श्री.श्रीनिवास वर्णेकर - सौ.वंदना वर्णेकर !! हे दाम्पत्य भगवद्गीतेची गोडी लावणारे,गीतेचा अभ्यास करणाऱ्या व गीता मुखोद्गत करण्यासाठी कायमच तत्पर असलेले दाम्पत्य आहेत. गीता- वेदांच्या अखेरच्या रचनेतील प्राचीन भारतीय ग्रंथ आहे आणि ह्याचसाठी सद्गुरुंच्या आज्ञेने ह्यांचा नित्य गीता अभ्यास वर्ग सुरू असतो. सात दिवस रोज वेगवेगळ्या ठिकाणी गीता पठण व चिंतन करण्याच्या उद्देशाने त्यांचे वर्ग सतत सुरू असतात.
भगवद्गीता हा ग्रंथ भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाचा मुकुटमणी आहे. मानवी जीवनाला उत्तुंगतेकडे नेणारे ते एक यथार्थ जीवनदर्शन आहे. गीता हे शास्त्र आहे. गीता हे काव्य आहे. गीता हे तत्त्व आहे. गीता ही विद्या आहे. गीता हा संवाद आहे आणि गीता हे दर्शन आहे. गीता हे नुसते शास्त्र नाही, तर शास्त्रांचेही शास्त्र आणि सकल शास्त्रांचे विश्रांतीस्थान आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला "योगोपनिषद" किंवा "गीतोपनिषद" म्हंटले जाते. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे,ह्याचे मार्गदर्शन करतो. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो आणि त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला मोक्षशास्त्र म्हंटले गेले आहे.
प्रज्ञाभारती डॉ. श्री.भा.वर्णेकर ह्यांनी आपल्या मुलांवर लहानपणापासून गीतेचे संस्कार केले. पाचवीत असतांना मुलांना गीता पाठांतर करायला सुरुवात केली. त्या वयात जे पाठ होतं ते पुढे कधीही विसरत नाही. त्यामुळे गीतेचे १८ अध्याय श्रीनिवास वर्णेकर व अन्य भावंडांना मुखोद्गत होते. श्री.भा. स्वतः संस्कृत उत्तम जाणणारे होते,अनेक ग्रंथ लेखन त्यांनी केले होते, मुलांनी जेव्हा गीतेचा अर्थ विचारला तेव्हा त्यांनी सांगितले की रोज गीतेचे पाठ करतांना अर्थ तुम्हालाच तुमचा उमजेल आणि तसेच झाले परम श्रद्धेय गोविंददेवगिरी यांच्या गीता साधना शिबिरात गेल्यावर स्वामींजीच्या मुखातून गीतेचा अर्थ समजला आणि हळूहळू पुढे रोज जनार्दन योगाभ्यासी मंडळात गीतेचा एक श्लोक व त्याचे चिंतन मांडण्याची सूचना आ.राम खांडवे गुरुजींनी दिली आणि आजही संपूर्ण आठवडा त्यांचा याच कार्यासाठी विविध ठिकाणी गीता शिकवण्यासाठी जातो. सौ.वंदना वर्णेकर ह्यांचा सुद्धा स्वतंत्र अभ्यास व चिंतन आहे आणि गीतेबद्दल गोडी त्या निर्माण करत आहेत. त्या म्हणतात की रोज एका श्लोकाचे चिंतन व मनन केले की,जीवन समृद्ध व प्रपंच सुखी झाल्याशिवाय राहणार नाही.
खरंतर गीतेमध्ये ज्ञान आहे,भक्ती आहे, कर्म आहे आणि या सर्वांना जोडणारा विवेक आहे. या तिन्हींच्या समन्वयाचे विवेकदर्शन म्हणजे गीता होय. ज्ञानरसाच्या आनंदोत्सवाने भारलेली गीता प्रासादातील १८ प्रसन्न आणि समृद्ध दालने आहेत. कोणत्याही दालनात प्रवेश करावा आणि ज्ञानाची व आनंदाची अनुभूती घेऊनच तृप्त व्हावे, हेच गीतेचे मोठेपण होय. गीतेची व्याप्ती वैश्विक आहे. तिची शिकवण जातीधर्माच्या बंधनापलीकडील आहे. जगातील सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक ग्रंथांपैकी मानली जाणारी गीता, ही आयुष्याला सत्य आणि सदाचाराचा मार्ग दाखवणारी नैतिक दिशादर्शक आहे. गीतेच्या अभ्यासातून मिळणारी शांती आणि भव्यता अतुलनीय आहे. कृष्णाने सांगितलेले पूर्ण सत्य म्हणजेच ही गीता; श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर दिलेले ज्ञान,तत्त्वज्ञान हे सर्व गीतेत उलगडत जाते. आजही गीतेतल्या आध्यात्मिक ज्ञानाने जगभरात लाखो लोकांचे आयुष्य उजळून टाकले आहे. त्यांना एक नवा दृष्टिकोन दिला आहे.
आज सत्तेची, प्रसिद्धीची, ऐश्वर्याची नशा मनुष्याला एक प्रकारच्या भोवऱ्यात अडकवते आहे. या उलट अध्यात्म मनाला आनंद देतो असतो,ते तुम्हाला फुलवू शकते. तुमच्यातल्या सकारात्मक बाबी खुलवू शकते. म्हणूनच तुमच्या मनाची दिशा यामुळे बदलू शकते. गीता ही आयुष्यात वरची पातळी गाठण्याची पायरी आहे. आत्मपरीक्षण, संयम, ध्यान आणि अर्थातच दया या सगळ्यांमुळे आयुष्य कसे समृद्ध होते याची शिकवण गीता देते. यामुळे एका विचारावरून दुसऱ्या विचाराकडे धावणारे चंचल मन यामुळे शांत होते. ज्यावेळी श्रीनिवास मामांशी ह्याविषयी बोलणे झाले तेव्हा ते म्हणाले, वास्तविक गीतेचे महत्व शब्दांनी वर्णन करता येत नाही कारण हा अत्यंत रहस्यपूर्ण ग्रंथ आहे. प्रत्येकवेळी वाचतांना त्याचे नवनवीन अर्थ प्राप्त होतात. म्हणूनच हजारो वर्षे झाली तरीही त्याची गोडी अवीट आहे. आपले कार्य उत्तरोत्तर सातत्यपूर्ण व्हावे हीच आजच्या निर्जला एकादशीच्या निमित्ताने श्री भगवंताचरणी प्रार्थना.
✍️ सर्वेश फडणवीस
#आयुष्य_जगणारी_माणसं
👍👍👏
ReplyDeleteThanks bhai😊👍
Delete