पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे- इतिहासातील अलौकिक व्यक्तिमत्त्व. 19 फेब्रुवारी तारखेप्रमाणे छत्रपतींची जयंती! ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हे तीन शब्द नुसते उच्चारले, की- सर्रकन अंगावर काटा उभा रहातो. महाराष्ट्रातच नाही,भारत देशातच नाही तर संपुर्ण विश्वात अतुलनीय, अद्वितीय, अलौकीक असे दुसरे छत्रपती शिवाजी राजे सापडणार नाहीतच. जगातल्या साहसी, पराक्रमी आणि दिग्विजय अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल. कोणत्याही काळात, कोणत्याही परिस्थितीत दिपस्तंभाप्रमाणे समाजाचे आणि राष्ट्राचे मार्गदर्शन करणारे शिवछत्रपती यांचे व्यक्तिमत्त्व.
अनेकदा प्रत्येकाचा अनुभव असतो, की- हजार शब्दांपेक्षा एक चित्र जास्त बोलके असते. चित्र प्रसंग जिवंत हुबेहूब उभा करतो. बाल मनावर चित्रांमुळे इतिहास कोरला जातो आणि तो त्यांच्या स्मरणात चिरकाल टिकून राहतो. प्रस्तुत ग्रंथ याचे उत्तम उदाहरण आहे. चित्रांच्या माध्यमातून आणि माहितीच्या आधारे 120 पाने व 62 भागांच्या या अतिशय वेगळ्या धाटणीच्या ग्रंथाची मांडणीच वेगळी आहे. राजा शिव छत्रपती यांचा इतिहास प्रत्येकाला प्रेरक आहे. छत्रपतींचा इतिहास सर्वश्रुत आहेच, पण या ग्रंथात तो अधिक वेगळ्या प्रकारे मांडलेला जाणवतो आणि चित्ररूप तो अधिक उत्तमच वाटतो.

छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण राष्ट्राचे आदर्श आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला, मुलांना त्यांच्या गोष्टी खूप आवडतात आणि त्यातूनच नकळत संस्कार घडतात. असेच संस्कार मनामनात रुजवण्यासाठी हे एक संस्कारक्षम ग्रंथ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व समजून घेताना तो ऐतिहासिक काळ समजून घ्यावा लागतो. ती पृष्ठभूमी समजून घ्यावी लागते. त्यामुळे या पुस्तकात सुरुवातीला शिवपूर्वकाळ व संपूर्ण पृष्ठभूमी उभी केली आहे आणि ती चित्रात्मक असल्यामुळे ती समजायला अधिक सोपी आहे. सातवाहन म्हणजे शालिवाहन, देवगिरीचे यादव राजे, संतांचे कार्य,त्या काळची अस्थिर राजकीय व सामाजिक परिस्थिती सुरुवातीच्या काही प्रकरणात चित्रात्मक जाणवते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ यांचे जाधव घराणे, त्यांचे घृष्णेश्वर दैवत, त्यांचा पराक्रम या संदर्भात ज्ञानवर्धक माहिती दिली आहे. पुढे महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी घेतलेली प्रतिज्ञा आणि स्वराज्य स्थापनेसाठी घेतलेले कष्ट अधिक प्रेरणादायी आहे.
या ग्रंथातील छत्रपतींच्या जीवनातील रोमहर्षक प्रसंगांना चित्रबद्ध करणारे चित्रकार चंद्रशेखर जोशी. त्यांची ग्रंथातील चित्र जिवंत वाटावेत इतके सुंदर असल्याने प्रत्येकाला त्यात गोडी वाटते आणि शिवछत्रपतींची ही जीवनकांक्षा त्यांचा संघर्ष, त्यांचा पराक्रम, त्यांची निष्ठा, त्यांचा ध्येयवाद आज प्रत्येकाला कळायला हवा म्हणून या ग्रंथाचे लेखन करणार्या लेखीका शुभा साठे यांची सोपी भाषा, लहान लहान वाक्य, ओघवती शैली या मुळे हे पुस्तक हातचे सुटतच नाही. शुभा साठे यांनी या अलौकिक विभूतीमत्त्वाचा आदर्श ठेवण्याचा केलेला प्रयत्न नक्कीच दिशादर्शक वाटतो.
शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले गुण आपल्यात अंगिकारण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. प्रत्येक येणार्या पिढीला हा इतिहास सांगण्याचे दायित्व आपल्याकडे आहेच. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातून लहान मोठ्या सर्वांना प्रेरणा मिळते. त्यांच्या जीवनातील सर्व प्रेरक प्रसंग या पुस्तकात मांडले आहेत. प्रत्येकाच्या संग्रही व आर्ट पेपर वर चित्रकथा अधिक आकर्षक असल्याने भेट देण्यासाठी उत्तम ग्रंथ असेच याचे वर्णन करता येईल. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विभूतीमत्त्वातुन प्रेरणा घेण्याची वेळ आली आहे. देव, देश, धर्म यासाठी कर्तव्यतत्पर असलेल्या छत्रपतींच्या ठायी असलेल्या गुणांचे अंगिकरण करण्याचा प्रयत्न करूया
No comments:
Post a Comment