Saturday, July 31, 2021

शिवशाहीरांचा शताब्दी उत्सव - ३ !! 🚩🙏🏼


शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांचं संपूर्ण जीवन म्हणजे सामाजिक जाणिवा,नाते जपणारे,संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाशी ऋणानुबंध जपणारे आहे असं वाटतं. खरंतर सार्वजनिक जीवनात हे नाते टिकवून ठेवणे तसे अवघड आहे. पण शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या शिवशाहीरांनी हे सहजपणे स्वतःच्या देहबोलीतून करून दाखविले आहे. त्यांच्या चरित्रातून सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारे प्रसंग अद्भुत आहेत.

जात, धर्म, श्रीमंत, गरीब इत्यादी प्रकार बाबासाहेबांनी कधीच मानले नाहीत. सेवा हा एकच धर्म आणि माणूस ही एकच जात त्यांना माहीत आहे. त्यांच्या वडिलांकडून हा गुण त्यांच्याकडे आला आहे. १९४३ च्या सुमारास त्यांच्या एका मित्राच्या घरात प्लेगची लागण झाली. त्याच्या घरी कमालीचे दारिद्रय. घर कसले? चक्क गोठ्यातच तो राहत होता. बाबासाहेबांच्या वडिलांनी त्यांच्या तीनही मुलांना उचलून आपल्या घरी आणले आणि ती स्वत:च्या पायावर उभी राहीपर्यंत त्यांच्या स्वत:च्या मुलांसारखाच सांभाळ केला. बाबासाहेबांनी सारे स्वत:च्या कर्तृत्वावर मिळवले आहे, पण हृदयाच्या श्रीमंतीचा फार मोठा वारसा त्यांना आपल्या वडिलांकडून मिळाला आहे. सामाजिक काम हे त्यांच्या सहजप्रवृत्तीचा भाग आहे. पुण्यामध्ये सुरुवातीला शुक्रवारपेठेतल्या घरी राहत असताना त्यांच्या वाड्याच्या ओट्यावर एक म्हातारी बाई कोणीतरी आणून टाकली. बाबासाहेबांनी स्वच्छतेपासून खाऊ घालण्यापर्यंत तिची सर्व सेवा केली. निःस्वार्थी सेवेचा, भूतदयेचा स्रोत त्यांच्या मनात आजपर्यंत तसाच टिकून आहे. अनेकांना त्यांच्या आजारपणात आर्थिकरूपात त्यांनी मदत देऊ केली, तर कित्येक शाळा, महाविद्यालयांना, रुग्णालयांना कोट्यवधी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर सर्व जाती-धर्माचे (मुस्लिमही) विद्यार्थी त्यांच्या घरी राहून शिकून मोठे झालेले आहेत.

१९४९ मध्ये त्यांचा विवाह 'माणूस'कार श्री. ग. माजगावकर यांच्या भगिनी कुमुद यांच्याशी झाला. हीच कुमुद सोळाव्या वर्षी पुढे निर्मला बळवंत पुरंदरे या नावाने पुरंदरे कुटुंबात समरसून गेली. इतक्या लहान वयात त्यांना खूप श्रीमंती आणि खूप गरिबीही अनुभवायला लागली. शिक्षण मॅट्रिक. माहेरी संकटांचा डोंगर कोसळलेला. शेवटी त्यांच्या आजीनं ठरवलं की जे आधी येतील त्यांना मुलगी देऊन टाकायची. सगळ्या बहिणींची लग्नं तशीच झाली,बाबासाहेब आणि निर्मला पुरंदरे यांचा संसार बहरू लागला होता पुढे त्यांना तीन मुलं झाली. मोठी माधुरी. दोन नंबर अमृत आणि तीन नंबर प्रसाद.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे इतिहासवेडे होते. किल्ले फिरणारे, इतिहासाची कागदपत्रं अभ्यासत इतिहास संशोधक मंडळात पडीक राहणारे. त्यामुळे सासरीसुद्धा आर्थिक संकटं आली. त्या परिस्थितीत निर्मला ताईंनी तीन मुलांना सांभाळत संसार केला.
‘वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र’ ही निर्मला ताईंनी सुरू केलेली संस्था आहे. ग्रामीण भागात मुलींना बालवाडी शिक्षणाची कशी गरज आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, बालवाडी शिक्षिका ग्रामीण भागांतूनच तयार केल्या तर बालवाडय़ा नक्की चालतील ही निर्मला ताईंची कल्पना आहे. आज शेकडो बालवाडी शिक्षिका तेवढय़ाच बालवाडय़ा चालवत आहेत. आणि हजारो मुलं, मुली त्याचा लाभ घेत आहेत.

बाबासाहेबांना अनेक मान्यवर, सरकारी पुरस्कार मिळाले. ‘पद्मविभूषण, ‘पुण्यभूषण’, महाराष्ट्रभूषण, आणि अनेक पुरस्कारांची श्रीमंती त्यांच्या पाठीशी आहे पण निर्मला ताईंनी त्याचं भांडवल स्वत:च्या कामाच्या फायद्यांसाठी कधी केलं नाही. बाबासाहेबांच्या ओळखी कधी मागितल्या नाहीत किंवा वापरल्याही नाहीत. स्वतःच्या संस्था त्यांनी स्वत: वाढवल्या होत्या.बाबासाहेबांना त्यांच्या कामाचं कौतुक होतं. अखेर २० जुलै २०१९ ला निर्मलाताई हे जग सोडून गेल्या. त्या काळात एका स्त्रीने समाजकार्य करणे हेच अवघड काम होते पण बाबासाहेबांच्या सावलीत त्यांनी ते अवघड कार्य पूर्ण केले..

१९५१ मध्ये बाबासाहेबांनी शिवचरित्र लेखनास प्रारंभ केला. मराठी इतिहासाच्या शकावली निर्मितीसाठी पुणे विद्यापीठाच्या वतीने भारत इतिहास संशोधक मंडळात त्यांनी १९५२ ते १९६० या काळात नोकरी केली. १९५४ मध्ये त्यांनी सुप्रसिद्ध गायक व संगीत दिग्दर्शक श्री सुधीर फडके यांच्या मार्गदर्शनाखाली ९० क्रांतिकारकांबरोबर गोवा मुक्ती संग्रामात-(दादरा-नगर-हवेली) भाग घेतला. या संग्रामात वेळ मिळेल त्या वेळी आपल्या या मित्रांपुढे ते शिवचरित्रातील प्रसंग सांगत. शिवचरित्रकथनाला अशी सुरुवात झाली.

श्री.सुधीर फडके बाबासाहेबांच्या गुणांचा गौरव करताना म्हणाले
होते, "परमेश्वरानं विशिष्ट हेतू मनात ठेवून या माणसाला जन्माला घातलं आहे. शिवाजी महाराजांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाचं असामान्य कर्तृत्व साक्षात उभं करण्यासाठी तशाच चारित्र्यसंपन्न माणसाची योजना त्यानं केली आहे. सत्चारित्र्य, निरलसपणा, निःस्वार्थता, स्वातंत्र्यभक्ती, स्फूर्तिदायी तसंच लालित्यपूर्ण लेखनकौशल्य, अमोघ वाणी, मूर्तिमंत नाट्य,विषयाशी तादात्म्य  कुणालाही चटकन् आपलंसं करून घेण्याची सहजवृत्ती अशा अनेक गुणांनी मंडित अशी ही आगळी व्यक्ती हे ईश्वरीकार्य तन, मन, धनानं आयुष्यभर करीत आहेत.'' या गोवा मुक्ती संग्रामात बाबासाहेब एक स्वयंसेवक होते. दमणगंगा नावाच्या नदीच्या काठावर रखोली हे छोटेसे गाव वसलेले आहे. या संग्रामाचा एक भाग म्हणून त्यांना या भागात गार्ड-ड्युटी करावी लागलेली होती.

दमणगंगेच्या रम्य काठी, तिथली दाट झाडी, शांतता आणि बरोबरचे तरुण सहकारी यांच्या सान्निध्याने त्यांना शिवकालाचे स्मरण झाले असणे साहजिक आहे. तिथेच २ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट १९५४ च्या दरम्यान त्यांच्या तोंडून शिवाजी राजांची स्फूर्तिदायक कथा बाहेर पडली. पुरंदऱ्यांनी त्या काळात बरीच व्याख्याने दिली. हे कार्य पूर्ण करून घरी परतताना त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचेही स्मरण होणे, त्यांचे दर्शन घेण्याची इच्छा होणे साहजिकच होते. शिवाजी महाराज ऐतिहासिक काळातले स्फूर्तिदाते तर वीर सावरकर हे आधुनिक इतिहासातील सशस्त्र क्रांतीचे प्रणेते होते. रणसंग्राम करून यशस्वी झालेल्या या तरुणांना वीर सावरकर मोठ्या आनंदाने भेटले. त्यांनी सुद्धा बाबासाहेबांसह सर्वांचे कौतुक केले.

✍️ सर्वेश फडणवीस

#शिवशाहीरांची_शंभरी

Friday, July 30, 2021

शिवशाहीरांचा शताब्दी उत्सव - २ !! 🚩🙏🏼

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सारख्या युगपुरूषांबद्दल काही बोलणे म्हणजे, सूर्याला दीप दाखवण्या सारखे आहे. इतके उत्तुंग व्यक्तीमत्व म्हणजे श्रीमंत बाबासाहेब आहे. सुरुवात कुठून करावी. हेच सुचत नव्हतं... आणि नकळत मनाने त्यांच्या बालपणात डोकावून पाहिले... तेव्हा जे गवसलं... ते असं.... 

श्री.बळवंतराव मोरेश्वरराव पुरंदरे ..जन्म.. पुणे येथे...२९ जुलै १९२२ रोजी झाला. त्या दिवशी भारतीय सौर पंचांगात 'नागपंचमी' ही तिथी होती. पुरंदरे घराणे म्हणजे सरदार घराणे. घरात बोलण्याची पद्धत खानदानी होती. एकमेकांना 'अहो-जाहो' संबोधणे असे,त्यामुळेच त्यांना 'बाबासाहेब' असे संबोधले जाऊ लागले.

जेजुरीचा खंडोबा आणि तुळजापूरची श्री तुळजाभवानी ही पुरंदऱ्यांची कुलदैवते. घरात धार्मिक वातावरण होते. खंडोबाचे, देवीचे नवरात्र, इतर सगळे सणवार -उत्सव साजरे केले जात. शिवाय पर्वतीवर वतनानुसार रोज सकाळ-सायंकाळ जाऊन श्रीविष्णूची पूजाही केली जात असे आणि त्या वेळपासून आजपर्यंत ती प्रथा तशीच चालू आहे. काही काळ बाबासाहेबही या पूजेसाठी रोज पर्वतीवर जात. परंतु पुढे व्याख्यानमाला, लेखनासाठी प्रवास घडू लागल्याने त्यांचे पुतणे विश्वासराव यांना त्यांनी पर्वतीवर पूजेस जाण्यास सांगितले. बाबासाहेब देवभक्तआहेत परंतु देवभोळे नाहीत. घरातल्या या धार्मिक वातावरणाचा त्यांच्या मनावर झालेला परिणाम त्यांच्या आचारविचारांतून व्यक्त होताना दिसतो. वडिलांच्या शैलीदार बोलण्याची विलक्षण मोहिनी त्यांच्या मनावर बसली. वडिलांकडून ऐकलेल्या गोष्टी, हकिकती वाड्याच्या आजूबाजूच्या मुलांना जशाच्या तशा सांगण्याचा प्रयत्न बाबासाहेब करू लागले आणि त्या वेळीच त्यांच्यातील 'कथनशैली'चा जन्म झाला. आपल्या वडिलांइतका दुसरा मोठा गुरू नाही असे त्यांना वाटे. 

बाबासाहेब वडिलांना मामासाहेब म्हणत. ते उत्तम चित्रकार होते. बाबासाहेबांना घडविण्यात मामासाहेबांचा फारच मोठा वाटा आहे. त्यांचे भारदस्त, पेशवाई थाटाचे व्यक्तिमत्त्व, धारदार आवाज, दांडगे वाचन, जबरदस्त पाठांतर होते. त्यांनी मुलांना इतिहासातल्या हकिकती, घराण्यातल्या गोष्टी, गडकोटांची, जुन्या वाड्याहुड्यांची वर्णने, शस्त्रास्त्रांची माहिती, स्त्री-पुरुषांचे जुने दागदागिने आणि खानदानी रीतिरिवाज तपशीलवार सांगितले. शिकारकथा सांगितल्या. महायुद्धाच्या शौर्यकथा, कधी बारभाईंचे कारस्थान, एखाद्या सतीचे गमन ह्या गोष्टी ते इतक्या हुबेहूब सांगत, की दोन दिवस डोळ्यांपुढून तो प्रसंग हलत नसे. भुताखेतांच्या गोष्टी मात्र चुकूनही त्यांनी कधी सांगितल्या नाहीत. यातूनच बाबासाहेबांना इतिहासाची आवड निर्माण झाली. 

प्लेगच्या साथीमुळे पुढे पुरंदरे कुटुंब सिंहगडच्या पायथ्याशी डोणजे गावात राहायला आले. तेव्हा छोट्या बाबासाहेबांनी आपल्या वडिलांबरोबर सिंहगडावर चढून जाऊन सर्व किल्ला पाहिला आणि नंतर ते वारंवार जाऊ लागले. तिथेच त्यांच्या मनात शिवभक्तीचा जन्म झाला,तसेच इतिहासाची आवड उत्पन्न झाली.


बाबासाहेब काही वेळा चिंचवडला आजोळी राहायला जात.चिंचवडच्या देवळात आणि पुण्याच्याही देवळांमध्ये त्यांनी भरपूर कीर्तने ऐकली. त्यांना कीर्तने ऐकण्याचा आणि करण्याचाही नादच होता. चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके यांच्या धाडसाचे त्यांना कायमच आश्चर्य वाटत. बाबासाहेबांच्या बोलण्यातला हजरजबाबीपणा, चातुर्य आणि मोठ्यांशी मान राखून बोलण्याचे,अदबीने वागण्याचे धैर्यही यातूनच आकाराला आले. पुढे एक दिवस त्यांची पावले शाळेबरोबरच 'भारत इतिहास संशोधक मंडळा'कडेही वळली. तिथले ग्रंथ पाहण्याची उत्सुकता त्या ग्रंथांचे वाचन करण्यापर्यंत पुढें त्यांचा अभ्यास वाढतच गेला

शालेय जीवनात अनेक नाटकांमध्ये त्यांनी भाग घेतला. ते नकला उत्तम करीत. एकदा संमेलनात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची नक्कल करून दाखविली. त्या वेळी प्राचार्य दबडघाव, प्रिं. नारळकर, श्री. किंकर, श्री. म. माटे, गोखले अशी ख्यातनाम मंडळी समोर बसली होती. या सर्वांनी बाबासाहेबांचे अतोनात कौतुक केले, 'तू उत्तम वक्ता होशील' असा आशीर्वादही दिला.

