आज मातृदिन. मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. खरं तर आई म्हणजे आनंदाचा ईश्वरी आविष्कार असंच म्हणावंसं वाटतं. आई आणि तिच्या संपूर्ण कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस अशीच संकल्पना जगमान्य असावी ह्यासाठी ह्या दिवसाचे औचित्य असेल.
जन्मानंतर सर्वजण बाळाची काळजी घेतात पण जन्माच्या आधी नऊ महिने आई हीच बाळाची पूर्ण काळजी घेत असते. नऊ महिने आपल्या उदरात त्याला बाळगून त्याला जन्म देणं ही साधी गोष्ट नाही. परमेश्वराचे अनंत उपकार आहेत आणि त्याचा प्रगाढ विश्वास आहे की स्त्री हे मातृत्व उत्तम सांभाळू शकते. सर्व संतांनी,साहित्यिकांनी तिचा यथार्थपणे गौरव केला आहे. तिचा गौरव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दांत तिच्या बद्दलच्या काही भावना मांडणे तसे कठीणच आहे.
जननी,माता,आई,माउली,माय अशा अनेक शब्दांच्या वलयाभवती ती कायमच असते. पण तरीही जी जन्म देते ती माता. जी स्वतःच्या मुलांना संस्कारित करते ती आई. आणि जी स्वतःसोबत दुसऱ्या मुलांना ही संस्कारित करते ती ठरते माउली. आज ही हजारो अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना माई म्हणून संबोधले जाते. आणि ही माई सगळ्यांची काळजी घेत त्यांना प्रेमाने वाढवते आहे.
खरच आई ही आपल्या जीवनात प्रत्येक भूमिका पार पाडत असते. प्रत्येक यशस्वी व्यक्ती आपल्या प्रगतीचे श्रेय आपल्या आईला देत असतात. आपल्याजवळ पैसा,ऐश्वर्य आहे. संस्कार देणारी,मार्गदर्शन करणारी, प्रेम करणारी, माया करणारी, तत्वज्ञान सांगणारी, खडसावणारी, चुका शोधून योग्य दिशा देणारी, मदत करणारी, लक्ष ठेवणारी, काळजी करणारी, जपणारी ती आई अशा कित्येक भूमिका पार पाडते. आईची जागा तिच्याशिवाय कोणीच घेवू शकत नाही. असे म्हणतात की 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'.
आपल्या जीवनात आईच्या सहवासात राहताना आपण कधी तिचं वेगळेपण जाणलेच नाही. कायमच दुसऱ्याच्या विचारांसाठी सदैव सिद्ध असणारी ती आईच असते. तिच्या हास्यात ती आनंदाची अनुभूती अनुभवता येईल. शेवटच्या श्वासापर्यंत काळजी घेण्याचे दायित्व तिच्याकडे आहे. मुलाला कुठे काही लागलं तरी त्याची काळजी घेणे हे क्रमप्राप्त आहेच. मुलगा हा आईसाठी वैरी होऊ शकतो. पण आई मुलासाठी वैरीण कधीच होणार नाही. कारण परमेश्वराचा तिच्यावर प्रगाढ विश्वास आहे. म्हणूनच आईसारखे दैवत जगामध्ये कुठेही नाही.
आईकडे जिव्हाळा आहे. प्रसंगी ज्ञान ही आहे. पण ज्ञान आणि जिव्हाळा एकत्र नांदतो तेव्हा ती माउली म्हणून संबोधिल्या जाते. माउली ही प्रेमाचे,ज्ञानाचे,जिव्हाळ्याचे प्रतीकच आहे. आज ज्या स्त्रीशक्तीच्या जागरात अर्थात नवरात्रात आपण आदिशक्तीचे जागरण करतो आज तिथेच स्त्री भ्रूणहत्या ही होत आहे. विद्यमान पिढीची शोकांतिकाच आहे असे म्हणता येईल. आज एक स्त्री आपल्याच गर्भातील भ्रूण हत्या करते आहे. तिच्यावर दबाव ही असू शकतो. पण ती कणखरपणे याच्यासाठी लढली तर ती रणरागिणी ही ठरू शकते. काळ अनंत आहे. आज मातृत्वाचा गौरव करताना आपण हे ही ध्यानात घेतले पाहिजे. सारी सृष्टी यशाचा मंत्रच देत असते. सद्गुणाचा संचय करत मातृत्वाचा गौरव करण्यासाठी आपण फक्त सदैव तत्पर राहण्यासाठी तयार असायला हवे. आणि ज्या संस्कृतीचे आपण पाईक आहोत त्या संस्कृतीत त्या मातृत्वाचे स्थान स्वर्गापेक्षा ही मोठे आहे. या मातृत्वाचा गौरव करताना एका दिवसाचे औचित्य आहेच पण ती निरंतर आनंदाचा आविष्कार आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
#Mothersday
No comments:
Post a Comment