काही माणसं त्यांच्या कामांमधून कायमच लक्षात राहतात. मनाच्या कोपऱ्यात त्यांच्यासाठी एक कप्पा असतोच. असेच एक हरहुन्नरी,कार्यकुशल, तडफदार आय.पी.एस. अधिकारी विश्वास नांगरे पाटील. आज विश्वास नांगरे पाटील खरंतर एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे बरेच व्हिडिओ कॉलेजपासून बघत आलो आहे. सहज,सोपे आणि आपले वाटणारे शब्द मनाला स्पर्शून जाणारे वाटतात. सध्या नाशिक शहराचे पोलीस कमिशनर या पदावर ते कार्यरत आहेत. महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना स्पर्धा-परीक्षेसाठी सतत मार्गदर्शन करणारे हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांच्या व्याख्यानात ते व्यक्तिमत्त्व विकासावर कायमच भर देत असतात. त्यांची अनेक व्याख्याने यू ट्यूबवर बघायला मिळतात आणि ही आज आपल्यासाठी अतिशय प्रेरणादायी गोष्ट आहे.
मध्यंतरी त्यांचे पुस्तक वाचनात आले. विश्वास नांगरे पाटील लिखित राजहंस प्रकाशित " मन में है विश्वास ". ह्या लॉकडाऊन च्या काळात बरीच पुस्तकं पुन्हा वाचतांना नव्याने कळायला लागली आहेत. आत्मकथनपर पुस्तकं वाचताना वेगळाच माहोल बनत असतो. खरंतर आत्मकथनात लेखक प्रत्यक्ष संवाद साधत असतो इतकं ते लेखन मनाला स्पर्शून जात असतं.
दहावी, बारावी.नंतर काय? असा प्रश्न तरुण पिढीसमोर कायमच असतो. त्याचं उत्तम उत्तर म्हणजे- ‘मन में है विश्वास’ हे पुस्तक असंच म्हणता येईल. सांगली जिल्ह्यातील कोकरूड या छोट्याशा खेडेगावातील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगतो (IPS) अधिकारी होतो स्वकार्य, कर्तृत्वाने राष्ट्रपती शौर्य पुरस्काराचा मानकरी ठरतो, तसेच तरुणाईच्या मनातील मानबिंदू होतो, ही सहजसोपी गोष्ट नाही. हा प्रवास ही सोपा नाही. अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा प्रवास कायमच प्रेरणादायी असतो.
स्वतःच्या भूतकाळात खोल उतरून यू.पी.एस.सी. त यशाच्या मार्गक्रमणेचा अर्थ लावू पाहणारा भावड्या प्रत्येक अनुभव इतक्या पोटतिडकीने मांडतो की आपली संवेदनशीलता क्षणभर थरारून उठते. भावड्याला बोलायचंय ते आपल्या गावाविषयी, आईवडिलांविषयी, नातेवाईक, मित्र, गुरूजनवर्ग स्वतःच्या अपार संघर्षाविषयी, यातनांविषयी, त्याच्या मनोविश्वाला व्यापून असणाऱ्या प्रत्येक घटनेविषयी, त्याला पराभूत करू पाहणाऱ्या वृत्ती-प्रवृत्तीविषयी, आशा-निराशा, यश अपयश, स्वप्न आणि भ्रमनिरास या साऱ्याविषयी. अशी अनेक वलयांच्या भोवती आशयसूत्रे असलेला एक कॅलिडोस्कोप म्हणजे ‘मन में है विश्वास’ हे आत्मकथन म्हणता येईल. अतिशय सहज सुंदर ओघवत्या भाषेत अगदी प्रांजळपणे स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून आपल्या हातून घडलेल्या चुका, अविचार सर्व काही हातचं राखून न ठेवता अतिशय मोकळेपणाने लेखकाने आपली कथा यात सांगितली आहे.
खरंतर यश हे त्यागाशिवाय व भोगाशिवाय प्राप्त होत नाही. अपयश येऊनही न डगमगता खंबीरपणे त्या परिस्थितीला सामोरा जातो तोच खरा यशस्वी होतो. हाच विचार या आत्मकथनात नांगरे- पाटील सर आपल्याला सांगतात. प्रत्येक व्यक्तीच्या यशाचे कारण कुणीतरी असते. विश्वास नांगरे पाटील यांनाही जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कुणी भेटत गेले व मार्ग दाखवत गेले आणि ते घडत गेले नव्हे आजही ते कार्यरत आहेत.
आत्मकथन मुख्यतः आमच्या सारख्या तरुणांसाठी असले तरी प्रत्यकाने वाचण्यासारखं हे पुस्तक आहे. सतत यश-अपयश, नैराश्याच्या गर्तेत उसळणारी मनस्थिती, तरी परत फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी मारण्याची जिद्द, त्यांच्या भावनिक घुसमटीचा हा २३ वर्षांचा जीवनपट ताकदीनं उभा राहिला आहे. प्रसंगाचे फार तपशील न देता संवादावर भर, उत्तमोत्तम कविता, सुंदर बोधप्रद वाक्यरचना, उत्तम भाषा यामुळे आत्मकथनाला कलात्मक सौंदर्यदेखील प्राप्त झालं आहे आणि तेच कुठंतरी आपल्याला प्रेरणा देणारे ठरते. आज लॉकडाऊन च्या दिवसात मनाला मरगळ येत असतानाच ही अशी पुस्तकं ऊर्जा आणि उभारी देतात. एके ठिकाणी ते आपल्या पुस्तकात म्हणतात की, विद्यार्थीदशेतले वय,घाम,गाळायचे आहे. रोज काहीतरी नवीन शिकायचे आहे. परिस्थिती बदल यासाठी फक्त इच्छा शक्ती पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न,आत्मविश्वास व कष्टाच्या जोरावर चटके-फटके सहन करत आयुष्याची शर्यत जिंकता येते आणि आज हेच कुठेतरी योग्य वाटतं आहे. ह्या आलेल्या परिस्थितीत आपल्याला एक सकारात्मकता आणि प्रेरणा देणारे हे पुस्तक संग्रही असावे असेच आहे. विश्वास नागरे पाटील सरांची कारकीर्द अशीच उत्तरोत्तर बहरत जावी हीच सदिच्छा. वाचतांना त्यांच्या माझा कट्टाची आठवण ही सहज होते. कारण यातील बरेच अनुभव त्यांनी त्यावेळी सुद्धा मांडले होते. मन में है विश्वास हा मंत्र देण्याचे सामर्थ्य त्यांच्या पुस्तकात जाणवतो. तेव्हा नक्की वाचा..मन में है विश्वास...
✍️ सर्वेश फडणवीस
#vishwasnangarepatil #विश्वासनांगरेपाटील
No comments:
Post a Comment