Saturday, July 10, 2021

''स्वरसाधना' - 'हे रत्न भारताचे' - लता मंगेशकर !! 📖

लता मंगेशकर हा सप्ताक्षरीचा गानमंत्र आहे. लताबाईं बद्दल कितीही वाचलं,ऐकलं तरी मन भरतच नाही. कारण हा स्वर समजल्यापासून मनाला रुंजी घालणारा आहे. या माध्यमाची ताकद पुन्हा यानिमित्ताने अनुभवता आली. आपल्या फ़्रेंड लिस्ट मध्ये एखादी व्यक्ती जी प्रत्यक्ष काही काळ लता मंगेशकर यांच्या घरी त्यांच्या ऊर्जेच्या प्रत्यक्ष सहवासात राहते आणि मग जो ध्यास लहानपणापासून घेतलेला असतो त्यातून काही दर्जेदार कलाकृती निर्माण होतात आणि त्याचे नाव असते 'हे रत्न भारताचे लता मंगेशकर 'आणि 'स्वरसाधना'. 

खरंतर कोणत्या व्यक्ती आपल्या जीवनात याव्यात याचे काही गणित नसते. नियती काही योग घडवून आणते आणि आपण फक्त निमित्तमात्र असतो असंच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे सौ.रेखा चवरे आहेत. अचानक एका संध्याकाळी फोन येतो समोरून लेखाचे कौतुक होते आणि मग त्यांचा अधिक परिचय जाणून घेतल्यावर आश्चर्य वाटतं. आयुष्यात प्रत्येकाला वाटतं की गानस्वरस्वती लता मंगेशकर यांना प्रत्यक्ष एकदा तरी बघावे, प्रत्यक्ष ऐकावे. पण हे स्वप्न फार कमी जणांचे सत्यात उरतले आहे. त्यात सौ.रेखा चवरे या खरोखर श्रीमंत आहेत त्यांनी दीदी नावाचा ध्यास घेतला त्यावर सतत वाटचाल केली आणि आज हे रत्न भारताचे लता मंगेशकर, स्वरसाधना,मोगरा फुलला आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे हृदयगंधर्व या कलाकृती त्यांच्याकडून निर्माण झाले. 'हे रत्न भारताचे लता मंगेशकर' आणि 'स्वरसाधना' हे पुस्तकं त्यांनी स्नेहपूर्वक भेट म्हणून पाठवले. 

लता दिदींवर आजवर अनेकांनी लिहिले आहे.अनेकांना दीदी या असामान्य दैवी शक्ती बद्दल समजले आहे. परंतु सौ.रेखा चवरे यांनी हे रत्न भारताचे या पुस्तकातून दिदींचा एक- एक पैलू छान उलगडून दाखवला आहे. दिदींची भक्ती त्यांनी यातून केलेली सहज जाणवते. खरंतर हे पुस्तक म्हणजे दिदींचे शब्दपूजनच त्यांनी आपल्यासमोर मांडले आहे. आचार्य अत्रे यांचा लेख,वक्ता दशसहस्त्रेशु राम शेवाळकर यांची प्रस्तावना आणि लेखिका सौ.रेखा चवरे यांनी मांडलेले शब्दपूजन याने हे पुस्तक वाचनीय आणि संग्रही असावे असेच आहे. स्वतःच्या लिखाणात दीदी पूर्णपणे सामावू शकलेल्या नाहीत याची खंत आणि जाणीव ही त्यांना आहे पण कृतज्ञतापूर्वक त्यांनी हे पुस्तक दिदींना अर्पण केले आहे. 

आचार्य अत्रे यांनी दै. मराठा मध्ये २८ सप्टेंबर १९६४ साली लिहिलेल्या लेखात म्हणतात, सरस्वतीच्या वीणेचा झंकार, उर्वशीच्या नूपुरांची रुणझुण नि कृष्णाच्या मुरलीची साद ही सर्व एकवटून साक्षात विधात्यानेच लताचा कंठ घडवला असला पाहिजे, याविषयी आम्हांला तिळमात्र शंका नाही. भारतीय संगीताच्या सृष्टीत मधुर, भरदार नि पल्लेदार आवाजाच्या गायक-गायिकांची वाण नाही. त्यांच्यापैकी काही जणांनी वर्षानुवर्षे गानतपस्या करून प्राप्त केलेली गायन,नैपुण्याची सिद्धी लतापेक्षा अधिक आहे, यातही शंका नाही. त्यांच्या संगीतसंपदेच्या भांडारापुढे कुणाचेही मस्तक आदराने नम्र झाल्याखेरीज राहणार नाही; पण लताच्या स्वरातील जादू काही आगळीच आहे.
 
