फाल्गुन पौर्णिमेला वेध लागतात ते होळीचे. पारंपरिक भारतीय सणांच्या रचनेमध्ये वर्षाचा शेवटचा सण म्हणजे होळी. फाल्गुन पौर्णिमेला संध्याकाळीच होळी करतात. विधिपूर्वक पवित्र अग्नी होळीमध्ये प्रज्वलित केला जातो. साधारणपणे पौर्णिमा ते वद्य पंचमी असा हा रंगोत्सव.
अग्नी ही एकच देवता हव्य,कव्य वहन करणारी आहे. काहीही हवनद्रव्य दिले की ते ज्या देवतेच्या नावाने दिले जाईल त्या देवतेपर्यंत ते पोहोचवायचा त्या अग्नीलाच फक्त अधिकार असतो. म्हणून शास्त्रोक्त अग्नी स्थापना करून होळी साजरी केली जाते.
वद्य प्रतिपदेला “धूलिवंदन” असते. त्या दिवशी होळीच्या राखेची किंवा धूळीची पूजा करतात. पारंपरिक पुरणपोळीच्या नैवेद्याच्या रूपाने आपण होळीला आपली कर्मे व कर्तृत्ववाचा अहंकार हेच अर्पण करायचे असते. अशा समर्पित भावनेनंतर दुसरा दिवस येतो तो रंगपंचमीचा.
आज हीच रंगपंचमी आहे. पिचकरीने रंग उडवण्याची मजा वेगळीच असते. पळसाची फुलं पाण्यात भिजवून त्या रंगाच्या पाण्याने रंगोत्सव आणखीनच उत्साह प्रदान करतो. रांगोत्सवातुन निखळ प्रेम आणि सुख हेच मिळतं. आणि यातूनच येणाऱ्या नवीन वर्षात पदार्पण करण्यासाठी ज्याप्रमाणे रंगांची उधळण करून रंगोत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे येणारे वर्ष सर्व रंगानी युक्त, मुक्त बहरत जीवन अधिक जबाबदारी आणि प्रत्येकाप्रति प्रेम भाव निर्माण करो याचसाठी रंगपंचमी हा दिवस.
वृंदावनातील रंगोत्सव हा जगभरातील आकर्षणाचा विषय आहे. श्री भगवंत व गोपी यांच्यातील रंगोत्सव म्हणजे बघण्यासारखा सोहळा आहे. रंग खेळण्यासाठी प्रामुख्याने वापरतात तो गुलाल म्हणजे प्रेमातला आनंद आणि या आनंदाची उधळण म्हणून गुलाल. गुलाल हे भगवतप्रेमातील आनंदाचे प्रतीक आहे. म्हणून जन्मोत्सव झाल्यावर गुलालाची मुक्त उधळण करतात. गुलाल हा प्रेमाचा रंग आहे.आणि याची मुक्त बरसात करण्यासाठी हा रंगपंचमीचा दिवसाची योजना असावी.
आपल्या संस्कृतीत जी सणांची मांडणी केली आहे ती अतिशय जाणीवपूर्वक केली आहे असे वाटते. अविद्येची,अज्ञानाची, अपूर्णतेची, विकारांची होळी करून ज्ञानाचा,तेजाचा,सद्गुणांचा, सत्त्वाचा स्निग्ध प्रकाश पसरवणारा हा तेजोत्सव अर्थात होलिकोत्सव! प्रत्येकाच्या जीवनात आनंद व उत्साह प्रदान करून ही होळी आनंदाची अनुभूती प्रदान करो हीच सदिच्छा !!
सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment