Friday, May 22, 2020

पुरातत्व वैभवाचे अभ्यासक - श्री. श्रीपाद चितळे


श्री.श्रीपाद चितळे !! प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्व वैभवाचे अभ्यासक म्हणून त्यांची ही ओळख आहेच पण श्री. श्रीपाद चितळे हे एका सळसळत्या चैतन्याचे नाव हीच ओळख सार्थ ठरेल कारण त्यांना थकू नये हे वरदान आहे आज त्यांच्या वयाकडे आणि शरीराकडे न पाहता त्यांच्या उत्साहाकडे बघायला हवे कारण ते आजही तरुणांना लाजवतील इतके उत्साही आहेत. 

वेड लागल्याशिवाय इतिहास घडू शकत नाही,आणि वेड लागलेली माणसचं इतिहास घडवतात. हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वाक्य शब्दशः खरे आहेत याचा अनुभव भारतातील थोर प्राचीन इतिहास व संस्कृती संशोधक श्री श्रीपाद चितळे यांना भेटल्यावर म्हणता येईल. पुरातत्व संशोधन हा काकांचा आवडता विषय आहे. त्यांचे ज्ञान आणि माहिती संग्रह बघितले की अचाट व्हायला होतं.

मध्यंतरी कपूर बावडी येथे गेलो असताना ती पुरातन वास्तू बघितली. त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी श्रीपाद काकांना भेटायला गेलो. त्यांचे कार्य बघून अतिशय भारावून गेलो. कपूर बावडी बद्दल ऐकतांना आश्चर्य वाटलं काका बोलत गेले आणि मी रेकॉर्ड करत गेलो. त्यांच्या अफाट माहितीने ऐकतांना आपण ही भारावून जातो एवढा खजिना आपल्यासमोर ते सहज रिकामा करतात.

विदर्भातील ज्या ठिकाणी पुरातत्व अवशेष आहेत त्या ठिकाणी श्रीपाद चितळे गेले आहेत. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन संशोधन केले आहे आणि जवळपास ३८ पुस्तकं त्यांच्या नावाने आहेत. त्यांनी लिहिलेल्या लेखाची संख्या तर सांगता येणार नाही इतके आहे. अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार आणि अनेक पुरस्कार सन्मानित असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीपाद चितळे. पुरस्कारांची श्रीमंती असून सुद्धा प्रसिद्धीच्या मागे नसणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीपाद चितळे आहे. 

आपले कार्य आज वयाच्या या टप्प्यावर असतांना ही अतिशय निष्ठेने आणि परिश्रमपूर्वक विद्यार्थी दशेत असल्यासारखे कार्यरत आहेत. आपल्या आजूबाजूला  असलेल्या असंख्य सुंदर पुरातत्व अवशेष असतात पण आपण दुर्लक्ष करतो पण जेव्हा काका बोलण्याच्या ओघात सांगायला सुरुवात करतात तेव्हा आपण भारावून जातो. सतत भटकंती,इतिहास आणि पुरातत्वाविषयी माहिती देणे,व्याख्याने देणे हे त्यांचे छंद आहेत.

सहज बोलताना त्यांनी त्यांच्या उपक्रमा बद्दल सांगितलं “Heritage Walk”. ते म्हणतात, एक तास द्या मी तुम्हाला नागपुरातील अनेक ऐतिहासिक गोष्टी दाखवत,त्याचा इतिहास ही सांगतो. आपण इतके वर्ष राहून सुद्धा पोहोचलो नाहीत तिथे यांच्यासोबत जात जाणून घेतांना वेगळाच उत्साह असतो. त्यांची इच्छा आहे की येणाऱ्या पिढीने हा इतिहास समजून घ्यावा. एक व्यक्ती जरी असेल तरी सुद्धा ते येतात. जोशपूर्ण वाणीने इतिहासात घेऊन जातात. नागपूर मध्ये श्रीपाद चितळे यांच्या सारखे इतिहास संशोधक अभ्यासक आपल्या सोबत आहे हे आपले भाग्य आहे असेच म्हणता येईल.

इतिहास कोळून प्यालेले व त्यासाठी झपाटलेले व्यक्तिमत्व म्हणजे श्रीपाद चितळे आहेत. कट्टर स्वयंसेवक असलेले श्रीपादजी स्वतःला हेडगेवार कुळातील मानतात. डॉक्टर हेडगेवार यांच्या घराबद्दल व त्यांचा इतिहास हा श्रीपाद काका यांच्याकडून ऐकणे म्हणजे पर्वणी असते. मी स्वतः वयक्तिक अनुभव घेतला आहे. खरंतर सातत्याने एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा कसा करायचा ते श्रीपाद चितळे यांच्याकडूनच शिकायला हवे. चरैवेति चरैवेति असं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांना निरामय आरोग्य प्रदान करावे हीच भगवंताचरणी प्रार्थना आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस

#आयुष्य_जगणारी_माणसं 


No comments:

Post a Comment