डॉ.लीना रस्तोगी !! संस्कृत साहित्यिका,व्याख्याता,संत साहित्य अभ्यासिका,अनेक ग्रंथ प्रकाशित सिद्ध लेखिका असल्या तरी विदुषी या शब्दांत यथार्थपणे त्यांच्या कार्याचा गौरव करता येईल. "मूर्ती लहान कीर्ती महान"अशा लीना ताई आहेत. आज अनेक पुरस्कार प्राप्त असून सुद्धा प्रसिद्ध पराङ्गमुख राहत आजही ज्यांचे नियमित लेखन सुरू आहे.
संस्कृत ही भाषांची जननी आहे. ती जनभाषा होती हे लक्षात घेऊन तिचे ज्ञानभाषा म्हणून असलेले महत्त्व आजही कायम आहे. भाषा हे निव्वळ अभिव्यक्तीचे साधन नसून ते मनुष्याच्या सामाजिक ओळखीचे एक महत्त्वाचे माध्यम असते. जात,धर्म,देश यांच्याबरोबरीनेच भाषा या संकल्पनेभोवतीदेखील सामूहिक अस्मिता विणली जात असते. संस्कृत ही जगातील सर्वात प्राचीन भाषा आहे. सर्व भारतीय भाषांची जननी म्हणजे संस्कृत भाषा आहे आणि ह्या भाषेच्या प्रचार आणि प्रसार ह्यासाठी लीनाताई आजही तत्पर आहेत. आजही संस्कृत एकांकिका लेखन,त्रिवेणी लेखन अर्थात ललित,वैचारिक,सामाजिक लेखन संस्कृत भाषेतून सुरू आहे. संस्कृत भवितव्यम हे नागपूरातील संस्कृत भाषा प्रचारणी सभेचे मुखपत्र आहे. सतत ६५ वर्षांपासून प्रकाशित होत असलेलं हे, एकमेव वैश्विक संस्कृत साप्ताहिक आहे.सध्याच्या विद्यमान संपादिका म्हणून कार्यरत आहेत.
आजचे युग हे विज्ञानाच्या चमत्काराचे युग मानले जाते. परंतु वैज्ञानिकांनाही थक्क करून सोडणारा, तर्कापलीकडचा एक चालता बोलता चमत्कार या विसाव्या शतकातही घडला आहे. आपल्या महाराष्ट्रात घडला आहे. प्रज्ञाचक्षु गुलाबरावमहाराज. लीनाताईंची संस्कृत,मराठी,हिंदी भाषेत गुलाबराव महाराजांवर विपुल ग्रंथसंपदा आहे.
आज राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषदेत त्या विशेष आमंत्रित असतात. अनेक विश्व विद्यालय,महाविद्यालयात व्याख्याता म्हणून त्यांना आमंत्रित केले जाते,अनेक नाटय एकांकिका त्यांनी संस्कृत मध्ये लिहिल्या आहेत आणि रंगमंचावर त्याचे सादरीकरण सुद्धा झाले आहे. International centre for cultural studies ह्याच्या स्थापनेपासून त्या जुळून आहेत. आजही अनेक व्याख्यान व प्रवचनांसाठी त्यांचा देशभर प्रवास सुरु असतो. संस्कृत व संस्कृती विषयक तीस मराठी ग्रंथ व अनेक संस्कृत ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली आहे. संस्कृत मध्ये नारदीय कीर्तन त्यांनी सादर केले आहे. आजही अनेक संस्कृत व्याकरण कार्यशाळेत त्यांचा विशेष सहभाग असतो. संस्कृत भाषेच्या भवितव्याच्या दृष्टीने त्या सतत कार्यमग्न असतात. सेवा निवृत्ती झाल्यानंतर ही त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना निःशुल्क संस्कृत शिकवत आहे. २००७ पासून गीतावर्ग ही घेत आहेत. गीतेची संथा,अर्थ आणि विश्लेषण करत त्याचे नियमित वर्ग सुरू आहे. आजवर २०० हुन अधिक जण गीता शिकले आहेत आणि त्यातील काहीजण स्वतः गीतावर्ग घेत आहेत.