त्यानंतर बाबासाहेबांनी ही नक्कल साक्षात स्वातंत्र्यवीर सावरकरांपुढेच सादर केली. तात्यांनीही त्यांचे कौतुक केले. त्यांना नक्कल फारच आवडली होती, पण पुढे ते म्हणाले, "आयुष्यभर केवळ नकलाच करू नकोस दुसऱ्यांच्या, स्वत:चं काही असू दे' आणि बाबासाहेबांनी त्यांचे सांगणे ऐकले. नकला करणे बंद केले. परंतु तात्यांच्या वक्तृत्वाचा प्रभाव त्यांच्या मनावर कायमचा ठसला आणि 'शिवशाहीर' म्हणून बाबासाहेब सुपरिचित झाले.

बाबासाहेबांमधील सर्वांत मोठा गुण म्हणजे त्यांची स्मरणशक्ती. त्यांच्या अफाट स्मरणशक्तीमुळे देशभक्तांची भाषणे, ग्रंथांमधील सनावळ्या त्यांच्या लक्षात राहत. कीर्तनातल्या आख्यायिका, पदे त्यांना तोंडपाठ असत. घरातल्या धार्मिक,सामाजिक वातावरणाचा त्यांच्या मनावर परिणाम होत होता. त्यातूनच त्यांची वाचनाची आवड संतवाङ्मयाकडे वळू लागली. त्याबरोबरच इतिहासाची पुस्तके वाचण्याचाही त्यांना नाद लागला आणि वाचलेले लक्षातही राहत असे. इतिहासाची आवड वाढत गेली आणि त्यामुळे मंडळातील बखरींचे वाचन त्यांनी केले. या वाचनाचा परिणाम त्यांच्या लेखनावर झालेला आढळतो. १९४२ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर काही काळ संघप्रचारक म्हणून नगर जिल्ह्यात काम करू लागले. १९४८ मध्ये संघाच्या सत्याग्रहात भाग घेतल्याने त्यांना तुरुंगवास घडला. पुण्याच्या येरवडा येथील तुरुंगात ते शिवाजी महाराजांच्या कथा सांगू लागले आणि त्यातूनच त्यांच्या मनात विचार आला की,जे आपण सांगतोय ते लिहून ठेवायला हवं आणि तुरूंगातून पुढे बाहेर पडल्यावर अधिक संशोधन सुरू झाले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे 'महाराज' या ग्रंथात लिहितात,कोण तूं रे कोण तूं ही कविता वाचतांना असं वाटतं की जणू या सगळ्या ओळीं त्यांनाच लागू होतील..

कोण तूं रे कोण तूं

कालिकेचे खड्ग़ तूं ? की इंदिरेचे पद्म तूं ?

जानकीचे अश्रु तूं ? की उकळता लाव्हाच तूं ?

खांडवांतिल आग तूं ? की तांडवांतिल त्वेष तूं ?

वाल्मिकीचा श्लोक तूं ? की मंत्र गायत्रीच तूं ?

भगिरथाचा पुत्र तूं ? की रघुकुलाचे छत्र तूं ?

मोहिनीची युक्ति तूं ? की नंदिनीची शक्ति तूं ?

अर्जुनाचा नेम तूं ? की गोकुळीचे प्रेम तूं ?

कौटिलाची आण तूं ? की राघवाचा बाण तूं ?

वैदिकाचा घोष तूं ? की नीतिचा उद्घोष तूं ?

शारदेचा शब्द तूं ? की हिमगिरी नि:शब्द तूं ?

की सतीचे वाण तूं ? वा मृत्युला आव्हान तूं ?

शंकराचा नेत्र तूं ? की भैरवाचे अस्त्र तूं ?

की ध्वजाचा रंग तूं ? वा बुद्धिचा श्रीरंग तूं ?

कर्मयोगी ज्ञान तूं ? की ज्ञानियांचे ध्यान तूं ?

चंडिकेचा क्रोध तूं ? की गौतमाचा बोध तूं ?

तापसीचा वेष तूं ? की अग्निचा आवेश तूं ?

मयसभेतिल शिल्प तूं ? नवसृष्टिचा संकल्प तूं ?

द्रौपदीची हांक तूं ? प्रलंकराचा धाक तूं ?

गीतेतला संदेश तूं अन् क्रांतिचा आदेश तूं !

संस्कृतीचा मान तूं अन् आमुचा अभिमान तूं !

कोण तूं रे कोण तूं.......कोण तूं रे कोण तूं

✍️ सर्वेश फडणवीस 

#शिवशाहीरांची_शंभरी


Thursday, July 29, 2021

शिवशाहिरांचा शताब्दी उत्सव !! 🚩🙏🏼

पद्मविभूषण,महाराष्ट्रभूषण,पुण्यभूषण श्रीमंत शिवशाहीर बळवंत मोरेश्वर पुरंदरे अर्थात बाबासाहेब या इतिहासपुरुषाने मराठी मनावर जे अधिराज्य गाजवले नव्हे मराठी मनांत एक आदराचे,आपुलकीचे स्थान निर्माण केले त्याला शब्दात व्यक्त करणे तसे कठीण आहे. कालपासून अनेकांचे व्हाट्स अँप आणि इनबॉक्स ला विचारणा झाली की बाबासाहेबांबद्दल काहीतरी लिही. बाबसाहेबांबद्दल लिहिणे सोपी नाहीच. खरंतर हा फक्त छोटासा प्रयत्न करतो आहे. बाबासाहेबांना जाणून घ्यायचे असेल तर प्रत्यकाने आपल्या मनाच्या दिवाणखान्यात "राजा शिवछत्रपती" हे द्विखंडात्मक चरित्र ठेवावें म्हणजे श्रीमंत बाबासाहेब समजू शकतील. शिवतपस्वी असलेले बाबासाहेब आज शताब्दी वर्षात पदार्पण करत आहेत. आंग्ल दिनांकानुसार २९ जुलै आणि तिथीनुसार नागपंचमी (१३ ऑगस्ट) या दोन्ही दिवसांचे औचित्य साधत बाबासाहेबांचा एक एक पैलू मांडण्याचा प्रयत्न करतोय. खरंतर हे शिवधनुष्य पेलणे कठीण आहे पण तरी जे वाचलं, जे २-३ भेटीतून जाणून घेतलं त्यांच्या परिचयाचे जे आहेत त्यांच्याकडून ऐकल्यावर आणि त्यातून सलग १५ दिवस लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.

आज सकाळपासूनच वातावरणात एक वेगळा बदल जाणवतो आहे. या माध्यमातून त्यांच्यावर जो शुभेच्छारुपी वर्षाव होतो आहे त्याने प्रसन्नता निर्माण झाली आहे. शरीराने जरी काही किलोमीटर दूर असलो तरी मनाने पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या पुरंदरे वाड्यात आहोत की काय इतका भास क्षणोक्षणी जाणवतो आहे.

