Friday, February 28, 2020

विज्ञाननिष्ठ विवेकानंद !!


२८ फेब्रुवारी अर्थात राष्ट्रीय विज्ञान दिवस. आज आपण ज्या काळात आहोत त्याला २१ वे शतक म्हणून संबोधले जाते. २० व्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांपासून प्राप्त झालेली गतिशीलता आजही कायम आहे.

स्वामी विवेकानंद हे वैज्ञानिक द्रष्टे होते. जगभरातील समान्यांपासून असामान्यापर्यंत सगळ्यांवर छाप सोडणारे प्रभावी व्यक्तिमत्त्व,योद्धा संन्यासी,युवा वृत्ती-प्रवृत्ती चा यथार्थ आविष्कार, युवा चेतना जागृती करणारा सप्ताक्षरी मंत्र “स्वामी विवेकानंद”. 

सदैव चिरविजयाची कामना जागृत करणारे स्वामीजींचे समग्र जीवन आणि चिंतन युवाऊर्जेचा महस्रोत आहे. स्वामीजींचे जीवन म्हणजे मंगलतेचा,उदात्ततेचा,उत्तमतेचा समन्वयच म्हणावा लागेल. वयाच्या ३० वर्षी सार्वजनिक जीवनसागरात स्वामीजी आलेत व पुढे ९ वर्ष सतत ज्ञानप्रसार,संघटन,सेवा या त्रिसूत्रांवर परिव्राजक म्हणून परिभ्रमण करीत राहिले. सतत प्रवास अविश्रांत परिश्रम आणि भारतीय उत्थानाचा ध्यास व त्यावेळी बघितलेले भारताचे विश्वगुरुपदी बसण्याचे स्वप्न या ९ वर्षात श्वास बनून गेला होते.

अध्यात्मिक पथिक असूनही स्वामी विवेकानंदांना विज्ञान विषयाबद्दल विलक्षण आस्था होती. अध्यात्म आणि विज्ञान यांचे वेगवेगळे मार्ग जोडले जाऊ शकतील का ? जोडायचे तर कसे जोडता येतील का ? आणि ते दोन्ही एकत्र येणे शक्य नसतील तर दोन्हींचा उपयोग करून मानवी जीवनाला अधिक सार्थकता कशी प्रदान करता येईल यावर त्यांचे अखंड चिंतन चालत असे. इ.स.१९०१ मध्ये स्वामीजींनी जगाचा निरोप घेतला. परंतु स्वामीजींनी विज्ञान विषयक जे विचार मांडले व विश्लेषण केले ते अधिक ठळकपणे नजरेत भरतात.

शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेला जाण्यापूर्वी स्वामीजींनी खेचरीच्या पंडित शंकरलाल यांच्याशी आपल्या देशात विज्ञानाचा अभाव का? याची बरीच चर्चा केली आहे. त्यांची विज्ञानासंबंधीची आस्था परिषदेनंतरही कायम होती. त्यावेळी आश्रमात विज्ञान आणि वैज्ञानिक प्रयोग चालावेत म्हणून गुरुबंधू, शिष्य व अन्य लोक यांच्यात विज्ञान विषयाबाबत जाणीव व जागृती निर्माण व्हावी,वैज्ञानिक वृत्ती तयार व्हावी हा त्यांचा विशेष आग्रह होता.

१८९३ ला शिकागो धर्मपरिषदेत जाताना प्रवासात जहाजावर स्वामीजी आणि जमशेदजी टाटा यांची भेट झाली. याच भेटीत विज्ञानमय स्वामीजींनी जमशेटजी टाटा यांना नवसृजनाच्या संकल्पना दिल्या. आजची भारतीय विज्ञान संस्था(IISC) बंगळूर ही जगप्रसिद्ध संस्था जमशेटजी टाटा यांनी प्रारंभ केली ती विज्ञानमय स्वामीजींमुळे. आज इनोव्हेशन, मेक इन इंडिया, टेक्नॉंलॉजी ट्रान्स्फर या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या जातात पण या सर्व गोष्टी स्वामी विवेकानंद यांनी पूर्वीच आपल्याकडे आणल्याआहे. 

२२ जून १८९७ रोजी अलमोडाहून स्वामी ब्रह्मानंद याना लिहिलेल्या पत्रात लिहिले होते. “ विज्ञान प्रयोगशाळेसाठी हवे ते संच विकत घ्या,हवे ती उपकरणे घ्या,दर आठवड्यास शशीबाबूने विज्ञान विषयावर व्याख्यान द्यावे,बंगाली भाषेत जितकी पुस्तके तुम्हाला मिळतील तितकी सगळी खरेदी करा आणि ती वाचा.” हा त्याचा विशेष आग्रह लक्षात येतो.

श्रीमती ओली बूल यांना ५ जून १८९६ रोजी लंडनहून लिहिलेल्या पत्रात त्यांनी व्यक्त केलेली भावना ही लक्षणीय आहे. स्वामीजींच्या व श्रीमती बूल या दोघांच्याही एक समान भारतीय परिचिताने इलेक्ट्रीशियन व्हावे अशी इच्छा असल्याचे म्हंटले आहे. भारताला कर्मतत्परता आणि वैज्ञानिक प्रतिभा याची गरज असल्याचे नमूद करत इलेक्ट्रिकल इंजिनिअर भारतात उदरनिर्वाह करू शकेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला होता.

१८९३ साली आधुनिक विज्ञानाने केलेली प्रगती आणि संशोधने यांची माहिती स्वामीजींना होतीच पण याचा जीवनाच्या संदर्भात,तत्वज्ञानाच्या संदर्भात काय आशय आहे यावर देखील त्यांचे सखोल चिंतन होते. आधुनिक विज्ञानाच्या लोंढ्याला त्यातून निर्माण होणाऱ्या मानवी बुद्धीच्या चौकसपणाला उत्तरदेण्याची क्षमता फक्त हिंदू धर्मात आहे हे ठामपणे त्यांनी सांगितले होते. 