हिंदू धर्म तत्त्वज्ञानाचा गाभा म्हणून ज्या प्राचीन दशोपनिषदांना मानले जाते ती बहुतेक सर्व इ.स.पू. १००० पर्यंत रचली गेली असावीत. उपनिषदांना जरी वेदांत म्हणजे ‘वेदांचाच शेवटचा भाग’ असे म्हटले जाते तरी ते सयुक्तिक वाटत नाही. कारण यांचा रचना-काळ हा ऋग्वेद रचनेच्या सुरुवातीनंतर सुमारे दीड हजार वर्षांनंतरचा काळ आहे. त्यामुळे त्यांची भाषाही वेगळी आहे.वैदिक साहित्यात उपनिषदे ही सर्वात शेवटी येतात म्हणून त्यांना ‘वेदान्त’ असेही म्हटले जाते. आज लीना ताईंचा उपनिषदांचा वर्गही सुरू आहे. २०१४ पासून त्यांनी ह्या वर्गाची सुरुवात केली. आतापर्यंत ईश,केन,कठ, प्रश्न,मुंडक,मांडुक्य उपनिषदांचे वर्ग पूर्ण झाले आहेत. आजवर जेवढे उपनिषद ग्रंथ उपलब्ध आहेत त्याचा अन्वय,अर्थ आणि त्यावरील भाष्य लिहून ते प्रकाशित करण्याचे खूप मोठे कार्य सुरू आहे. जवळपास ५ खंडांमध्ये ते प्रकाशित होण्याची शक्यता आहे. पहिला ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहे. बाकी ४ खंडात इतर उपनिषदांचा अन्वय,अर्थ आणि त्यावरील भाष्य ह्याचे कामही पूर्णत्वाच्या दिशेने आहे.
डॉ.लीना रस्तोगी म्हणजे संस्कृत भाषेला मिळालेले एक मोठे देणं आहे. संस्कृत भाषेतल्या शीघ्र कवी म्हणून त्यांची ओळख यथार्थ होईल. यावयातला त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे. आज त्यांचा संस्कृत संभाषणाचा कायमच आग्रह असतो. त्या म्हणतात की जिभेचा उत्तम व्यायाम म्हणजे संस्कृत उच्चारण आहे. संस्कृत शब्दसंपदेच्या त्या धनी आहेत. खरंतर त्यांना संस्कृत शब्दावलीचा चालताबोलता ज्ञानकोष म्हणणेच यथार्थ ठरेल. अतिशय नम्र,शालीन आपुलकी आणि सहजपणा यामुळे त्या आपल्याला वेगळ्या अशा वाटतच नाही. आज त्यांच्या कार्याचा आलेख बघितला की आपण थक्क होतो. सध्या त्या बंगाली भाषेचा अभ्यास करत आहेत. त्या म्हणतात की,बंगाली भाषा मुळात अतिशय मधुर आहे तर त्यातील साहित्य ही तसेच आहे. मूळ साहित्य वाचनासाठी त्यांचा सध्या बंगाली शिकण्याची तयारी सुरू आहे. आणि पुढे अनेक चांगले साहित्य त्यांच्या अनुवादित पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळतील हा विश्वास वाटतो. प्राकृत ज्ञानभाषा अर्थात संस्कृत भाषा आणि या ज्ञानभाषेची विदुषी हेच संबोधन त्यांना यथार्थपणे लागू होईल. डॉ.लीना रस्तोगी ह्यांना श्री भगवंताने निरामय आरोग्य प्रदान करावे हीच प्रार्थना आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
#आयुष्य_जगणारी_माणसं
Excellent narration of a tall personality
ReplyDeleteThank You so much🙏
Delete