वे.शा.सं श्री.विनायकशास्त्री आर्वीकर आणि वे.शा.सं सौ.ललितशास्त्री आर्वीकर !! आज ही नावे नागपूरला आणि नागपूरकरांना सुपरिचित आहे. वेद रक्षणाचे महत्कार्य करणारे हे दाम्पत्य आहेत. प्रसिद्धी पराङ्गमुख राहत त्यांचे वेदाध्ययनाचे महत्कार्य आजही सुरू आहे. त्यांच्या कार्यावर ही छोटीशी शब्दफुलांची ओंजळ वैशाखात मोगऱ्याचा सुगंध देणारी ठरावी हीच सदिच्छा आहे कारण हे कार्य सदैव सुंगध देणारेच आहे.
आपल्या संस्कृतीचे आधारभूत अत्यंत प्राचीन वाङ्मय म्हणजे आपले वेद आहेत. वेद जगातील सर्वात प्राचीन वाङ्मय आहे. वेद केव्हा निर्माण झाले हे कुणीच सांगू शकत नाही. खरंतर वेद म्हणजे ज्ञान. वेद म्हणजे शब्दबद्ध ज्ञान. शब्दांचे ज्ञान म्हणजे ते कुणीतरी उच्चारले असणारच. ज्याने उच्चारले ते म्हणजे ऋषी पण ते ही ज्ञानाचा कर्ता नाही तर तो फक्त द्रष्टा आहे. म्हणून वेदांना 'अपौरुषेय' म्हंटले आहे. आणि आज याच वेदांचे चिंतन करत त्यांच्या रक्षणार्थ यशस्वी वाटचाल करणारे दाम्पत्य वे.शा.सं विनायकशास्त्री व वे.शा.सं सौ.ललितशास्त्री आर्वीकर दाम्पत्य आहे.
पितृचरणाजवळ राहून विनायकशास्त्रींनी वेदांचे अध्ययन केले. आजही सांप्रत वेदाध्ययनाचे कार्य त्यांच्या स्वस्थानी सुरू आहे. अनेक महायागाचे प्रधानाचार्य भुषवलेले श्री विनायकशास्त्री विनयशील आहेत. आलेल्या प्रत्येक शंकांच निरसन ते सहजपणे करतात. दरवर्षी श्रावणी अर्थात नारळी पौर्णिमेला यज्ञोपवीत म्हणजे(जानवे) बदलविण्याचा विधी जो असतो तो सामूहिक करण्यात विनायकशास्त्री स्वतः पुढाकार घेत आयोजित करतात. ३-४ वर्ष झाली मला ही तिथं जाण्याचा योग येतो आहे. श्रावणीत प्रत्येक विधी अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगताना आत्मिक समाधान मिळत असते. वयाच्या या टप्प्यावर असतांना सुद्धा त्यांची वेदाध्ययनाची धडपड बघून आश्चर्य वाटतं. अनेक पुरस्कार व सत्कारांची श्रीमंती पाठीशी असतांना ते त्याचा मोठेपणा कधीही मिरवत नाही. श्रीमद भागवत,प्रवचन,मासिक पारायण,सप्ताह कार्यातून त्यांचा प्रवास सतत सुरू असतो. भोसला संस्कृत महाविद्यालय आणि सरस्वती संस्कृत महाविद्यालयात त्यांनी अनेक वर्षे संस्कृत अध्यापनाचे कार्य केले आहे.
प्राचीन काळात गार्गी आणि मैत्रेयी यांसारख्या अध्यात्मिक क्षेत्रातील तत्वजिज्ञासूं स्त्रिया होऊन गेल्या. "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः" मनुस्मृतितील ह्या श्लोकात मनूने म्हंटले आहे,जेथे स्त्रियांना गौरवाचे स्थान दिले जाते,तेथे देवतांचे वास्तव्य असते आणि हीच उक्ती वे.शा.सं.ललितशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर ह्यांना लागू होईल. राधाकृष्णाच्या कृपाप्रसादाने प्रतिथयश वैदिक कुळातील रोडींच्या घरी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील वेदशास्त्रसंपन्न होते व वैदिक परंपरेतील अग्रगण्य होते. पुढे वडिलांनी भोसला संस्कृत महाविद्यालयात जाऊन संस्कृत अध्ययन सुरू केले आणि वे.शा.सं
ललितशास्त्रींनी आपले शैक्षणिक पाऊल ही याच महाविद्यालयात ठेवुन अनेक वर्षे अध्यापनाचे कार्य त्यांनी केले. जगद्गुरू कांचीकामकोटी पीठाधीश्वर शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांच्या अट्टतिरी विरचित "नारायणीय" ह्या संस्कृत महाकाव्याचा महाराष्ट्रात प्रचार-प्रसार व्हावा ह्या प्रामाणिक हेतूने ह्या महाकाव्याचा मराठी भाषेत अनुवाद करण्याचे कार्य यांच्या हातून घडले. ह्या ग्रंथाचे प्रकाशन ही प.पू. श्री शंकराचार्य जयेंद्र सरस्वती ह्यांच्या हस्ते झाले होते. खरंतर "नारायणीय" हे महाकाव्य श्रीमद भागवताचे संक्षिप्त वर्णन आहे.
आज वेदांच्या रक्षणाचे कार्य करणारे आर्वीकर घराणे हे नागपूरला लाभलेली दैवी देणगी आहे. स्त्री-पुरुष यांच्यातील परस्पर संबंध हा विषय व्यक्ती व समाज ह्या दोन्ही दृष्टींनी अतिशय महत्वाचा आहे. दोघांच्या संबंधातील परस्परावलंबित्व आणि परस्परपूरकत्व यांचा विचार आपल्या संस्कृतीमध्ये जेवढ्या समतोलपणे केला आहे तो अन्यत्र क्वचितच आढळणार आहे. २००४ साली कांचीकामकोटी पीठाधीश्वर शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती ह्यांच्या हस्ते पिठारोहण सुवर्णजयंती निमित्ताने ह्या दाम्पत्यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता. असे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व व वैदिक परंपरा अखंड टिकून राहावी ह्यासाठी कार्यतत्पर वे.शा.सं विनायकशास्त्री व सौ.ललितशास्त्री आर्वीकर ह्यांना कोटी अभिवादन. श्री भगवंताने आपल्याला निरामय आरोग्य प्रदान करावे हीच प्रार्थना.
✍️ सर्वेश फडणवीस
#आयुष्य_जगणारी_माणसं
No comments:
Post a Comment