Wednesday, May 31, 2023

नर्मदेच्या तीरावरचे 'महेश्वर'


" मुली, अहिल्या मेली आणि खंडू जिवंत आहे असे मी समजेन, पण तूं सती जाऊं नकोस. माझं ऐक. " हृदयाचे पाणी करणाऱ्या ह्या शब्दांनी मल्हारराव पुत्रनिधनानंतर आपल्या सुनेची समजूत घालीत होते. खरंतर ही गोष्ट इ. स. १७५४ मध्ये घडली. पेशव्यांचा भाऊ राघोबा ( रघुनाथ ) याने कुंभेरीचा किल्ला घेतला. या मोहिमेंत मल्हारराव त्यांच्या मदतीला गेले होते. लढाईत मल्हाररावांचा मुख्या मारला गेला. या वेळीं अहिल्याबाईही त्यांच्याबरोबर होत्या. खंडूजी हे मल्हाररावांचे एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांना पुत्रनिधनाचा फार मोठा धक्का बसला. या वेळीं अहिल्याबाईचें वय अवघें वीस वर्षांचे होते. त्या काळच्या परिपाठानुसार पतीमागोमाग सती जाण्याची त्यांनी तयारी केली. पण मल्हारराव यांना दुसरा कोणाचाच आधार नसल्यानें त्यांनी अहिल्याबाईंना सती न जाण्याची विनंती केली कारण आपल्या पराक्रमाने मल्हारराव जाणून होते की, इंदूर संस्थानच्या आधारवेल म्हणून अहिल्याबाईच योग्य आहे.  

हे वर्णन वाचून पुण्यश्लोक अहल्याबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महेश्वर या भूमीत मध्यंतरी जाण्याचा योग आला. हे मराठी मनांसाठी अभिमानस्पद असं गाव आहे. मध्य प्रदेशात नर्मदेच्या किनारी वसलेल्या या गावात अहिल्याबाई होळकर यांची राजधानी होती. इथे बसूनच त्यांनी माळव्यातील मराठी दौलतीचा कारभार चालवला आणि आजही त्याच्या पाऊलखुणा पावलापावलावर जाणवतात. पण त्याचबरोबर सम्राट कार्तवीर्य अर्जुन याची राजधानी म्हणूनही महिष्मती अर्थात महेश्वरची ओळख आहे. महेश्वरचा किल्ल्यासमोरील नर्मदा घाट समृद्ध असाच आहे. खरंतर पहाण्यासारखं इथे बरंच काही आहे. किल्ला, मंदिरे, नर्मदेचा किनारा आणि महेश्वरी साड्या हे येथे बघण्यासारखे आहे. 

महेश्वरला कवेत घेऊन नर्मदा येथून पुढे जाते. या नदीवर बांधलेले घाट देखणे आणि स्वच्छ आहेत. पेशवा घाट, अहिल्या घाट हे प्रसिद्ध घाट आहेत. या घाटांवर जास्त गर्दी दिसत नाही.  नर्मदेच्या किनाऱ्यावर दगडी बांधकाम असलेला हा किल्ला आहे. वर चढून आत गेल्यावर त्यातील राजगादीवर अहिल्याबाईंची मूर्ती आहे. ही राजगादी पाहिल्यावर तो सगळा काळ जिवंत होऊन आपल्यासमोर उभा राहतो. याच किल्ल्यात एका भागात महेश्वरी साड्या तयार करण्याची केंद्रे आहेत. या विणकरांना अहिल्याबाईंनी त्यावेळी सूरत वगैरे शहरातून बोलवले होते. त्यांच्या पुढच्या पिढ्याही येथे हेच काम करत आहेत. किल्ल्यातील छोट्या मंदिरातूनच येथील प्रसिद्ध दसरा उत्सवाची सुरवात केली जाते.