विज्ञान व हिंदू धर्म 

पाश्चिमात्य देशात वेदांत तत्वज्ञानाची धर्मध्वजा फडकावून भारतात परतलेले स्वामीजींनी १५ जानेवारी १८९७ साली कोलंबो येथे पाऊल ठेवले. हिंदू धर्माचा गौरव सर्वदूर पोहोचविण्याऱ्या या थोर सुपुत्राचा हिंदू समाजाने सन्मान करण्याचा पहिलाच प्रसंग होता. या सत्काराला उत्तर देताना स्वामीजी आधुनिक विज्ञानाच्या संदर्भात हिंदू धर्माचे स्थान काय? याबद्दल आपले व्याख्यान प्रतिपादित केले, ते म्हणाले . “फिरून एकवार जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती व्हावयास सुरुवात झाली आहे. कारण आज ज्यावेळी आधुनिक विज्ञानाच्या शोधांनी सतत केलेल्या प्रहरांमुळे दृढ व अभेद्य वाटणाऱ्या जुन्या धार्मिक विश्वासाचा पायादेखील खिळखिळा बनून छिन्नविच्छिन्न होतो आहे. ज्यावेळी मानवजातीला स्वतःकडे खेचून घेण्याच्या निरनिराळ्या धर्मपंथाच्या मोठमोठ्या वलग्ना शून्यात विरून जात आहेत. अशावेळी जेथील रहिवाश्यांचे धर्मजीवन अध्यात्मिक तत्वांवर उभारलेले आहे अशा भारताचे तत्वज्ञान भारतीयांच्या धार्मिक आकांक्षामधून उदयास आलेले उत्तम सिद्धांत,जगासमोर येण्यास सुरुवात झाली आहे.” 

हिंदू धर्माचा एवढा गौरव केल्यानंतर एक महत्त्वाचा इशारा देताना म्हणाले “ परंतु त्याचबरोबर हेही लक्षात ठेवा की भारताबाहेरील देशांमध्ये पडणाऱ्या भारतीय धर्माच्या प्रभावासंबंधी बोलताना, ज्याच्या पायावर भारतीय धर्माची इमारत उभारली गेली आहे मूलतत्वे; हाच भारतीय धर्म मला अभिप्रेत आहे. त्याच्या शाखा,प्रशाखा शेकडो शतकांच्या सामाजिक आवश्यकतेनुसार त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या साऱ्या लहान सहान गोष्टी भिन्न प्रथा,रूढी,सामाजिक कल्याण वगैरेचा वास्तविक धर्म या शब्दात अंतर्भाव होऊच शकत नाही.” 

आधुनिक वैज्ञानिक प्रगतीच्या संबंधात हिंदू धर्माचा गौरव करताना ते पुढे लिहितात ‘ धन्य ते प्राचीन ऋषी की ज्यांनी असा व्यापक विस्तारशील धर्म अस्तित्वात आणला आहे की जो,भौतिक क्षेत्रात मानवाला जे काही ज्ञान प्राप्त झाले आहे आणि होणे शक्य आहे,त्या साऱ्यांचे स्वागत करू शकतो. त्याच्याकडे हिंदू आता नव्या दृष्टीने बघावयास शिकला आहे. नव्याने त्याची कदर करु लागला आहे.त्याच्या लक्षात येऊन चुकले आहे की,हे जे सारे आधुनिक शोध त्याच्या स्वतःच्या पूर्वजांनी अंतदृष्टीने, समाधी अवस्थेत शतकांपूर्वी शोधून काढलेल्या सत्यांचा, बुद्धीच्या व इंद्रियांच्या पातळीवरील पुनराविष्कारच होत. म्हणूनच त्याने कशाच्याही शोधात अन्यत्र कुठे भटकण्याची गरज नाही किंवा अन्यत्र फिरण्याचीही जरुरी  नाही. जे अनंत भांडार वारसा म्हणून लाभले आहे ,त्यातूनच थोडे घेऊन ते आपल्या कामी लावण्यानेच त्याचे भागणार आहे. आणि तसे करावयास त्याने सुरुवातही केली आहे आणि उत्तरोत्तर तो अधिक करीलही..’ 

विज्ञान व मानसशास्त्राचे महत्त्व 

मानसशास्त्राचे महत्त्व या विषयाच्या व्याख्यानात स्वामीजी म्हणतात “पाश्चात्य देशात मानसशास्त्राविषयीची कल्पना बऱ्याच खालच्या पातळीवर आहे. मानसशास्त्र हे श्रेष्ठ शास्त्र आहे. परंतु पाश्चात्य देशात ते इतर शास्त्राच्या दर्जाचे मानले जाते. म्हणजे उपयुक्ततेच्या निकषांवर त्याचे मूल्यमापन केले जाते. आपण क्षणभरही आपल्या मनाचे नियंत्रण करू शकत नाही. फार काय मन स्थिरही ठेवू शकत नाही. मानसशास्त्र आपल्याला मनाच्या बेताल भटकण्याला आवर घालण्यास,त्याला इच्छाशक्तीच्या ताब्यात ठेवण्यास आणि मनाच्या जुलमी हुकुमांपासून स्वतःला मुक्त करण्यास शिकवते. म्हणून मानसशास्त्र हे श्रेष्ठ शास्त्र आहे.त्यावाचून इतर सर्व शास्त्रे आणि सर्वज्ञाUन कवडीमोलाचे आहे हा विचार स्वामीजींनी मांडला. मनाचे विश्लेषण मनाकडूनच होते म्हणून मनाचे शास्त्र मानसशास्त्र सर्वश्रेष्ठ आहे.

