Monday, June 22, 2020

मेघदूत- एक विरह काव्य !!

आज पाऊस सर्वदूर दाखल झाला आहे. पावसाची चातकाप्रमाणे वाट बघणारा माणूस आज आनंदी आहे. मेघ म्हंटला की सहजपणे मेघदूत आठवतं मग कालिदास,आणि रामगिरी अर्थात रामटेक ह्याचा संबंध आलाच. मेघदूताची गोडी प्रत्येक प्रांतामधील लोकांना लागली आहे. संस्कृत साहित्य विषयक रुची असलेल्या लोकांना याबद्दल विलक्षण प्रेम आहे. मेघाला दूत बनवून प्रियतमेला संदेश पाठविणाऱ्या विरही यक्षाची कथा आजही तशीच चिरतरुण आहे.  ११६ श्लोकांत महाकवी कालिदासाने विरही यक्षाच्या वेदनेचं अचूक वर्णन केलंय. मेघदूताची दीडशेहून अधिक रूपांतरं झाली. मंदाक्रांता वृत्तात लिहिलेल्या या काव्याचं त्याच वृत्तात मराठी रूपांतर केलं कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी. ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर आणि कवयित्री शांता शेळके यांनाही ‘मेघदूत’ मराठीत आणले आणि त्यांनी कालिदासच्या काव्याचं रसाळ रूपांतर केलं. मात्र केवळ कवी मंडळींनाच ‘मेघदूता’ने भुलवलं असं नाही तर ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि भारताचे पहिले अर्थमंत्री असलेल्या चिंतामणराव देशमुख यांनाही ‘मेघदूत’ मराठी भाषेत आणले त्यानंतर अनेकांनी आपापल्या परीने या अमर काव्याचा अनुवाद केला. आज आषाढस्य प्रथम दिवसे अर्थात कालिदास दिन.

कालिदासाच्या ‘मेघदूता’तील ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ ही एका श्लोकाची सुरुवात प्रचारासारखी रूढ झाली. मात्र तो ‘मेघदूता’चा आरंभ नव्हे. कालिदासाच्या कुमारसंभव आणि मेघदूत या काव्यांच्या निर्मितीची एक गमतीशीर कथा आहे. ती कथा असं सांगते की, सुशिक्षित राजकन्येचा पती झालेला कालिदास अगदीच अडाणी होता. तेव्हा पत्नीने त्याला ज्ञानप्राप्ती करून येण्यासाठी घराबाहेर पाठवलं. कालांतराने कालिदास प्रज्ञावंत होऊन परतला तेव्हा त्याच्या पत्नीने पहिला प्रश्न विचारला, ‘‘अस्ति कश्चित् वाग्विशेष?’’ म्हणजे “तुझ्या बोलण्यात (ज्ञानात) काही बदल झाला आहे का?’’ त्यावर बुद्धिमान झालेला कालिदास हसून म्हणाला, ‘‘तू हा जो प्रश्न विचारलास त्यातील प्रत्येक अक्षराने आरंभ करून मी काव्यरचना करीन.’’

मग ‘‘अस्ति उत्तरस्य दिशी देवतात्मा’’ अशी सुरुवात करून त्याने ‘कुमारसंभव’ या काव्याची रचना केली. ‘कश्चित् कांता विरहगुरुणां’ या शब्दांनी ‘मेघदूता’चा आरंभ केला आणि ‘रघुवंशा’च्या सुरुवातीला ‘वागर्थाविव संपृक्तो’ अशी शब्दयोजना केली. कदाचित या तीनही काव्यांच्या रचनेनंतर कुणीतरी ही कल्पक कथा रचली असेल.

कालिदासाच्या ‘मेघदूता’चा आणि महाराष्ट्राचा जवळचा संबंध आहे. कुबेराच्या शापाने एक वर्षाचा पत्नीविरह नशिबी आलेला यक्ष अलकानगरीतून फिरत फिरत नागपूरजवळच्या रामगिरी म्हणजे रामटेक येथे येऊन विसावला. तिथे त्याच्या विरहव्याकूळ मनाला आषाढाच्या पहिल्या दिवशी एक मोठा ढग दिसला आणि उत्तरेकडे जाणाऱ्या त्या मेघाला पाहून यक्षाने आपल्या पत्नीला संदेश देण्याची विनंती केली. तोपर्यंतच्या काळात राजहंसासारखे पक्षी दूताचं काम करून पत्र पोहोचवत असत. शिकवलेल्या पक्ष्यांचा उपयोग त्या काळी संदेशवहनासाठी होत असे, परंतु बाष्पयुक्त धूसर असलेल्या निर्जीव मेघाला ‘दूत’ बनवण्याची अद्वितीय कल्पना कवी कालिदासाला स्फुरली. मग त्या मेघाशी त्याचं हितगुज सुरू झालं. रामगिरी ते अलकानगरी आणि मध्ये उज्जयिनी असा प्रवास तो मेघ कसा करील, त्याला वाटेत काय काय दिसेल, विरही पत्नी किती दुःखाश्रू ढाळत असेल हे सारं कालिदासाचा यक्ष का मेघाला सांगतो हे सारंच वर्णन उत्कट आणि भावमधूर आहे. ‘मेघदूत’ हा कालिदासाच्या प्रतिभेचा अप्रतिम आविष्कार आहे. त्याचा प्रभाव नंतरच्या अनेक कवींवर पडला. शिलर या जर्मन कवीने मेघदूत वाचून त्याच्या कथानकातील राणी मेघाबरोबर संदेश पाठवते असं लिहिलं. आणि आज हे प्रयोगाद्वारे सिद्ध ही झाले आहे. ते मेघ उत्तरेकडून रामटेक पर्यन्त आलेले होते.

कालिदास हा संस्कृतमधला श्रेष्ठ नाटककार. शाकुंतल, मालविकाग्निमित्रम्, विक्रमोर्वशीयम् अशी त्याची अनेक नाटकं प्रसिद्ध आहेत. त्यापैकी ‘शाकुंतल’ची गोडी अनेकांना मोहात पाडणारी ठरली. जर्मन कवी गटे ‘शाकुंतल’ डोक्यावर घेऊन नाचला असं म्हणतात. याच ‘शाकुंतला’ची कथा घेऊन अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेलं ‘शाकुंतल’ हे संगीत नाटक आधुनिक मराठी संगीत नाटकाच्या परंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवात करणारं ठरलं. कालिदास हा चपखल ‘उपमा’ अलंकार वापरण्यासाठी प्रसिद्ध मानला गेला. ‘उपमा कालिदासस्य’ असंच म्हटलं जातं. अशा या जागतिक कीर्तीच्या महाकवीचं काव्य मेघदूत.  कालिदासाच्या कलाकृती आजही सर्वांच्या मनात रुजल्या आहेत आज नागपूर आणि रामटेक या ठिकाणी कालिदास महोत्सव ही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. महाराष्ट्र सरकारने कालिदास स्मारक छान सुशोभित केला आहे. पण लोकांनी त्याची अवस्था दयनीय केली आहे. कालिदासाचे स्मरण करताना ज्या मेघदूताची रचना झाली त्या स्मारकाचे जतन करण्याची जबाबदारी आपली आहे. सरकारने ही पुन्हा त्याचे सौंदर्य करावे हीच इच्छा आहे. कालिदास,मेघदूत व रामगिरी याचा संबध वैदर्भीयांसाठी एक अमौलीक ठेवा आहे जो जतन करण्याची जबाबदारी आपली आहे. 

’आषाढस्य प्रथम दिवसे’ मेघदूतं पठामः।
वारंवारं कविकुलगुरुं कालिदास स्मरामः॥
यस्य प्रज्ञा खलु भगवती, लेखनं भावगर्भम्।
नाट्यं, काव्यं मनसि स्वनितं तं कथं विस्मरामः।।

✍️ सर्वेश फडणवीस

 #आषाढस्य_प्रथम_दिवसे #कालिदासदिन


No comments:

Post a Comment