आपण ज्या संस्कृतीचे पाईक आहोत ती चिरपुरातन असली तरी नित्यनूतन आणि वर्धिष्णू आहे. आषाढ शुद्ध प्रतिपदा कालिदासदिन मेघदूताचे रसास्वाद घेतल्यावर आषाढ शुध्द द्वितीया तिथिला जगन्नाथाचा रथोत्सव सुरू होतो. काही दिवसांपूर्वी Disney Hot Star वर रथयात्रा सिरीज बघितली आणि जगन्नाथपुरी आणि या एकंदर रथयात्रेबद्दलचे कुतूहल वाढतच गेले. मध्यंतरी काही कामानिमित्त संत साहित्याचे गाढे अभ्यासक आचार्य म.रा.जोशी सरांशी या विषयावर बोलणे झाले. त्यांच्याशी बोलताना जाणवलं की रथयात्रा हा उत्सव परंपरेचा भाग असला तरी त्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे आणि तो आजही तसाच उत्साहात सुरू आहे.
जगन्नाथाच्या रथयात्रेचे भव्य आयोजन शतकानुशतके अखंडपणे चालू आहे. जगन्नाथपुरीचा उल्लेख पुरुषोत्तम क्षेत्र नावाने होतो. पंढरपूर, तिरुपती, कांची,प्रमाणेच जगन्नाथपुरी हे वैष्णव क्षेत्र आहे. या क्षेत्राचे आराध्य दैवत जगन्नाथ अर्थात विष्णू आहे. पण येथील आराध्य दैवत आपल्या नावाने व अस्तित्वाने वैचित्र्यपूर्ण असे आहे, त्याच्या कथा तसेच इतिहासही तेवढाच वेगळा आहे. या क्षेत्रातील देवता काष्ठाच्या आहेत. वेळोवेळी नवीन काष्ठाने त्यांची आकृती सिद्ध होते. मुळात द्वारकेहुन ओंडका वाहत वाहत पुरीला येतो आणि त्यातून या मूर्ती घडवल्या जातात अशी पारंपरिक समजूत आहे.
या क्षेत्राच्या देवता आणि परंपरा यांची हकिकत आगळीवेगळी आहे. यापैकी एक रथोत्सव आहे व आपल्या मार्गावरून रथ ओढण्याचे काम भक्त करीत असतात. पण, हा रथ तेवढाच महत्त्वाचा आहे. तो सूर्यतंत्र विद्येशी संबंधित आहे कारण तो रथ कालतंत्राचा गतिमान आहे. रथात जगन्नाथासह बलराम आहे आणि या रथाची अधिष्ठात्री देवी सुभद्रा आहे. भगवंतांनी योगमायेला पृथ्वीतलावर ज्या ज्या नावाने प्रकट होण्यास सांगितले, त्यापैकी एक नाव भद्रा आहे. भद्रा देवीलाच ‘सुभद्रा’ असेही म्हणतात.
पुरीच्या विश्वविख्यात जगन्नाथ मंदिरातही उत्कीर्ण लेख आहेत. स्वतः तो प्राचीन शिलालेख जोशी सरांनी बघितला आहे. या लेखामधून जगन्नाथपुरीचे मंदिर शके ९००-१००० नामरूपाला आले हे कळते. परंतु, उपलब्ध माहितीने असेही दिसते की, जगन्नाथाची पूजाअर्चा ९०० शकापूर्वी होत होती व ओरिसातील सर्व समाजबांधव जगन्नाथ रथोत्सवात भाग घेत. जगन्नाथाच्या भक्तांबरोबरच राजघराणेही या उत्सवात सहभागी होतात. लक्षणीय बाब अशी की, तत्कालीन पुरी प्रदेशावर राज्य करणार्या राजांनी राज्य आपले नसून जगन्नाथाचे आहे व आपण त्याचे सेवक आहोत, अशी भूमिका घेऊन उत्सवाचे वेळी राजा स्वत: सेवक म्हणून झाडलोट करीत असे. राज्य आपले नाही, राजाचा मालक अनुपस्थित आहे म्हणून आपण सेवाधर्माने राज्य कारभार करतो हा भाव रामायणापासून आपल्या संस्कृती, धर्म परंपरेत होता. तेच दृश्य जगन्नाथ रथोत्सवातही आढळते. आचार्यांनी ज्या चार दिशेला मठांची स्थापना केली त्यात पुरीला सुद्धा त्यांनी मठ स्थापन केला आणि तेथील पीठस्थ आचार्य रथोत्सवात सहभागी होतात.
जगन्नाथ पुरी येथे जे जगन्नाथाचे क्षेत्र आहे तेथे बलराम,जगन्नाथ व सुभद्रा आहे. पुरीची सुभद्रा भगिनी रूपात आहे. विशेषत: ती बलरामासह आहे. पुरीतील जगन्नाथ प्रकटीकरणाचे रूप अलौकिक आहे. याची अलौकिकता सरांना स्वामी विकासानंदानी सांगितलेली आहे. ते म्हणाले,एकदा भगवती लक्ष्मी देवीने भगवंताजवळ अशी तक्रार केली. आपण अहोरात्र भक्तांचाच विचार करता व आपली वाट पाहता पाहता काहीच हाती लागत नाही. तेव्हा भगवंत म्हणाले, माझे पुढील रूप पाहा. माझ्याजवळ भगवती कुमारिका सुभद्रा असेल. शेष बलराम रूपात असेल. मी रथात आरूढ असेल व मला हात असणार नाही. माझ्या भक्तांना सतत मी वाटप करतो व ते हाताने करतो. जगन्नाथ रूपात हात राहणार नाही तर दृष्टीने, गतीने, रथस्थ गतीने मी कार्य करीन.
म्हणून सर्व भक्तांना सुभद्रादेवीसह जगन्नाथ नावाने भगवान वाटप करतात व उत्साहाने, आनंदाने, प्रसन्नतेने भगवान जगन्नाथ भक्तांना मला हात नसले, तरी माझी बहीण सुभद्रा अन्नाचे, भाताचे वाटप करीत आहे. असे हे पुरुषोत्तम क्षेत्र अद्वितीय आहे. रथात जगन्नाथ नारायण आहेत व देवी सुभद्रा प्रसाद देत आहे. सुभद्रा, जगन्नाथ आणि बलराम ज्या ज्या भक्तांवर नजर फेकतात त्यांना ती अन्न देते आहे. हे सगळं अलौकिक आहे. आज Dr.David Frawley यांचे ट्विट याच अनुषंगाने आवडले. ते लिहितात,
Only in Bharat are the great Devatas honored, worshipped and travel along with us on our life-journey (Jivayatra). May we all join them in the true inner journey of consciousness to the highest Light.
जय जगन्नाथ
✍️ सर्वेश फडणवीस
#RathYatra2021 #JayJagannath
रथ आणि रथाचे चाक आयुष्याच्या गतीमानातेचे प्रतीक आहे असे मला वाटते.
ReplyDeleteछान माहितीपूर्ण लेख.