'छत्रपती शिवाजी महाराज' या ऐतिहासिक युगपुरुषाला आणि त्यांच्या कर्तुत्वाला साहित्याच्या,कथा,कादंबरी, नाटक, चरित्र, व्याख्याने या विविध रूपांमध्ये समर्थपणे साकारणाऱ्या एकमेवाद्वितीय श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आहेत. या यज्ञासाठी  त्यांच्याच शब्दांतील आई जगदंबेच्या चरणी 'वरदान' मागून आपण सुरुवात करूया..

चंडिके दे,अंबिके दे,शारदे वरदान दे
रक्त दे,मज स्वेद दे, तुज अर्घ्य देण्या अश्रु दे।
वादळासह प्रलयलाटा मज सभोती उसळु दे
खांडवालित अग्नितांडव मांडवा या बिलगु दे
सोसण्या ती आग शक्ती अन् शिशूचे हास्य दे
चंडिके दे,अंबिके दे,शारदे वरदान दे।

आहुतीचे मंत्र गाण्या मज शिबीची शक्ति दे
परी सतीची मुग्धता दे, हा देह भगवा होऊ दे
आग ती भडकून उठण्या स्निग्धता अस्थीस दे
चंडिके दे,अंबिके दे,शारदे वरदान दे।

तृप्त मी शिवशक्तिच्या गानात झालो शारदे
मागणे काहीच नाही, एवढे वरदान दे
मम चितेने यात्रिकांची वाट क्षणभर उजळू दे
चंडिके दे, अंबिके दे, शारदे वरदान दे।

ब. मो. तथा बाबासाहेब पुरंदरे

✍️ सर्वेश फडणवीस

#शिवशाहिरांची_शंभरी

( खालील छायाचित्र प्रतापगडावरील श्री भवानी मातेच्या मंदिरात पूजा करतांनाचे आहे) 

Friday, July 23, 2021

गुरु हा माझा प्राणविसावा !! ✨

आज गुरुपौर्णिमा !! 🙏🏼🌺🙏🏼

अतीव प्रेमादराने,कृतज्ञतेने करुणा भाकण्याचा शिष्यांचा हक्काचा दिवस. श्री सद्गुरू म्हणजे माया,ममता,प्रेम आणि वात्सल्याने प्रत्येक शिष्यावर कृपेचा वर्षाव करणारी माउली. श्री  सद्गुरू म्हणजे चालते-बोलते ईश्वरच म्हणता येईल .आपण सारे 'गुरु' या शब्दाचे महत्त्व जाणतोच. गुरु शिष्याला आत्मसाधन देतात व त्याला आत्मसाक्षात्कारी बनवतात व पुढे त्याचे आत्मकल्याण ही करतात.

मी ज्या परंपरेचा पाईक आहे त्याबद्दल आज लेखन करतो आहे. स्वामी चिन्मयानंद यांच्यापासून श्री.पूर्णानंद महाराज,श्री.रामानंद महाराज,श्री.माधवराव महाराज व विद्यमान पीठाधीश श्री.दाजी महाराज या श्री सद्गुरु परंपरेचा पाईक झालो.

पाटणबोरी हे गाव यवतमाळ जिल्यातील केळापुर तालुक्यातील पांढरकवड्यापासून आंध्रप्रदेशच्या वाटेवर वसलेले आहे. यांच गावात पांच पिढ्यांपासून मठाची परंपरा आजतागायत चालू आहे.१९०९ च्या दसऱ्याला मठात चतुर्थ दत्तावतार प.पू.श्री.वासुदेवानंद सरस्वती आले आणि तेथेच त्यांनी श्री गुरुचरित्र पारायण करण्याची आपली मनीषा बोलून दाखवली. प.पू.श्री.टेंबेस्वामी यांनी आठवडाभर मुक्काम केला नि पारायण केले. रोज गावात भिक्षा मागून ते आपला उदरर्निर्वाह चालवत.

प.पू.श्री.माधवराव महाराज यांच्या अवतार समाप्तीनंतर श्री मठाची धुरा त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव थोर अवतारी पुरुष संतश्रेष्ठ श्री दाजी महाराज सांभाळत होते. २८ ऑगस्ट २०१८ ला महाराजांनी आपली अवतार लीला समाप्त केली. आज श्री सद्गुरू देहरूपाने नसले तरी तत्वरूपाने सदैव आहेत याची प्रचिती कायमच असते. 

नांदेड जिल्यातील (धनगर) टाकळी येथील टेंबेस्वामींचे समकालीन दाजी महाराज यांनी सांगून घेतलेला हा पुनर्वतार आहे. त्यावेळी त्यांनी माधवराव महाराज यांना सांगितले होते की मला आठव्या वर्षी सर्पदंश होईल.  त्याची कथा ही विस्तृतपणे देतो आहे.

श्री.दाजी महाराज व नागसर्प यांचा फार जवळचा संबंध दिसून येतो.त्यांच्या जन्मवेळी नागराजाने दर्शन दिले होते.त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी ते नागपूर येथे श्री दादाजी काळू यांच्या घरातील विहरीवर कपडे धूत असताना साबणाची वडी दोन फर्शांच्या मधल्या सांदित पडली.ती उचलताना अत्यंत विषारी नागाने त्यांच्या तर्जनीस दंश केला.साबणाच्या वडीसोबतच बोटामध्ये दात रुतलेल्या अवस्थेत तो नाग वर आला.परंतु विष शरीरात भिनले नाही,ते तर्जन व मध्यमा यांच्या सांध्याजवळ तसेच गोठून राहिले. ती जागा विषाप्रमाणे काळी पडलेली दिसत असे.

श्री.दाजी महाराज यांची राहणी नेहमी साधी व नीटनेटकी असते. धोतर,कुर्ता,उपरणे व काळी टोपी असा त्यांचा अगदी साधा वेश असतो. सोवळे अत्यंत कड़क. पण आजच्या आधुनिक युगातील व्यक्तींना जाच होणार नाही यावर त्यांचा कटाक्ष असे. प. पू. महाराजांचा स्वभाव अगदी मितभाषी होता. बोलणे मोजकेच होते. आवश्यक त्याच्याशी आवश्यक तेवढेच. विनाकारण चर्चा,तर्क-कुतर्क,त्यांच्या स्वभावास पटत नसे. त्यांच्या मनाचा मोठेपणा थक्क करुन सोडणारा होता. वृत्ती टोकाची क्षमाशील होती. त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान ज्यांनी राबवले त्यांच्याठाई सुद्धा ममत्व कमी झाले नाही.’निंदकाचे घर असावे शेजारी’ आणि ‘झाकली मूठ स्व्वालाखाची’ही त्यांची महत्वाची जीवनसूत्रे राहीले होते . निर्लेप,निरपेक्ष,निस्पृहवृत्ती.त्यांच्या सद्गुरु तीर्थरूपांच्याच तोडीची होती .व्यवहार दक्षताही तशीच होती. गृहस्थाश्रमाचे आचरण करीत त्यांनी मोक्षसाधना केली तरी संसाराकडे किंचितही दुर्लक्ष केले नाही.

