प्रा.चंद्रकांत चन्ने !! चित्रकलेच्या माध्यमातून गेली ४५ वर्ष बसोलीच्या चित्रचळवळीतून बालविश्वात आत्मविश्वास निर्माण करणारे एक चित्रजादूगार म्हणून त्यांचा गौरव होईल. चित्रकार प्रा.चंद्रकांत चन्ने हे कला इतिहासाचे अभ्यासक असले तरी प्रामुख्याने ‘बसोली’ या बालचित्रकला-विषयक कला चळवळीतील लक्षणीय कार्याबद्दल नागपूर व भारतात प्रसिद्ध आहेत. बसोली ही भारतीय चित्रकला क्षेत्रातील प्रसिद्ध चित्रशैली आहे त्याची सुरवात हिमाचल प्रदेशातील बसोली ह्या पहाडी गावातील लघुचित्र मालिकेतून झाली असे सर सांगतात. आज नागपूरमधील बालचित्रकारांच्या बसोली ग्रुप ने हीच संकल्पना पुढे नेली आहे.
खरंतर माणसाला जगायला शिकवते ती म्हणजे कला आणि माणूसपणाच्या जगण्याला एक उंची देते ती म्हणजे सुद्धा कला आहे. दररोजच्या कंटाळवाण्यातून हवाहवासा वाटणारा विरंगुळा म्हणजे कुठलीही कला कारण कला जगण्याला सौंदर्य प्रदान करते आणि ह्या कलेमुळे जगणे अधिक सुसह्य होत जाते त्यातली अनेकांच्या जवळची,अनेकांना उपजत असलेली कला म्हणजे चित्रकला. शब्दांपासून दूर नेण्याची ताकद ही चित्रात असते. चित्रं ही माणसाच्या मनात विचारांची स्पंदने निर्माण करतात आणि चित्र आपल्याला विचारांनी समृद्ध करत असते.
सध्या रंगांच्या दुनियेत स्वतःला हरवणारे बालपण आता मोबाईलच्या दुनियेत हरविल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. अशावेळी मुलांच्या हातून अलगद मोबाईल बाजूला काढून ठेवत रंग,ब्रश, पेन्सिल ह्यांच्या सोबतीने रंगाची सफर घडवणारे बसोलीचे बापमाणूस चित्रकार प्रा.चंद्रकांत चन्ने सर आहेत. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या व्यक्तिमत्त्वाचे स्पंदन अनुभवण्यासाठी एकदा सरांना भेटायला पाहिजेच किंवा निदान बोलायला तरी हवेच. मी स्वतः शालेय जीवनात बसोलीच्या शिबिरात गेलो आहे आणि सरांचा चित्रांवरचा आनंद अनुभवला आहे. ‘लाल कावळा,पिवळा राघू, बंधन नाही कशाचे, काढू फांद्या जमिनीलागून,आकाशाला मुळे, आम्ही बसोलीची मुले’ या गीतातील शब्दांप्रमाणे उन्मुक्त, निर्भीड आणि दिलखुलास चित्रांच्या दुनियेत भटकायला कुणाला आवडणार नाही ? जर ती भटकंती करायची असेल तर चंद्रकांत चन्ने सरांच्या सानिध्यात ते अनुभवता येते. बालगोपालांच्या आनंदी दुनियेचे शिल्पकार म्हणजे चन्ने सर आहेत.
आज लहान मुलांना त्यांच्या भावविश्वाच्या अनुरूप चित्रांमधून व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आणि शिकवण देणारी तसेच त्यांचा आत्मविश्वास जागविणारी अनोखी चित्र चळवळ सरांनी सुरू केली आहे. सध्या लॉकडाऊन च्या काळात मुलांना चित्राची आवड निर्माण व्हावी म्हणून सरांनी अभिनव उपक्रम सुरू केले आहेत. त्यातीलच 'रंगसेतू-कुटुंब रंगलय रंगात' ह्या कुटुंब ऑनलाइन चित्र स्पर्धेचे आयोजन यशस्वीरित्या संपन्न झाले. बसोलीच्या शिबिरात मुलांना खोडरबर दिला जात नाही. काहीही खोडायचे नाही. मुलांना जपा, त्यांना वेळ द्या,त्यांना त्यांच्या भावविश्वात रममाण होऊ द्या आणि त्यांच्या भावनांवर आपले मत थोपवू नका, हेच सरांचे पालकांना सांगणे आहे आणि याच साठी त्यांचा अट्टहास आहे. आज मोठेपणाचे ओझे उतरवून सर सहज मुलांत रमतात,त्यांच्यातले एक होतात आणि त्यातून सरांप्रती सहज आत्मीयता निर्माण होते. बसोली आता ललित कला चळवळ झाली आहे. उन्हाळा सुट्टी सुरू झाली की सगळ्यात पहिले चाहूल लागते ती बसोलीच्या निवासी शिबिराची. गेल्या ४५ वर्षांत बसोली ग्रुप नावाने परिचित झालेल्या या चित्रचळवळीत लाखो विद्यार्थी सहभागी झाले आहेत आणि होत आहेत.
एकाच घरातील तिसरी पिढी सुद्धा आज येथे येत आहे. बसोलीच्या शिबिरात फक्त नागपूरच नाही तर अगदी गडचिरोली,अहेरी पासून लंडन,अमेरिका येथून सुद्धा मुले येतात. मुलांची चित्रे भलेही सरळ साधी असतील, पण ती बालिश नसतात, ही तळमळ सरांच्या वागण्यातून सदैव व्यक्त होत असते. सरांचे कार्य प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. अनेक पुरस्कारांची श्रीमंती सरांच्या पाठीशी असून सुद्धा लहान मुलांच्या विश्वात ते सहज रमतांना दिसतात. कुठेही पुरस्कारांचे मोठेपण जाणवत नाही. त्यांच्याशी बोलतांना सुद्धा अतिशय आपुलकीने आणि दिलखुलासपणे व्यक्त होतात.
चित्रकलेपासून होणारा आनंद सार्वजनिक स्वरूपाचा असतो. एकदां चित्र काढून तयार झालें कीं त्यांतील आनंदावर कोणाची सत्ता असूच शकत नाहीं कारण लहान मुलांची चित्रे मोठा आशय घेऊन येतात,ती समजायला पालक,शिक्षक आणि समाज यांनी मुलांशी संवाद साधला पाहिजे, त्यांना वेळ दिला पाहिजे हाच सरांचा अट्टहास आहे आणि ह्याचसाठी त्यांचे कार्य सुरू आहे. सरांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. परमेश्वराने त्यांना निरामय आरोग्यप्रदान करावे हीच प्रार्थना आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
#आयुष्य_जगणारी_माणसं
Khoop chan...
ReplyDelete