Friday, February 28, 2020

विज्ञाननिष्ठ विवेकानंद !!


२८ फेब्रुवारी अर्थात राष्ट्रीय विज्ञान दिवस. आज आपण ज्या काळात आहोत त्याला २१ वे शतक म्हणून संबोधले जाते. २० व्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांपासून प्राप्त झालेली गतिशीलता आजही कायम आहे.

स्वामी विवेकानंद हे वैज्ञानिक द्रष्टे होते. जगभरातील समान्यांपासून असामान्यापर्यंत सगळ्यांवर छाप सोडणारे प्रभावी व्यक्तिमत्त्व,योद्धा संन्यासी,युवा वृत्ती-प्रवृत्ती चा यथार्थ आविष्कार, युवा चेतना जागृती करणारा सप्ताक्षरी मंत्र “स्वामी विवेकानंद”. 

सदैव चिरविजयाची कामना जागृत करणारे स्वामीजींचे समग्र जीवन आणि चिंतन युवाऊर्जेचा महस्रोत आहे. स्वामीजींचे जीवन म्हणजे मंगलतेचा,उदात्ततेचा,उत्तमतेचा समन्वयच म्हणावा लागेल. वयाच्या ३० वर्षी सार्वजनिक जीवनसागरात स्वामीजी आलेत व पुढे ९ वर्ष सतत ज्ञानप्रसार,संघटन,सेवा या त्रिसूत्रांवर परिव्राजक म्हणून परिभ्रमण करीत राहिले. सतत प्रवास अविश्रांत परिश्रम आणि भारतीय उत्थानाचा ध्यास व त्यावेळी बघितलेले भारताचे विश्वगुरुपदी बसण्याचे स्वप्न या ९ वर्षात श्वास बनून गेला होते.

अध्यात्मिक पथिक असूनही स्वामी विवेकानंदांना विज्ञान विषयाबद्दल विलक्षण आस्था होती. अध्यात्म आणि विज्ञान यांचे वेगवेगळे मार्ग जोडले जाऊ शकतील का ? जोडायचे तर कसे जोडता येतील का ? आणि ते दोन्ही एकत्र येणे शक्य नसतील तर दोन्हींचा उपयोग करून मानवी जीवनाला अधिक सार्थकता कशी प्रदान करता येईल यावर त्यांचे अखंड चिंतन चालत असे. इ.स.१९०१ मध्ये स्वामीजींनी जगाचा निरोप घेतला. परंतु स्वामीजींनी विज्ञान विषयक जे विचार मांडले व विश्लेषण केले ते अधिक ठळकपणे नजरेत भरतात.

शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेला जाण्यापूर्वी स्वामीजींनी खेचरीच्या पंडित शंकरलाल यांच्याशी आपल्या देशात विज्ञानाचा अभाव का? याची बरीच चर्चा केली आहे. त्यांची विज्ञानासंबंधीची आस्था परिषदेनंतरही कायम होती. त्यावेळी आश्रमात विज्ञान आणि वैज्ञानिक प्रयोग चालावेत म्हणून गुरुबंधू, शिष्य व अन्य लोक यांच्यात विज्ञान विषयाबाबत जाणीव व जागृती निर्माण व्हावी,वैज्ञानिक वृत्ती तयार व्हावी हा त्यांचा विशेष आग्रह होता.

१८९३ ला शिकागो धर्मपरिषदेत जाताना प्रवासात जहाजावर स्वामीजी आणि जमशेदजी टाटा यांची भेट झाली. याच भेटीत विज्ञानमय स्वामीजींनी जमशेटजी टाटा यांना नवसृजनाच्या संकल्पना दिल्या. आजची भारतीय विज्ञान संस्था(IISC) बंगळूर ही जगप्रसिद्ध संस्था जमशेटजी टाटा यांनी प्रारंभ केली ती विज्ञानमय स्वामीजींमुळे. आज इनोव्हेशन, मेक इन इंडिया, टेक्नॉंलॉजी ट्रान्स्फर या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या जातात पण या सर्व गोष्टी स्वामी विवेकानंद यांनी पूर्वीच आपल्याकडे आणल्याआहे. 