महेश्वरातील मंदिरेही प्रसिद्ध आहेत. कालेश्वर, राजराजेश्वर, विठ्ठलेश्वर व अहिल्येश्वर ही मंदिरे खासकरून पाहण्यासारखी आहेत. मंदिरावरची नक्षी, त्यामागील कल्पना या सगळ्या गोष्टी खरोखरच अत्यंत देखण्या आहेत. उत्तम प्रशासक न्याय देणाऱ्या म्हणून अहिल्याबाईंची ख्याति सर्वदूर होती. तडजोड आणि मार्दव हे गुण त्यांच्यात भरपूर असले तरी जिथे गरज असेल तेथें त्या वज्रापेक्षांहि कठोर होत असत.

अहिल्याबाईंचे स्मारक, त्यांनी बांधलेल्या अनेक विहिरी, धर्मशाळा, पूल, रस्ते, घाट आणि देवळें या रूपांत त्यांनी केलेले कार्य आजही सुस्थितीत बघायला मिळते. कलकत्ता ते बनारस रस्ता तयार करून सौराष्ट्रांत सोमनाथाचे, गयेला विष्णूचे आणि काशीला विश्वनाथाचे, नेपाळ येथील पशुपतीनाथ अशी विविध देवालये त्यांच्या धार्मिक वृत्तीची आणि दातृत्वाची आजही साक्ष देत आहेत. अहिल्याबाईंनी त्यांच्या जीवनकाळात केलेल्या पुण्यकर्मामुळेच त्या "पुण्यश्लोक" झाल्या. इंदूर संस्थानचा  कारभार त्यांनी अत्यंत कर्तबदारीने जवळजवळ तीस वर्षे सांभाळला. मल्हाररावानंतर इंदूर संस्थानची आधारवेल आणि स्त्री पराक्रमाचे एक सुवर्णपान मराठी इतिहासात अहिल्याबाईंच्या पराक्रमाने जुळले आणि म्हणून समृद्ध अशी महेश्वरची नर्मदा आजही पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या अस्तित्वाची जाणीव करून देते आहे. एकदा तरी या स्थानाची ऊर्जा प्रत्यक्षात अनुभव घेण्यासारखी आहे. अहिल्याबाई यांच्या चरणी नमन आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस

Tuesday, May 30, 2023

◆ तरलतरतरंगे देवि गंगे प्रसीद..

भगवति तव तीरे नीरमात्राशनोहं 
विगतविषयतृष्ण: कृष्णमाराधयामि  
सकलकलुषभंगेस्वर्गसोपानसंगे 
तरलतरतरंगे देवि गंगे  प्रसीद।। १।। 

श्रीमद आदि शंकराचार्य यांचे हे गंगाष्टक. हे अष्टक ऐकतांना, म्हणतांना सुद्धा आपण आपल्या स्थानाववरून गंगेच्या काठावर असल्याचा, तो गंगेचा प्रवाह अनुभवू शकतो इतकी विलक्षण रचना त्यांनी केली आहे. 

गंगा म्हणजे गंगाच आहे. तिचे मंत्रमय,काव्यमय वर्णन करणे तसे सोपें नाही. श्रीमद आदि शंकराचार्य आणि थोरले स्वामी महाराज अर्थात श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी प्रत्येक नदीवर स्तोत्र रचले. गेय आणि विशिष्ट छंदात असलेल्या रचना आजही अनेकांच्या ओठी आहेत. थोरले स्वामी महाराज वर्णन करतांना म्हणतात, 

न जाणे मी धर्मा न च विहित कर्मा अवगमा ।
न जाणे मी शर्मा न च विहित आधार महिमा ।।
कुकर्मासी कामा कुलित कृतकर्माची सुभगे ।
मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपथगे ।।

अशी ही गंगा स्वच्छ, निर्मळ,अविरल वाहते आहे. वैज्ञानिक दृष्टीनेही पाहून झाले,गंगेचे साठविलेले पाणी बिघडत नाही. काहीकाळ सगळं स्तब्ध झाल्यावर गंगेचा स्वच्छ आणि निर्मळ प्रवाह आपण बघितला आहे. गंगा म्हणजे पावित्र्याचा प्रेमळ प्रवाह आहे. प्रत्यक्ष भगवान विष्णूच्या चरणकमलातून निघालेले पावित्र्य, शंकराच्या मस्तकावर अवतरले व तेथून सेवेची दीक्षा घेऊन प्रवाह रूपात पृथ्वीवर वाहू लागले. ज्ञानाचा परिपाक म्हणजे सेवा व सेवेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे गंगा. गंगेचा हा उसळता प्रेमप्रवाह पाहून गंगेच्या अवतीभवती असणाऱ्या प्रत्येकाच्या ओठावर सहज शब्द येतात , 'गंगा मैय्या की जय!'

स्कंद पुराणात लिहिले आहे की, ज्येष्ठ शुद्ध दशमी संवत्सरमुखी म्हटली जाते. त्या दिवशी भावयुक्त अंत:करणाने स्नान व दान करावे. प्रयागराज कुंभमेळ्याच्या निमित्ताने गंगा स्नान पहिल्यांदा घडले. खरंतर तो अनुभव शब्दांतही मांडता येणार नाही इतका विलक्षण आहे. प्रयागराज कुंभमेळ्याची व्यवस्था अतिशय भव्यदिव्य आणि डोळे दिपवून टाकणारी होती. प्रयागराज ला राहिल्यावर गंगेत डुबकी मारल्यावर दुसऱ्या दिवशी काशीत पोहोचलो. दशाश्वमेध घाटावर गंगेचे पुन्हा दर्शन घेतले दिवसभर काशी पालथी घातली पुन्हा सायं आरतीसाठी गंगेच्या काठावर येऊन बसलो. देव, देश, धर्माच्या सीमा ओलांडलेली शेकडो माणसं तिथं बघितली आणि मनात एक क्षण विचार आला की खरंच गंगा किंवा नदी महात्म्य हे अभ्यासनीय आहे. सूर्यास्तानंतर काही क्षणांत दिव्यांच्या झमगटात गंगेची आरती सुरू झाली. गंगेचा प्रवाह शांत असला तरी सायं आरतीच्यावेळी गंगेच्या पाण्यात वेगळेपण जाणवत होते. ते बघितले आणि मनःशांती या शब्दाची ताकद अनुभवली. 

व्रतनिष्ठ, तेजोमूर्ती,चारित्र्यसंपन्न, तत्वज्ञ भीष्मांना जन्म देऊन गंगा कृतार्थ झाली. भारतीय लोकांच्या हृदयात तिने मातेचे स्थान प्राप्त केले. गंगेकडे भोगाच्या दृष्टीने पाहणाऱ्या असुरांना भोग मिळाला तर भक्तीच्या दृष्टीने पाहणाऱ्या देवांनी मोक्ष प्राप्त केला. पतीतपावनी गंगा अनेकांना भुरळ पाडणारी आहे. संत कबीर यांच्या गंगेच्या काठावरील रचना असो किंवा मग जगन्नाथ पंडित यांची गंगा लहरी म्हणजे तर गंगेचे विलोभनीय दर्शन घडवणारे आहे. आज गंगा दशहरा या निमित्ताने भगवती गंगा आम्हा सगळ्यांवर मांगल्याचा वर्षाव करो हीच तिच्या चरणी प्रार्थना.. 

हर हर गंगे !! 

✍️ सर्वेश फडणवीस 

#गंगादशहरा #Ganga

Friday, May 26, 2023

दूरदृष्टी , कल्पकता आणि अंत्योदय साकारणारे नितीन गडकरी

अखंडितलक्ष्मीअलंकृत, सकळगुणालंकरण राजर्षी राजमान्य श्रीमंत नितीनजी यांचे सेवेसी सप्रेम नमस्कार व विनंती विज्ञापना जे -