स्वामी विवेकानंद यांनी केलेले भारतीय समाजाचे,हिंदू समाजाचे प्रबोधन सर्वविदित आहे. पाश्चात्य देशातून परतल्यावर त्यांनी प्रबोधन कार्याला सुरुवात केली असे नाही. पाश्चात्य देशात असतानाही अनेक राजे,महाराजे,सामान्य लोक,विद्वान,पंडित,गुरुबंधू अशा अनेकांना पत्रातून ते संपर्कात होतेच.त्या पत्रातून ज्ञान-विज्ञानाच्या विषयांवर चर्चा ही करीत.

असेच एक पत्र २३ जून १८९४  रोजी म्हैसूरच्या राजेसाहेबांना लिहिले. त्यात धर्म आणि विज्ञान या संबंधी ते लिहितात “साधारणपणे आपले गरीब हिंदू लोक या पाश्चात्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक नीतिमान आहेत. धार्मिक बाबतीत इकडील लोक एकतर ढोंगी असतात,नाहीतर अत्यंत हटवादी असतात. येथे विचारी,समंजस आणि स्थिर मनाच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना भोळसट कल्पनांनी भरलेल्या त्यांच्या धर्मपंथाचा वीट आला आहे. आणि नव्या ज्ञानप्रकाशासाठी ते भारताकडे मोठ्या आशेने बघत आहेत. महाराज,आपल्या पावन वेदांमधील उदात्त विचारांचा मिळेल ते अत्यल्प अंशदेखील हे लोक किती उत्सुकतेने ग्रहण करीत आहेत हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय आपणांस कळणार नाही. याचे कारण हेच की, आधुनिक विज्ञान धर्मावर प्रचंड आघात करीत आहेत त्यांना केवळ वेदच तोंड देऊ शकतात. त्या आघातांमुळे वेदांची मुळीच हानी नाही. जीवात्मा आणि सृष्टी ही दोन्ही अनादि काळापासून परमात्म्याचे जीवितात्म्याचे सर्वोच्च व पूर्ण स्वरूप होय. अशी जी आपल्या परमपावन वेदांची शिकवण आहे तिच्यावर येत्या पन्नास वर्षात जगातील साऱ्या सुशिक्षित लोकांचा विश्वास बसेल. बायबलचा असाच अर्थ लावण्याची सुरुवात आतापासूनच इकडील विद्वान पुरोहितांनी केली आहे. पाश्चात्यांना अधिक अध्यात्मिक सभ्यतेची आवश्यकता असून आपल्या अधिक ऐहिक सभ्यतेची गरज आहे असा माझा निष्कर्ष आहे.” 

आज १२५ वर्षांपूर्वी प्रदर्शित केलेले विज्ञानविषयक विचार तंतोतंत जुळून येतात आहेत. अशा विचारांना आत्मसात करण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या जीवनातून,चिंतनातून त्यांनी सांगितलेल्या वैज्ञानिक दृष्टीकोनातून प्रेरणा घेण्याची हीच वेळ आहे. या देवभूमीला,या स्वर्णभूमीला जगाच्या गुरुपदी बसवण्याची हीच वेळ आहे. साऱ्या क्षमता अर्जित करून सुखनैव त्या भारतमातेच्या चरणी अर्पण करण्याची हीच वेळ आहे. साऱ्या विश्वात युवकांची सर्वाधिक संख्या म्हणून उभ्या राहणाऱ्या भारतवर्षाची उद्याची वाटचाल स्वामीजींच्या विचारांनी झाली तर भारत वैभवशाली बनेलच पण साऱ्या विश्वासाठी ही भूमी आधार देणारी ठरेल. 

“उठा,जागे व्हा,आणि ध्येय प्राप्त केल्याविना थांबू नका” हा स्वामीजींचा संदेश सार्थ करण्यासाठी कटिबद्ध होऊ या. आणि वैज्ञानिक वाटचाल प्रगतीपथावर नेण्यासाठी सदैव तयार असू हाच संकल्प करत स्वामींजींचे विचार आत्मसात केले पाहिजे. विवेकानंद विजयंतेतराम .....

सर्वेश फडणवीस


Thursday, February 27, 2020

आग्रह मराठीचा !!


"माझा मराठाचि बोलु कौतुकें।परि अमृतातेंही पैजां जिंके।
ऐसीं अक्षरें रसिकें।मेळवीन।।"

ही ओवी संत ज्ञानेश्वर माउलींनी सातशे वर्षापूर्वी रचली आहे. आज त्यांनी सांगितलेले आपण किती ऐकतो आहोत हा प्रश्न आहे. दरवर्षी  'जागतिक मराठी दिन' आपण अतिशय उत्साहात साजरा करतो. परंतु भाषेच्या सर्वांगीण विकासाबाबत आपण कायमच उदासीन राहतो.आज  जनता जनार्दनच मराठी भाषेची उपेक्षा करत आहे असे माझे मत आहे. अभिजात भाषेचा दर्जा पात्रतेचे सर्व निकष पूर्ण होत असताना का मिळत नाही,हे एक न उलगडणारे कोडे आहे. प्रत्येकाला मराठीचा अभिमानच नाही तर माज असायला हवा. अमृताशी पैजा जिंकणाऱ्या माझ्या मराठीची आज काय परिस्थिती आहे याचा प्रत्येकाने विचार करावा.

मराठी भाषेचा विचार करता प्रामुख्याने पाच मुद्द्यावर प्रकाश टाकतोय.