२२ जून १८९७ रोजी अलमोडाहून स्वामी ब्रह्मानंद याना लिहिलेल्या पत्रात लिहिले होते. “ विज्ञान प्रयोगशाळेसाठी हवे ते संच विकत घ्या,हवे ती उपकरणे घ्या,दर आठवड्यास शशीबाबूने विज्ञान विषयावर व्याख्यान द्यावे,बंगाली भाषेत जितकी पुस्तके तुम्हाला मिळतील तितकी सगळी खरेदी करा आणि ती वाचा.” हा त्याचा विशेष आग्रह लक्षात येतो.

श्रीमती ओली बूल यांना ५ जून १८९६ रोजी लंडनहून लिहिलेल्या पत्रात त्यांनी व्यक्त केलेली भावना ही लक्षणीय आहे. स्वामीजींच्या व श्रीमती बूल या दोघांच्याही एक समान भारतीय परिचिताने इलेक्ट्रीशियन व्हावे अशी इच्छा असल्याचे म्हंटले आहे. भारताला कर्मतत्परता आणि वैज्ञानिक प्रतिभा याची गरज असल्याचे नमूद करत इलेक्ट्रिकल इंजिनिअर भारतात उदरनिर्वाह करू शकेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला होता.

१८९३ साली आधुनिक विज्ञानाने केलेली प्रगती आणि संशोधने यांची माहिती स्वामीजींना होतीच पण याचा जीवनाच्या संदर्भात,तत्वज्ञानाच्या संदर्भात काय आशय आहे यावर देखील त्यांचे सखोल चिंतन होते. आधुनिक विज्ञानाच्या लोंढ्याला त्यातून निर्माण होणाऱ्या मानवी बुद्धीच्या चौकसपणाला उत्तरदेण्याची क्षमता फक्त हिंदू धर्मात आहे हे ठामपणे त्यांनी सांगितले होते. 

विज्ञान व हिंदू धर्म 

पाश्चिमात्य देशात वेदांत तत्वज्ञानाची धर्मध्वजा फडकावून भारतात परतलेले स्वामीजींनी १५ जानेवारी १८९७ साली कोलंबो येथे पाऊल ठेवले. हिंदू धर्माचा गौरव सर्वदूर पोहोचविण्याऱ्या या थोर सुपुत्राचा हिंदू समाजाने सन्मान करण्याचा पहिलाच प्रसंग होता. या सत्काराला उत्तर देताना स्वामीजी आधुनिक विज्ञानाच्या संदर्भात हिंदू धर्माचे स्थान काय? याबद्दल आपले व्याख्यान प्रतिपादित केले, ते म्हणाले . “फिरून एकवार जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती व्हावयास सुरुवात झाली आहे. कारण आज ज्यावेळी आधुनिक विज्ञानाच्या शोधांनी सतत केलेल्या प्रहरांमुळे दृढ व अभेद्य वाटणाऱ्या जुन्या धार्मिक विश्वासाचा पायादेखील खिळखिळा बनून छिन्नविच्छिन्न होतो आहे. ज्यावेळी मानवजातीला स्वतःकडे खेचून घेण्याच्या निरनिराळ्या धर्मपंथाच्या मोठमोठ्या वलग्ना शून्यात विरून जात आहेत. अशावेळी जेथील रहिवाश्यांचे धर्मजीवन अध्यात्मिक तत्वांवर उभारलेले आहे अशा भारताचे तत्वज्ञान भारतीयांच्या धार्मिक आकांक्षामधून उदयास आलेले उत्तम सिद्धांत,जगासमोर येण्यास सुरुवात झाली आहे.” 