श्री.दाजी महाराजांच्या आत्मिक,अध्यात्मिक व यौगिक सामर्थ्याची चर्चा केलेली,स्तुती केलेली त्यांना अजिबात आवडत नसे.पण तरीही शिष्याने असे केले तरी मातृवत प्रेमाने त्याचे कौतुकच करत असत.
प.पू.सद्गुरुंचा साधकाने साधन करावे हाच अट्टाहास होता.कायम दिलेले साधन नित्य नियमित करण्याकडे त्यांचा कटाक्ष होता. ते स्वतः ते करत असत आणि शिष्यांकडून ही करवून घेत असत. अशा सद्गुरूंची प्राप्ती होणे ही  दैवी कृपा आहे असेच समजतो. एक तप त्यांचा सहवास आणि त्यांची कृपा हे ही शब्दांत न मांडणारे आहे. 
असंख्य शिष्य,साधक,आणि भक्तांवर आपल्या कृपेची साऊली कायम राहावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. 

केवळ भाग्यवंतासच श्री सद्गुरुंची प्राप्ती होते. त्याहीपेक्षा ते भाग्यवंत ज्यांना सद्गुरुसेवेची संधी मिळते. त्या भाग्यवंतात अगदीच थोड़े असे परमभाग्यशाली असतात ज्यांना श्रीगुरुकृपा लाभते. गुरुकृपेशिवाय जीवन व्यर्थ आहे. श्रीसद्गुरुकृपेशिवाय
सन्मार्गाचे ज्ञान नाही.ज्ञानाशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती नाही.

राहो सदैव रसना रत राम नामी ।
नेवो प्रभो मजसी शेवटी सौख्य धामी ।
हे एवढे करी न वेळ दिनासी द्याया ।
दाजी गुरू नमन हे तव दिव्य पाया ।।

।। श्री सद्गुरूचरणार्पणमस्तु ।।

✍️ सर्वेश फडणवीस 

#गुरुपौर्णिमा

Saturday, July 17, 2021

आठवणीतील वारी.. 🚩🚩

दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात आळंदीहून पंढरपुरास जाण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी निघते. श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याबद्दल कुतूहल व प्रेम मराठी माणसाच्या मनात जणू उपजत निर्माण झाले आहे. पिढ्यान् पिढ्या वारकरी व सर्वसामान्यांच्या मनावर या पालखीचे संस्कार झालेले आहेत. लोकांच्या प्रेमाचे प्रत्यंतर पालखीच्या वाटेने ठायी ठायी दिसून येते. पालखीने मराठी माणसाला अगदी भारून टाकले आहे. आयुष्यात सर्व गोष्टी श्रीभगवंत ठरवत असतात, आपण त्या मार्गावरून वाटचाल करायची असते. याचा प्रत्यय बरेचदा येतो. वारीचा हा अनुभव फक्त टीव्ही च्या माध्यमातून घेणारा मी कधी माउलींच्या पालखीला खांदा देण्यापर्यंत गेलो हे समजलेच नाही. वाटले की स्वप्नवतच आहे की काय?

पण मी स्वतःला भाग्यवान समजतो याचे मुख्य कारण म्हणजे फलटणला वारीत जाण्याची संधी पांडुरंगाने दिली. तो माझ्या आयुष्यातील परमभाग्याचा दिवस मी समजतो. प्रत्यक्ष आळंदी ते पंढरपूर वारीत जायला मिळाले नाही; पण फलटण ला जो अनुभव मिळाला तो अवर्णनीय आहे.

सर्व संतांच्या पालख्यांमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी प्रमुख समजली जाते. पंढरपुरास येताना निरनिराळ्या गावी या पालखीची मोठ्या आदराने आणि उत्कंठाने लोक वाट बघत असतात. असाच काहीसा अनुभव मला फलटण मुक्कामी आला.
तत्पूर्वी माउली किती काळजी घेतात याचा अनुभव सातारा येथे आला. फलटणला जाण्यासाठी सातारा हून जायचे होते. सातारा येथे भेटण्याचे ठरले. पालखी गावी येणार म्हणून बसेस बंद होत्या. मग श्री.रोहन दादा उपळेकरचे परिचित श्री.गुमास्ते काका अचानकपणे बस स्टैंड वर भेटले. मग टैक्सी करून आम्ही सर्वजण फलटण ला पोहोचलो.

माउली म्हणजे साक्षात् चैतन्यच!  त्यामुळे सर्वच वातावरणात चैतन्याने भरले होते. साधारणपणे दुपारी ४ वाजता गावाच्या वेशीवर पालखी आली. बरेचजण गावाच्या वेशीवरच पालखीला सामोरे जातात.तेथून मग पालखी गावात रात्रीच्या मुक्कामी आली. संध्याकाळी ६.३० - ७.०० च्या सुमारास पालखी तळ्यावर आली. एका विशिष्ठ ठिकाणी रथ थांबवून त्यानंतर पालखी खांद्यावर घेऊन तळाच्या मध्यभागी आणली जाते. पालखी खांद्यावर घेण्याचे भाग्य मला लाभले.आणि तेथून मग “माउली माउली” चा जयजयकार करत तंबूपुढे तळाच्या मध्यभागी पालखी आली. तंबूपुढे सर्व दिंड्या वर्तुळाकार थांबतात, मध्ये लोक बसलेले असतात. मध्यभागी गालिचावर पालखी आणून ठेवतात. “ज्ञानोबा माउली तुकाराम” म्हणत सर्व वारकरी गजर करत टाळ वाजवत असतात. पुढे माउलीच्या पालखीजवळ पंच उभे राहून तेथे जाऊन चोपदार उभे राहतात. त्यांनी चांदीची मूठ असलेली काठी वर केली व हैबतराव बाबांचे प्रतिनिधी यांनी "हो" म्हटले की एक चमत्कार दिसून येतो, सर्वजण एकदम टाळ वाजवण्याचे थांबवतात. सर्वत्र एकदम शांतता पसरते.चोपदार काय सांगतात या कडे सगळ्यांचे लक्ष लागते. सावकाशपणे चोपदार हरविलेल्या व सापडलेल्या वस्तूंची यादी वाचतात, कोणाचे काही हरविले व कोणाला काही सापडले असेल तर ते त्यांनी माउलींच्या तंबूजवळ कळवायचे. नंतर दुसऱ्या दिवशीच्या मुक्कामाची व प्रस्थानाची वेळ सांगितली जाते. यानंतर " आरती ज्ञानराजा " या आरतीस सुरवात होते. ही आरती वारकऱ्यांना अत्यंत प्रिय आहे. खरं सांगायचं तर शिस्तीने, प्रेमाने आणि आदराने आरती म्हणावी ती वारकऱ्यांनीच !आरती झाली की पालखी तंबूत जाते व वारकरी आपल्या दिंडीच्या उतरण्याच्या ठिकाणी जातात.

