Friday, May 29, 2020

स्वप्न बांधणीचे शिल्पकार "अभ्युदयाचे" चे अभियंते - श्री.सचिन देशपांडे - सौ.भाग्यश्री देशपांडे


श्री सचिन देशपांडे व सौ.भाग्यश्री देशपांडे !! व्यवसायाच्या वेगळ्या वाटा शोधत चाकोरी बाहेर जाऊन समाजात प्रतिष्ठा प्राप्त केलेल्या व्यक्तिमत्वाची स्पंदनं ही कशी असतील तर त्यासाठी आपण एकदा अभ्युदय ग्लोबल व्हिलेज स्कूल येथे भेट देऊन ह्या दाम्पत्याची नक्की भेट घ्यावी. आज खरंतर सर्व क्षेत्रात वेगळ्या वाटेवर असणारी ही शाळा भविष्यात आदर्श शाळेचे मॉडेल होईल ह्यात शंकाच नाही. 

अभ्युदय !! नावात च एक वेगळं आकर्षण आहे. अभ्युदय म्हणजे उत्कर्ष व भरभराट आणि ही शाळा बघितल्यावर जाणवतं की याचा उत्कर्ष होतोच आहे. शाळा बघताना खेड्यातील गरीब मुलांसाठी शाळा काढून ज्ञान दानाचे काम करत आहेत आणि कुठेही प्रसिध्दीच्या मागे न लागता आदर्श शाळा कशी असू शकते ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही शाळा आहे. ह्यांचे कार्य किती वेगळे आहे याचा अंदाज इथे गेल्यावरच समजेल .

नागपूरच्या जवळ खापरखेडा येथून पुढे खापा गाव तेथून बावणगाव येथे सचित्तानंद धाम येथे अभ्युदय ग्लोबल व्हिलेज स्कूल २०१० पासून सुरू आहे. समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून २०१० साली शेतातच ही शाळा सुरू झाली. डॉ.प्रकाश गांधी यांनी शाळा सुरू केली आणि पुढे त्यांची कन्या सौ.भाग्यश्री देशपांडे व श्री सचिन देशपांडे यां अभियंता असलेल्याला दाम्पत्याने २०१३ साली या शाळेला वेगळे आणि नवे रूप दिले. नवनवीन प्रयोग हे या शाळेचे वेगळेपण आजही टिकून आहे. आज शाळा वेगळ्या उंचीवर आहे. ही शाळा आणि या शाळेच्या माध्यमातून चालणारे अभिनव प्रकल्प बघण्यासारखे आहेत. शाळा म्हंटलं की वर्ग आला,ब्लॅक बोर्ड, डेस्क बेंच आले,पण इथे याच्या जोडीला ४० गायी आणि बैल आहेतच पण त्यांचा मोठा गोठा आहे,नैसर्गिक शेती आहे जी स्वतः विद्यार्थी करतात म्हणजे शालेय शिक्षणाबरोबरच माणूस आणि त्याच्या गरजा लक्षात घेऊन ते घडवण्याचे महत्कार्य हे दाम्पत्य मागील ८ वर्षांपासून करतात आहे. २८ विद्यार्थी यांना घेऊन २०१० साली सुरू झालेले कार्य आज ३५०  हुन अधिक विद्यार्थी पर्यंत येऊन पोहोचले आहे. आज शाळेचा आलेख सतत वर्धिष्णू होतो आहे.

पुस्तकी शिक्षणाबरोबरच नैसर्गिक शेती व आपल्या मातीची ओळख होण्यासाठी विद्यार्थ्यांना घडणाऱ्या ह्या शाळेची वेगळी बाजू नक्कीच कौतुक करावी अशीच आहे. विद्यार्थी स्वतः पालक,मेथी,मिरची,वांगे,टमाटे याची लागवड करून त्याचे संवर्धन करताना आणि ते संवर्धन करताना त्याची काळजी घेण्यासाठी कुठली  उपाययोजना करावी ह्याचे वर्णन विद्यार्थ्यांच्या कडून ऐकताना आणि ते बघताना अतिशय आनंद होतो. मी स्वतः २०१८ मध्ये या शाळेत जाऊन आलो आहे. डिसेंबर महिन्यात शनिवारी सकाळी इथं गेल्यावर शाळा बघता आलीच पण तेथील विद्यार्थी, त्यांचा वर्ग शिकवण्याची पद्धत सारे जवळून बघता आले. त्यानंतर तिथेच लागवड केलेल्या नैसर्गिक भाज्यांचा वापर करत जेवण म्हणजे तर शब्दच नाही आहेत.  

आज जवळपास आजूबाजूच्या १८ गावांमधून विद्यार्थी इथे येतात आहे.  ३ किमी ते २० किमी अंतरावरुन इथे विद्यार्थी रोज येतात. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात 'आनंद जत्रा' म्हणून शाळेचा वार्षिकोत्सव होतो ज्यात विद्यार्थ्यांनी केलेलं कार्य त्यांच्या कल्पनेची मांडणी बघायला मिळते. नागपूरहुन अनेक कुटुंब ह्या आनंदजत्रेत सहभागी होतात. आनंद जत्रेचा उद्देशच असा आहे की विद्यार्थ्यांच्या कल्पनेला चालना मिळावी आणि जाणकारांनी त्यांना अधिक माहिती देत एक चांगला नागरिक घडावा. श्रमदान, आरोग्य,सेवा या क्षेत्रातील अनेक मान्यवर शाळेत येऊन विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी तत्पर आहेतच. 

मी जे काही काम करणार आहे ते प्रेमाने करेल आणि निःस्वार्थ भावनेतून करेल आणि याच भावनेतून ह्यांचे कार्य सुरू आहे. आज स्वप्न बांधणीचे शिल्पकार या ज्ञानदानाच्या माध्यमातून माणूस घडविणाऱ्या श्री सचिन देशपांडे आणि सौ भाग्यश्री देशपांडे ह्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#आयुष्य_जगणारी_माणसं 

No comments:

Post a Comment