायुसेना सशस्त्र सेनादलाचा भाग आहे. जे वायू युद्ध,वायू सुरक्षा आणि वायू चौकशी हे महत्त्वपूर्ण कार्य देशासाठी करत असतात. याची स्थापना ८ ऑक्टोबर १९३२ साली झाली. स्वातंत्र्यापूर्वी याचे नाव ‘रॉयल इंडियन एयरफोर्स’ होते. १९४५ च्या युद्धात या सेनादलाचे महत्त्वपूर्ण योगदान होते. आज भारतीय वायुसेनेचे तळ उझबेकीस्तान व कझाकस्तानमध्ये आहेत हे विसरून चालणार नाही.

भारतीय वायुसेना ही आतंरराष्ट्रीय पातळीवर सशस्त्र सेना म्हणून परिचित आहेच. वायुसेनेने १३ जुलै २००० रोजी आफ्रिकेतील छोटासा देश (Sierra Leone) येथे “ऑपेरशन खुकरी”पार पाडले. UN peace keeping force येथे गोरखा रेजिमेंटचे २२५ जवान आतंकवादी यांनी कैद केले होते तेव्हा जे सर्जिकल स्ट्राइक झाले होते विश्वात आजही एक major rescue operation म्हणून ओळखले जाते ही खरी ताकद आहे आपल्या सैन्य दलाची. 

भारतीय वायुसेना आणि त्याची ताकद आता ब्रिटिशांनी पण ओळखली . २०१५ मध्ये ब्रिटिश रॉयल एयरफोर्स आणि भारतीय वायुसेना यांच्यात सामूहिक युद्ध अभ्यास झाला. भारतीय सुखोई SU 30MKi याने ब्रिटिश एयरफोर्स चे यूरोफाइटर टायफून ला  १२-० ने dogfight मध्ये हरवलं आहे. याचं ब्रिटीश अधिकाऱ्यांना ही वाईट वाटलं होतं. आणि हेच यूरोफाइटर आपण विकत घ्यावे हा आग्रह ब्रिटिशांनी केला होता.

आज रशिया आणि भारत मिळून 5th generation फाइटर जेट बनवतात आहेत. विद्यमान सरकार हे बनविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात आहेत. जेव्हा बनवून होईल तेव्हा लॉकहीड मार्टिन F35 याच्या तोडीचे लढावू विमान म्हणून हे असेल.

आज भारतीय वायूसेनेन कोरोना योध्यांना दिलेली मानवंदना कौतुकास्पद अशीच आहे. खरंतर कर्मवीरांना शूरवीरांनी दिलेली सलामीच आहे. आणि हे अभूतपूर्व असं आहे. राजकीय चष्म्यातून बघितलं तर राजकारण वाटेल पण परिस्थितीच्या गांभीर्यातून विचार केला आणि सहज विवेक जागृत ठेवत बघितलं तर आजचा आनंद हा पुन्हा शब्दांच्या पलीकडचा आहे. 

इच्छा आणि शक्तीच्या जोरावर आपली सेना कसे प्रभावी कार्य करते याचा प्रत्यय आज आला. भारतीय वायुदलाला सलाम,त्यांच्या शौर्याला,धाडसाला,देशभक्तीला सलाम. हा आनंद जरी क्षणिक असला तरी त्याने आलेल्या परिस्थितीतही आम्ही जी सकारात्मकता दाखवली त्याच कौतुक जगभर होईल. काही काळ वातावरणात चैतन्य निर्माण झालं आणि प्रत्येकाला त्याबद्दल आनंदच  झाला आहे. पण आता आपल्याला अधिक सजग आणि  सावध राहावे लागेल. कोरोनावर मात आपण नक्की करू. स्वस्थ रहा..काळजी घ्या..

जय हिंद !! 

✍️ सर्वेश फडणवीस 

#IAF #IndiaSalutesCoronaWarriors

 #Airwarriors to #CoronaWarriors

Friday, May 1, 2020

विचारांची विवेक वाणी !! 🎤🙏


श्री.विवेक घळसासी !! राष्ट्र विचारांचे उत्तम वक्ते, विद्यावाचस्पती, वक्तादशसहस्त्रेषु,सप्ताक्षरीचा अमृत वाणी मंत्रच आहे. आज काकांबद्दल लिहायला घेताना हिम्मत करूनच लिहितोय. खरंतर त्यांना आवडेल की नाही याबद्दल साशंकीत आहे. पण तरी त्यांना आवडेल ही खात्री सुद्धा आहे.

श्री.विवेक कृष्णाजी घळसासी  नाव व्याख्याने,प्रवचनातून वक्तृत्वाच्या शिखरावर आहे. काकांना वक्तृत्त्वाचा वारसाही घरातूनच मिळाला आहे. ८० च्या दशकापासून काकांची व्याख्याने व प्रवचनासाठी देश-विदेश प्रवास सुरु झाला. दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश,आंध्र प्रदेश,कर्नाटक राज्यांत मराठी आणि अमराठी श्रोत्यांसांठी अनेक व्याख्याने ते करत असतात. भारतीय तत्त्वज्ञान,संत कार्याविषयी युरोपीय देशांमध्ये केवळ युरोपीय लोकांसाठी सलग सहा महिने प्रवास-व्याख्याने,चर्चासत्रासाठी त्यांचा प्रवास झाला आहे आणि अजूनही अधून-मधून होत असतो. मराठी आणि हिंदीतून श्रीमद्‌ भागवत सप्ताह तसेच श्रीरामचरितमानस सप्ताहांचेही अनेक ठिकाणी यशस्वी आयोजन होत असते. गेल्या दोन तपाहून अधिक काळात साडेतीन- चार हजारहुन अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत आणि आजही देतात आहे. आज संपूर्ण देश आणि विदेशात व्याख्यानांच्या रूपाने सततचा प्रवास प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. श्रद्धेय गोविंददेवगिरी महाराज त्यांना "अध्ययन शिरोमणी" ह्याच नावाने संबोधित करतात. 

विवेकजी काका धडाडीचे पत्रकार असून १५ वर्ष सोलापूर तरुण भारताचे संपादक होते. त्यांचा वृत्तपत्र, दूरचित्रवाणी, आकाशवाणी यात ही बराच प्रदीर्घ अनुभव आहे. याद्वारे सतत जनप्रबोधन ते करत असतात. ६ वर्ष वनवासी क्षेत्रात पूर्णकालीन कार्यकर्ते म्हणून त्यांनी सेवा कार्य केले आहे. ह्या कार्यात स्मिता काकूंची सुद्धा त्यांना पूर्ण साथ होती. काकांबद्दल एक सांगण्याची गोष्ट म्हणजे त्यांना युवकांशी चर्चा करायला फार आवडते. युवकांशी बोलतांना त्यांच्यातलेच एक वाटतील इतका सहज संवाद त्यांचा असतो. सार्धशतीच्या वेळी स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचा वेध व उद्बोधक विचार "युवा चेतना-स्वामी विवेकानंद" ह्या पुस्तकात काकांनी मांडला आहे. कमी शब्दात व्यापक विचार ही काकांची लेखनशैली जी मनाला कायमच भावते आणि त्यांचा कायम आग्रह असतो की कमी शब्दांत आपले विचार मांडता यावे. माउलींच्या शब्दात सांगायचे झाले तर ' मितुले आणि सांच '.  आम्ही भावंडांनी कौटुंबिक भागवतात काकांचा सहवास अनुभवला आहे आणि आता व्याख्यानाच्या निमित्ताने,कौटुंबिक कार्यप्रसंगी ही अनुभवत असतो. 

काकांबद्दल आणखीन काय लिहिणार..त्यांच्या सहवासात जो जो आला तो अधिक त्याबद्दल सांगेल. आम्हा भावंडांचे त्यांच्या बरोबर एक वेगळेच नाते निर्माण झाले आहेत. कुटुंबातील एक ज्येष्ठ सदस्य असल्यासारखाच घनिष्ठ ऋणानुबंध निर्माण झाला आहे. आजही हे स्नेहबंध निरंतर दृढ होत आहेत. काकांचे आशीर्वाद व मार्गदर्शन कायमच मिळते व ते आपल्या सर्वांचे मोठे भाग्य आहे. सहज एकदा गप्पांच्या ओघात काकांना अनुभवांबद्दल विचारले असता, त्यावेळी त्यांनी सांगितलेला किस्सा आजही आठवणीत आहे. गानस्वरस्वती भारतरत्न लता मंगेशकर यांचा सोलापुरात नागरी सत्कार होता.' मला गायला सांगायचे नाही' ही त्यांची अट होती. पण सर्वांना तर त्यांनी काही गायला हवे असे वाटत होते. श्री. शरदराव पवार यांच्यासह अनेक मंत्रीही याच मताचे होते. पण दिदींना कसं सांगायचे ? काका सूत्रसंचालन करत होते. धाडस करुन त्यांनी विनंती केली आणि दोन पदे त्या गायल्या इतकेच नव्हे तर पुढे पुण्याच्या 'बालगंधर्व' मध्ये, मा.बाबासाहेब पुरंदरे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात पुन्हा दीदी आणि काका एकत्र आले. तेव्हा त्या मिश्किलपणे म्हणाल्या,'आज गायची गळ घालू नका बरं !' 

खरंतर प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक विचाराने बघता येते हे काकांना भेटल्यावर कायम अनुभवता येते. "ज्ञानयज्ञातील याज्ञीक" म्हणूनच काकांचा गौरव करता येईल आणि हीच काकांची ओळख सार्थ ठरेल. विवेक विचारांच्या वाणीचा श्रवणानंद असाच उत्तरोत्तर मिळत रहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कवी बा.भ.बोरकरांच्या 'लावण्यरेखा' कवितेच्या शब्दांचा आधार घेत लेखणीला विराम देतो. 

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके 
चांदणे ज्यातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे 

✍️ सर्वेश फडणवीस 

#आयुष्य_जगणारी_माणसं