श्री नितीन जयराम गडकरी या आपल्या नावातच एक विलक्षण दूरदृष्टी ही बघायवयास मिळते. या माध्यमातून आपली रोजची दिनचर्या बघून अचंबित व्हायला होतं. आपला प्रवास आणि सतत कार्यमग्न राहण्याची सवय बघून आम्हा सर्वांना सदैव प्रेरणा मिळत असते. आज केंद्रातील मंत्री म्हणून आपण सलग ९ वर्ष झाली रस्ते विकासाच्या माध्यमातून देशात रस्त्याचे नवनवीन जाळे विणत आहात. देशाच्या कुठल्याही भागात गेलो की, नागपूर म्हंटल की आपल्या नावाचे वेगळेपण अनुभवायला येतंच. खरंतर राजकारणी नेता समाजाभिमुख तळागाळातील कार्यकर्त्यांशी ही तितक्याच आपुलकीने कार्य करणारा असावा असे वाटते आणि आपण त्यात अग्रक्रमावर आहात. सर्वांशी एक होत आपले वेगळे अस्तित्व आहे याची जाणीव करून देण्याची इच्छा आणि आकांक्षा असलेले आणि संघ संस्कार नकळतपणे लहानपणापासून भिनलेले आणि विद्यार्थी परिषदेपासून राजकारणात असलेले प्रतिभावंत मुदसद्दी राजकारणी म्हणून होत असलेली आपली जगन्मान्य ओळख आम्हाला नागपूरकर म्हणून अभिमान वाटावा अशीच आहे. 

आज भारतभर महामार्गाच्या माध्यमातून आपण आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. लोकाभिमुख कार्य करताना त्यांच्यातला एक होऊन कार्य करण्याची आपली आवड प्रत्येकाला जोडून ठेवत आहे. आज आपण नागपूरचा जो कायापालट करण्याचा ध्यास घेतला आहे त्याला शब्दात व्यक्त करणे कठीण असेच आहे. कुणीही नवा व्यक्ती नागपूरला आला की त्याच्या तोंडून आपुसक शब्द निघतात ते म्हणजे वाह.. नागपूर फारच बदलले आहे. आज नागपूर मेट्रोचे कार्य हे आपल्या कारकिर्दीत झाले याचा आम्हाला नागपूरकर म्हणून अभिमानच आहे. प्रत्येक नागपूरकरांना आपल्या कुटुंबातील एक ज्येष्ठ सदस्य असल्याचा विश्वास आपण निर्माण केला आहे. कुटूंब वत्सल आहात आणि कौटुंबिक सोहळ्यात आम्ही ते कायम अनुभवत असतो. पक्ष, पार्टी याचा मान ठेवत वैयक्तिक माणूसकीचे नाते आपण टिकवून ठेवले आहे त्यामुळे विरोधक सुद्धा आपल्याशी प्रसंगी राजकारण बाजूला ठेवत मैत्रीपूर्ण संबंध टिकवून ठेवण्यासाठी तत्पर असतात.  

आपण करत असलेले कार्य विलक्षण आदरयुक्त आणि अभिमान आणि अभिनंदनीय आहे आणि आम्हा नागपूरकरांचे आपण भूषण आहात. आपल्या सारखे नेते आणि राजकारणी आज देशाला वेगळ्या उंचीवर नेतील यात शंका नाहीच. आपल्या कार्यावर लिहिण्याचा माझा अधिकार नाही. पण आपला हितचिंतक आणि आपल्या कामावर निरतिशय प्रेम करणारा सच्चा कार्यकर्ता म्हणून या प्रभावी माध्यमातून शुभेच्छा देताना आनंद आणि गौरव होतो आहे. आपणांस जन्मदिवसाचे अभिष्टचिंतन. आई रेणुका आपल्याला उदंड निरामय आरोग्य प्रदान करो हीच तिच्या चरणी प्रार्थना..💐🙏🌷🌷

बहुत काय लिहिणे ? अगत्य असू द्यावे ही विज्ञापना. 

- सर्वेश फडणवीस


Monday, May 8, 2023

प्रणवीर महाराणाप्रताप !!

प्रणवीर अर्थात मेवाडचा राजा महाराणा प्रताप. आजही ह्यांच्या गौरवशाली इतिहासाचे किस्से ऐकणे म्हणजे पर्वणीच असते. त्यात कादंबरीत कठीण विषयाला सोपे करण्याची शैली सुद्धा वेगळीच असते. पराक्रमी योद्धयाची फारशी ओळख दुर्दैवाने आपल्याकडे नाही. राजपूतांमध्ये स्वाभिमानाची आग चेतविण्याचे महत्कार्य महाराणा प्रतापांनी केले. अकबराशी प्राणपणाने झुंज घेतली, प्रचंड पराक्रम गाजवला आणि त्याच महाराणाप्रताप यांच्याविषयी मराठीत माहिती कमीच सापडते. 

भारताच्या मध्ययुगीन इतिहासातील अत्यंत तेजस्वी आणि दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व म्हणजे 'महाराणा प्रताप'. ज्या महापुरुषांच्या केवळ स्मरणानं देशभक्तांचे बाहू स्फुरण पावतात ते प्रातःस्मरणीय नाव म्हणजे 'महाराणा प्रताप'. ज्याच्या जाज्वल्य राष्ट्रप्रेमाच्या कथांवर भारतीय मनं संस्कारित होऊन त्यांत राष्ट्रीय भावना निर्माण होते ते नाव म्हणजे 'महाराणा प्रताप'. राजस्थानच्या भूमीचा कणनकण, अरवली पर्वताचे उत्तुंग शिखर, घनदाट अरण्यातल्या वृक्षांच्या पल्लवित शाखा, या पुण्यभूमीवर वाहणारे मंद वारे आणि शांत नीरव रात्री आकाशात शांतपणे चमकणारे अगणित तारे अजूनही मूकपणे या प्रणवीराची कथा सांगत असतात, शतकानुशतकं. जाज्वल्य राष्ट्रप्रेमाची प्रदीप्त ज्योत, भारताच्या इतिहासातलं सोनेरी पान, आणि मातृभूमीसाठी सर्वस्वाची आहुती देणाऱ्या परमवीराची, त्याच्या यशापयशाची प्रेरणादायी गाथा म्हणजे महाराणा प्रतापांच्या आयुष्यावर असलेले 'प्रणवीर महाराणाप्रताप' ही कादंबरी गाथा आहे. 

राजस्थानमधील मेवाडच्या महापराक्रमी राजा प्रतापसिंह याच्या शौर्याने आजही भारतीयांचा ऊर भरून येतो. तुर्कांशी त्यांनी दिलेल्या लढ्याचे वर्णन आजही केले जाते. १५७२ ते १५९७ अशी २५ वर्षे राज्य केले. आपल्या मातृभूमीसाठी सर्वस्वाची आहुती देणाऱ्या या परमवीराची कथा, त्याच्या यशापयशाची प्रेरणादायी गाथा डॉ. भारती सुदामे यांनी प्रणवीर महाराणा प्रताप यातून लिहिली आहे. महाराणा प्रताप, मेवाड, त्याचा प्रिय चेतक घोडा आणि हल्दी घाटची लढाई, हाच इतिहास माहीत असणाऱ्यांना या कादंबरीतून महाराणांचे प्रामाणिक चरित्र समजते. देदीप्यमान पुरुषाची राष्ट्रप्रेमाने भारलेली ही कहाणी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

भारती ताई त्यांच्या मनोगतात लिहितात की, 'महाराणा प्रतापांच्या आयुष्यावर कादंबरी लिहायची म्हणजे व्यक्तिपूजन नव्हे.
'प्रतिमापूजन' 'प्रतिमाभंजना'ला दिलेलं उत्तर ठरू शकत नाही.' ही समजही दिली गेली. राणा प्रतापांच्या आयुष्याचा अभ्यास करण्यात जे गवसलं ते व्यक्त करण्याच्या सहज प्रक्रियेतून 'प्रणवीरा'चा जन्म झाला. ९ मे १५७० ला महाराणा प्रताप यांचा जन्म झाला. आज महाराणा प्रताप यांची जयंती आहे. त्यांची स्फुर्तीदायी जीवनगाथा जाणून घेण्यासाठी सौ.भारती सुदामे यांनी लिहिलेले 'प्रणवीर महाराणाप्रताप' ही कादंबरी मिळवून वाचायला हवी आणि संग्रही असावी अशीच आहे.

✍️ सर्वेश फडणवीस

#प्रणवीर #महाराणा_प्रताप_जयंती

Saturday, May 6, 2023

◆ नमो नारदाय हरिरूपाय !