माऊलींच्या पादुकांवर डोकं टेकवल्यावर सर्व शीण एका क्षणात विरघळून जातो व मग नवे चैतन्य आणि आनंद घेऊन बाहेर पडतो. ’समाधान’ या शब्दात किती गोष्टी भरून आहेत याचा प्रत्यय प्रत्यक्ष पादुकांचे दर्शन घेतल्यावर येतो. ज्या गावात पालखी येते तेथील लोकांच्या आनंदाला तर पारावर राहात नाही. याचा अनुभव मी घेतला. सर्वजण वारीत समाविष्ट होतात. गावात अनेक साधू संत आलेले असतात तोच त्यांचा दसरा व तीच त्यांची दिवाळी. या माध्यमातून मैत्री झालेला रोहन विजय उपळेकर च्या घरी मी हा सोहळा​ अनुभवू शकलो. याच्या घरी अनेक वारक-यांना जेवायला बोलावले जाते. अगदी सणावाराप्रसंगी जे गोडधोड पदार्थ करून खातो, तसे पदार्थ केले होते हे पाहून आश्चर्य वाटले. हा अनुभव माझ्यासाठी नवीनच होता. पण रोहन दादाची आई सौ.चारुकाकू म्हणाल्या की, यांना जेवू घातले म्हणजे आपण व आपले कुळ कृतार्थ झाले असे समजले जाते. त्यानंतर वारकरी संप्रदायातील संततुल्य श्री. मुकुंदकाका जाटदेवळेकर यांच्या दर्शनासाठी जाण्याचा योग आला. स्वतः ते वारीत अनेक वर्षांपासून चालत आहेत. त्या नंतर तळावर रात्री परत दर्शनाला गेलो. तोच उत्साह सर्वदूर होता.रथाला फुलांनी सजवण्याचे काम चालू होते. दर्शनार्थी दर्शन घेत होते.

सकाळी ६ वाजता माउली पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले. सर्व वारकरी माउलींबरोबर  त्या अठ्ठावीस युगे उभ्या असलेल्या पांडुरंगाच्या भेटी साठी निघाले. हा नयनरम्य सोहळा डोळ्यांत व मनात साठवून आम्ही पण परतीच्या प्रवासाला निघालो. तेथून परतीच्या प्रवासाला 'श्रीक्षेत्र दत्तधाम' येथे दर्शन घेऊन परत सातारा येथे येऊन श्री गुमास्ते काकांकडे आलो. त्यांनी पण खुप अगत्यानी सर्व केले. एक नवं नातं साताऱ्यात निर्माण झालं. खरं सांगायचं तर हे सगळं खूप विलक्षण आहे. यथाशक्य सगळ्यांनी एकदा तरी वारी अनुभवावी. हा आनंद सदैव सोबत असतो. अजून बऱ्याच गोष्टी आठवत आहेत, पण त्या शब्दात सांगता येणार नाहीत. त्यासाठी एकदा तरी वारीच अनुभवायला हवी ! 

- सर्वेश फडणवीस

Monday, July 12, 2021

रथोत्सव जगन्नाथाचा !! 🙌🚩🚩

आपण ज्या संस्कृतीचे पाईक आहोत ती चिरपुरातन असली तरी नित्यनूतन आणि वर्धिष्णू आहे. आषाढ शुद्ध प्रतिपदा कालिदासदिन मेघदूताचे रसास्वाद घेतल्यावर आषाढ शुध्द द्वितीया तिथिला जगन्नाथाचा रथोत्सव सुरू होतो. काही दिवसांपूर्वी Disney Hot Star वर रथयात्रा सिरीज बघितली आणि जगन्नाथपुरी आणि या एकंदर रथयात्रेबद्दलचे कुतूहल वाढतच गेले. मध्यंतरी काही कामानिमित्त संत साहित्याचे गाढे अभ्यासक आचार्य म.रा.जोशी सरांशी या विषयावर बोलणे झाले. त्यांच्याशी बोलताना जाणवलं की रथयात्रा हा उत्सव परंपरेचा भाग असला तरी त्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे आणि तो आजही तसाच उत्साहात सुरू आहे. 

जगन्नाथाच्या रथयात्रेचे भव्य आयोजन शतकानुशतके अखंडपणे चालू आहे. जगन्नाथपुरीचा उल्लेख पुरुषोत्तम क्षेत्र नावाने होतो. पंढरपूर, तिरुपती, कांची,प्रमाणेच जगन्नाथपुरी हे वैष्णव क्षेत्र आहे. या क्षेत्राचे आराध्य दैवत जगन्नाथ अर्थात विष्णू आहे. पण येथील आराध्य दैवत आपल्या नावाने व अस्तित्वाने वैचित्र्यपूर्ण असे आहे, त्याच्या कथा तसेच इतिहासही तेवढाच वेगळा आहे. या क्षेत्रातील देवता काष्ठाच्या आहेत. वेळोवेळी नवीन काष्ठाने त्यांची आकृती सिद्ध होते. मुळात द्वारकेहुन ओंडका वाहत वाहत पुरीला येतो आणि त्यातून या मूर्ती घडवल्या जातात अशी पारंपरिक समजूत आहे. 

या क्षेत्राच्या देवता आणि परंपरा यांची हकिकत आगळीवेगळी आहे. यापैकी एक रथोत्सव आहे व आपल्या मार्गावरून रथ ओढण्याचे काम भक्त करीत असतात. पण, हा रथ तेवढाच महत्त्वाचा आहे. तो सूर्यतंत्र विद्येशी संबंधित आहे कारण तो रथ कालतंत्राचा गतिमान आहे. रथात जगन्नाथासह बलराम आहे आणि या रथाची अधिष्ठात्री देवी सुभद्रा आहे. भगवंतांनी योगमायेला पृथ्वीतलावर ज्या ज्या नावाने प्रकट होण्यास सांगितले, त्यापैकी एक नाव भद्रा आहे. भद्रा देवीलाच ‘सुभद्रा’ असेही म्हणतात. 

पुरीच्या विश्वविख्यात जगन्नाथ मंदिरातही उत्कीर्ण लेख आहेत. स्वतः तो प्राचीन शिलालेख जोशी सरांनी बघितला आहे. या लेखामधून जगन्नाथपुरीचे मंदिर शके ९००-१००० नामरूपाला आले हे कळते. परंतु, उपलब्ध माहितीने असेही दिसते की, जगन्नाथाची पूजाअर्चा ९०० शकापूर्वी होत होती व ओरिसातील सर्व समाजबांधव जगन्नाथ रथोत्सवात भाग घेत. जगन्नाथाच्या भक्तांबरोबरच राजघराणेही या उत्सवात सहभागी होतात. लक्षणीय बाब अशी की, तत्कालीन पुरी प्रदेशावर राज्य करणार्‍या राजांनी राज्य आपले नसून जगन्नाथाचे आहे व आपण त्याचे सेवक आहोत, अशी भूमिका घेऊन उत्सवाचे वेळी राजा स्वत: सेवक म्हणून झाडलोट करीत असे. राज्य आपले नाही, राजाचा मालक अनुपस्थित आहे म्हणून आपण सेवाधर्माने राज्य कारभार करतो हा भाव रामायणापासून आपल्या संस्कृती, धर्म परंपरेत होता. तेच दृश्य जगन्नाथ रथोत्सवातही आढळते. आचार्यांनी ज्या चार दिशेला मठांची स्थापना केली त्यात पुरीला सुद्धा त्यांनी मठ स्थापन केला आणि तेथील पीठस्थ आचार्य रथोत्सवात सहभागी होतात.
 
जगन्नाथ पुरी येथे जे जगन्नाथाचे क्षेत्र आहे तेथे बलराम,जगन्नाथ व सुभद्रा आहे. पुरीची सुभद्रा भगिनी रूपात आहे. विशेषत: ती बलरामासह आहे. पुरीतील जगन्नाथ प्रकटीकरणाचे रूप अलौकिक आहे. याची अलौकिकता सरांना स्वामी विकासानंदानी सांगितलेली आहे. ते म्हणाले,एकदा भगवती लक्ष्मी देवीने भगवंताजवळ अशी तक्रार केली. आपण अहोरात्र भक्तांचाच विचार करता व आपली वाट पाहता पाहता काहीच हाती लागत नाही. तेव्हा भगवंत म्हणाले, माझे पुढील रूप पाहा. माझ्याजवळ भगवती कुमारिका सुभद्रा असेल. शेष बलराम रूपात असेल. मी रथात आरूढ असेल व मला हात असणार नाही. माझ्या भक्तांना सतत मी वाटप करतो व ते हाताने करतो. जगन्नाथ रूपात हात राहणार नाही तर दृष्टीने, गतीने, रथस्थ गतीने मी कार्य करीन.
 
