शीर्षक वाचून जरा वेगळे वाटेल आणि मग सहज विचार येईल, की- वाचण्याच्या सवयीबद्दल पण कुणी पुस्तक लिहू शकते का? पण नुकतेच एक पुस्तक हाती आले- अमृत देशमुख यांचे ‘द सेवन हॅबीट्स ऑफ हायली इफेकटिव्ह रिडर्स’.

पुस्तकांचे विश्व मोठे अजब असते. मन मोहून टाकणारे, जीवन बदलवून टाकणारे असते. आपल्या आयुष्यावर जवळच्या आप्तमित्रांचा जसा प्रभाव पडतो, तसा पुस्तकांचाही पडतो. बुकलेट अॅपच्या माध्यमातून वाचन संस्कृती अधिक वाढावी, यासाठी अमृत कार्यरत आहे. अमृत देशमुख यांच्या या पुस्तकात वाचनाच्या प्रभावी सात सवयीबद्दल निव्वळ 56 पानांत अनेक महत्त्वाची माहिती आपल्याला सापडते. आज पुस्तक वाचन करत नाही, अशी सर्वत्र ओरड असताना अमृत देशमुख यांनी या पुस्तकात प्रभावी आणि अतिशय छोट्या-छोट्या सवयी पुस्तकात मांडल्या आहेत. सहज कुणीही या सवयी आचरणात आणून प्रभावी वाचक करू शकेल. स्वतः प्रकाशित केल्यामुळे सर्वप्रथम अमृत यांनी पत्राद्वारे आपल्या वाचकांशी काही हितगुज केले आहे. जवळपास 1300 हून अधिक पुस्तके वाचल्यामुळे सहज आणि सोप्या शब्दात पुस्तक वाचनाच्या काही सवयी त्यांनी सांगितलेल्या आहेत.
वाचनाला जास्त गांभीर्याने घेऊ नका. बरेचदा आपण पुस्तक वाचताना आनंदाने सुरुवात करतो पण काही काळाने आपल्याला पुस्तक वाचायचा कंटाळा येतो आणि आपण पुस्तक बाजूला ठेवतो. मग काही दिवसांनी उगाच आपल्याला वाटते आपण चांगले वाचक होऊ शकत नाही, हे सर्वसामान्यपणे प्रत्येकाला वाटत असते पण याला अमृत यांनी उत्तर दिले आहे, की- कुठलेही पुस्तक पूर्ण वाचून संपवल्यावरच नवे पुस्तक हाती घ्यावे.
पुढे ते लिहितात- वेळेला महत्त्व द्या. अनेकांची तक्रार असते, की- लहानपणी खूप वाचन करत होते पण आता वेळच मिळत नाही. पण या सवयीला बदलण्याची क्षमता ही स्वतःमध्ये असावी हाच आग्रह आहे. आपण आपले आयुष्य बदलू शकत नाही, पण दिवस हा आपला आहे आणि त्याचे नियोजन करण्याचे सामर्थ्य आपल्यातच आहे. वेळेचे नियोजन योग्य पद्धतीने झाले तर वाचनाला वेळ मिळेलच.
सहज आणि आवडेल ते वाचा. अतिशय छोटीशी सवय आपले आयुष्य आणि दिवस बदलण्याची ताकद बनू शकते. अनेकदा वेळ असून सुद्धा आपण वाचत नाही. म्हणून वाचलेच पाहिजे हा आग्रह नाही तर आवडेल आणि सहज उपलब्ध असेल असे वाचले तर दिवसाचा आनंद अधिक द्विगुणित होईल.
त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो वाचा आणि चर्चा करा. वाचल्यावर प्रत्येक गोष्ट लक्षात राहील हा आग्रह नाहीच. पण अनेकदा वाचून त्यावर चर्चा केली तर काही प्रमाणात ती गोष्ट कायमस्वरूपी लक्षात राहते. जेव्हा पुस्तके आणि त्यातील कल्पना आपल्या मनात आणि हृदयात असतात तेव्हा त्या जिवंत असतात आणि म्हणूनच वाचून चर्चा करणे अधिक फायदेशीर आहे.
अतिशय महत्त्वाची सवय ती म्हणजे- वाचा आणि पुढे द्या. अतिशय चांगली सवय आपण स्वतःला लावून घ्यावी. अनेकांना आपली पुस्तके द्यायला आवडत नाही. पण आपण पुस्तक देताना ती कुणाला दिली याबद्दल नोंद ठेवली तर ते अधिक फायदेशीर ठरेल आणि आपणही कुणाचे पुस्तक वाचायला आणले तर तेही त्याला परत करण्याचा प्रयत्न करावा.
आपण म्हणाल तर हे पुस्तक आपल्या प्रत्येकासाठी विचार आहे, कारण अनेक प्रश्नांची उत्तरे यात आपल्याला सापडतील. वाचल्यावर लक्षात न राहणार्या प्रत्येकासाठी हे पुस्तक उपयोगी आहे. ज्याना वेळेअभावी वाचन करणे जमत नाही त्यांच्यासाठी आहे. लहानपणी बरेच पुस्तके वाचायचे पण आता वाचन होत नाही त्यांच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीतून वाचन वाढवण्याचा अट्टहास अमृत देशमुख यांचा आहे हे प्रकर्षाने जाणवते. एक अत्यंत उपयोगी प्रत्येकाच्या संग्रही असावे, असे हे छोटेखानी पुस्तक आहे. अनेकांना भेट म्हणून देण्यासाठी सुद्धा उपयोगी असे हे पुस्तक आहे. वाचनाने आनंदाची अनुभूती घेण्यासाठी कायम काहीतरी सतत वाचत म्हणूया वाचू आनंदे...
सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment