८ मार्च !! जागतिक महिला दिन.
महिला ,स्त्री याचा समानार्थी शब्द अर्थात अष्टभुजा !! सारी प्रतीके जिच्या हाती आहेत ती अष्टभुजा. आणि ती अष्टावधानीच असली पाहिजे हा विश्वास आहे. महत्वाच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्वापार तिने सांभाळल्या आहेत. शिक्षण देण्याची जबाबदारी सरस्वतीची,अन्नधान्य पुरवठा करण्याची जबाबदारीअन्नपूर्णेकडे, पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी गंगेकडे, अर्थाची जबाबदारी लक्ष्मीकडे,रक्षणाची जबाबदारी दुर्गेकडे. प्रत्येक कर्तव्य करताना अष्टवधान जागरूक होऊनच ती मार्गक्रमण करते आहे.
अष्टभुजा ही कालानुरूप बदलत गेली..मध्ययुगात तिने यशस्वी राज्यकारभार बघितला. त्याचा आदर्श जिजाबाई,अहिल्याबाई आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे. त्यांचे वैशिष्ट्य ही एकच अष्टावधान..
असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे खंबीर स्त्री असते आणि तिच्यात ज्या गुणांचा संचय जसा ती वृत्ती,प्रवृत्ती आणि प्रकृती असेल तर तो माणूस सद्गुणी झाला म्हणूनच समजा. ज्याच्या अंगी माया,ममता आणि बंधुत्व असेल तर तो समन्वय साधला जातो. श्रद्धा ,भक्ती असेल तर तो परमार्थ घडतो. निष्ठा आणि जिद्द असेल तर तो निर्धार होतो. ती कल्पना,आणि कविता असेल तर तो कवी होतो. ती एकाग्रता आणि कुशाग्र असेल तर तो निकाल उत्तम लागतो. ती माता आणि जननी झाली तर तो पुत्र होतो. आणि शेवटी मुक्ती मिळाली की तो मोक्ष होतो. ती असताना तो असल्याचा आनंदच वेगळा असतो.
खरंच स्त्री ही अष्टभुजाच आहे. सारे गुणात्मक स्त्रीलिंगी शब्द हे तिचेच आहेत. आज काळानुसार काही पारंपरिक तर काही आधुनिक आयुधं तिच्याकडे आहेच एका हातात भाजीची पिशवी, दुधाची पिशवी,झारा, झाडू, टॅब, स्टेथ्यस्कोप ,पुस्तक,गिटार अशी साधने आहेत. आणि गळ्यात मोबाईल व ही सगळी आयुधं यशस्वीपणे आणि जबाबदारीने वापरताना स्त्री ही अर्थात अष्टभुजा दिसते आहे. तेव्हा अष्टवधान जागृत असलेली स्त्रीची भारतमाता विश्वपटलावर वाट पाहतो आहे. कारण आज तिच्या अष्टावधानाची गरज आहे. आणि तिच्या जागृतीनेच भारतमाता ही विश्वपटलावर जगाचे नेतृत्व करण्यासाठी कटिबद्ध आहे.
सर्वेश फडणवीस.
No comments:
Post a Comment