म्हणून सर्व भक्तांना सुभद्रादेवीसह जगन्नाथ नावाने भगवान वाटप करतात व उत्साहाने, आनंदाने, प्रसन्नतेने भगवान जगन्नाथ भक्तांना मला हात नसले, तरी माझी बहीण सुभद्रा अन्नाचे, भाताचे वाटप करीत आहे. असे हे पुरुषोत्तम क्षेत्र अद्वितीय आहे. रथात जगन्नाथ नारायण आहेत व देवी सुभद्रा प्रसाद देत आहे. सुभद्रा, जगन्नाथ आणि बलराम ज्या ज्या भक्तांवर नजर फेकतात त्यांना ती अन्न देते आहे. हे सगळं अलौकिक आहे. आज Dr.David Frawley यांचे ट्विट याच अनुषंगाने आवडले. ते लिहितात,

Only in Bharat are the great Devatas honored, worshipped and travel along with us on our life-journey (Jivayatra). May we all join them in the true inner journey of consciousness to the highest Light. 

जय जगन्नाथ 

✍️ सर्वेश फडणवीस

#RathYatra2021 #JayJagannath

Saturday, July 10, 2021

''स्वरसाधना' - 'हे रत्न भारताचे' - लता मंगेशकर !! 📖

लता मंगेशकर हा सप्ताक्षरीचा गानमंत्र आहे. लताबाईं बद्दल कितीही वाचलं,ऐकलं तरी मन भरतच नाही. कारण हा स्वर समजल्यापासून मनाला रुंजी घालणारा आहे. या माध्यमाची ताकद पुन्हा यानिमित्ताने अनुभवता आली. आपल्या फ़्रेंड लिस्ट मध्ये एखादी व्यक्ती जी प्रत्यक्ष काही काळ लता मंगेशकर यांच्या घरी त्यांच्या ऊर्जेच्या प्रत्यक्ष सहवासात राहते आणि मग जो ध्यास लहानपणापासून घेतलेला असतो त्यातून काही दर्जेदार कलाकृती निर्माण होतात आणि त्याचे नाव असते 'हे रत्न भारताचे लता मंगेशकर 'आणि 'स्वरसाधना'. 

खरंतर कोणत्या व्यक्ती आपल्या जीवनात याव्यात याचे काही गणित नसते. नियती काही योग घडवून आणते आणि आपण फक्त निमित्तमात्र असतो असंच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे सौ.रेखा चवरे आहेत. अचानक एका संध्याकाळी फोन येतो समोरून लेखाचे कौतुक होते आणि मग त्यांचा अधिक परिचय जाणून घेतल्यावर आश्चर्य वाटतं. आयुष्यात प्रत्येकाला वाटतं की गानस्वरस्वती लता मंगेशकर यांना प्रत्यक्ष एकदा तरी बघावे, प्रत्यक्ष ऐकावे. पण हे स्वप्न फार कमी जणांचे सत्यात उरतले आहे. त्यात सौ.रेखा चवरे या खरोखर श्रीमंत आहेत त्यांनी दीदी नावाचा ध्यास घेतला त्यावर सतत वाटचाल केली आणि आज हे रत्न भारताचे लता मंगेशकर, स्वरसाधना,मोगरा फुलला आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे हृदयगंधर्व या कलाकृती त्यांच्याकडून निर्माण झाले. 'हे रत्न भारताचे लता मंगेशकर' आणि 'स्वरसाधना' हे पुस्तकं त्यांनी स्नेहपूर्वक भेट म्हणून पाठवले. 

लता दिदींवर आजवर अनेकांनी लिहिले आहे.अनेकांना दीदी या असामान्य दैवी शक्ती बद्दल समजले आहे. परंतु सौ.रेखा चवरे यांनी हे रत्न भारताचे या पुस्तकातून दिदींचा एक- एक पैलू छान उलगडून दाखवला आहे. दिदींची भक्ती त्यांनी यातून केलेली सहज जाणवते. खरंतर हे पुस्तक म्हणजे दिदींचे शब्दपूजनच त्यांनी आपल्यासमोर मांडले आहे. आचार्य अत्रे यांचा लेख,वक्ता दशसहस्त्रेशु राम शेवाळकर यांची प्रस्तावना आणि लेखिका सौ.रेखा चवरे यांनी मांडलेले शब्दपूजन याने हे पुस्तक वाचनीय आणि संग्रही असावे असेच आहे. स्वतःच्या लिखाणात दीदी पूर्णपणे सामावू शकलेल्या नाहीत याची खंत आणि जाणीव ही त्यांना आहे पण कृतज्ञतापूर्वक त्यांनी हे पुस्तक दिदींना अर्पण केले आहे. 

आचार्य अत्रे यांनी दै. मराठा मध्ये २८ सप्टेंबर १९६४ साली लिहिलेल्या लेखात म्हणतात, सरस्वतीच्या वीणेचा झंकार, उर्वशीच्या नूपुरांची रुणझुण नि कृष्णाच्या मुरलीची साद ही सर्व एकवटून साक्षात विधात्यानेच लताचा कंठ घडवला असला पाहिजे, याविषयी आम्हांला तिळमात्र शंका नाही. भारतीय संगीताच्या सृष्टीत मधुर, भरदार नि पल्लेदार आवाजाच्या गायक-गायिकांची वाण नाही. त्यांच्यापैकी काही जणांनी वर्षानुवर्षे गानतपस्या करून प्राप्त केलेली गायन,नैपुण्याची सिद्धी लतापेक्षा अधिक आहे, यातही शंका नाही. त्यांच्या संगीतसंपदेच्या भांडारापुढे कुणाचेही मस्तक आदराने नम्र झाल्याखेरीज राहणार नाही; पण लताच्या स्वरातील जादू काही आगळीच आहे.
 
आ.राम शेवाळकर त्यांच्या प्रस्तावनेत लिहितात,लतादीदींची ही जीवनगाथा त्यांच्या कंठाइतकीच सुरेल आहे. दीदींच्या
सुखदुःखात्मक जीवनातील सर्व क्षण स्वरांसारखेच आहेत. त्यातून कधी सोसलेल्याची करुण नादवलये निघतात, तर क्वचितच आनंदकल्लोळ निनादत राहतात. त्यांचे संपूर्ण जीवन ही अभिजात संगीताची मैफलच झाली आहे. तिचा आस्वाद घेताना सुखदु:खातीत अशी समधात अवस्था वाचकांनाही प्राप्त होते. आयुष्यात रुतलेल्या सर्व काट्यांचे पराग होतात व सलांची फुले होतात. लतादीदींच्या स्वरांनी आपल्या मनाचा गाभारा झंकारून उठतो व आयुष्याला अमृतकुंभाची धन्यता लाभते. पूर्वायुष्यात लतादीदींना प्याव्या लागलेल्या विषाचा एकही शिंतोडा रसिकांच्या अमृतकुंभावर उडालेला नसतो. त्यामुळे सर्व प्रकारच्या स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून उरणाऱ्या आनंदाचे चांदणे आपल्याही अंतराळात फुलत राहते.