हिंदू धर्माचा एवढा गौरव केल्यानंतर एक महत्त्वाचा इशारा देताना म्हणाले “ परंतु त्याचबरोबर हेही लक्षात ठेवा की भारताबाहेरील देशांमध्ये पडणाऱ्या भारतीय धर्माच्या प्रभावासंबंधी बोलताना, ज्याच्या पायावर भारतीय धर्माची इमारत उभारली गेली आहे मूलतत्वे; हाच भारतीय धर्म मला अभिप्रेत आहे. त्याच्या शाखा,प्रशाखा शेकडो शतकांच्या सामाजिक आवश्यकतेनुसार त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या साऱ्या लहान सहान गोष्टी भिन्न प्रथा,रूढी,सामाजिक कल्याण वगैरेचा वास्तविक धर्म या शब्दात अंतर्भाव होऊच शकत नाही.” 

आधुनिक वैज्ञानिक प्रगतीच्या संबंधात हिंदू धर्माचा गौरव करताना ते पुढे लिहितात ‘ धन्य ते प्राचीन ऋषी की ज्यांनी असा व्यापक विस्तारशील धर्म अस्तित्वात आणला आहे की जो,भौतिक क्षेत्रात मानवाला जे काही ज्ञान प्राप्त झाले आहे आणि होणे शक्य आहे,त्या साऱ्यांचे स्वागत करू शकतो. त्याच्याकडे हिंदू आता नव्या दृष्टीने बघावयास शिकला आहे. नव्याने त्याची कदर करु लागला आहे.त्याच्या लक्षात येऊन चुकले आहे की,हे जे सारे आधुनिक शोध त्याच्या स्वतःच्या पूर्वजांनी अंतदृष्टीने, समाधी अवस्थेत शतकांपूर्वी शोधून काढलेल्या सत्यांचा, बुद्धीच्या व इंद्रियांच्या पातळीवरील पुनराविष्कारच होत. म्हणूनच त्याने कशाच्याही शोधात अन्यत्र कुठे भटकण्याची गरज नाही किंवा अन्यत्र फिरण्याचीही जरुरी  नाही. जे अनंत भांडार वारसा म्हणून लाभले आहे ,त्यातूनच थोडे घेऊन ते आपल्या कामी लावण्यानेच त्याचे भागणार आहे. आणि तसे करावयास त्याने सुरुवातही केली आहे आणि उत्तरोत्तर तो अधिक करीलही..’ 

विज्ञान व मानसशास्त्राचे महत्त्व 

मानसशास्त्राचे महत्त्व या विषयाच्या व्याख्यानात स्वामीजी म्हणतात “पाश्चात्य देशात मानसशास्त्राविषयीची कल्पना बऱ्याच खालच्या पातळीवर आहे. मानसशास्त्र हे श्रेष्ठ शास्त्र आहे. परंतु पाश्चात्य देशात ते इतर शास्त्राच्या दर्जाचे मानले जाते. म्हणजे उपयुक्ततेच्या निकषांवर त्याचे मूल्यमापन केले जाते. आपण क्षणभरही आपल्या मनाचे नियंत्रण करू शकत नाही. फार काय मन स्थिरही ठेवू शकत नाही. मानसशास्त्र आपल्याला मनाच्या बेताल भटकण्याला आवर घालण्यास,त्याला इच्छाशक्तीच्या ताब्यात ठेवण्यास आणि मनाच्या जुलमी हुकुमांपासून स्वतःला मुक्त करण्यास शिकवते. म्हणून मानसशास्त्र हे श्रेष्ठ शास्त्र आहे.त्यावाचून इतर सर्व शास्त्रे आणि सर्वज्ञाUन कवडीमोलाचे आहे हा विचार स्वामीजींनी मांडला. मनाचे विश्लेषण मनाकडूनच होते म्हणून मनाचे शास्त्र मानसशास्त्र सर्वश्रेष्ठ आहे.