• मराठी साहित्य• मराठी बोली• मराठी शाळा• प्रवाही भाषा • भाषा आणि संस्कृती

प्रत्येक काळात अजरामर ठरेल असे समृद्ध साहित्य मराठी भाषेत लिहिले गेले. असंख्य साहित्यिकांनी आपापल्या ताकदीनिशी जमेल तसे  योगदान या मराठी भाषेला दिले.  पण मग चूक कुठे झाली ? मराठी साहित्य आपण खरंच वाचतोय का ? आज मराठी पुस्तक विक्रेत्यांची काय अवस्था झाली आहे हे एकदा त्या पुस्तक विक्रेत्यांकडे जाऊन बघता येईल. या दिवशी आपण एकतरी पुस्तक त्याच्याकडून विकत घेऊन नक्की वाचायला घ्या. त्याला भरपूर आनंद होईल आणि आपल्याकडूनही अक्षर वाङ्मयाची अल्प सेवाही घडेल.

त्यानंतर मराठी- संवादाचे माध्यम. आज मराठी बोलायला सर्वजण घाबरतात, प्रसंगी कमीपणाही वाटतो. हे कुठे तरी कमी व्हायला हवे.  यापुढे दोन मराठी भाषिक एकत्र आले तर मराठीतच बोलण्याचा आग्रह धरूया, मग क्षेत्र कुठलंही असेल. आज नक्की संकल्प करूया, मराठी बोलण्याचा. प्रसंगी इंग्रजी आणि इतर भाषा ही यायला हव्यातच ती काळजी गरज आहेच पण मराठी भाषेप्रती सुद्धा आपले कर्तव्य पार पडायलाच हवे.

त्यानंतर मराठी शाळांचा आग्रह धरूया. निदान प्राथमिक शिक्षण तरी मराठी भाषेत असायला हवं. आजचं स्पर्धेचं युग बघता इंग्रजी भाषा महत्वाची आहेच पण संस्कृती आणि मातीशी नाळ जोडली जाण्यासाठी प्राथमिक शिक्षण मराठीतच व्हायला हवे असे वाटते.आणि ते शक्य नसल्यास घरी पालकांनी थोरल्या मोठ्यांनी तरी आपल्या घरीच प्राथमिक बोली भाषेत तरी मराठी शिक्षण द्यायलाच हवे नव्हे आग्रही असावे असे वाटते.

प्रवाही भाषा- कोणत्याही संवादाची मनातल्या भावनांसह परिपूर्ण अभिव्यक्ती ज्या माध्यमातून समोरच्याच्या मनावर ठसते ते माध्यमच संवादाचे योग्य माध्यम होय असे मला वाटते. जागतिकीकरणाचा डोलारा आज पाश्चात्यांनी सावरल्याने त्यांच्या भाषा आत्मसात केल्याशिवाय पर्याय नाही. मराठीतून संगणक शिकणे, विज्ञान शिकणे या फारच जिकिरीच्या गोष्टी आहेत. आर्टीफिशियल इटीलिजंन्स, स्पेस सायन्स, बायो-टेक या तर फारच दूरच्या गोष्टी; त्या इंग्रजी मधून शिकलेल्याच बऱ्या...!  कितीतरी अशा शाखा आहेत जिथे मराठी प्रतिशब्दच देता येणार नाहीत आणि कुणीतरी ओढून-ताणून संस्कृतमध्ये खोदकाम करून निर्माण  केलेला शब्द इंग्रजीपेक्षा उलट जास्तच परकीय वाटतो. भाषा ही प्रवाही असावीच या मताचा मी आहे. उर्दुने जर पर्शियन, अरेबिक नाहीतर हिंदी यापैकी एक-दोघांचाच पदर धरण्याचा अट्टाहास केला असता तर ही भाषा इतकी सुंदर होऊ शकली नसती, तिला जनमान्यताही लाभली नसती.

भाषा आणि संस्कृती - कोणतीही भाषा आत्मसात करताना तिच्यासोबत तिची संस्कृतीही थोड्याफार प्रमाणात घेऊन येत असते. त्यामुळे पाश्चात्य संस्कृती आपल्या नित्यकर्मात येत असेल तर साहजिक म्हणावं लागेल. कारण जी संस्कृती शक्तिशाली आहे, विकसित आहे, आघाडीवर आहे तिचंच अनुकरण करणं हा मानवी स्वभाव आहे. पण त्यासोबत आपल्या भाषेतून आलेल्या संस्कृतीचा सारासार विवेक करून स्वीकार करणे अथवा तिचा त्याग करणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे. कारण चांगले सांस्कृतिक पायंडे हे भाषेशिवाय देखील नव्या रुपात जिवंत राहू शकतात. म्हणून आपली संस्कृती आहे तशी पठडीबद्धचं राहावी, तिचे स्वरूप बदलत्या काळानुसार बदलू नये असा दुराग्रह ठेवला तर उलट तो त्या संस्कृतीच्या अंताला कारणीभूत ठरेल. भाषेप्रती भावूक होऊन भाषाविकासाच्या इतिहासाचा अभ्यास केला तर पाय आपसूक जागेवर येतात.

ही मराठी शे-दोनशे नव्हे तर तब्बल अडीच हजार वर्षांपासून मानवाला व्यक्त होण्यासाठीचे समर्थ माध्यम बनली आहे. अनेक थोर लोक या मराठीसाठी आग्रही होते. मराठीचा गोडवा, मार्दव आणि तिचा समृद्ध वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असायला हवे. मराठीचा आग्रह जागतिक मराठी दिनानिमित्त दृढ करून मराठी भाषेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करूया..

✍️ सर्वेश फडणवीस

Wednesday, February 26, 2020

विवेकानंदांच्या विचार प्रकाशात सावरकर !!

मध्यंतरी " savarkar in the light of swami vivekanand" हे श्री मनोज नाईक यांनी लिहिलेलं पुस्तक वाचनात आले. माणूस घडविणे हे स्वामीजींचे व्रत सावरकरांनी सुद्धा अंगिकारले होते. अंदमानच्या अंधार कोठडीत अमानुष वागणूक मिळत असूनही गंभीर गुन्हे दाखल केलेल्या गुन्हेगारांना आणि अट्टल दरोडेखोर आणि बदमाशांना प्राथमिक काम देण्याचे काम स्वच्छेने आणि जिद्दीने सावरकरांनी केले. भावी काळात स्वतंत्र भारतात हेच लोक अव्वल देशकार्य करण्यास उपयोगी पडतील हाच त्यांचा त्यामागचा शुद्ध हेतू होता. विवेकानंदांची दूरदृष्टी सावरकरांनी प्रत्यक्षात आणून दाखवली. तळागाळातील आणि पायाखाली तुडविल्या गेलेल्या लोकांचा उद्धार करूनच खरेखुरे व विश्वसनीय अशा प्रकारचे राष्ट्रीय कर्तव्य सुरू व्हावयास हवे हा प्रामाणिक हेतू होता. विवेकानंद आणि सावरकर यांच्या विचारातील अध्यात्मिक एकरूपता आणि विवेकानंदांच्या विचारांच्या प्रकाशझोतात सावरकरांनी केलेले अद्वितीय कार्य प्रत्येकाला निश्चितच प्रेरणादायी ठरेल. पुस्तक वाचनीय आहेच. यातील आत्मार्पण प्रकरण  .. 

आत्मार्पणाच्या उद्देशाने सावरकरांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले. ३ फेब्रुवारी १९६६ रोजी प्रायोपवेशनास प्रारंभ केला. त्यांच्या कुटुंबीयांनी चहा देतेसमयी त्यात व्हिटॅमिनच्या गोळ्याही देण्यास सुरुवात केल्याने त्यांनी चहा पण वर्ज्य केला. केवळ जलप्राशन करणे त्यांनी सुरू ठेवले होते. त्यापूर्वी त्यांनी लिहून ठेवलेले विचार- 

" माझ्या शक्तीसामर्थ्यानुसार,माझ्या लोकांसाठी, माझ्या देशासाठी जेवढे काही करणे शक्य होते ते मी केले आहे. मात्र आयुष्यास स्वतःच्या पण मर्यादा असतात. आपल्या गात्रांना काही काम करणे झेपत नाही तेव्हा निसर्गास शरण जाणे एवढाच एक मार्ग उरतो. माझ्या आत्म्याला वेढुन राहिलेल्या या माझ्या देहाच्या आवरणापासून आता मला मुक्त होऊ दे." 

धनंजय कीर यांनी सावरकरांच्या खालावत जाणाऱ्या प्रकृतीचा हर एक दिवसाचा व क्रमवार अहवाल देण्याचे काम सुरू ठेवले होते. या प्रायोपवेशन कालावधीत सावरकर रोज दोन-चार चमचे पाणीच केवळ पीत असत. त्यांच्या प्रकृतीची तपासणीसाठी स्थानिक डॉक्टर मंडळी रोज त्यांच्या घरी येत असत. २२ फेब्रुवारीस डॉ.अरविंद गोडबोले,डॉ.वसंतराव काळे,डॉ.श्रीखंडे, डॉ.शरद मराठे आळीपाळीने त्यांचे सोबत अहोरात्र सेवेसाठी म्हणून येऊन जाऊन होते. त्यांची परिस्थिती फारच चिंताजनक होती. २४ फेब्रुवारीस त्यांनी त्यांचे स्वीय-सहायक बाळ सावरकर यांस तसेच अन्य सहकारी यांना- 'आम्ही जातो आमुच्या गावा,आमुचा रामराम घ्यावा' असे म्हणून अखेरचा निरोप दिला. त्यांची परिस्थिती दिवसागणिक अधिकच बिकट होत होती. २६ फेब्रुवारीला त्यांना थोडा तापही चढला होता व ते अत्यवस्थ होते. धनंजय कीर लिहितात- तो मृत्यू,ज्याला त्यांनी तरूणपणीच आव्हान दिले होते तो त्यांच्या समोर यावयास भीत होता. भीत भीतच तो बिछानाच्या कोपऱ्यात आता उभा होता. कारण सावरकर आता आनंदाने त्याच्या आश्रयाला जाऊ इच्छित होते. पण मृत्युलाच त्यांना कवटाळण्याची लाज वाटत होती. अखेरीस प्रातःकाळी ११ वाजून १० मिनिटांनी सावरकरांनी नेत्र मिटून घेतले. ते चिरनिद्राधीन झाले. अखंडपणे त्यांनी आयुष्याचा होम केला होता. 

अशा मुक्त आत्म्यांना देवाने सदोदित सुखी ठेवावे हीच प्रार्थना आहे. कारण काही एका विशिष्ट कार्यासाठीच त्यांचा जन्म असतो. ईश्वराचे असे अवतार-सर्वसामान्य माणसाप्रमाणे पुन्हा पुन्हा जन्म घेण्यासाठी वा मृत्यूपावण्यासाठी म्हणून नसतात. या अवघ्या विश्वाचे एकच राज्य व्हावे आणि साऱ्या मानवजातीने व्यापावे. जिथले नागरिक या पृथ्वीवरचे सारे काम करण्यात आनंद मानतील. हीच कल्पना सावरकरांच्या "स्वतंत्रतेचे स्तोत्र"या कवितेची आहे. 

मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती।
स्वतंत्रते भगवती,योगीजन परब्रह्म वदती।।

सावरकर कवी,देशभक्त,तत्वज्ञानी,तत्वचिंतक, क्रांतिकारक,समाज सुधारक,तर्कशुद्ध विचारवंत,इतिहास तज्ञ,विधिज्ञ होते. एकाच व्यक्तिमत्वामध्ये असे बहुविध गुणविशेष असणे हे दुर्मिळच आहे. चला,सावरकर विचारांना अधिक वर्धिष्णू व  चिरतरुण करण्याची हीच योग्य वेळ आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस

Friday, February 21, 2020

आदिवासींच्या जगण्याची ‘प्रकाशवाट’ !!