स्वरसम्राज्ञी लतादीदींनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह म्हणजे स्वरसाधना आहे . या ग्रंथाचं संपादन करण्याची सुवर्ण संधी सौ.रेखा चवरे यांना प्राप्त झाली आहे. त्यात त्या लिहितात, शब्दांतून व्यक्त झालेल्या स्वरसम्राज्ञीला बघणं, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा आस्वाद  घेणं हा सुंदर आनंद योग आहे. लतादीदींचं हे अनोखं रूप खूप काही देणारं आहे. या ग्रंथांच्या रूपाने त्यांचं हे सुंदर रूप दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. विविध प्रसंगी अनेक विषयांवर उमटलेल्या लतादीदींच्या लेखणीतून या साहित्याची निर्मिती झाली. 

स्वतःच्या संग्रही विखुरलेल्या स्वरुपात असलेला हा मौलिक ऐवज एकत्रित करताना आणि ग्रंथरुपाने हा अमूल्य ठेवा अभिजात साहित्याच्या दरबारात सादर करताना अतीव आनंद,कृतार्थता आणि कृतज्ञताभावाने मन भरून आलं आहे. लतादीदींच्या लेखणीचं आणि वाणीचं समजून-उमजून अभ्यासपूर्ण रीतीने वाचन करताना आणि त्यावर चिंतन- मनन करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं जे सखोल दर्शन नव्याने घडलं,ते रसिकांना दाखविण्याच्या उत्कट ओढीचं मूर्त स्वरूप म्हणजे हा संपादित ग्रंथ. कृतार्थ भावनेने, चिमुकल्या ज्योतीने लतादीदींच्या महा तेजाची आरती करण्याचा हा नम्र प्रयत्न आहे.

आयुष्य उजळणाऱ्या अशा व्यक्तींच्या परिसस्पर्शाने दुसऱ्या व्यक्तींच्या जीवनात जे सुवर्णकण येतात, ते श्रीमंत, समृद्ध करणारे असतात आणि वाचतांना नकळतपणे हात जोडले जातात. भारतीय चित्रपटसृष्टीची अनभिषिक्त गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मानाचा मुजरा करीत या देशामधील नादलुब्ध रसिकांच्या हृदयसिंहासनावर चिरकाल राज्य करण्यासाठी त्यांना आणि त्यांच्या सूररम्य कंठाला दीर्घायू लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. 

हे रत्न भारताचे - लता मंगेशकर / स्वरसाधना 
लेखिका - संपादन - सौ.रेखा चवरे
प्रकाशक - परचुरे प्रकाशन मंदिर - मुंबई 
मूल्य- ₹ २५० - ₹ ३०० 

✍️ सर्वेश फडणवीस

#लतामंगेशकर #परचुरे_प्रकाशन

Friday, July 9, 2021

मानाचं पान - सुधीर गाडगीळ !! 📖



सुधीर गाडगीळ याचे एक छान आणि आपल्यापैकी अनेकांच्या खाणे या आवडीच्या विषयावरील पुस्तक वाचनात आले. प्रसिद्धीच्या यशोशिखरावर असलेले वलयांकित लोक खातात तरी काय ? या आशयावर आधारित फक्त ११२ पानी असलेले हे पुस्तक वाचनीय आहे आणि संग्रही असावे असेच आहे. घनश्याम पाटील यांच्याकडून मागवले आणि न राहवता लगेच वाचून संपवले.

आज सुधीर गाडगीळ हे नाव मुलाखती आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांत सुवर्णाक्षरात नोंदवून ठेवावे असेच आहे. प्रख्यात मुलाखतकार,निवेदक म्हणून ते जगन्मान्य आहेत. प्रत्येक मराठी माणसाने त्यांच्या मुलाखती ऐकल्या असतील,वाचल्या असतील आणि बघितलेल्या असतील पण त्यांनी स्वतः या मानाच्या पानात स्वतःच्या अनुभवाबद्दल सगळ्यात शेवटी मांडलेले आहे. खरंतर ते सगळ्यात पहिल्यांदा वाचायला हवे असं वाटतं. त्यांच्या मानाच्या पानावर ते लिहितात, खाणे,गाणे,बोलणे हे माझे वीक पाँईटस आहेत आणि खाताना कुणी बोलणारा समोर असेल तर खाण्याला चव येते आणि पदार्थांच्या चवीवर चवीष्टपणे टिप्पणी करत खाल्लं तर गप्पांची मैफलही जमते नि खाण्याची रंगतही वाढते.

फक्त ११२ पानांच्या पुस्तकात जगातील सर्वोत्कृष्ट खाण्याच्या ठिकाणांची जगभ्रमंती आपल्याला पुस्तकातून सहज घडते. यातील प्रत्येक वलयांकित व्यक्तीच्या प्रवासातील खाण्याचे ठिकाण आणि त्यातील वर्णन वाचतांना आपणही काहीकाळ त्या ठिकाणी त्याचा आस्वाद घेतोय की काय असा अनुभव येतो. जगभरातील हाँटेलमध्ये गेल्यावर तेथील खाद्य भ्रमंती,तिथल्या खाद्य पदार्थांची चव, नुसत्याच शाकाहारी किंवा मांसाहारी नाही तर कसं,काय खावं याबद्दलही भरभरून लिहिल्यावर तेथील संपूर्ण वातावरणाची सफर त्यांनी आपल्यासारख्या वाचकांना करून दिली आहे.

प्रेमाने खिलवणारी आणि मनमुक्त खाणारी मंडळी मोकळीढाकळी असतात असा सुधीर गाडगीळ यांचा अनुभव आहे. केवळ भूक लागलीय म्हणून खाणं उरकणारे वेगळे आणि विशिष्ट पदार्थांसाठी हॉटेल हुडकत जाणारे चविष्ट वेगळे. मुळात ही वलयांकित लोक काय खातात?कुठे खातात?कसे खातात? याबद्दल त्यांनी केलेल्या गप्पांच्या नोंदी म्हणजे हे मानाचं पान आहे.

जवळपास ३१ वलयांकित व्यक्तींच्या खवय्येगिरी वर त्यांनी यात छान प्रकाश टाकला आहे. पुण्यातील चपराक प्रकाशनाच्या घनश्याम पाटील यांनी प्रकाशित केलेले हे ' मानाचं पान ' विकत घेवुनच वाचावे लागेल आणि संग्रही ठेवावे असेच आहे. नुकतीच त्याची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. चवदार मंडळींच्या चविष्ट खाण्याचे चोचले मांडणारे हे मानाचं पान आहे. वलयांकित व्यक्ती खातात तरी काय? या प्रश्नाचे उत्तर देणारे हे पुस्तक आवर्जून वाचावे असेच आहे. खूप दिवसांनी काहींतरी हलकेफुलके,वेगळ्या धाटणीचे आणि नवं वाचल्याचे आत्मिक समाधान आहे.

नामवंताची खवय्येगिरी या विषयाचं अफलातून पुस्तक
'मानाचं पान'
लेखक : सुधीर गाडगीळ
प्रकाशक : घनश्याम पाटील (चपराक प्रकाशन)
मूल्य - ₹ १५०

✍️ सर्वेश फडणवीस

चपराक प्रकाशन,घनश्याम पाटील