"माझा मराठाचि बोलु कौतुकें।परि अमृतातेंही पैजां जिंके।
ऐसीं अक्षरें रसिकें।मेळवीन।।"
ही ओवी संत ज्ञानेश्वर माउलींनी सातशे वर्षापूर्वी रचली आहे. आज त्यांनी सांगितलेले आपण किती ऐकतो आहोत हा प्रश्न आहे. दरवर्षी 'जागतिक मराठी दिन' आपण अतिशय उत्साहात साजरा करतो. परंतु भाषेच्या सर्वांगीण विकासाबाबत आपण कायमच उदासीन राहतो.आज जनता जनार्दनच मराठी भाषेची उपेक्षा करत आहे असे माझे मत आहे. अभिजात भाषेचा दर्जा पात्रतेचे सर्व निकष पूर्ण होत असताना का मिळत नाही,हे एक न उलगडणारे कोडे आहे. प्रत्येकाला मराठीचा अभिमानच नाही तर माज असायला हवा. अमृताशी पैजा जिंकणाऱ्या माझ्या मराठीची आज काय परिस्थिती आहे याचा प्रत्येकाने विचार करावा.
मराठी भाषेचा विचार करता प्रामुख्याने पाच मुद्द्यावर प्रकाश टाकतोय.
• मराठी साहित्य• मराठी बोली• मराठी शाळा• प्रवाही भाषा • भाषा आणि संस्कृती
प्रत्येक काळात अजरामर ठरेल असे समृद्ध साहित्य मराठी भाषेत लिहिले गेले. असंख्य साहित्यिकांनी आपापल्या ताकदीनिशी जमेल तसे योगदान या मराठी भाषेला दिले. पण मग चूक कुठे झाली ? मराठी साहित्य आपण खरंच वाचतोय का ? आज मराठी पुस्तक विक्रेत्यांची काय अवस्था झाली आहे हे एकदा त्या पुस्तक विक्रेत्यांकडे जाऊन बघता येईल. या दिवशी आपण एकतरी पुस्तक त्याच्याकडून विकत घेऊन नक्की वाचायला घ्या. त्याला भरपूर आनंद होईल आणि आपल्याकडूनही अक्षर वाङ्मयाची अल्प सेवाही घडेल.
त्यानंतर मराठी- संवादाचे माध्यम. आज मराठी बोलायला सर्वजण घाबरतात, प्रसंगी कमीपणाही वाटतो. हे कुठे तरी कमी व्हायला हवे. यापुढे दोन मराठी भाषिक एकत्र आले तर मराठीतच बोलण्याचा आग्रह धरूया, मग क्षेत्र कुठलंही असेल. आज नक्की संकल्प करूया, मराठी बोलण्याचा. प्रसंगी इंग्रजी आणि इतर भाषा ही यायला हव्यातच ती काळजी गरज आहेच पण मराठी भाषेप्रती सुद्धा आपले कर्तव्य पार पडायलाच हवे.
त्यानंतर मराठी शाळांचा आग्रह धरूया. निदान प्राथमिक शिक्षण तरी मराठी भाषेत असायला हवं. आजचं स्पर्धेचं युग बघता इंग्रजी भाषा महत्वाची आहेच पण संस्कृती आणि मातीशी नाळ जोडली जाण्यासाठी प्राथमिक शिक्षण मराठीतच व्हायला हवे असे वाटते.आणि ते शक्य नसल्यास घरी पालकांनी थोरल्या मोठ्यांनी तरी आपल्या घरीच प्राथमिक बोली भाषेत तरी मराठी शिक्षण द्यायलाच हवे नव्हे आग्रही असावे असे वाटते.
प्रवाही भाषा- कोणत्याही संवादाची मनातल्या भावनांसह परिपूर्ण अभिव्यक्ती ज्या माध्यमातून समोरच्याच्या मनावर ठसते ते माध्यमच संवादाचे योग्य माध्यम होय असे मला वाटते. जागतिकीकरणाचा डोलारा आज पाश्चात्यांनी सावरल्याने त्यांच्या भाषा आत्मसात केल्याशिवाय पर्याय नाही. मराठीतून संगणक शिकणे, विज्ञान शिकणे या फारच जिकिरीच्या गोष्टी आहेत. आर्टीफिशियल इटीलिजंन्स, स्पेस सायन्स, बायो-टेक या तर फारच दूरच्या गोष्टी; त्या इंग्रजी मधून शिकलेल्याच बऱ्या...! कितीतरी अशा शाखा आहेत जिथे मराठी प्रतिशब्दच देता येणार नाहीत आणि कुणीतरी ओढून-ताणून संस्कृतमध्ये खोदकाम करून निर्माण केलेला शब्द इंग्रजीपेक्षा उलट जास्तच परकीय वाटतो. भाषा ही प्रवाही असावीच या मताचा मी आहे. उर्दुने जर पर्शियन, अरेबिक नाहीतर हिंदी यापैकी एक-दोघांचाच पदर धरण्याचा अट्टाहास केला असता तर ही भाषा इतकी सुंदर होऊ शकली नसती, तिला जनमान्यताही लाभली नसती.
भाषा आणि संस्कृती - कोणतीही भाषा आत्मसात करताना तिच्यासोबत तिची संस्कृतीही थोड्याफार प्रमाणात घेऊन येत असते. त्यामुळे पाश्चात्य संस्कृती आपल्या नित्यकर्मात येत असेल तर साहजिक म्हणावं लागेल. कारण जी संस्कृती शक्तिशाली आहे, विकसित आहे, आघाडीवर आहे तिचंच अनुकरण करणं हा मानवी स्वभाव आहे. पण त्यासोबत आपल्या भाषेतून आलेल्या संस्कृतीचा सारासार विवेक करून स्वीकार करणे अथवा तिचा त्याग करणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे. कारण चांगले सांस्कृतिक पायंडे हे भाषेशिवाय देखील नव्या रुपात जिवंत राहू शकतात. म्हणून आपली संस्कृती आहे तशी पठडीबद्धचं राहावी, तिचे स्वरूप बदलत्या काळानुसार बदलू नये असा दुराग्रह ठेवला तर उलट तो त्या संस्कृतीच्या अंताला कारणीभूत ठरेल. भाषेप्रती भावूक होऊन भाषाविकासाच्या इतिहासाचा अभ्यास केला तर पाय आपसूक जागेवर येतात.
ही मराठी शे-दोनशे नव्हे तर तब्बल अडीच हजार वर्षांपासून मानवाला व्यक्त होण्यासाठीचे समर्थ माध्यम बनली आहे. अनेक थोर लोक या मराठीसाठी आग्रही होते. मराठीचा गोडवा, मार्दव आणि तिचा समृद्ध वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असायला हवे. मराठीचा आग्रह जागतिक मराठी दिनानिमित्त दृढ करून मराठी भाषेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करूया..
✍️ सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment