Saturday, July 31, 2021

शिवशाहीरांचा शताब्दी उत्सव - ३ !! 🚩🙏🏼


शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांचं संपूर्ण जीवन म्हणजे सामाजिक जाणिवा,नाते जपणारे,संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाशी ऋणानुबंध जपणारे आहे असं वाटतं. खरंतर सार्वजनिक जीवनात हे नाते टिकवून ठेवणे तसे अवघड आहे. पण शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या शिवशाहीरांनी हे सहजपणे स्वतःच्या देहबोलीतून करून दाखविले आहे. त्यांच्या चरित्रातून सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारे प्रसंग अद्भुत आहेत.

जात, धर्म, श्रीमंत, गरीब इत्यादी प्रकार बाबासाहेबांनी कधीच मानले नाहीत. सेवा हा एकच धर्म आणि माणूस ही एकच जात त्यांना माहीत आहे. त्यांच्या वडिलांकडून हा गुण त्यांच्याकडे आला आहे. १९४३ च्या सुमारास त्यांच्या एका मित्राच्या घरात प्लेगची लागण झाली. त्याच्या घरी कमालीचे दारिद्रय. घर कसले? चक्क गोठ्यातच तो राहत होता. बाबासाहेबांच्या वडिलांनी त्यांच्या तीनही मुलांना उचलून आपल्या घरी आणले आणि ती स्वत:च्या पायावर उभी राहीपर्यंत त्यांच्या स्वत:च्या मुलांसारखाच सांभाळ केला. बाबासाहेबांनी सारे स्वत:च्या कर्तृत्वावर मिळवले आहे, पण हृदयाच्या श्रीमंतीचा फार मोठा वारसा त्यांना आपल्या वडिलांकडून मिळाला आहे. सामाजिक काम हे त्यांच्या सहजप्रवृत्तीचा भाग आहे. पुण्यामध्ये सुरुवातीला शुक्रवारपेठेतल्या घरी राहत असताना त्यांच्या वाड्याच्या ओट्यावर एक म्हातारी बाई कोणीतरी आणून टाकली. बाबासाहेबांनी स्वच्छतेपासून खाऊ घालण्यापर्यंत तिची सर्व सेवा केली. निःस्वार्थी सेवेचा, भूतदयेचा स्रोत त्यांच्या मनात आजपर्यंत तसाच टिकून आहे. अनेकांना त्यांच्या आजारपणात आर्थिकरूपात त्यांनी मदत देऊ केली, तर कित्येक शाळा, महाविद्यालयांना, रुग्णालयांना कोट्यवधी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर सर्व जाती-धर्माचे (मुस्लिमही) विद्यार्थी त्यांच्या घरी राहून शिकून मोठे झालेले आहेत.

१९४९ मध्ये त्यांचा विवाह 'माणूस'कार श्री. ग. माजगावकर यांच्या भगिनी कुमुद यांच्याशी झाला. हीच कुमुद सोळाव्या वर्षी पुढे निर्मला बळवंत पुरंदरे या नावाने पुरंदरे कुटुंबात समरसून गेली. इतक्या लहान वयात त्यांना खूप श्रीमंती आणि खूप गरिबीही अनुभवायला लागली. शिक्षण मॅट्रिक. माहेरी संकटांचा डोंगर कोसळलेला. शेवटी त्यांच्या आजीनं ठरवलं की जे आधी येतील त्यांना मुलगी देऊन टाकायची. सगळ्या बहिणींची लग्नं तशीच झाली,बाबासाहेब आणि निर्मला पुरंदरे यांचा संसार बहरू लागला होता पुढे त्यांना तीन मुलं झाली. मोठी माधुरी. दोन नंबर अमृत आणि तीन नंबर प्रसाद.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे इतिहासवेडे होते. किल्ले फिरणारे, इतिहासाची कागदपत्रं अभ्यासत इतिहास संशोधक मंडळात पडीक राहणारे. त्यामुळे सासरीसुद्धा आर्थिक संकटं आली. त्या परिस्थितीत निर्मला ताईंनी तीन मुलांना सांभाळत संसार केला.
‘वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र’ ही निर्मला ताईंनी सुरू केलेली संस्था आहे. ग्रामीण भागात मुलींना बालवाडी शिक्षणाची कशी गरज आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, बालवाडी शिक्षिका ग्रामीण भागांतूनच तयार केल्या तर बालवाडय़ा नक्की चालतील ही निर्मला ताईंची कल्पना आहे. आज शेकडो बालवाडी शिक्षिका तेवढय़ाच बालवाडय़ा चालवत आहेत. आणि हजारो मुलं, मुली त्याचा लाभ घेत आहेत.

