मध्यंतरी " savarkar in the light of swami vivekanand" हे श्री मनोज नाईक यांनी लिहिलेलं पुस्तक वाचनात आले. माणूस घडविणे हे स्वामीजींचे व्रत सावरकरांनी सुद्धा अंगिकारले होते. अंदमानच्या अंधार कोठडीत अमानुष वागणूक मिळत असूनही गंभीर गुन्हे दाखल केलेल्या गुन्हेगारांना आणि अट्टल दरोडेखोर आणि बदमाशांना प्राथमिक काम देण्याचे काम स्वच्छेने आणि जिद्दीने सावरकरांनी केले. भावी काळात स्वतंत्र भारतात हेच लोक अव्वल देशकार्य करण्यास उपयोगी पडतील हाच त्यांचा त्यामागचा शुद्ध हेतू होता. विवेकानंदांची दूरदृष्टी सावरकरांनी प्रत्यक्षात आणून दाखवली. तळागाळातील आणि पायाखाली तुडविल्या गेलेल्या लोकांचा उद्धार करूनच खरेखुरे व विश्वसनीय अशा प्रकारचे राष्ट्रीय कर्तव्य सुरू व्हावयास हवे हा प्रामाणिक हेतू होता. विवेकानंद आणि सावरकर यांच्या विचारातील अध्यात्मिक एकरूपता आणि विवेकानंदांच्या विचारांच्या प्रकाशझोतात सावरकरांनी केलेले अद्वितीय कार्य प्रत्येकाला निश्चितच प्रेरणादायी ठरेल. पुस्तक वाचनीय आहेच. यातील आत्मार्पण प्रकरण ..
आत्मार्पणाच्या उद्देशाने सावरकरांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले. ३ फेब्रुवारी १९६६ रोजी प्रायोपवेशनास प्रारंभ केला. त्यांच्या कुटुंबीयांनी चहा देतेसमयी त्यात व्हिटॅमिनच्या गोळ्याही देण्यास सुरुवात केल्याने त्यांनी चहा पण वर्ज्य केला. केवळ जलप्राशन करणे त्यांनी सुरू ठेवले होते. त्यापूर्वी त्यांनी लिहून ठेवलेले विचार-
" माझ्या शक्तीसामर्थ्यानुसार,माझ्या लोकांसाठी, माझ्या देशासाठी जेवढे काही करणे शक्य होते ते मी केले आहे. मात्र आयुष्यास स्वतःच्या पण मर्यादा असतात. आपल्या गात्रांना काही काम करणे झेपत नाही तेव्हा निसर्गास शरण जाणे एवढाच एक मार्ग उरतो. माझ्या आत्म्याला वेढुन राहिलेल्या या माझ्या देहाच्या आवरणापासून आता मला मुक्त होऊ दे."
धनंजय कीर यांनी सावरकरांच्या खालावत जाणाऱ्या प्रकृतीचा हर एक दिवसाचा व क्रमवार अहवाल देण्याचे काम सुरू ठेवले होते. या प्रायोपवेशन कालावधीत सावरकर रोज दोन-चार चमचे पाणीच केवळ पीत असत. त्यांच्या प्रकृतीची तपासणीसाठी स्थानिक डॉक्टर मंडळी रोज त्यांच्या घरी येत असत. २२ फेब्रुवारीस डॉ.अरविंद गोडबोले,डॉ.वसंतराव काळे,डॉ.श्रीखंडे, डॉ.शरद मराठे आळीपाळीने त्यांचे सोबत अहोरात्र सेवेसाठी म्हणून येऊन जाऊन होते. त्यांची परिस्थिती फारच चिंताजनक होती. २४ फेब्रुवारीस त्यांनी त्यांचे स्वीय-सहायक बाळ सावरकर यांस तसेच अन्य सहकारी यांना- 'आम्ही जातो आमुच्या गावा,आमुचा रामराम घ्यावा' असे म्हणून अखेरचा निरोप दिला. त्यांची परिस्थिती दिवसागणिक अधिकच बिकट होत होती. २६ फेब्रुवारीला त्यांना थोडा तापही चढला होता व ते अत्यवस्थ होते. धनंजय कीर लिहितात- तो मृत्यू,ज्याला त्यांनी तरूणपणीच आव्हान दिले होते तो त्यांच्या समोर यावयास भीत होता. भीत भीतच तो बिछानाच्या कोपऱ्यात आता उभा होता. कारण सावरकर आता आनंदाने त्याच्या आश्रयाला जाऊ इच्छित होते. पण मृत्युलाच त्यांना कवटाळण्याची लाज वाटत होती. अखेरीस प्रातःकाळी ११ वाजून १० मिनिटांनी सावरकरांनी नेत्र मिटून घेतले. ते चिरनिद्राधीन झाले. अखंडपणे त्यांनी आयुष्याचा होम केला होता.
अशा मुक्त आत्म्यांना देवाने सदोदित सुखी ठेवावे हीच प्रार्थना आहे. कारण काही एका विशिष्ट कार्यासाठीच त्यांचा जन्म असतो. ईश्वराचे असे अवतार-सर्वसामान्य माणसाप्रमाणे पुन्हा पुन्हा जन्म घेण्यासाठी वा मृत्यूपावण्यासाठी म्हणून नसतात. या अवघ्या विश्वाचे एकच राज्य व्हावे आणि साऱ्या मानवजातीने व्यापावे. जिथले नागरिक या पृथ्वीवरचे सारे काम करण्यात आनंद मानतील. हीच कल्पना सावरकरांच्या "स्वतंत्रतेचे स्तोत्र"या कवितेची आहे.
मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती।
स्वतंत्रते भगवती,योगीजन परब्रह्म वदती।।
सावरकर कवी,देशभक्त,तत्वज्ञानी,तत्वचिंतक, क्रांतिकारक,समाज सुधारक,तर्कशुद्ध विचारवंत,इतिहास तज्ञ,विधिज्ञ होते. एकाच व्यक्तिमत्वामध्ये असे बहुविध गुणविशेष असणे हे दुर्मिळच आहे. चला,सावरकर विचारांना अधिक वर्धिष्णू व चिरतरुण करण्याची हीच योग्य वेळ आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment