डाँ. उर्मिला क्षीरसागर !! हे नाव फक्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या म्हणून नाही तर ग्रामोत्थानासाठी झटणाऱ्या आणि ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने निरामय बहूउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून कार्य करत असलेले प्रसिद्धी पराङ्गमुख असे व्यक्तिमत्त्व आहे खरंतर त्यांना भेटल्यावरच त्यांच्याविषयी जाणून घेता येते. त्यांच्या कार्याचा अवाका बघितला की आपणही थक्क होऊन जातो.
देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण काहीतरी देणं लागतो या सावरकरांच्या विचारांना प्रत्यक्षपणे जगवणाऱ्या डाँ. उर्मिला क्षीरसागर आहेत. शिक्षण,संस्कार,रोजगार या त्रीस्थयी वर गावात काम करणारी त्यांची संस्था म्हणजे निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था आहे. याच्या नावातच निरामय म्हणजे निरोगी, बहुउद्देशीय म्हणजे आज शिक्षण,संस्कार आणि रोजगार या तिन्ही माध्यमात सेवा भावनेने काम करणारी ही संस्था आहे.
सुदूर वसलेल्या गावांमधील कुपोषण आणि आरोग्याच्या प्रश्नांकडे अनेकांचे लक्ष नसते. मात्र, नागपूरसारख्या शहरांना लागून असलेल्या गावांमधील जनतेला हा प्रश्न भेडसावत असतो. जिल्ह्यातील लहान-मोठ्या ३५ गावांमध्ये बालक आणि स्त्री आरोग्याशी थेट भिडण्याचा प्रयत्न नागपूरच्या निरामय संस्थेने केला आहे. स्थानिक महिलांचेच सक्षमीकरण करून आरोग्याचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.
बालकांचे आरोग्य आणि कुपोषण हा दुर्गम भागातीलच प्रश्न नाही, तर शहरे आणि शहरांना लागून असलेल्या वस्ती आणि गावांमध्येही अस्तित्वात आहे. या संस्थेच्यावतीने गेली तीस वर्षे हा प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. नागपूरला लागून असलेल्या अनेक गावांमध्ये मातांचे आरोग्य आणि पर्यायाने बालकांचे आरोग्य याकडे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात आले आणि डाँ.उर्मिला क्षीरसागर यांनी आपले कार्य सुरू केले. अगदी नव्वदच्या दशकातही दवाखान्यात बाळंतपणे करण्याबाबत संकोच केला जात होता. १९९६ मध्ये जेव्हा उर्मिला ताई काही गावांमध्ये गेल्या तेव्हा महिला ‘मला मरण्याचे औषध द्या’, म्हणून विनंती करीत असत. नागपूरच्या इतक्या जवळ असलेल्या खेड्यांमध्ये ही परिस्थिती होती. ती बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले या प्रयत्नांचाच भाग म्हणून मग स्थानिक महिलांना आरोग्यसेवेत प्रशिक्षित करण्याचा अभिनव प्रयोग त्यांनी राबविला. आज सुमारे ५० गावांमध्ये अशा प्रशिक्षित महिलांमार्फत महिला आणि बालकांपर्यंत आम्ही आरोग्य सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत’. असे डाँ. उर्मिला क्षीरसागर आवर्जून सांगतात.
गावातील सातवी-आठवी शिकलेल्या महिलांना प्राथमिक आरोग्याचे शिक्षण,आजारांची आणि औषधांची माहिती,उपचारांच्या पद्धती शिकवल्या जातात. कमी शिकलेल्या या महिलांमधून निरामयने आरोग्य कार्यकर्त्या घडविल्या. या कार्यकर्तींना औषधोपचारांच्या पेट्या दिल्या गेल्या. गावातील बहुतांश महिला या शारीरिकदृष्ट्या अशक्तच होत्या. खाण्या-पिण्याकडे,आरोग्याकडे पुरेसे लक्ष नसणे हे सगळ्या घरांचे चित्र होते. त्याचा परिणाम बाळांच्या आरोग्यावर होत असे. त्यामुळे,अनेक बालके कमी वजनाची जन्माला येत होती. ही परिस्थिती हाताळणे हे आव्हानच होते. सुरुवातीच्या काळात महिलांचे प्रबोधन करण्यापासून ते औषधोपचारांसाठी मानसिकता तयार करण्यापर्यंत त्यांना बरेच काम करावे लागले. आज परिस्थितीत बदल झालेला आहे. दवाखान्यात जायचेच नाही, या धारणेपासून ते स्वतःहून आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या खाण्यापर्यंत गावातील महिलांची मानसिकता आता बदलली आहे. निरामयच्या कार्यकर्त्या ज्या गावांमध्ये काम करीत आहेत तेथे कुपोषित बालके जन्माला येण्याचे प्रमाण जवळपास नगण्य झाले आहे. बहुतांश ठिकाणी आता दवाखान्यांमध्येच बाळंतपणे होऊ लागली आहेत. मात्र, या यशामागे निरामय संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जवळपास दोन दशकांची मेहनत आहे आणि त्यांना मार्गदर्शक म्हणून डाँ.उर्मिला क्षीरसागर या आहेत.
आकाशवाणीत त्यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांच्या भेटीचा योग आला तेव्हा त्यांच्या कार्याविषयी जास्त माहिती नव्हती. पण मुलाखत ऐकतांना जाणवलं की आयुष्य जगणारी माणसं ही अशीच असू शकतील. आपल्यातीलच वाटत असणारी पण आपल्या कार्यातून वेगळेपण जपणारी आदरणीय माणसं. सामाजिक परिवर्तन व ग्रामोत्थान हे सेवा भावनेने करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डाँ.उर्मिला क्षीरसागर या करत आहेत. “बस एक कदम और" या ब्रीदवाक्याला धरत यांचे कार्य अविरत सुरू आहे. एक पाऊल पुढे पडलं तर परिवर्तन हे नक्कीच विद्यमान पंतप्रधानांनी घोषित केलेल्या आत्मनिर्भर भारताच्या यशस्वी वाटचालीकडे जात ग्रामीण क्षेत्र हे अधिक सुजलाम,सुफलाम होईल हाच विश्वास वाटतो.
✍️ सर्वेश फडणवीस
#आयुष्य_जगणारी_माणसं
Niramay Bahuddeshiya Sewa Sanstha
No comments:
Post a Comment