Friday, May 15, 2020

शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ - डॉ.बाबा नंदनपवार

डॉ.बाबा नंदनपवार !! आज हे नाव शैक्षणिक क्षेत्रात आदराने घेतले जाते. ज्याप्रमाणे दीपस्तंभ सगळे वातावरण प्रकाशमय करीत असतं तसेच आ.सरांचे कार्य आहे. शिक्षण क्षेत्रात ४५ वर्षांहुन अधिक काळ लोटला आहे पण आजही सरांचे कार्य नित्यनेमाने सुरू आहे. या वयातील त्यांचा उत्साह बघता सहज हात जोडले जातात आणि आपण त्यांच्यासमोर नतमस्तक होतो.  

डॉ. बाबा नंदनपवार अतिशय नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे चालतेबोलते व्यासपीठच म्हणता येईल. नवयुग विद्यालयात सलग ४० वर्ष त्यांनी ज्ञानदानाचे कार्य करत अनेक विद्यार्थी घडवले. खरंतर माझ्या बाबांना सुद्धा सरांनी शिकवलं आहे त्यामुळे कौटुंबिक संबंध सरांशी आजही आहेत आणि सांगायला अभिमान वाटतो की बाबांचे रिटायरमेंट झाल्यावर सर स्वतः घरी आले आणि स्वतः लिहिलेले "उत्तरायण" पुस्तक भेट म्हणून दिले. उतरत्या वयातील करण्याचे कार्य आणि नवीन पिढीशी जुळवुन घेण्याचा मंत्र सरांनी अतिशय सहज सोप्या शब्दांत या छोटेखानी पुस्तकात मांडला आहे. 'संस्कार कवच','सुंदर माझं घर' अशी अनेक पुस्तकांचे लेखन सरांनी केले आहे. स्वागत मूल्य असलेल्या या पुस्तकातून आलेली रक्कम ते सेवाभावी संस्थेला देतात. प्रसिद्धीच्या मागे न लागता आपले कार्य करत राहावे हेच सरांचे सांगणे असते. संघ संस्कारांची शिदोरी सरांजवळ असल्याने सरांचे चिंतन,वैचारिक मांडणी अतिशय वेगळ्या धाटणीची आहे.

आज पत्रलेखन हे दुर्मिळ होत असतांना नव्हे संपले की काय ही भीती असतांना सरांनी पत्रलेखनाचा छंद जोपासला आहे. शाळेत शिक्षक असतांना पासून त्यांचा ना.सी.फडके,कुसुमाग्रज यांच्याशी पत्रव्यवहार असायचा. पत्रलेखन ही माणसं जोडण्याची कला आहे. मनातील भाव पत्रातून सहज व्यक्त होतात. पण आज व्हाट्स अँप आणि फेसबुकमुळे ती कला संपत चाललेली आहे ही खंत कायम व्यक्त करतात. आज याच पत्रलेखणीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील एका कुटुंबाशी त्यांचे आत्मीय व जिव्हाळ्याचे संबंध आजही टिकून आहेत आणि यातूनच हजारो माणसं त्यांना भेटत गेली आणि नाते संबंध दृढ होत गेले. सर सांगतात की, 'माणसाची श्रीमंती आणि जगण्याचा आनंद हा आत्मकेंद्रित राहण्यापेक्षा या मिळालेल्या प्रेमाच्या माणसांच्या सहवासात घालवावा असं वाटतं आणि त्या प्रेमातूनच नवी ऊर्जा आपल्याला मिळत असते.' ते कायम त्यांच्या व्याख्यानातून सांगतात, समाजाने मला काय दिले यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो,त्याचे ऋण कसे फेडू शकतो या भावनेने त्यांचे कार्य,त्यानिमित्ताने प्रवास आजही सुरू आहे. जसे विवेकानंद म्हणतात,"माणूस निर्माण करणारे आणि चारित्र्य घडवणारे शिक्षण हवे." हाच अट्टहास सरांचा आहे आणि ह्याच कार्यासाठी सरांनी अभिनव संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहेत. 

आज सरांसारख्या शिक्षकाने अनेकांना सोबत घेऊन शिक्षकांची शाळा,आई-बाबांची शाळा,पालकांची शाळा,मुख्याध्यापकांची शाळा असे अनेक आगळेवेगळे प्रयोग केले आहेत. मुकी होत चाललेली घरे,मुलांना घर द्या घर, ह्या विषयातूनही समाज प्रबोधन सुरू आहे. नव्या शतकातील शैक्षणिक आव्हान बघता अत्यंत दूरदृष्टीने केलेले सरांचे कार्य बघून आश्चर्य वाटतं. आता संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या कार्याचे जाळे पसरलेले आहे. असंख्य पुरस्कार पाठीशी असतांना सुद्धा प्रसिद्धीच्या मागे न लागता शांतपणे त्यांचे कार्य सुरू आहे. 

कै. म.ल.मानकर स्मृती प्रतिष्ठाच्या माध्यमातून सुरू असलेल्या गुरुकुल आनंद शाळेचे ते सध्या कुलगुरू आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुकुल शाळेत मला जाण्याचा योग आला. शाळेतील संस्कारमय वातावरण बघून आश्चर्य वाटतं. शिक्षणक्षेत्रात रमलेल्या,शैक्षणिक विकासाचा अट्टहास असलेल्या सरांना कुटूंबाची सुद्धा साथ मिळाली म्हणून इथवरचा प्रवास झाला आणि आजही सुरु आहे. सरांच्या घराचे नाव ही पसायदान आहे. आपण गेल्यावर कृतार्थतेचा प्रसाद घेवूनच बाहेर पडतो हा माझा अनुभव आहे. नुकताच शिक्षण शाखेने त्यांचा जीवनव्रती पुरस्काराने गौरव केला आहे. जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत कार्यरत राहायला पाहिजे हा सरांचा मूलमंत्र आहे. आयुष्य जगत असतांना अखेरच्या क्षणापर्यंत सक्रिय कसे राहील हा विचार कायम असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत आपण आनंदाने जगत असतो. जीवनात नैराश्य न येण्यासाठी कायम सक्रियपणे कार्यरत राहावे हेच ते नेहमी सांगतात. सरांच्या कार्याबद्दल प्रत्येकाने कृतज्ञ राहायला हवे इतके मोठे कार्य सरांचे आहे. ते कायमच साने गुरुजींच्या ओळी गुणगुणत असतात,"खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे" ह्या कार्यासाठी सरांना निरामय आरोग्य प्रदान करावे हीच भगवंताचरणी प्रार्थना आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस

#आयुष्य_जगणारी_माणसं

No comments:

Post a Comment