‘श्रम ही है श्रीराम हमारा’ असे म्हणणार्‍या बाबांनी वरोड्याच्या ओसाड, खडकाळ जमिनीवर ‘आनंदवन’ उभारले. कुष्ठरुग्णांना आत्मसन्मान मिळवून दिला. ताठ मानेने जगण्याचं बळ दिलं. विकास आणि प्रकाश या त्यांच्या, अफाट कर्तृत्ववान मुलांनी बाबांचा वारसा चालवला. डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे हे गेली अनेक वर्षं भामरागडच्या जंगलात राहून आदिवासींचं जगणं सुसह्य व्हावं म्हणून प्रयत्नरत आहेत. 

 1973 मध्ये हेमलकशाला लोकबिरादरी प्रकल्प सुरू झाला तेव्हा तिथले माडिया गोंड आदिवासी भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडले होते. त्या जंगलापलीकडचं जग त्यांना माहीत नव्हतं. आज मात्र तिथे सुसज्ज रुग्णालय आहे, शाळा आहे. तिथली मुलं शिकून डॉक्टर, वकील होतात. वैद्यकीय उपचारांअभावी होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण अत्यल्प आहे. या अंधाराकडून उजेडाकडे झालेल्या प्रवासाचे संपूर्ण श्रेय लोकबिरादरी प्रकल्पाच्या विलक्षण प्रयत्नांना आहे. डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे यांच्या जबरदस्त इच्छाशक्तीची, दुर्दम्य जिद्दीची कहाणी म्हणजे ‘प्रकाशवाटा’ हे डॉ. प्रकाश आमटे यांचं आत्मचरित्र प्रत्येकाच्या संग्रही असावे असेच आहे.
 
हेमलकशाच्या तेव्हाच्या परिस्थितीची कल्पना आज तो भाग बघणार्‍यांना येणार नाही. तेव्हा तिथे नुसतं दाट जंगल होतं. झाडं एवढी मोठमोठी वाढलेली, की सूर्यप्रकाशही आत यायचा नाही. सगळीकडे नीरव शांतता. आवाज फक्त वन्य प्राण्यांचे आणि दूरवरून वाहत असलेल्या नदीच्या पाण्याचे. साप आणि विंचू यांचे अस्तित्व पावलापावलांवर होते. गाव-शहरापासून संपूर्णपणे तुटलेला आणि एखादा प्रकल्प उभा करण्याच्या दृष्टीने अगदी प्रतिकूल असा हा भाग होता. आरोग्यसेवा नाही अशा खेड्यात जाऊन काम करणे ही गोष्ट तुलनेने खूपच सोपी वाटावी, अशी परिस्थिती तेव्हा हेमलकशात होती. एखाद्या खेड्यात जेव्हा आरोग्यसेवा देण्याचा प्रकल्प उभारला जातो तेव्हा तिथे राहायची जागा, पाणी अशा प्राथमिक गोष्टी बहुधा उपलब्ध असतात. निदान आजूबाजूला माणसे तरी असतातच असतात. हेमलकशात या कुठल्याच गोष्टी नव्हत्या. वीज नव्हती, पाणी नव्हते, राहायची जागा नव्हती, माणसेही नव्हती. होते फक्त जंगल, त्यात लपून बसलेले आदिवासी आणि प्राणी. अशा परिस्थितीत प्रकाश आणि मंदा आमटे व काही सहकार्‍यांनी मिळून प्रकल्प सुरू केला.
 
सर्वांना अस्वस्थ करणारी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्यासाठी त्या जंगलात आलो होते ते आदिवासी वार्‍यालाही उभे राहात नव्हते. कारण त्यांना परग्रहावरून आलेले प्राणी वाटत असणार! त्यांची भाषा येत नव्हती, त्यामुळे त्यांना समजावणे शक्य नव्हते. त्यामुळे खूप त्रास व्हायचा. या सगळ्याची कल्पना आधी नव्हती असे नाही. पण, बर्‍याचदा प्रत्यक्ष त्या परिस्थितीला सामोरे गेल्यावरच त्याची तीव्रता, आधी न जाणवलेल्या गोष्टी कळायला लागतात.
 
चार लोकात असताना एकाकी, उदास वाटले तर मन रमवायचे मार्ग असतात. वाचन, संगीत, कुणी चित्रपट बघतो, तर कुणी मित्राकडे जातो. इथे तसे काहीच नव्हते. जंगलातली नीरव शांतता एक-दोन दिवस बरी वाटते, पण कधीकधी ती अंगावरही येते, विशेषतः तुम्ही अशा मनःस्थितीत असाल तर. या सगळ्या परिस्थितीचा सगळ्यांनाच त्रास झाला; पण त्यातून एक चांगली गोष्टही घडली. आपल्यासमोर उभ्या ठाकणार्‍या प्रश्नांना आपणच तोंड द्यायचे आहे, हे लक्षात येऊन आम्ही त्यातून वाट काढायला शिकलो. दुसरे म्हणजे सततच्या सहवासाने, अडचणी एकत्र सोडवण्याने आम्ही सगळे खूप जवळ आलो. आमचं सगळ्यांचं असं एक कुटुंब तयार झालं जे अजूनही एकत्र आहे आणि आज प्रकाश आमटे यांची दोन्ही मुले डॉ. दिगंत व अनिकेतसुद्धा तिथंच राहून प्रकल्पाला नव्या क्षितिजावर नेण्यासाठी तत्पर आहेत.
 