आ.राम शेवाळकर त्यांच्या प्रस्तावनेत लिहितात,लतादीदींची ही जीवनगाथा त्यांच्या कंठाइतकीच सुरेल आहे. दीदींच्या
सुखदुःखात्मक जीवनातील सर्व क्षण स्वरांसारखेच आहेत. त्यातून कधी सोसलेल्याची करुण नादवलये निघतात, तर क्वचितच आनंदकल्लोळ निनादत राहतात. त्यांचे संपूर्ण जीवन ही अभिजात संगीताची मैफलच झाली आहे. तिचा आस्वाद घेताना सुखदु:खातीत अशी समधात अवस्था वाचकांनाही प्राप्त होते. आयुष्यात रुतलेल्या सर्व काट्यांचे पराग होतात व सलांची फुले होतात. लतादीदींच्या स्वरांनी आपल्या मनाचा गाभारा झंकारून उठतो व आयुष्याला अमृतकुंभाची धन्यता लाभते. पूर्वायुष्यात लतादीदींना प्याव्या लागलेल्या विषाचा एकही शिंतोडा रसिकांच्या अमृतकुंभावर उडालेला नसतो. त्यामुळे सर्व प्रकारच्या स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून उरणाऱ्या आनंदाचे चांदणे आपल्याही अंतराळात फुलत राहते.

स्वरसम्राज्ञी लतादीदींनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह म्हणजे स्वरसाधना आहे . या ग्रंथाचं संपादन करण्याची सुवर्ण संधी सौ.रेखा चवरे यांना प्राप्त झाली आहे. त्यात त्या लिहितात, शब्दांतून व्यक्त झालेल्या स्वरसम्राज्ञीला बघणं, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा आस्वाद  घेणं हा सुंदर आनंद योग आहे. लतादीदींचं हे अनोखं रूप खूप काही देणारं आहे. या ग्रंथांच्या रूपाने त्यांचं हे सुंदर रूप दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. विविध प्रसंगी अनेक विषयांवर उमटलेल्या लतादीदींच्या लेखणीतून या साहित्याची निर्मिती झाली. 

स्वतःच्या संग्रही विखुरलेल्या स्वरुपात असलेला हा मौलिक ऐवज एकत्रित करताना आणि ग्रंथरुपाने हा अमूल्य ठेवा अभिजात साहित्याच्या दरबारात सादर करताना अतीव आनंद,कृतार्थता आणि कृतज्ञताभावाने मन भरून आलं आहे. लतादीदींच्या लेखणीचं आणि वाणीचं समजून-उमजून अभ्यासपूर्ण रीतीने वाचन करताना आणि त्यावर चिंतन- मनन करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं जे सखोल दर्शन नव्याने घडलं,ते रसिकांना दाखविण्याच्या उत्कट ओढीचं मूर्त स्वरूप म्हणजे हा संपादित ग्रंथ. कृतार्थ भावनेने, चिमुकल्या ज्योतीने लतादीदींच्या महा तेजाची आरती करण्याचा हा नम्र प्रयत्न आहे.

आयुष्य उजळणाऱ्या अशा व्यक्तींच्या परिसस्पर्शाने दुसऱ्या व्यक्तींच्या जीवनात जे सुवर्णकण येतात, ते श्रीमंत, समृद्ध करणारे असतात आणि वाचतांना नकळतपणे हात जोडले जातात. भारतीय चित्रपटसृष्टीची अनभिषिक्त गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मानाचा मुजरा करीत या देशामधील नादलुब्ध रसिकांच्या हृदयसिंहासनावर चिरकाल राज्य करण्यासाठी त्यांना आणि त्यांच्या सूररम्य कंठाला दीर्घायू लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. 

हे रत्न भारताचे - लता मंगेशकर / स्वरसाधना 
लेखिका - संपादन - सौ.रेखा चवरे
प्रकाशक - परचुरे प्रकाशन मंदिर - मुंबई 
मूल्य- ₹ २५० - ₹ ३०० 

✍️ सर्वेश फडणवीस

#लतामंगेशकर #परचुरे_प्रकाशन

No comments:

Post a Comment