आत्मनिर्भर अर्थात आत्मनिर्भरता याचा इंग्रजी प्रतिशब्द आहे Self reliance.
कालच्या मा.पंतप्रधानांच्या संबोधनात आत्मनिर्भर हा शब्द होता. शब्दाचे वजन आणि व्याप्ती बघता त्याबद्दल किती जणांना जाण असेल याबाबत शंका आहेच. त्यांनी घोषणा तर केली..आत्मनिर्भर भारताची !! पण आपली जबाबदारी आता वाढली आहे.
खरंतर हे आपले उत्तरदायित्व आहे की आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे आहे की नाही हे आपल्याला ठरवायचे आहे. कारण आत्मनिर्भर असण्यासाठी खूप हिंमत लागते. कोणाचीही साथ नसते किंवा प्रत्येक गोष्टीकरिता तुम्हाला स्वतःवरच अवलंबून राहणे पसंत असते तेव्हा तुमच्याकडे भरपूर हिंमत असावी लागते आणि म्हणून आत्मनिर्भर शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे.
मनुस्मृती मधील ४ अध्यायातील श्लोक क्र.६१ ज्याच्या उल्लेख ही कालच्या संबोधनात झाला..
सर्व परवशं दुःखं सर्वमात्मवशं सुखम् ।
एतद विद्यात्समासेन लक्षणं सुखदुःखयोः ॥
दु: ख दुसर्यावर आधारले पाहिजे, तो आनंद स्वतःच्या अधीन असावा; हे आनंद आणि दु: खाचे संक्षिप्त लक्षण आहे. मुळात शरण जाणं थोडं सोपं असते. जी व्यक्ती शरण जाऊ शकत नाही ती आत्मनिर्भरसुद्धा होऊ शकत नाही.जर तुमच्याकडे शरण जाण्याची हिंमत नसेल तर मग आत्मनिर्भर होणे शक्य नाही. तुम्ही केवळ स्वतःचे समाधान करीत आहात. आत्मनिर्भरतेमध्ये शरण असणे हे समाविष्ठ असते. बहुधा लोक विचार करतात की शरण जाणे हे त्यांच्या कर्तव्यांपासून पळ काढण्याचा एक मार्ग आहे.वास्तविकपणे सगळ्याची संपूर्ण जबाबदारी घेणे म्हणजेच खरे शरण जाणे होय. शरणागत होण्याने अखेरीस आम्ही आत्मनिर्भर होतो.
यावेळी दत्तोपंत ठेंगडी यांचे विचार प्रासंगिक वाटतात. त्यांच्या "Third Way" पुस्तकातून याबद्दल अधिक जाणून घेता येईल. हे वर्ष दत्तोपंत यांचे जन्मशताब्दी वर्ष सुद्धा आहे. आत्मनिर्भर भारताची संकल्पना जी महात्मा गांधींनी सुद्धा थोड्या वेगळ्या शब्दात मांडली ती सुद्धा याच्याशी मिळतीजुळती आहे. श्रीगुरुजी व दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचा प्रतिध्वनी,विस्तार व विशदीकरण हे दत्तोपंत ठेगडी यांच्या विचारात दिसते पण नव्या परिस्थितीला उदा. जागतिकीकरण,शिथिलीकरण इ. ना आवश्यक असे नवमार्गदर्शनही त्यांनी केले. दत्तोपंतांनी आपल्या प्रतिभेने राष्ट्राचे नवनिर्माण नव्हे तर पुनर्निर्माण,संपूर्ण क्रांति नव्हे तर युगानुकूल परिवर्तन हे विचार मांडले. कालच्या संबोधनातली आर्थिक परिस्थितीची मांडणी ही दत्तोपंतांच्या चरित्रातील त्यांनी जे आर्थिक चिंतन मांडले आहे त्याच्याशी बरीच साम्य वाटली. दत्तोपंत ठेंगडी हे समग्र विचारक व समाजशिल्पी होते. सनातन धर्माच्या मूळ तत्त्वांवर आधारित त्याचे युगानुकूल रूप ‘एकात्म मानव दर्शन’ हेच राष्ट्रजीवनाचे आधारभूत तत्त्वज्ञान असले पाहिजे व त्या प्रकाशातच प्रत्येक क्षेत्रात आपली धोरणे असावीत, असे त्यांचे प्रतिपादन होते.
दत्तोपंतांनी स्वदेशी म्हणजे देशभक्तीची साकार अभिव्यक्ती ही सुटसुटीत व सर्वांना भावणारी व्याख्या त्यांनी दिली आहे. त्याचवेळी त्यांनी हेही स्पष्ट केले की, देशभक्ती याचा अर्थ इतर देशांकडे पाठ फिरवणे,असा नसून एकात्म मानव दर्शनाच्या तत्त्वाप्रमाणे मानव चेतनेच्या आधारावर समता व सन्मान राखून आंतरराष्ट्रीय सहकार्यास आम्ही नेहमीच तयार आहोत. स्वदेशीची संकल्पना केवळ वस्तूंपुरती मर्यादित नसून ती राष्ट्रजीवनाच्या सर्व क्षेत्रांना व्यापुन पुढे राष्ट्राचे संरक्षण,राष्ट्राचा स्वाभिमान,राष्ट्रीय स्वावलंबन इ.तून प्रकट होते.
आत्मनिर्भर भारताची संकल्पना राबवत असतांना दत्तोपंतांचे विचार हे प्रासंगिक वाटतात. आज पश्चिमी विचारव्यूहांच्या दयनीय अपयशानंतर अंधारात चाचपडणाऱ्या या जगाला नवे नेतृत्व देण्यासाठी नियतीने भारताला आवाहन केले आहे. नवा भारत घडवताना तो आत्मनिर्भर ही असावा हीच काळाची गरज आहे. जगद्गुरू पदाची वाटचाल ही आत्मनिर्भर ही असावी कारण स्वामी विवेकानंद म्हणतात तसं..“उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत ।” उठा,जागे व्हा,ध्येयप्राप्ती विना थांबू नका हा संदेश देत प्रत्येकाच्या मनात नवचेतना जागृत करणारे ते शब्द आहेत. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आपली होणारी वाटचाल अधिक संयत असावी हीच अपेक्षा आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
#आत्मनिर्भर_भारत #AatmaNirbharBharat
No comments:
Post a Comment