आज ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारी रक्कम लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा, येथील खर्चासाठी वापरण्यात येते आहे, त्यामुळे हे पुस्तक आपण विकत घेतल्यास प्रकल्पाला आपली मदतच होईल. हे आत्मचरित्र नक्कीच प्रेरणादायी आहे. जे सत्य आहे, सुंदर आहे त्याचाच आजन्म ध्यास मिळवण्यासाठी या प्रकल्पाला आवर्जून भेट द्यावी.

सर्वेश फडणवीस

प्रभावी वाचनाच्या सवयी !!


शीर्षक वाचून जरा वेगळे वाटेल आणि मग सहज विचार येईल, की- वाचण्याच्या सवयीबद्दल पण कुणी पुस्तक लिहू शकते का? पण नुकतेच एक पुस्तक हाती आले- अमृत देशमुख यांचे ‘द सेवन हॅबीट्स ऑफ हायली इफेकटिव्ह रिडर्स’.

wachal_1  H x W
 
पुस्तकांचे विश्व मोठे अजब असते. मन मोहून टाकणारे, जीवन बदलवून टाकणारे असते. आपल्या आयुष्यावर जवळच्या आप्तमित्रांचा जसा प्रभाव पडतो, तसा पुस्तकांचाही पडतो. बुकलेट अॅपच्या माध्यमातून वाचन संस्कृती अधिक वाढावी, यासाठी अमृत कार्यरत आहे. अमृत देशमुख यांच्या या पुस्तकात वाचनाच्या प्रभावी सात सवयीबद्दल निव्वळ 56 पानांत अनेक महत्त्वाची माहिती आपल्याला सापडते. आज पुस्तक वाचन करत नाही, अशी सर्वत्र ओरड असताना अमृत देशमुख यांनी या पुस्तकात प्रभावी आणि अतिशय छोट्या-छोट्या सवयी पुस्तकात मांडल्या आहेत. सहज कुणीही या सवयी आचरणात आणून प्रभावी वाचक करू शकेल. स्वतः प्रकाशित केल्यामुळे सर्वप्रथम अमृत यांनी पत्राद्वारे आपल्या वाचकांशी काही हितगुज केले आहे. जवळपास 1300 हून अधिक पुस्तके वाचल्यामुळे सहज आणि सोप्या शब्दात पुस्तक वाचनाच्या काही सवयी त्यांनी सांगितलेल्या आहेत.

वाचनाला जास्त गांभीर्याने घेऊ नका. बरेचदा आपण पुस्तक वाचताना आनंदाने सुरुवात करतो पण काही काळाने आपल्याला पुस्तक वाचायचा कंटाळा येतो आणि आपण पुस्तक बाजूला ठेवतो. मग काही दिवसांनी उगाच आपल्याला वाटते आपण चांगले वाचक होऊ शकत नाही, हे सर्वसामान्यपणे प्रत्येकाला वाटत असते पण याला अमृत यांनी उत्तर दिले आहे, की- कुठलेही पुस्तक पूर्ण वाचून संपवल्यावरच नवे पुस्तक हाती घ्यावे.
 
पुढे ते लिहितात- वेळेला महत्त्व द्या. अनेकांची तक्रार असते, की- लहानपणी खूप वाचन करत होते पण आता वेळच मिळत नाही. पण या सवयीला बदलण्याची क्षमता ही स्वतःमध्ये असावी हाच आग्रह आहे. आपण आपले आयुष्य बदलू शकत नाही, पण दिवस हा आपला आहे आणि त्याचे नियोजन करण्याचे सामर्थ्य आपल्यातच आहे. वेळेचे नियोजन योग्य पद्धतीने झाले तर वाचनाला वेळ मिळेलच.
 
 सहज आणि आवडेल ते वाचा. अतिशय छोटीशी सवय आपले आयुष्य आणि दिवस बदलण्याची ताकद बनू शकते. अनेकदा वेळ असून सुद्धा आपण वाचत नाही. म्हणून वाचलेच पाहिजे हा आग्रह नाही तर आवडेल आणि सहज उपलब्ध असेल असे वाचले तर दिवसाचा आनंद अधिक द्विगुणित होईल.
 
त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो वाचा आणि चर्चा करा. वाचल्यावर प्रत्येक गोष्ट लक्षात राहील हा आग्रह नाहीच. पण अनेकदा वाचून त्यावर चर्चा केली तर काही प्रमाणात ती गोष्ट कायमस्वरूपी लक्षात राहते. जेव्हा पुस्तके आणि त्यातील कल्पना आपल्या मनात आणि हृदयात असतात तेव्हा त्या जिवंत असतात आणि म्हणूनच वाचून चर्चा करणे अधिक फायदेशीर आहे.
अतिशय महत्त्वाची सवय ती म्हणजे- वाचा आणि पुढे द्या. अतिशय चांगली सवय आपण स्वतःला लावून घ्यावी. अनेकांना आपली पुस्तके द्यायला आवडत नाही. पण आपण पुस्तक देताना ती कुणाला दिली याबद्दल नोंद ठेवली तर ते अधिक फायदेशीर ठरेल आणि आपणही कुणाचे पुस्तक वाचायला आणले तर तेही त्याला परत करण्याचा प्रयत्न करावा.
 
आपण म्हणाल तर हे पुस्तक आपल्या प्रत्येकासाठी विचार आहे, कारण अनेक प्रश्नांची उत्तरे यात आपल्याला सापडतील. वाचल्यावर लक्षात न राहणार्‍या प्रत्येकासाठी हे पुस्तक उपयोगी आहे. ज्याना वेळेअभावी वाचन करणे जमत नाही त्यांच्यासाठी आहे. लहानपणी बरेच पुस्तके वाचायचे पण आता वाचन होत नाही त्यांच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीतून वाचन वाढवण्याचा अट्टहास अमृत देशमुख यांचा आहे हे प्रकर्षाने जाणवते. एक अत्यंत उपयोगी प्रत्येकाच्या संग्रही असावे, असे हे छोटेखानी पुस्तक आहे. अनेकांना भेट म्हणून देण्यासाठी सुद्धा उपयोगी असे हे पुस्तक आहे. वाचनाने आनंदाची अनुभूती घेण्यासाठी कायम काहीतरी सतत वाचत म्हणूया वाचू आनंदे...

