स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांना " तेजोमय भास्कर " हा शब्द शुभाताईंनी एके ठिकाणी लिहिला आणि दिवसभर सारखा मनात रुंजी घालत होता, सावरकरांना "तेजोमय भास्कर " ह्या बिरुदावलीत आपण खरंच बसवावे इतके त्यांचं राष्ट्रार्पण जीवन आहे. स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडातील हे अग्निहोत्र २८ मे १८८३ ते २६ फेब्रुवारी १९६६ सलग ८३ वर्षे सतत धगधगत होते.
आज जयंतीनिमित्त या माध्यमातून विचार,लेख प्रकाशित होत असतांना मनात वेगळीच भावना होती. राष्ट्रीय सणाचे औचित्य असल्यासारखा इथे प्रत्येकाचा भाव होता. अनेक नामवंत व्याख्यात्यांचे व्याख्यान आणि भाषणे ही एक जोडबाजू सुद्धा शब्दांच्या पलीकडची होती. पण सावरकर समर्पित जीवनाचा कालक्रम समजून घेतांना एक दिवसासाठी साठी नाही तर रोजच्या दैनंदिन आयुष्यात सावरकर आचरणात आणावे लागतील आणि आज त्याचीच जास्त आवश्यकता आहे असं प्रामाणिकपणे वाटतं. त्यांच्या समर्पित जीवनाचा कालक्रम बघतांना ते लक्षात येईल.
◆ १८८३ मे २८ - भगूर येथे जन्म
◆ १८९८ - अष्टभुजा देवीपुढे शपथ ग्रहण
◆ १९०० जानेवारी १ - मित्रमेळा या संस्थेची स्थापना पुढे याचेच नाव अभिनव भारत असे बदलले गेले
◆ १९०५ ऑक्टोबर - पुणे येथे लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत परदेशी कपड्यांची होळी
◆ १९०६ मार्च ९ - शिष्यवृत्तीसाठी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याकडे अर्ज
◆ १९०६ जून - लंडनला रवाना
◆ १९०७ - अणुबॉम्ब निर्मितीचे सूत्र गवसले
◆ १९०९ ऑगस्ट - 'भारताचे स्वातंत्र्य-समर' या पुस्तकाचे प्रकाशन
◆ १९१० मार्च १३ - व्हाइसरॉय विरोधात युद्ध पुकारल्याच्या आरोपावरून लंडन मध्ये अटक
◆१९१० जुलै ८ - फ्रान्समधील 'मर्सिलेस' बंदराजवळ मारिया बोटीतून समुद्रात साहसी उडी
◆ १९१० डिसेंबर २४ - आयुष्यात प्रथमच जन्मठेपेची शिक्षा
◆ १९११ जानेवारी ११ - दुसऱ्यांदा जन्मठेपेची शिक्षा
◆ १९२१ मे - दोन्ही बंधूंची अंदमानहून बंगालमधील अलीपुर येथे बदली . काही कालावधीनंतर विनायक सावरकरांची रत्नागिरी येथे रवानगी पण तुरुंगवास कायम.
◆ १९२४ जानेवारी ६ - १४ वर्षांच्या प्रदीर्घ कारावासानंतर काही अटींवर तुरुंगातून मुक्तता. रत्नागिरीत स्थानबद्धता
◆ १९३० नोव्हेंबर - जातिनिर्मूलन व्हावे यासाठी सहभोजन
◆ १९३१ फेब्रुवारी २२ - सर्व जातीधर्मासाठी पतितपावन मंदिरात मूर्तीची स्थापना
◆ १९३७ मे- सर्व बंधने उठवली
◆ १९३९-४०- दुसऱ्या महायुद्धात लढाईचे शिक्षण मिळेल या हेतूने सैन्यात भरती व्हावे ह्या हेतून व्याख्यानासाठी देशभर भ्रमण
◆ १९४० जून २२ - नेताजीं सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धात सामील होऊन त्याचा लाभ उठवावा अशी सूचना.
◆ १९४४ जून २५ - सिंगापूर रेडीओ केंद्रावरून नेताजी आणि रासबिहारी बोस यांचा सावरकर ह्यांना खास आभार मानणारा संदेश
◆ १९४७ ऑगस्ट १५ - भारताला स्वातंत्र्य
◆ १९४९ फेब्रुवारी ५ - गांधीवधामध्ये फसवण्याचा निंद्य प्रयत्न
◆ १९४९ फेब्रुवारी १० - चारित्र्य निष्कलंक असल्याचा निर्वाळा
◆ १९५४ जानेवारी २६ - संभाव्य चिनी आक्रमणाचा देशाला व सरकारला जाहीर इशारा
◆ १९६२ ऑक्टोबर २० - चिनी सैन्याचे उघडउघड भारतावर आक्रमण
◆ १९६६ फेब्रुवारी ३ - आत्मसमर्पणाच्या हेतूने अन्न-त्याग निश्चय
◆ १९६६ फेब्रुवारी २६ - देहावसान
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राष्ट्र समर्पित कालानुक्रम बघितला की सहज जाणवेल की त्यांचा श्वास आणि ध्यास हे फक्त स्वातंत्र्यासाठी आणि ह्या भारतमातेसाठी होते. आज म्हणावेसे वाटते की,स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या व्यक्तिमत्वाचा निखारा होऊ न देता हे स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडातील अग्निहोत्र सतत पेटत ठेवण्याचे दायित्व आपल्याकडे आहे. कवी भा. रा.तांबे म्हणतात ,"मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज जोडुनि दोन्ही करा !". सावरकर जन्मजयंतीच्या या मावळत्या दिनकराला दोन्ही हाताने अर्घ्य देत संकल्प करूया.. जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर आणि मानस आपल्याकडे येत नाही, जोपर्यंत सिंधू भारतात येत नाही तोपर्यंत हे अग्निहोत्र सतत पेटत ठेवण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे.
वंदे मातरम !!
✍️ सर्वेश फडणवीस
#SwatantryaVeerSavarkar
No comments:
Post a Comment