आ.राम खांडवे गुरुजी !! निरामय जीवनासाठी योगाचा अट्टहास करणारे योग तपस्वी म्हणून त्यांची ओळख सार्थ ठरेल. आज जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह नात्याने अतिशय उत्तम आणि योग्य पद्धतीने सांभाळत आहेत.
समाधानाय सौख्याय नीरोगत्वाय जीवने ।
योगमेवाभ्यसेत्त् प्राज्ञ: यथाशक्ति निरन्तरम् ।।
प. पू. जनार्दनस्वामी यांनी सांगितलेल्या योग मंत्राचा हजारो योग साधक नित्य योगासनांच्या माध्यमातून निरामय वाटचाल करत आहेत. सांघिक योगासने ही संकल्पनाच सर्वप्रथम जर्नादन स्वामींनी विश्वाला दिली आहे. त्याआधी योग आणि प्राणायाम हा योगी,संन्यासी यांच्यापुरता मर्यादित होता. आ.खांडवे गुरुजींच्या मार्गदर्शनात अनेक साधक नियमितपणे योगाभ्यासी मंडळात येऊन गेली सहा दशके स्वामीजींच्या कृपेने आणि प्रेरणेने योगाभ्यासाच्या माध्यमातून सुख,समाधान आणि निरोगत्व भरभरून वाटत आहेत. 'मानव जन्मामध्ये नराचा होण्या नारायण, करा हो नियमित योगासन’ हे ब्रीद अंगी बाणवलेले योगसाधक स्वत:च्या आणि समाजाच्या उत्कर्षासाठी अविरत कार्यरत आहेत.
सकाळी ५ वाजून ५९ मिनिटांनी या पवित्र वास्तूत शंखनाद ऐकल्यावर खांडवे गुरुजींच्या उपस्थितीत धीरगंभीर आवाजातली प्रार्थना आणि ओंकाराचा पवित्र ध्वनी याने भारलेल्या वातावरणात योगासनांच्या वर्गाची सुरूवात होते. कुठलाही दिवस आणि कुठलाही ऋतू याला अपवाद नाही. निःशुल्क व निःस्वार्थ भावनेने गुरुजींचे कार्य आजही सुरू आहे.
सूर्यनमस्कार आणि काही आसनक्रिया अल्पकाळात लाभ देणारी ठरू शकते हे सांगणारे कुणी समाजात नसतांना योगगुरू जनार्दन स्वामी नागपूरात आले आणि त्यांनी योगविद्येचा प्रचार-प्रसार सुरू केला. सुरुवातीला त्यांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले पण आज योगविद्येचे महत्कार्य आ.खांडवे गुरुजींच्या मार्गदर्शनात अविरतपणे सुरू आहे. आज नागपूर आणि विदर्भात आ.गुरुजींमुळे योगक्षेत्रात नवे चैतन्य निर्माण झाले आहे. १९८४ पासून ते आजपर्यंत जनार्दन योगाभ्यासी मंडळ या नोंदणीकृत संस्थेचे कार्यवाह म्हणून गुरुजी कार्यरत आहे. शिस्त आणि फक्त शिस्त या एकाच गुणाने मंडळाची वाटचाल सुरू आहे. या संपूर्ण वाटचालीत आ.गुरुजींनी अनेक उपक्रम राबवले आणि अजूनही राबवतात आहे. ऊर्जेचा महस्रोत म्हणजे आ.खांडवे गुरुजी. कारण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत ते स्वतः जातीने लक्ष घालतात आणि गुरुजींची निष्ठा व परिश्रम हे प्रत्येकवेळी जाणवत असते.
आजही या टप्प्यावर गुरुजींचा काम करण्याचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे. गुरुजींच्या संपर्कात आल्यावर ते प्रत्येक जण अनुभवतो. योग हा योग्य पद्धतीने व्हायला हवा हाच त्यांचा आग्रह आहे. स्वामीजींनी सांगितलेल्या मंत्राबद्दल गुरुजी सांगतात,जीवनामध्ये समाधान,सुख,आणि आरोग्य हे तीन लाभ घ्यायचे असतील तर शहाण्या माणसाने योगाचाच अभ्यास करायला हवा. तो प्रत्येकाने आपल्याला सहज सहन होईल इतक्याच प्रमाणात परंतु सतत करायला हवा आणि आ.गुरुजींना भेटल्यावर हा मंत्र ते सतत देत असतात. निरामय जीवनाचा आधारस्तंभ म्हणूनच गुरुजी सगळयांचे प्रेरणास्थान व आधारवड आहेत.
मध्यंतरी गुरुजींना एका कामाच्या निमित्ताने भेटण्याचा योग आला."मंडळात विद्यार्थ्यांना योगसाधना शिकविण्यावर विशेष भर आहे. ध्येयनिष्ठ,सात्विक,संयमी,धैर्यपूर्ण,तेजस्वी,समाजाभिमुख पिढी तयार व्हावी, असा मंडळाचा प्रयत्न आहे. अंधार म्हणजे केवळ प्रकाशाचा अभाव आहे. प्रत्येक योगसाधकाने एकेक पणती प्रज्वलीत केली तर समाजातला हा अनैतिकतेचा,असंयमाचा अंधार नाहीसा झाल्याशिवाय राहणार नाही." हा संदेश त्यांनी दिला. मंडळाच्या सामूहिक प्रार्थनेत म्हणतात तसं,
प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे । तसे नित्य मांगल्य नेत्रां दिसावे ।।
कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो । शतायुष्य ऎश्वर्य विद्यान लाहो ।।
आ.गुरुजींच्या मार्गदर्शनात आज मंडळाची जी यशस्वी वाटचाल सुरू आहे ती एकमेवाद्वितीय अशीच आहे. नवी वास्तू अत्यंत देखण्या रुपात उभी आहे. प.पू. स्वामीजींच्या कार्याची ध्वजा आ.गुरुजींच्या मार्गदर्शनात अशीच फडकत राहणार आहेच. निरोगी जीवनाचा आधारस्तंभ आ.गुरुजींचे कार्य उत्तरोत्तर बहरत जावो हीच सदिच्छा आणि परमेश्वरचरणी प्रार्थना आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
आयुष्य_जगणारी_माणसं
No comments:
Post a Comment