सर्वेश फडणवीस

Thursday, February 20, 2020

सचित्र शिवचरित्र !! सर्वेश फडणवीस


पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे- इतिहासातील अलौकिक व्यक्तिमत्त्व. 19 फेब्रुवारी तारखेप्रमाणे छत्रपतींची जयंती! ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हे तीन शब्द नुसते उच्चारले, की- सर्रकन अंगावर काटा उभा रहातो. महाराष्ट्रातच नाही,भारत देशातच नाही तर संपुर्ण विश्वात अतुलनीय, अद्वितीय, अलौकीक असे दुसरे छत्रपती शिवाजी राजे सापडणार नाहीतच. जगातल्या साहसी, पराक्रमी आणि दिग्विजय अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल. कोणत्याही काळात, कोणत्याही परिस्थितीत दिपस्तंभाप्रमाणे समाजाचे आणि राष्ट्राचे मार्गदर्शन करणारे शिवछत्रपती यांचे व्यक्तिमत्त्व.
 
अनेकदा प्रत्येकाचा अनुभव असतो, की- हजार शब्दांपेक्षा एक चित्र जास्त बोलके असते. चित्र प्रसंग जिवंत हुबेहूब उभा करतो. बाल मनावर चित्रांमुळे इतिहास कोरला जातो आणि तो त्यांच्या स्मरणात चिरकाल टिकून राहतो. प्रस्तुत ग्रंथ याचे उत्तम उदाहरण आहे. चित्रांच्या माध्यमातून आणि माहितीच्या आधारे 120 पाने व 62 भागांच्या या अतिशय वेगळ्या धाटणीच्या ग्रंथाची मांडणीच वेगळी आहे. राजा शिव छत्रपती यांचा इतिहास प्रत्येकाला प्रेरक आहे. छत्रपतींचा इतिहास सर्वश्रुत आहेच, पण या ग्रंथात तो अधिक वेगळ्या प्रकारे मांडलेला जाणवतो आणि चित्ररूप तो अधिक उत्तमच वाटतो.
 

charitra _1  H  
 
छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण राष्ट्राचे आदर्श आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला, मुलांना त्यांच्या गोष्टी खूप आवडतात आणि त्यातूनच नकळत संस्कार घडतात. असेच संस्कार मनामनात रुजवण्यासाठी हे एक संस्कारक्षम ग्रंथ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व समजून घेताना तो ऐतिहासिक काळ समजून घ्यावा लागतो. ती पृष्ठभूमी समजून घ्यावी लागते. त्यामुळे या पुस्तकात सुरुवातीला शिवपूर्वकाळ व संपूर्ण पृष्ठभूमी उभी केली आहे आणि ती चित्रात्मक असल्यामुळे ती समजायला अधिक सोपी आहे. सातवाहन म्हणजे शालिवाहन, देवगिरीचे यादव राजे, संतांचे कार्य,त्या काळची अस्थिर राजकीय व सामाजिक परिस्थिती सुरुवातीच्या काही प्रकरणात चित्रात्मक जाणवते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ यांचे जाधव घराणे, त्यांचे घृष्णेश्वर दैवत, त्यांचा पराक्रम या संदर्भात ज्ञानवर्धक माहिती दिली आहे. पुढे महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी घेतलेली प्रतिज्ञा आणि स्वराज्य स्थापनेसाठी घेतलेले कष्ट अधिक प्रेरणादायी आहे.
 
या ग्रंथातील छत्रपतींच्या जीवनातील रोमहर्षक प्रसंगांना चित्रबद्ध करणारे चित्रकार चंद्रशेखर जोशी. त्यांची ग्रंथातील चित्र जिवंत वाटावेत इतके सुंदर असल्याने प्रत्येकाला त्यात गोडी वाटते आणि शिवछत्रपतींची ही जीवनकांक्षा त्यांचा संघर्ष, त्यांचा पराक्रम, त्यांची निष्ठा, त्यांचा ध्येयवाद आज प्रत्येकाला कळायला हवा म्हणून या ग्रंथाचे लेखन करणार्‍या लेखीका शुभा साठे यांची सोपी भाषा, लहान लहान वाक्य, ओघवती शैली या मुळे हे पुस्तक हातचे सुटतच नाही. शुभा साठे यांनी या अलौकिक विभूतीमत्त्वाचा आदर्श ठेवण्याचा केलेला प्रयत्न नक्कीच दिशादर्शक वाटतो.
 
शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले गुण आपल्यात अंगिकारण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. प्रत्येक येणार्‍या पिढीला हा इतिहास सांगण्याचे दायित्व आपल्याकडे आहेच. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातून लहान मोठ्या सर्वांना प्रेरणा मिळते. त्यांच्या जीवनातील सर्व प्रेरक प्रसंग या पुस्तकात मांडले आहेत. प्रत्येकाच्या संग्रही व आर्ट पेपर वर चित्रकथा अधिक आकर्षक असल्याने भेट देण्यासाठी उत्तम ग्रंथ असेच याचे वर्णन करता येईल. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विभूतीमत्त्वातुन प्रेरणा घेण्याची वेळ आली आहे. देव, देश, धर्म यासाठी कर्तव्यतत्पर असलेल्या छत्रपतींच्या ठायी असलेल्या गुणांचे अंगिकरण करण्याचा प्रयत्न करूया