स्वामी विवेकानंद यांनी केलेले भारतीय समाजाचे,हिंदू समाजाचे प्रबोधन सर्वविदित आहे. पाश्चात्य देशातून परतल्यावर त्यांनी प्रबोधन कार्याला सुरुवात केली असे नाही. पाश्चात्य देशात असतानाही अनेक राजे,महाराजे,सामान्य लोक,विद्वान,पंडित,गुरुबंधू अशा अनेकांना पत्रातून ते संपर्कात होतेच.त्या पत्रातून ज्ञान-विज्ञानाच्या विषयांवर चर्चा ही करीत.

असेच एक पत्र २३ जून १८९४  रोजी म्हैसूरच्या राजेसाहेबांना लिहिले. त्यात धर्म आणि विज्ञान या संबंधी ते लिहितात “साधारणपणे आपले गरीब हिंदू लोक या पाश्चात्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक नीतिमान आहेत. धार्मिक बाबतीत इकडील लोक एकतर ढोंगी असतात,नाहीतर अत्यंत हटवादी असतात. येथे विचारी,समंजस आणि स्थिर मनाच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना भोळसट कल्पनांनी भरलेल्या त्यांच्या धर्मपंथाचा वीट आला आहे. आणि नव्या ज्ञानप्रकाशासाठी ते भारताकडे मोठ्या आशेने बघत आहेत. महाराज,आपल्या पावन वेदांमधील उदात्त विचारांचा मिळेल ते अत्यल्प अंशदेखील हे लोक किती उत्सुकतेने ग्रहण करीत आहेत हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय आपणांस कळणार नाही. याचे कारण हेच की, आधुनिक विज्ञान धर्मावर प्रचंड आघात करीत आहेत त्यांना केवळ वेदच तोंड देऊ शकतात. त्या आघातांमुळे वेदांची मुळीच हानी नाही. जीवात्मा आणि सृष्टी ही दोन्ही अनादि काळापासून परमात्म्याचे जीवितात्म्याचे सर्वोच्च व पूर्ण स्वरूप होय. अशी जी आपल्या परमपावन वेदांची शिकवण आहे तिच्यावर येत्या पन्नास वर्षात जगातील साऱ्या सुशिक्षित लोकांचा विश्वास बसेल. बायबलचा असाच अर्थ लावण्याची सुरुवात आतापासूनच इकडील विद्वान पुरोहितांनी केली आहे. पाश्चात्यांना अधिक अध्यात्मिक सभ्यतेची आवश्यकता असून आपल्या अधिक ऐहिक सभ्यतेची गरज आहे असा माझा निष्कर्ष आहे.” 

आज १२५ वर्षांपूर्वी प्रदर्शित केलेले विज्ञानविषयक विचार तंतोतंत जुळून येतात आहेत. अशा विचारांना आत्मसात करण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या जीवनातून,चिंतनातून त्यांनी सांगितलेल्या वैज्ञानिक दृष्टीकोनातून प्रेरणा घेण्याची हीच वेळ आहे. या देवभूमीला,या स्वर्णभूमीला जगाच्या गुरुपदी बसवण्याची हीच वेळ आहे. साऱ्या क्षमता अर्जित करून सुखनैव त्या भारतमातेच्या चरणी अर्पण करण्याची हीच वेळ आहे. साऱ्या विश्वात युवकांची सर्वाधिक संख्या म्हणून उभ्या राहणाऱ्या भारतवर्षाची उद्याची वाटचाल स्वामीजींच्या विचारांनी झाली तर भारत वैभवशाली बनेलच पण साऱ्या विश्वासाठी ही भूमी आधार देणारी ठरेल. 

“उठा,जागे व्हा,आणि ध्येय प्राप्त केल्याविना थांबू नका” हा स्वामीजींचा संदेश सार्थ करण्यासाठी कटिबद्ध होऊ या. आणि वैज्ञानिक वाटचाल प्रगतीपथावर नेण्यासाठी सदैव तयार असू हाच संकल्प करत स्वामींजींचे विचार आत्मसात केले पाहिजे. विवेकानंद विजयंतेतराम .....

सर्वेश फडणवीस


No comments:

Post a Comment