Monday, May 25, 2020

मनोरुग्णांचे आश्रयदाते - श्री.प्रमोद राऊत- डॉ.सौ.प्रज्ञा राऊत !!

श्री. प्रमोद राऊत आणि डॉ.सौ प्रज्ञा राऊत !! आज हे दाम्पत्य मनोरुग्ण असलेल्या मुला-मुलींचे आश्रयदाते आहेतच पण  आईवडीलही झाले आहेत. "श्रीकृष्ण शांतिनिकेतन"च्या माध्यमातून नागपूरातच आडवाटेवर असलेल्या बेलतरोडी भागात त्यांचे कार्य सुरू आहे. आजही शांतपणे कुठेही प्रसिद्धीच्या झोतात न येता हे कुटुंब कारण आज प्रज्ञाताई यांची मुलगी पण मेडिकल कॉलेज ला शिकत असून ती सुद्धा यांना पूर्ण मदत करते आहे. 

" कर्मण्येवाधिकरस्ते मा फलेषु कदाचन " या गीतेतील तत्वावर एक सेवाकार्य निस्वार्थी पणे चालू शकतं यावर विश्वास बसणार नाही. पण श्री.प्रमोद राऊत व डॉ.सौ.प्रज्ञा राऊत यांनी श्रीरामकृष्णहरी सेवाभावी प्रतिष्ठान संचालित  “श्रीकृष्ण शांतिनिकेतन" च्या माध्यमातून गतिमंद,मनोरुग्ण,अंध,अपंग,मरणासन्न अशा समाजातील सर्व जाती बांधवांसाठी निशुल्क घरकुल सुरू केलं. 

आज रस्त्यावर अर्थहीन भटकणाऱ्या मनोरुग्णाला प्रज्ञा ताईने घरी आणले आणि तेच तिच्या आयुष्याचे ध्येय झाले. नवऱ्याचा पगार आणि शेतीचं उत्पन्न यांच्या जिवावर तिने आज अनेक मनोरुग्णांना आपल्या घरात आश्रय दिला; परंतु त्यांचा त्रास होणाऱ्या शेजाऱ्यापाजाऱ्यांनी तिलाच वेडं ठरवायचा प्रयत्न केला. असंख्य अडचणींना मात देत, स्वत:चे आईपण सांभाळत या रुग्णांवर भरभरून माया करणारी मातृवत प्रज्ञा ताई आणि पितृवत सगळे लाड पुरवणारे तिचे यजमान श्री प्रमोद राऊत.

आज प्रज्ञा ताई हसतमुखाने आणि आनंदाने सगळे करते आहे. रोजचे त्यांचे सगळे करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे.पण ताई कुठंही जाणवू देत नाही. माझा नियमित दरवर्षी इथं जाण्याचा योग असतोच. एकवर्षी दिवाळीचा फराळ सुद्धा यांच्यासोबत केला आहे. पण पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण म्हणून किंवा मग त्यांच्या आशीर्वादाने  आपणही या समाजाचे देणं लागतो या भावनेतून आपण सुखासीन आनंदाने जगत असतांना यांच्याबद्दल काही देणे हे आपले कर्तव्य आहे आणि याच देण्याच्या भावनेनं जी अनुभूती मिळते त्यातला आनंद हा प्रत्येकजण या ठिकाणी भेटूनच अनुभवु शकतो.  कारण त्यांना भेटल्यावर शब्दांपेक्षा भावनिक नातं लवकर जुळतं आणि खरंतर यांना भेटल्यावर कसे व्यक्त व्हावे हे नंतर कळतच नाही. 

खरंतर मानसिक रुग्णांना सांभाळणे हे फार जिकिरीचे काम असते. एखादा माणूस मानसिक रुग्ण झाला किंवा असला,की त्याच्याकडे बघायची समाजाचीच काय,पण अनेकदा रक्ताच्या नात्यातील माणसं सुद्धा विचित्र नजरेने बघतात. जन्मत:च मानसिकदृष्टय़ा अविकसित मुलांना ते लहान असतात तोवर आईवडील सांभाळून घेतात; परंतु काही विशिष्ट वयानंतर त्या आईवडिलांनाही त्यांना सांभाळणे अनेकदा अशक्य होते. अशा वेळी त्यांना सांभाळणारे कोणी नसेल तर त्यांना थेट मनोरुग्णालयाचा रस्ता दाखवला जातो किंवा मग रस्त्यावर सोडले जाते. मनोरुग्णांना काही दिवस नातेवाईक बघायला येतातही; पण नंतर नंतर तेही कमी होत जाते आणि नंतर तर ते येणे पूर्णपणे बंद होते. रस्त्यावर सोडल्या जाणाऱ्यांना तर उपाशीतापाशी भटकण्याशिवाय पर्याय नसतो. अशा स्थितीत त्यांचे पुनर्वसन हे एक आव्हान ठरते आणि या कठीण आव्हानात्मक कार्याला प्रज्ञाताई धैर्याने सांभाळत आहे.

जग काय म्हणेल याचा विचार न करता प्रज्ञा ताईने सुरू केलेले अथक प्रयत्नच तिला आपल्या कामाचे समाधान देत आहेत. आजही आनंदाने ती सगळे करते आहे. तिला मदतीचा हात देऊन तिच्या सोबतीने चालण्याचे उत्तरदायित्व आपल्याकडे आहे. आपण ही समाजाचे देणं लागतो ह्या भावनेतून तिला केलेली मदत ही लाखमोलाचा आनंद देणारी ठरणार आहे. फोन करूनही तिला विचारून आपण मदत करू शकतो. म्हणून तिचा नंबर देण्याचे प्रयोजन आहे. तिच्या परवानगीने संपर्क क्रमांक दिलेला आहे.
फोन करून तिला विचारून आपण सत्पात्री दान करावे हीच सदिच्छा आहे. एकदा या घरकुल सेवा प्रकल्पाला भेट देऊन त्यांच्या सोबत थोडा क्षण व्यतीत करुन बघा. मला खात्री आहे की यांना भेटून आपल्याला आत्मिक समाधान भेटेल.

डॉ.सौ. प्रज्ञा प्रमोद राऊत
संपर्क- ०९९७०४२५९४५
श्रीकृष्ण शांतिनिकेतन,
पत्ता:- राकेश हाऊसिंग सोसायटी ,ले आऊट,क्र.०३,प्लॉट न.८८ व ८९ ,शौर्या इस्टेट जवळ,बेलतरोड़ी,नागपूर.

सर्वेश फडणवीस 

#आयुष्य_जगणारी_माणसं

No comments:

Post a Comment