बाबासाहेबांना अनेक मान्यवर, सरकारी पुरस्कार मिळाले. ‘पद्मविभूषण, ‘पुण्यभूषण’, महाराष्ट्रभूषण, आणि अनेक पुरस्कारांची श्रीमंती त्यांच्या पाठीशी आहे पण निर्मला ताईंनी त्याचं भांडवल स्वत:च्या कामाच्या फायद्यांसाठी कधी केलं नाही. बाबासाहेबांच्या ओळखी कधी मागितल्या नाहीत किंवा वापरल्याही नाहीत. स्वतःच्या संस्था त्यांनी स्वत: वाढवल्या होत्या.बाबासाहेबांना त्यांच्या कामाचं कौतुक होतं. अखेर २० जुलै २०१९ ला निर्मलाताई हे जग सोडून गेल्या. त्या काळात एका स्त्रीने समाजकार्य करणे हेच अवघड काम होते पण बाबासाहेबांच्या सावलीत त्यांनी ते अवघड कार्य पूर्ण केले..

१९५१ मध्ये बाबासाहेबांनी शिवचरित्र लेखनास प्रारंभ केला. मराठी इतिहासाच्या शकावली निर्मितीसाठी पुणे विद्यापीठाच्या वतीने भारत इतिहास संशोधक मंडळात त्यांनी १९५२ ते १९६० या काळात नोकरी केली. १९५४ मध्ये त्यांनी सुप्रसिद्ध गायक व संगीत दिग्दर्शक श्री सुधीर फडके यांच्या मार्गदर्शनाखाली ९० क्रांतिकारकांबरोबर गोवा मुक्ती संग्रामात-(दादरा-नगर-हवेली) भाग घेतला. या संग्रामात वेळ मिळेल त्या वेळी आपल्या या मित्रांपुढे ते शिवचरित्रातील प्रसंग सांगत. शिवचरित्रकथनाला अशी सुरुवात झाली.

श्री.सुधीर फडके बाबासाहेबांच्या गुणांचा गौरव करताना म्हणाले
होते, "परमेश्वरानं विशिष्ट हेतू मनात ठेवून या माणसाला जन्माला घातलं आहे. शिवाजी महाराजांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाचं असामान्य कर्तृत्व साक्षात उभं करण्यासाठी तशाच चारित्र्यसंपन्न माणसाची योजना त्यानं केली आहे. सत्चारित्र्य, निरलसपणा, निःस्वार्थता, स्वातंत्र्यभक्ती, स्फूर्तिदायी तसंच लालित्यपूर्ण लेखनकौशल्य, अमोघ वाणी, मूर्तिमंत नाट्य,विषयाशी तादात्म्य  कुणालाही चटकन् आपलंसं करून घेण्याची सहजवृत्ती अशा अनेक गुणांनी मंडित अशी ही आगळी व्यक्ती हे ईश्वरीकार्य तन, मन, धनानं आयुष्यभर करीत आहेत.'' या गोवा मुक्ती संग्रामात बाबासाहेब एक स्वयंसेवक होते. दमणगंगा नावाच्या नदीच्या काठावर रखोली हे छोटेसे गाव वसलेले आहे. या संग्रामाचा एक भाग म्हणून त्यांना या भागात गार्ड-ड्युटी करावी लागलेली होती.

दमणगंगेच्या रम्य काठी, तिथली दाट झाडी, शांतता आणि बरोबरचे तरुण सहकारी यांच्या सान्निध्याने त्यांना शिवकालाचे स्मरण झाले असणे साहजिक आहे. तिथेच २ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट १९५४ च्या दरम्यान त्यांच्या तोंडून शिवाजी राजांची स्फूर्तिदायक कथा बाहेर पडली. पुरंदऱ्यांनी त्या काळात बरीच व्याख्याने दिली. हे कार्य पूर्ण करून घरी परतताना त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचेही स्मरण होणे, त्यांचे दर्शन घेण्याची इच्छा होणे साहजिकच होते. शिवाजी महाराज ऐतिहासिक काळातले स्फूर्तिदाते तर वीर सावरकर हे आधुनिक इतिहासातील सशस्त्र क्रांतीचे प्रणेते होते. रणसंग्राम करून यशस्वी झालेल्या या तरुणांना वीर सावरकर मोठ्या आनंदाने भेटले. त्यांनी सुद्धा बाबासाहेबांसह सर्वांचे कौतुक केले.

✍️ सर्वेश फडणवीस

#शिवशाहीरांची_शंभरी

No comments:

Post a Comment