आज वैशाख कृष्ण प्रतिपदा, देवर्षी श्रीनारदांची जयंती. देवर्षी नारद म्हणजे हरिभक्तीचा, गुह्यज्ञानाचा, विलक्षण प्रतिभेचा प्रसन्न आविष्कार आहेत. पुराणांव्यतिरिक्त त्यांच्या इतके परमज्ञानी, समयसूचक, हजरजबाबी, अलौकिक दूरदृष्टीचे आणि अपरंपार प्रेमभक्तीने अंतर्बाह्य दुसरे व्यक्तिमत्व शोधून सापडणार नाही. 

भगवद्गभक्तीचा प्रचार प्रसार त्रिभुवनात करणारे महर्षी नारद ज्ञानी होते तसेच राजनिती, धर्मशास्त्र, वेदपुराण, व्यवहारज्ञान यात निपूण होते. देवर्षी नारद उत्तम मार्गदर्शक आणि वक्ता म्हणून आजही प्रसिद्ध आहे. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. त्रिखंडात त्यांची सर्वदूर कीर्ती होती. 

देवर्षी नारदांची भूमिका समाजाचे हितरक्षक म्हणून देखील अत्यंत महत्वाची आहे. सर्वगुणसंपन्न देवर्षी नारद हे त्रिभुवनतारक होते. आपल्या मुक्त संचाराने त्यांनी त्रिभुवनातील अनेक समस्या सोडविल्या आणि जनसंवादाचे पुण्यकार्य केले. त्यांच्या प्रत्येक शब्दावर सर्वांचा विश्वास होता, त्यांची संवादशैली भिन्न होती. मुखातून वाईट शब्द न काढता समस्या सांगणे आणि प्रसंगी त्या समस्येच्या निराकरणात मदत करणे यासाठी ते प्रसिद्ध होते. प्रत्यक्ष ब्रम्हदेवाचे पुत्र असलेले देवर्षी नारदांनी गृहस्थाश्रम नाकारला म्हणून पित्याच्या शापाला सामोरी गेले. त्यांच्या संयमी वृत्तीचा परिचय त्यांच्या चरित्रात होतो, आपल्या शब्दावर कायम राहणारे नारदमुनी म्हणूनच तिन्ही लोकात ते वंदनीय होते. देवत्व आणि ऋषीत्व यांचा संगम नारदमुनींच्या व्यक्तिमत्वात होता म्हणून त्यांना 'देवर्षी' उपाधी प्राप्त झाली. देवांसह सामान्य माणसाचा देखील नारदवाणीवर विश्वास होता. 

त्रिखंडातील माहिती संकलित करून ती योग्य पद्धतीने आणि योग्य शब्दात मांडणे तसेच संवाद साधण्याचे काम नारदांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक केले. या कामासाठी ते त्रिखंडात आद्य पत्रकार म्हणून गौरविल्या गेले कारण तेव्हाही संवाद हे प्रभावी माध्यम होते आणि आजही याच माध्यमातून समाजात बदल घडुन येत आहेत. संवाद कौशल्य असेल पण बातमीत सत्यता नसेल तर अशा बातमीने समाज एकसंध राहत नाही. आपल्या जवळील माहितीची पूर्ण खात्री केल्याविना त्याला प्रसिद्धी न देणे सर्वोत्तम आहे. देवर्षी नारदांनी संवाद जगतात काम करणाऱ्या  प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांच्या अनुभवांचा ठेवा ठेवलेला आहे, त्यासाठी या क्षेत्रातील प्रत्येकाने त्यांच्या चरित्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

काळानुसार अनेक बदल होत आहेत. आज उपग्रहाच्या माध्यमातून माहिती त्याक्षणी लगेच मिळते. पण आजच्या काळाच्या या टप्प्यावर ज्यांनी याचा पाया रचला त्यांच्याप्रती आपली समर्पण भावना व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे आणि या कर्तव्याचे पालन करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. आज नारद जयंतीच्या मुहूर्तावर सकारात्मक विचारांना पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असायला हवे हाच संकल्प करत ज्यांनी जगालाही आनंदित केले त्यांना त्रिवार वंदन आहे.

- सर्वेश फडणवीस